शुक्रवार, ८ मार्च, २०१९

भारतीय परिप्रेक्ष्यात अ‍ॅनिमल फार्म

कायमचा परागंदा झालेल्या #स्नोबॉल चा बागुलबुवा दाखवून ऑर्वेलचा #नेपोलियन सार्‍या प्राण्यांना आपण म्हणेल तेच मान्य करण्यास भाग पाडे.

सध्या पन्नासेक वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या नेहरुंच्या नावे चाललेला शिमगा ऐकला की मला नेहमी स्नोबॉलची आठवण होते.

ज्या #ओल्डमेजरच्या प्राण्यांच्या राज्याचे स्वप्न नेपोलियन आणि स्नोबॉल मिळून साकार करतात तो ओल्ड मेजर अडगळीत पडून अखेर कोणत्याही अधिकाराशिवाय मृत्यु पावतो.

आमच्याकडील ओल्ड मेजरला ज्यांच्याकडून बिलकुल सल्ला घेत नाही अशा सल्लागार मंडळात टाकून दिले आहे. ऐंशी उलटलेला ओल्ड मेजर सत्तेविना निजधामास जाईल अशीच चिन्हे आहेत.

या नेपोलियनचा #स्क्वीलर नावाचा एक प्रॉपगंडा मिनिस्टर होता. नेपोलियन स्वत: काहीच बोलत नसे, स्क्वीलर हाच त्याच्या वतीने प्राण्यांना सारे समजावून सांगे.

आपल्या नेपोलियनचाही एक स्क्वीलर आहे नि त्याच्या हाताखाली प्रॉपगंडा सैनिकांची फौज आहे. सुरुवातीला ठरवलेल्या अच्छे दिन, पंधरा लाख, विकास, ४० रु डॉलर वगैरे सात कमांडमेंट्स यांच्याच कृपेने आपल्याला सतत बदलताना दिसतात.

प्रॉपगंडाशिवाय नेपोलियनची भिस्त त्याने जन्मत:च ताब्यात घेऊन ’ट्रेनिंग दिलेल्या’ नऊ कुत्र्यांच्या मसल-पॉवरवर असते. याच्यासाठी ’#अगदीबकवासविद्यार्थीसंघटना’ आहे. नेपोलियनला प्रश्न विचारणार्‍यांना ठोकून काढण्याचे काम ते इमानेइतबारे करत असतात.

नेपोलियनचे तिसरे हत्यार होते कामचुकार पण एकनिष्ठ #शेळ्यांची टोळी. तथाकथित मीटिंगमध्ये कुणी प्रश्न विचारतो आहे असे वाटले की या शेळ्या ’फोर लेग्ज गुड, टू लेग्ज बॅड’चा जयघोष सुरु करत नि त्याला बोलण्यापासून रोखत.

आता शेळ्या कोण हे ही मीच सांगायला हवे?  ;)


या शेळ्यांपैकीच काही जण #बॉक्सरची - धन्याशी एकनिष्ठ राहात, हेतूचा विचार न करता आज्ञापालन करत मरेपर्यंत मेहनत करणार्‍या घोड्याची - भूमिकाही पार पाडताना दिसतात.

’इथे भरपूर काम केले की मेल्यावर शुगरकॅंडी माउंटन नावाच्या स्वर्गात सारी सुखे मिळतील’ असे सांगणार्‍या ’#मोझेस’ नावाच्या कावळ्याची भूमिका पार पाडायला तर आमच्या नेपोलियनकडे भगव्या कपड्यातील माणसांची फौजच आहे.

आपल्यावरचा प्राण्यांचा रोष जरा जास्तच वाढला की #मि.जोन्स याच्या सोबत कट करुन स्नोबॉल आपला फार्म परत माणसांच्या ताब्यात देणार आहे असा कांगावा नेपोलियन करे.

आपल्यावरचा रोष वाढला की कॉंग्रेसचे लोक पाकिस्तानशी हातमिळवणी करुन ’त्यांच्या’ हाती सत्ता देऊ पाहात आहेत असा कांगावा याच जातकुळीचा.

जोवर आपल्याला विविध रंगी रिबिन्स बांधून नटायला मिळते आहे तोवर हे राज्य कल्याणकारी आहे असे समजणार्‍या #मॉली नावाच्या घोडीची भूमिका, पोटे तुडुंब भरलेली असल्याने ’फूटपाथ रंगवले, त्यावर नवी बाकडी’ टाकली की आपली सिटी स्मार्ट झाली असे समजणारी सुस्थितीतील मध्यमवर्गीय माणसे पार पाडत आहेत.

आणि सर्वात महत्वाचे:
काहीतरी चुकतंय खरं, पण नक्की काय ते समजत नसलेल्या आणि म्हणून ’जे चालले आहे ते चालू द्या’ म्हणणार्‍या अस्थिर बुद्धीच्या ’#क्लोव्हर’ ची भूमिका बहुसंख्य भारतीय इमानेइतबारे पार पाडत आहेत.

#WeLiveInAnimalFarm
#ItsNotJustCommunismStupid

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा