बुधवार, १७ एप्रिल, २०१९

भक्तराज चोळामोळा

एका कार्यक्रमात एका बर्‍याच जुन्या मित्राची, अनेक वर्षांनंतर गाठ पडली. इतक्या वर्षांत आमचा अजिबात संपर्क नव्हता.

कार्यक्रमानंतर चहापान नि गप्पा चालू असताना त्याच्या शर्टच्या बाहीवर एक काळा डाग दिसला म्हणून त्याला चटकन म्हणालो ’अरे तुझ्या बाहीवर डाग पडला आहे...’

माझे वाक्य पुरे होऊ न देता तो त्वेषाने उद्गारला, ’तुझा तर पुरा शर्ट काळा आहे.’

त्याचा त्वेष थोडा निमाल्यावर त्याला विचारले, ’तू मोदी-समर्थक का रे?’

अठ्ठावीस इंची छाती फुगवून तो म्हणाला, ’अर्थातच! तुम्ही कितीही आपटा, येणार तर मोदीच.’

मी हसलो. विषय बदलले, चर्चा पुढे सुरु झाली.

थोड्या वेळाने त्याला शंका आली म्हणून त्याने विचारले, ’तू कसे ओळखलेस मी मोदी-समर्थक आहे म्हणून?’
म्हटलं, "समोरचा काय सांगतो आहे ते पुरे न ऐकता, त्याचा हेतू लक्षात न घेता, तो आरोपच करणार हे गृहित धरुन, त्वेषाने प्रत्यारोप केलास. दुसरे, मी काळाच शर्ट घालून आलो आहे. शिवाय माझे आडनावही काळेच आहे. तेव्हा माझा ’शर्टही काळा आहे’ हा तसा प्रत्यारोप म्हणूनही फोलपट आहे. तिसरे, समोरच्याने प्रश्न विचारल्यावर समोरचा विरोधकच आहे असे गृहित धरुन ’कितीही आपटा’चा प्रतिसाद आपटलास. तेव्हा तू मोदी-समर्थकच असू शकतोस हे त्रिवार पुराव्याने शाबीत झाले…"

”... पण तरीही तू काही पुरेसा कट्ट्र्र्र्र मोदी-समर्थक नाहीस." मी पुढे पुस्ती जोडली.

तो उखडला नि ’कशावरुन?’ असा नव्या त्वेषाने विचारता झाला.

"कारण तू ’तुम्ही' कितीही आपटा म्हणालास, ’तुम्ही खांग्रेसी' कितीही आपटा... असे म्हणाला नाहीस. समोरुन प्रश्न विचारणारा मोदी-विरोधक असतो हे गृहित धरण्याची पहिली टेस्ट तू पास केलीस, तरी प्रत्येक विरोधक हा खांग्रेसीच समजायचा असतो हे मात्र तू विसरलास. तेव्हा तू पुरेसा ष्ट्रांग मोदी-समर्थक नाहीस हे सिद्ध झाले."

आयुष्यात माझे तोंड पुन्हा न पाहण्याची प्रतिज्ञा करुन तो - अर्थात बिल न देता - चालता झाला.

(’भक्ताची व्यवच्छेदक, उच्छेदक आणि उत्तेजक लक्षणे’ या लेखातून)

---
(कथा, प्रसंग व पात्र काल्पनिक. यातील पात्राचे कोणत्याही जिवंत व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजू नये. कारण अशी पात्रे जागोजागी सापडतील.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा