शनिवार, ९ मार्च, २०१९

या भक्तांनो परत फिरा रे

तरी भक्तांना सांगत असतो, बाबानो जरा दमानं. चोरी होऊ देणं कशी मास्टरस्ट्रोक होता, सापळा होता म्हणून जरा कुठं शड्डू ठोकू लागले इतक्यात चोरी झालीच नाही म्हणून तोंडावर पाडलं ना वकीलानं? अरे डिजिटल डेटा सिक्युरिटी कॉंक्रीट भिंतीच्या आड असल्याने सुरक्षित आहे असे विधान करणारा वकील निवडलाय तुम्ही. आता पाटी पुसून नवा धडा लिहिणं आलं.

बाबांनो, आपलं सरकार यु-टर्न सरकार आहे हे विसरु नका. आधार पासून नोटाबंदी पर्यंत इतके यु-टर्न झाले की सुरुवात कुठून झाली होती हे ते स्वत:देखील विसरले असतील.

आपलं सरकार कम्पल्सिव लायर आहे हे थेट नेहरु पटेलांच्या अंत्यविधीला हजर नव्हते’ पासून सिद्ध झाले आहे.
आपल्या सरकारला इतिहासाचे किती अगाध ज्ञान आहे हे त्यांनी एका शतकातल्या व्यक्तीला दुसर्‍या शतकातील व्यक्तीची भेट घडवून सिद्ध केले आहे.

त्यांची वैज्ञानिक दृष्टी आपण गटारगॅस प्रकरणात पाहिली.

आपली पदवी गुलदस्त्यात ठेवलेल्या नेत्याला शिक्षणाची आच किती आहे ते टाटांच्या TIFR आणि TISS या दोन अत्यंत महत्वाच्या शिक्षण नि संशोधन संस्थांचे अनुदान कमी करुन, दुर्गम भागातील शाळा ’तोट्यात’ चालतात असा धंदेवाईक विचार करुन बंद केल्या त्यातून दिसले. याच वेळी काशीतील विश्वनाथ कॉरिडॉर साठी सहाशे कोटी, साडेतीन हजार कोटी पुतळा उभारण्यासाठी खर्च झालेले आपण पाहिले

संस्कृतीच्या डिंगा मारतानाच ’पचास करोड की गर्लफ्रेंड’ म्हणण्यापासून सुरुवात करत डिस्लेक्सिक व्यक्तींची टवाळी करण्यापर्यंत मजल मारलेली आपण पाहिली.

राष्ट्रभक्तीचा झगा घालून लष्कराची ठेकेदारी करतानाच ’व्यापारी जवानापेक्षा अधिक रिस्क घेत असतो’ म्हणत आपल्या निष्ठा वास्तविक कुठे आहेत हे उघड करताना आपण पाहिले.

शस्त्रास्त्रे, विमाने, इन्शुरन्स, विमानतळांचे ठेके, वीज-वितरण सार्‍याच क्षेत्रात फक्त अडानी नि अंबानी ही दोनच नावे (५९ मिनिटांत कर्ज नावाच्या फ्रॉड प्रकरणात कॅपिटा वर्ल्ड ही पुन्हा ’आपणो माणस’ ची कंपनी) का दिसतात असा प्रश्न का पडत नाही. गुजरात सोडून देशात दुसरीकडे कुठेच कंपन्या नाहीत का? राष्ट्रभक्तीचे चालते-बोलते उदाहरण म्हणून संस्कृतीचे ठेकेदार ज्यांच्या नावे बेटकुळ्या दाखवतात त्या टाटांचे नाव कुठेच कसे दिसत नाही यात?

---

संवेदनशील विषयावरच्या खटल्यात कधी सरकार टायपो झाला म्हणते, लगेच तुम्ही टायपो झाला म्हणालात.
मग ते म्हणते ’नै नै, न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला’ की तुम्ही खाली डोकं वर पाय करुन मैलभर लेख लिहून ते सिद्ध करत बसलात.

मग सरकार म्हणाले की ती कागदपत्रे अर्धवट छापली आहेत ’द हिंदू’ ने (म्हणजे ती खरी आहेत हे अप्रत्यक्षपणे कबूल केले). ही घ्या खरी म्हणून कुणाला तरी छापायला देते. तुम्ही ती घेऊन नाचू लागता.

आता न्यायालयात एजी म्हणतात, कागदपत्रे चोरलेली आहेत. की तुम्ही लगेच तो कसा विरोधकांना चोरी कबूल करण्यासाठी मारलेला मास्टरस्ट्रोक आहे वगैरे- माझी खात्री आहे मनातून तुम्हाला न पटलेला, स्वत:च्याच पेकाटात एक लाथ घालावी असे वाटत असतानाही अपरिहार्यपणे द्यावा लागणारा डिफेन्स घेऊन येता.

मग कुणीतरी म्हणतं नाही नाही. चोरली नव्हे चोरली ’असावीत’. अरे बाबांनो मग चोरली हे नक्की माहीत नाही तर ती विचारात घेऊ नये अशी मागणी कशाच्या बळावर केली?

आता एजी पुन्हा म्हणताहेत, चोरली नाहीत, कॉपी केलीत. आता वरुन आलेला नव्या डिफेन्सचा ड्राफ्ट घेऊन तुम्ही कॉपी-पेस्टचा धडाका उडवाल.

कधीतरी शांतपणे विचार करा. आपण कुठे होतो नि आपलं आज असं माकड का झालंय. जितक्या लवकर आपला अपेक्षाभंग झाला आहे हे उघडपणे (मनातून अनेकांना एव्हाना ते मान्य झाले असेल) मान्य कराल तितके हा आक्रमकपणॆ इतरांना नि स्वत:ला ’मी अजूनही बरोबरच्चं आहे’ पटवत बसण्याच्या कष्टांतून नि मानसिक त्रासातून बाहेर याल.

कुणी एक देव आहे इतक्या माथेफिरुपणे त्याच्या मागे गेलात तुम्ही. तो तसा नाही हे मान्य केले, म्हणजे लगेच तो दानव आहे असेही सिद्ध होत नाही. फक्त तो नि आपणही माणसे आहोत, सोबत जगताना माथेफिरुप्रमाणे न जगता माणसासारखे राहू शकू इतकं नक्की.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा