गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

शहाणपण: रुजणारे काही, मिरवणारे काही

सिंहावलोकन:  http://ramataram.blogspot.com/2016/05/MyIsm.html
---

हा लेख जरी त्यावेळी स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवणार्‍यांच्या आरोपाला प्रतिसाद म्हणून लिहिलेला असला तरी त्याची व्याप्ती बरीच आहे. इथे जसे सवर्णांनी आंबेडकरवादी असणे ही सतत सिद्ध करत बसण्याची तक्रार आहे तसेच:

१. मुस्लिमांनी देशभक्त असणॆ सतत सिद्ध करावे लागते. आणि तसे असले तरी एक मुस्लिम गुन्हेगार वा दहशतवादी सापडला की ज्याच्या जाती/धर्मात महामूर गुन्हेगार आहे शी व्यक्ती देखील त्याच्याकडे संशयाने पाहणे सुरु करते.

२. ब्राह्मणाने पुरोगामित्व सतत सिद्ध करत राहावे लागते. स्वत: अब्राह्मण असल्याने जन्मजात पुरोगामी आहोत असे समजणार्‍या प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात जी परस्परविरोधी असू शकतात. त्या सार्‍यांशी एकाच वेळी सहमती दाखवावी लागते. नाहीतर ज्याच्याशी असहमती दाखवतो तो त्याचा’ छुपा मनुवादी वा संघवादी’ म्हणून ’सत्कार’ करतो. पुढच्या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत होऊन अन्य कुणाशी असहमती झाली की सत्काराची जबाबदारी तो उचलतो.

३. गुन्हेगार जमाती म्हणून ब्रिटिशांनी शिक्का मारलेल्या जातींमधला कुणी स्वकष्टाने प्रगती करुन मोठा झाला तरीही पुन्हा असहमतीच्या क्षणी त्याच्या जातीचा उद्धार त्याला सहन करावा लागतोच. त्या धोक्याचा विचार करुन आयुष्यभर त्याला सतत आपल्या मुळांपासून दूर झाल्याचे सिद्ध करत राहावे लागते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपल्या समाजापासून तो दूर जातो आणि ’आता तू बामण झालास.’ हा आरोप स्वजातीयांकडून सहन करावा लागतो.

४. ९५ - ९९ टक्के सहमत असलेला उरलेल्या एक वा पाच टक्क्यावर असहमत असेल तर लगेच तो ’छुपा तिकडचा’ ठरतो (तो आपल्या जातीचा, धर्माचा नसेल तर मग नक्कीच). हा अनुभव स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून अधिक येतो. ते तुम्हाला जवळ करण्यापेक्षा दूर ढकलण्यास अधिक उत्सुक असतात.

... यादी भरपूर लांबेल. तूर्त इतके पुरे.

कोणतही इझम परिपूर्ण नसतो तसेच तो ब्लू-प्रिंट स्वरुपात, काटेकोर नसतो. त्यातही मूल्यमापनाचे सापेक्षत्व अनुस्यूत असतेच. संस्कृती, विचार नि विचारव्यूह हे प्रवाहीच असावे लागतात. एकच नाव मिरवणार्‍या विचारधारेच्या विविध प्रवाहांत भौगोलिक, सामाजिक, कालसापेक्षता असतेच. रशियातल्या कम्युनिजमची जातकुळी वेगळी नि चीनच्या वेगळी. क्यूबामधला आणखी तिसर्‍या प्रकारचा. त्यांच्यात परस्परात अंतर्विरोध असणारच. हिंदू धर्म या नावाने काही संघटना काहीतरी अभंग, एकसंघ आहे असा दावा करतात त्या परंपरांमध्ये तर प्रचंड अंतर्विरोध आहेत. त्या उपप्रवाहांचेही पुन्हा परस्पर-संघर्ष होतच राहतात. उदा. सध्या शाकाहाराचे हुकूमशहा तो उरलेल्या हिंदूंवर लादू पाहात आहेत.

दुसरे असे की मी अमुकवादाचा वा तमक्या विचारवंताच्या मांडणीचा अभ्यास केला आहे म्हणजे तो मला तंतोतंत समजला आहे आणि मी तो तंतोतंत आचरणात आणतो आहे हा समज एका बाजूने भाबडेपणाचा आणि दुसर्‍या बाजूने धूर्तपणाचा असतो. बहुसंख्य मंडळी ज्या विचाराची मांडणी करतात तो विचार ते आचरणात आणत असतीलच असे नाही. याला त्यांची विचारांची समज, कुवत, गाफीलपणा, परिस्थिती, ज्यांच्याशी सहजीवन जगावे लागते अशा इतरांच्या विचार-वर्तनामुळॆ पडणारी बंधने अशी अनेक कारणे असू शकतात.

हे सारे लक्षात न घेता स्वत:च स्वत:ला ठेका बहाल करत ’हे आमच्या संस्कृतीत/विचारात बसत नाही.’ म्हणणारे दुराग्रही किंवा अज्ञानी असतात.

मी अमुकवादी आहे हे केवळ झेंडा मिरवणॆ आहे.जात, धर्म आणि स्वीकृत इझम याचा गजर करणे, त्याच्या अस्मितेच्या ढेकरा देणे हे कम-अस्सल लोकांचे काम आहे. ज्यांना शहाणपण रुजवून दाखवता येत नाही ते मिरवून दाखवतात इतकेच.

-oOo-

1 टिप्पणी: