शनिवार, २ मार्च, २०१९

भस्मासुराच्या भस्मासुरांचा उदय - २

भारताचे आयआरएस उपग्रह (बहुतेक २०१४ नंतरच विकसित झाले नि तेव्हाच विकसित झालेल्या टाईम-मशीनने काळात मागे नेऊन लॉंच केलेले) ५ बाय ५ मीटरपर्यंत अचूक इमेज घेऊ शकतात. अमेरिकेसह अनेक देश आपल्या उपग्रहांच्या इमेजेस वापरतो (माझी माहिती किमान दहा वर्षे जुनी आहे. आता अ‍ॅक्युरसी अधिक वाढली असेल.) आणि त्यांना दिवस आहे की रात्र याने फरक पडत नसतो. असे असताना ३५० माणसे मारल्याच्या सोडा हल्ल्याचे नुकसान दाखवणार्‍या कोणत्याही इमेजेस - आपल्या देशाने वा अन्य देशाने - प्रसृत केलेल्या नाहीत.

परकीय माध्यमांनी हल्ल्याच्या ठिकाणी इतकी हानी झाली असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ते खोटारडे आहेत नि भारतावर ’जळतात’ वगैरे शाळकरी समज आपण करुन घेऊ या. (पण नव्या सरकारच्या मुत्सद्देगिरीने थेट अमेरिकेचे सरकार नमते, इम्रान लाचार वगैरे होतो म्हणॆ. मग इतकी पॉवर असून आंतरराष्ट्रीय माध्यमे अशी प्रेषित-द्रोही कशी काय राहू दिली बुवा.) पण इमेजेस वा अन्य मार्गाने या नुकसानीला कॉरोबोरेट का केले जात नाही? एकाच वेळी सार्‍यांची तोंडे बंद होतील. (आयटी सेल ला इमेजेस बनवता येतात. फक्त त्यात तुमच्याबरोबर लष्कराचीही अब्रू पणाला लावाल हे विसरु नका.) 

समजा ३५० माणसे मारली पण तिथे त्याचा मागमूस दिसत नाही म्हणजे हल्ला झाल्यापासून दिवस उजाडेतो (बालकांना वाटते उजाडल्यावरच फोटो काढता येतात.) पाकिस्तानने तो सारा परिसर एकही मृतदेह सापडू नये इतका साफ केला? भलतेच कार्यक्षम दिसते पाकिस्तानचे लष्करी सहाय्यक दल. आणि इतकी माणसे मेली, तर त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले असेल? आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्यांच्यापैकी एकही सापडू नये. बरे ते सगळे अकार्यक्षम आहेत, निदान आपल्या रिपब्लिक टीवी, झी टीवीने तरी त्यांच्या शोध घेऊन कोण कुठे ते आम्हाला सांगू नये?

परवाच्या पोस्टमध्ये म्हटले तेच पुन्हा म्हणतो. या स्ट्राईकचा उद्देश नि व्याप्ती ही क्षमता सिद्ध करण्यासाठीच होती. तो डावपेचांच्या राजकारणाचा (आंतरराष्ट्रीय, भारतातील निवडणुकांचे नाही!)एक भाग होता. त्याचे यशापयश किती माणसे मारली यावरुन मोजणारे बिनडोक आहेत इतकेच. आपण आधी बेताल दावे करायचे आणि लष्करी नि मुलकी अधिकार्‍यांना पुरावे देण्याच्या मागणीला सामोरे जाण्याच्या खिंडीत अडकवायचे हे स्वत:ला देशभक्त समजणार्‍या देशद्रोह्यांचेच पाप आहे.

त्यात माध्यमे हातात असलेल्या मद्यधुंद मर्कटांच्या लीला तर अगाधच होत्या. भस्मासुर जसा आपल्या निर्मात्याच्याच डोक्यावर हात ठेवू बघू लागला तसे आता मोदीभक्तांचे झाले आहे. मोदींना काय म्हणायचे आहे हे भक्तच ठरवतात नि उलट मोदींना त्याच्या सुसंगत भूमिका घ्यावी लागते आहे असे मला वाटू लागले आहे. थोडक्यात ज्या टोळक्याच्या जिवावर मोदी सत्ता-स्वार झाले ते टोळकेच आता खोगीर टाकून मोदी-स्वारी करु लागले आहे. ते लगाम खेचतील त्या दिशेला वळणे मोदींना भाग पडते आहे. नेत्याचे रूपांतर अनुचरामध्ये झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा