सोमवार, २२ एप्रिल, २०१९

साहित्यिक अ‍ॅटमबॉम्ब

"तो अ‍ॅटमबॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात एक वेल्डर म्हणून नोकरीला होता."

एका कथेमध्ये हे वाक्य वाचले आणि मरता मरता वाचलो. आईच्यान सांगतो, मी एका काना-मात्रेचाही फरक केलेला नाही.

लगेच पुढचा देखावा माझ्या डोळ्यासमोर... चुकलो, मन:चक्षूंसमोर आला.
---

मोगॅंबोच्या बेटावर हा अ‍ॅटमबॉम्बचा कारखाना आहे. रात्रीच्या वेळी मांडवा बंदरातून या बेटावर गुपचूप येणार्‍या होड्यांमधून दणादण युरेनियमच्या पेट्या उतरवून घेतल्या आहेत. पण त्यापूर्वी अर्धी-अर्धी नोट जुळवून आयात नि निर्यात या दोन्ही बाजूंच्या किरकोळ प्रकृतीच्या दाढीवाल्यांनी एकमेकांना अंगठे उंचावून दाखवले आहेत.
इकडे कारखान्यात अणुबॉम्बची असेम्ब्ली लाईन चालू आहे. तासाला शंभर या वेगाने अणुबॉम्ब तयार होत आहेत. आमच्या कथेतले हे पात्र डोळ्यावर काळा गॉगल चढवून दणादण वेल्डिंग करते आहे. असेम्ब्ली लाईनच्या शेवटी येऊन पडलेले बॉम्ब पटापट उचलून खोक्यात ठेवणारे वीर त्याच्या भोवती थर्माकोलचे पॅडिंग लावण्यास विसरत नाहीत. इतक्यात त्यांच्यापैकी एकावर त्याचा ठेकेदार ’इथे बिड्या ओढू नकोस, बॉम्ब फुटेल नि मरु सगळे’ म्हणून खेकसतो आहे.

आत चकाचक वॉर-रुममध्ये मोगॅम्बो कोणा-कोणाच्या ऑर्डर पुर्‍या झाल्या कोणत्या पेंडिंग आहेत याचा हिशोब घेतो आहे. किम-जॉंग-इल आणि ट्रम्प यांनी यावेळी कमी ऑर्डर दिल्यामुळॆ ’मुख्य कष्टमर्सचे बिलिंग कमी होऊ लागले तर क्वार्टरली टार्गेट कसे अचिव होणार?’ असा जाब विचारतो आहे. त्यावर ’पण यावेळी मोदींकडून जास्तीची ऑर्डर येते आहे. आणि हे इम्रानच्या कानावर जाईल याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे तिकडूनही मोठी ऑर्डर मिळू शकते.’ असा दिलासा त्याचा ’ऑर्डर्ली’ देतो आहे...

च्यामारी बघता बघता एक कथा खरडून काढली. हाय काय न नाय काय. अन् म्हणे मराठी लेखनाला वैश्विक परिमाण नाही. समीक्षक कुठले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा