गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

पर्याय कोण?

भारतातील बहुसंख्य माणसे देवबाप्पा मेंटॅलिटीतून बाहेर येत नाहीत हीच समस्या आहे . त्यांना ’एलआयशीची कंची पॉलिशी घ्यावी?’ यासाठी एक देवबाप्पा, मानसिक स्वास्थ्यासाठी एक बुवा/बाबा नावाचा देवबाप्पा, ज्यांची ’मी काय पाप केलं म्हणून असं घडलं?’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी एक अध्याहृत देवबाप्पा, मुलाच्या/मुलीच्या करियरसाठी परिचितांपैकी एखादा देवबाप्पा... असे प्रत्येक क्षेत्रात देवबाप्पा लागतात. अडचण, प्रश्न कार्य समोर ठाकले की ’कसे सिद्धीस न्यावे?’ या ऐवजी ’कोण सिद्धीस नेईल?’ हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. मीच नेईन, आम्ही नेऊ, आपण नेऊ ही शक्यताच डोक्यात येत नाही. 

असा कुणी देवबाप्पा दिसला नाही, की एखाद्या दगडाला शेंदूर फासून ते स्वत:च तो तयार करतात. आणि त्याच्या शिरावर आपले ओझे टाकून निश्चिंत होतात. त्याने त्यांचा प्रश्न सुटेल न सुटेल, जबाबदारी नक्की टळते. मग तो प्रश्न सोडवण्यावर खल करण्याऐवजी, कृती करण्याऐवजी तो शेंदूर लावलेला दगडच माझी समस्या कशी सोडवू शकतो यावर त्या प्रश्न/ समस्या/ अडचण सोडवण्यास लागली असती त्याच्या पाचपट ऊर्जा, वेळ नि सौहार्द खर्च करत बसतात.

संसदीय लोकशाहीत प्रातिनिधिक लोकशाही आहे. तिथे पहिल्या टप्प्यात लोक आपले प्रतिनिधी निवडतात नि नंतर दुसर्‍या टप्प्यात ते आपला नेता. शिवाय मंत्रिमंडळ, ब्यूरोक्रसी, दंडव्यवस्था, न्यायव्यवस्था. संरक्षण व्यवस्था अशी लोकशाहीची उपांगे आपापले काम करत असतात. कुणी एखादा बाहुला बसवला तरीही या व्यवस्थांच्या आधारे देश व्यवस्थित चालू शकतो... एखाद्या अति-स्वार्थी, अति-महत्वाकांक्षी नेत्याने एकाधिकारशाहीच्या लालसेने त्यांना बुडवण्याचे धंदे केले नाहीत तर.

तेव्हा 'पर्याय कोण?' हा प्रश्न देवबाप्पा मेंटॅलिटीचे किंवा आपल्या नेणीवेत अजूनही राजेशाहीच आहे, लोकशाहीला आपण पुरेसे परिपक्व झालेलो नसल्याचेच लक्षण आहे.

#मंकाम्हणेआता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा