रविवार, १७ मार्च, २०१९

अखंड हिंदुस्तानची पोपटपंची

आता इंद्रेश भैया म्हणालेच आहेत '२०२५ मध्ये पाकिस्तान भारतात असेल'; तर माझ्या संघी मित्रांना नेहमी विचारतो तो प्रश्न विचारतो. ते नेहमीच मोदींसारखे उत्तर टाळतात. बघू आज तरी उत्तर मिळते का.

---

२०१६ च्या आसपास भारताची लोकसंख्या होती १३० कोटी पैकी सुमारे १४ टक्के (म्हणजे अंदाजे १९ कोटी) मुस्लिम लोकसंख्या आहे. आणि संघ-भाजपचे म्हणणे आहे की मुस्लिमांमुळे ’हिंदू खतरेमें है’.

त्याच वेळी पाकिस्तानची लोकसंख्या आहे सुमारे २० कोटी. यात सुमारे ९५ टक्के, म्हणजे १९ कोटी मुस्लिम आहेत. हिंदू नगण्य आहेत.

आता जर संघ वा मोदीकृपेने पाकिस्तान भारतात विलीन करुन घेतला गेला तर भारताची एकुण लोकसंख्या होईल अंदाजे १५० कोटी आणि त्यात मुस्लिम लोकसंख्या असेल ३८ कोटी... म्हणजे सुमारे २५%!

आज १४ टक्के मुस्लिमांमुळे जर हिंदू खतरेमें असेल तर २५% मुस्लिम असलेल्या समाजात तो अधिक सुरक्षित असेल की खतरेमें*? लव्ह जिहाद वगैरे वाढेल की कमी होईल?

बरं त्या आसिंधुसिंधु मध्ये पूर्व पाकिस्तान पण आहे म्हणे. तर तो बांग्लादेशही यात घेऊ. (यांचा डॆटा जरा जुना आहे. पण प्रपोर्शनसाठी घेऊ या.) तिथे २०११ च्या गणनेनुसार सुमारे साडेचौदा कोटी मुस्लिम आहेत आणि अंदाजे दीड कोटी हिंदू आहेत.

आता हे जमेस धरले तर भारताची लोकसंख्या होईल सुमारे १६६ कोटी, मुस्लिम लोकसंख्या सुमारे ५२ कोटी म्हणजे सुमारे ३१ टक्के !!

३१ टक्के मुस्लिम असलेला देश कोणत्या अर्थाने ’हिंदु’स्थान म्हणायचा मग?

---

तर हे भलतेच अडचणीचे आहे. म्हणजे आता पाकिस्तान नि बांग्लादेश तर आमचा आहे... म्हणे, तो मिळवला तर पाहिजे. पण हे वैट्टं लोक आपल्या देशात कसे सामील करुन घ्यायचे?

मग आता यांचे काय करायचे म्हणता?

प्रश्न १. आहेत तसे सामील करुन घ्या आणि त्यांना शाखेत घेऊन त्यांचे प्रबोधन करुन त्यांना देशभक्त बनवा.

प्रश्न २. सामील करुन घेण्याच्या रणधुमाळीतच त्यांचे शिरकाण करा नि फक्त जमीनच काय ती सामील करुन घ्या.

उपप्रश्न:

अ. या लढाईसाठी लागणारे मनुष्यबळ नि पैसा यापैकी तुम्ही किती नि कसे कॉन्ट्रिब्युट करणार?

ब. की पुन्हा ’देशासाठी कुणीतरी त्याग करायलाच हवा’ असे म्हणत बहुजन समाजातील एक पिढी यात खर्ची घालून,
आपण आपली राष्ट्रभक्ती फक्त व्हॉट्स अ‍ॅप आणि दसर्‍याच्या संचलनापुरती मर्यादित ठेवणार आहोत?

प्रश्न ३. माणसे नि जमीन सामील करुन घ्या, पण त्यांना बाटवून हिंदू करावे.

उपप्रश्न:

अ. त्यांना जात कोणती द्यावी?

ब. की समस्त मुस्लिम ही नवी जात निर्माण करावी? पण तसे झाले तर ते ’समरस’ कसे होणार?

क. की समाजाचा एक भाग जसा शूद्र बनवला तसे त्यांना कायमचे शूद्र बनवून टाकायचे?

ड. आणि याचे हो असे उत्तर असेल तर प्रातिनिधिक लोकशाहीत त्यांना मतदानाचा हक्क नाकारायचा का? कारण तो दिला की त्यांना हवे ते कायदे करुन घेणारे प्रतिनिधी - देशद्रोही खांग्रेसी आहेतच त्यांना मदत करायला - ते निवडून आणू शकतात.

ई. समजा तो हक्क नाकारला तर आजच्या पाकिस्तानचे नि बांग्लादेशचे सारे प्रांत विधिमंडळाखेरीज केवळ केंद्रशासित ठेवायचे का? थोडक्यात देशाचा जवळजवळ ३० टक्के भूभाग हा केंद्रशासित असेल का?

फ. की तोवर सारा देशच केंद्रशासित असेल, राज्य विधिमंडळ वगैरे बाष्कळ प्रकारच नसतील नि त्यामुळे हा प्रश्नच गैरलागू होईल?

---

ता.क.
आकडे ढोबळ आहेत. तेव्हा पाकिस्तानात १९ कोटी नव्हे १९.०२३ कोटी मुस्लिम आहेत वगैरे शहाणपण घेऊन येणार्‍यांना ’हळद’ देण्यात येईल.

---

(*अर्धवट अकलेच्या स्वयंघोषित पुरोगाम्यांसाठी:
हे ’त्यांच्या’ दृष्टीकोनातून म्हणतोय. नाहीतर बावळटासारखे अडवानींची बाजू घेऊ नका म्हणत धावत आला होतात तसे ’बघा काळॆ छुपे संघी आहेत’ म्हणत धोतर सुटेतो नाचत सुटाल. तसे म्हणायला हरकत काहीच नाही, फक्त आपापलं धोतर/लुगडं सांभाळून म्हणा म्हणजे झालं.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा