गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

माध्यमांचा निलाजरेपणा

चित्रपट, मासिक आदी अनेक क्षेत्रात उतरलेल्या एका चॅनेलकडून एका फोटोग्राफर मित्राला त्याचे फोटो त्यांच्या एका फीचरसाठी वापरण्याची ’विनंती’ करण्यात आली. तो व्यावसायिक फोटोग्राफर असल्याने त्याने मानधनाची चौकशी केली. त्यावर ’तुम्हाला प्रसिद्धी मिळेल की.’ असे निर्लज्ज उत्तर त्याला मिळाले. आता आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याचे बर्‍यापैकी नाव आहे अशा कुणाला हे दीडवीत मराठी चॅनेल आणखी काय प्रसिद्धी देणार होते? त्याहूनही अस्वस्थ करणारी बाब म्हणजे प्रत्येक सेकंदाच्या बाष्कळ बडबडीला पैशात कन्वर्ट करणारी ही धंदेवाईक मंडळी सर्जनशील कामाची मात्र एक दमडी देऊ इच्छित नाही. त्यांची संपूर्ण उपेक्षा करतात. तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो ही उपकाराची भाषा करतात. 

एकुणच माध्यमे ’धंदेवाईक’ झाल्यापासून क्रिएटिव गोष्टींची, अभ्यासाची किंमत शून्य झाली आहे. माझा स्वत:चा अनुभव आहे. सकाळी नऊ वाजता होणार्‍या चर्चेबाबत एकमेव संवाद त्याच दिवशी दीड तास आधी! अगदी मोघम. नंतर शून्य संपर्क. दिवाळीचा एक मग तेवढा पोचला. नियमितपणे चॅनेल्सवर जाणार्‍या आमच्या कार्यकर्त्या, कलाकार, अभ्यासक मित्रांनाही एक पैशाचे मानधन मिळाल्याचे ऐकिवात नाही. आणि बातम्या देण्यापासून, विविध ठिकाणी बाईट्स घेणे, स्पेशल प्रोग्राम (उदा. दिवाळी अंकावर चर्चा, ज्यात मी सहभागी होतो) करणे वगैरे सगळे काही करणार्‍या यांच्या नोकरांना मात्र नियमित पगार. ते ही बिचारे मूठभर पगारावर साहेब सांगेल ते निमूटपणे सगळे करतात. 

भांड्वलशाही आणि मॅनेजमेंट फॅकल्टी स्वतंत्र होणे याचे दोन महत्वाचे दोष दिसतात. पहिला म्हणजे गुणवत्तेचा र्‍हास (दहा गोष्टी करणारा नोकर प्रत्येकीला किती न्याय देत असेल, किती उत्साहाने करत असेल?) आणि दुसरा म्हणजे मॅनेजमेंट नावाच्या अनुत्पादक जमातीला नफ्याचा मोठा वाटा. आणि याचवेळी उलट सर्जनशील व्यक्तीला निलाजरा प्रश्न, ’ तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो, आणखी काय हवे?”

वृत्तपत्रांचाही हाच प्रकार आहे. एका वृत्तपत्राचा अपवाद (ज्यांच्यासाठी मी अधूनमधून लिहित असतो) वगळता उरलेल्या तीन ते चार प्रथितयश वृत्तपत्रांनी मी लिहिलेल्या लेखांसाठी एक दमडीही कधी दिलेली नाही. बरं लेख घेतला नाही हे सांगण्याची तसदीही घेत नाही. तुम्ही त्यांच्या दारातले लाचार असल्यासारखे त्यांना दहा वेळा विचारायचे. यांची ही तर्‍हा आणि पुस्तक प्रकाशनाची तशी (दोन तीन दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली आहे). त्यामुळे खासगी मालकीची, जिथे निवड करणे न करणे, इतरांच्या हातात आहे अशा माध्यमांसाठी लिहिणे मी सोडून दिले.

सोशल मीडियावर चार ओळी लिहिल्याने प्रशंसा झालेल्या नि त्या अर्ध्या हळकुंडानेच पिवळ्या होऊन बसलेल्या नि ’पेपरमध्ये आपले नाव आले’ या बालीश आनंदाने ऊर भरून येणार्‍यांची इतकी भाऊगर्दी आहे की या माध्यमांना एक गेला दुसरा सहज मिळतो. आणि गुणवत्ता वगैरे गेली उडत, ’दीड कॉलम भरून काढायला लेख पाहिजे’ किंवा ’चर्चेत साडेतीन मिनिटे वाजवायला एक तोंड पाहिजे’ एवढ्याच धंदेवाईक अपेक्षा असलेल्यांना ’कथा पुणे, मुंबई आणि सोलापूर इथे घडते. पात्ररचना विलोभनीय आहे’ वगैरे सखाराम गटणे पातळीवरचे रिव्यू नि चर्चक मिळत असल्याने काम भागते. गुणवत्तेच्या बैलाला ढोल. सासू-सुनेच्या शह-काटशहांवरची मालिका जिथे दहा वर्षे चालते तिथे प्रेक्षकांनाही फार अपेक्षा नसतात हे उघड आहे.

एकुणात ’बेशरम सुमारांची सद्दी’ आहे. गुणवत्तेचा आग्रह धरण्यासाठी स्वतंत्र माध्यमे निर्माण करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा