शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

दोन तत्त्वांचा संघर्ष

मागेही एक दोन पुरोगामी मंडळींनी हा उल्लेख केला होता. अर्थात तो नवा नाही. मी कुरुंदकर वाचले तेव्हाही तो माझ्या कानावर आला होताच. स्वत:ला नास्तिक, अगदी मार्क्सवादी म्हणवणार्‍या कुरुंदकरांनी आपल्या मुलाची मुंज केली. हे कसले पुरोगामी? असा आक्षेप घेतला जातो. अनेकदा यावर बोलावे असे वाटले, पण आपला तर्क रुजणे सोडा, समजून घेण्याची इच्छा व्हावी अशी भूमी अजूनही तयार नाही असे तेव्हाही वाटले होते, आजही वाटते. पण तरीही लिहूनच टाकतो.

ज्या निर्णयात आपण एकटेच भागधारक नसतो तिथे आपले मत लादणे हे हुकूमशाहीचेच लक्षण आहे. ’मोठा नास्तिकपणाचा/पुरोगामित्वाचा बडिवार माजवतो आणि स्वत:च्या मुलाची मुंज केली.’ हे म्हणणाराच उलट दिशेने ती ’करायची नाही’ अशी भूमिका त्याने घेतली असती तर, ’पण त्यांच्या पत्नीचे मत करावी असे असेल तर असे हुकूमशाही पद्धतीने आपले मत लादणे हे कुठले पुरोगामित्व आहे?’ असा प्रश्न विचारणारच होता.
भारतीय स्त्रियांच्या बाबत असे म्हटले जाते की त्यांचा नवरा धार्मिक असेल तर त्यांना कर्मकांडाची सक्ती असते आणि नवरा नास्तिक असला की तिला कोणतेही कर्मकांड न करण्याची सक्ती असते. तिचा निर्णय तिने घेण्याचा पर्यायच उपलब्ध नसतो. पण जर पत्नीवर अशी सक्ती नसेल (नसेल म्हणजे काय, नसावीच! ती करण्याचा अधिकारच कुणाला नसावा.) तर तिचेही स्वत:चे एक मत असेल जे कदाचित पतीच्या मताशी मिळतेजुळते नसेल ही शक्यताही असते. (ती स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र विचार करणारी असेल तर ही शक्यता आयुष्यात अनेकदा येऊ शकतेच.) आता निर्णय घेताना या दोनपैकी एका मताला अनुसरुन घ्यायची वेळ आली तर दोघांपैकी एकाचे मत बाद होणे अपरिहार्य असते. मग ज्याचे मत बाद झाले त्याने त्या मताशी प्रतारणा केली असे म्हणावे का?

मुलाची मुंज करावी की नाही याबाबत पती नि पत्नी यांची दोन मते असली तरी अंमलबजावणी एकाचीच होऊ शकते. आणि जर पत्नीच्या मताला अनुसरुन मुंज करावी असा निर्णय झाला तर पुरोगामी पतीच्या पुरोगामित्वाला बाध येतो का? नक्कीच येतो! हे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु त्याचवेळी पत्नीला स्वतंत्र मत आहे हे मान्य करताना त्याने त्याचे विचारस्वातंत्र्याचे मूल्य जपले आहे हे ही विसरता कामा नये. ज्याप्रमाणे घातक किंवा मूठभरांचा अधिकार मानल्या गेलेल्या कर्मकांडांना विरोध हे पुरोगामी मूल्य आहे त्याच प्रमाणे व्यक्तीस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य ही पुरोगामी विचारांनी मान्य केलेली मूल्ये आहेत.

मुद्दा आपण आपली स्वीकृत मूल्ये आचरणात आणली की नाही एवढाच असावा. आणि आयुष्यात असे प्रसंग येतातच, जिथे आपलीच दोन मूल्ये परस्परांविरोधात उभी राहतात. निर्णय घ्यायची वेळ आली की तेवढ्यापुरते त्यातले एक दूर ठेवावे लागते. त्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वात अंतर्विरोध दिसतो (तो नाकारण्याचा प्रयत्नही करु नये). जगात कुणालाच तो टाळता आलेला नाही. फक्त अशी तत्त्वच्युती ही दुसर्‍या, त्याहून अधिक महत्वाच्या किंवा तुल्य अशा स्वीकृत तत्त्वासमोर दिलेली शरणागती असावी, कमअस्सलासमोरची नसावी, इतके साधले तरी खूप झाले.

इथे थोडा टॅन्जन्ट मारून मी पुन्हा माझ्या ’कट्यार काळजात घुसली’ वरील दोन दीर्घ (आणि म्हणून बहुतेकांनी लाईक करुन सोडून दिलेल्या) लेखांची आठवण करुन देतो.(त्यातील पहिला भाग वाचला तरी पुरेसे आहे.) मूळ नाटक हे सुष्टांच्या संघर्षाचे आहे. त्यातील पात्रांचे परस्पर-सौहार्द वादातीत आहे. तरीही त्यांच्यात परिस्थितीजन्य, व्यवस्थेने लादलेला संघर्ष आहे. त्यातून त्यांच्या स्वभावाशी विपरीत असे घेतलेले निर्णय आहेत, त्या निर्णयांतून येणारी वेदनाही आहे. (त्याउलट त्यावरील चित्रपट काळा-पांढरा, धार्मिक अहंगंडाचे हत्यार म्हणून वापरुन त्याचा पार चिखल केलेला.)

तसाच काहीसा प्रकार तत्वनिष्ठाच्या आयुष्यातही येत असतो. ज्या प्रकारचे वर्तन करावे असे मनापासून वाटते, त्याचे स्वातंत्र्य त्याला असेलच असे मुळीच नाही. कारण एका एका कृतीवर, निर्णयावर त्याच्या एकट्याच्या पलीकडे इतर अनेक घटकांचा परिणाम होत असतो, त्याचा विचार करुनच त्याचा निर्णय होत असतो. तो अनेकदा अनपेक्षित अशा अन्यायालाही जन्म देतो (कट्यार... - अर्थात नाटक- मधील खॉंसाहेबांचा सदाशिवला गाणे न शिकवण्याचा निर्णय) जो निर्णय घेणार्‍याला टाळता येत नाही, कारण तो अन्य घटकांनाही बाध्य असतो.

सूत्ररूपाने सांगायचे झाले तर मुद्दा समर्थन वा विरोधाचा नव्हे तर समजून घेण्याचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा