शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

सर्वेंचा सुळसुळाट आणि कावळ्यांचा कलकलाट

न्यूज चॅनेल्सनी घेतलेले मासिक ’मोदीच हीरो’ हे सर्वे त्यांच्या करमणूक पॅकेजचा भाग आहेत असे समजूनच पाहावे वा न पाहावे. ते सर्वे बरोबर अंदाज बांधतात की चूक हा मुद्दा नाही, मुद्दा त्यांचा रतीब घालण्याचा आहे (आणि त्याचा देशाच्या मतावर परिणाम घडवण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा.)

गेली साडेचार वर्षे या चॅनेल्सनी सर्वसामान्यांना पुन्हा पुन्हा ’कोण जिंकणार, कोण हरणार?’, ’का जिंकले, का हरले?’ या प्रश्नांभोवती फिरत ठेवून भरपूर करमणूक केली नि करवून घेतली आहे. निवडणुका हा सर्वसामान्यांचा पैजा लावणे नि त्यावर वाद घालणॆ याचा मुख्य आधार झाला आहे. परवाच एका राष्ट्रीय वृत्तपत्रांत कर्नाटकांत तीन नगरपालिकांत भाजप मागे पडला (#मटा च्या भाषेत ’पछाडला’) याची बातमी वाचली. सीरीयसली? नाही म्हणजे भाजप मागे पडला याने आम्ही खुश झालो हे खरं आहे (पहा, आम्हीही प्रवाहपतितच) पण ही काय राष्ट्रीय महत्वाची बातमी आहे? महाराष्ट्रात (आणि अन्य राज्यांतही) पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये हा अंदाज बांधणे, ’चर्चा’ (म्हणजे तुझी पार्टी कशी चूक, माझीच कशी बरोबर हे दोन्ही बाजूंच्या सर्वाधिक निर्बुद्धांनी एकमेकांना सांगायचे.) करणे हे सारे ’सिंहासन का सेमीफायनल’ या शीर्षकाखाली चालू असते. साडेचार वर्षांत इतक्या सेमीफायनल झाल्यात की फायनल कधी होणारच नाही की काय असे वाटू लागले आहे.

मला एक सांगा हो. इतके बारकाईने नि नियमित लक्ष कधी आपल्या स्वत:च्या आर्थिक स्थितीवर ठेवले होते का कधी? आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर ठेवले होते का कधी? मोदींचा ग्राफ वर गेला अथवा खाली गेला म्हणून अस्वस्थ होणारे लातूरला गेले वर्षभर दर आठवड्याला एकदा पाणी मिळते, (या वर्षी हे दहा दिवसांत एकदा इतके भयावह पातळीवर उतरले आहे.) यात ते लोक कसे जगत असतील याचा विचार डोक्यात होऊन त्याच्या दशांशाने तरी अस्वस्थ झाले असतील का? (या बिनडोकांनो, पुण्याच्या नावे शंख करायला या.) एखाद्या मोदी भक्ताच्या मनाला मोदींचे आमंत्रण ट्रम्प यांनी नाकारले म्हणून झाला त्याहून शतांश तरी त्रास एखाद्या माणसाला जमावाने घेरुन मारले याचा झाला का? कर्नाटकात अखेर मोदींचा वारु रोखला याचा आनंद झालेल्या मोदीविरोधकाला दोन्ही पायांना सहा बोटे असल्याने आरामदायक शूजच नसलेल्या, त्यामुळे होणार्‍या वेदना सहन करत ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या स्वप्ना बर्मनच्या यशाने झाला होता का?

कसली डोंबलाची युनिटी इन डिवर्सिटी नि कसली देशभावना. राजकारणाकडे आपण एखाद्या वीडिओ गेमसारखे पाहतो. त्या चढ-उताराचा कैफ एन्जॉय करतो. ’मग त्याचा आमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही का?’ असा तर्कापुरता दावा करताना केंद्राच्या अमुक निर्णयाचा आपल्यापर्यंत येईतो परिणाम नक्की कसा होइल याबाबत फिकीर करत नाही. मग इतरांवर काय होईल हे तर आमच्या खिजगणतीतही नसते. (यातूनच ’विकास हवा तर त्याग करायलाच हवा.’ हे ’कुणाचा?’ आणि कुणी या दोन प्रश्नांना सफाईने बगल देणारे बेशरम वक्तव्य करण्याइतका निलाजरेपणा अंगी मुरतो.) इतर करमणुकीकडे वळताना गेम बंद करुन टाकावा तसे हा गेम बंद करुन टाकतो.

गावात शिक्षण, कौशल्य वा इच्छा नसल्याने हाताला काम नसलेले तरुण आणि बाद झालेले म्हातारे जसे पारावर बसून सदोदित अमेरिकेच्या (लोकांची लफडी चघळायला मनापासून आवडणार्‍या भारतीयांचा लेविन्स्की प्रकरणापासून फेवरिट झालेल्या) बिल क्लिंटन पासून ते चीन सारखी एकाधिकारशाही पायजे’ वगैरे वाट्टेल त्या विषयावर एखाद दोन बिडीच्या आधारे चर्चांचा फड रंगवतात, मध्येच एखादी गावची पोरगी वा स्त्री जाताना दिसली की चर्चा थांबवून तिला निरखूऽन पाहातात, ती निघून गेली की पुन्हा चकाट्या पिटू लागतात तसे आपले झाले आहे. दोन ते अडीच जीबी डेटा आणि चघळायला मोदींचं पारडं अजून जड झालं की हलकं यावर पुन्हा पुन्हा चर्चा करणार्‍यांना महत्वाच्या विषयांवर चर्चा, खल वा कृती करण्यासाठी कुवत वा इच्छा नसल्याने देश या दोन गोष्टींच्या अफूच्या धुंदीत राहतो.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा