शनिवार, २० एप्रिल, २०१९

प्रिय विकास...

प्रिय विकास,

असशील तिथून ताबडतोब निघून ये. तुला कुणी काही बोलणार नाही.

तू गेल्यापासून अडवानी आजोबा त्यांना नेमून दिलेल्या अंथरुणावरुन उठून तुरुतुरु चालू लागले आहेत.

तू गेल्यापासून तुझ्या पप्पांनी गहिवरुन रडू येऊ नये (लगेच फुरोगामी ’रडले का?’ म्हणून टिंगल करतात) म्हणून जाहीर सभेत तुझे नाव घेणे सोडले आहे. नेहमीचे मश्रूम न खाता ते देशी मातीत उगवलेले स्वस्तातले मश्रूम खात आहेत. काल तर चक्क तीन तीन कॅमेरे समोर असून ते एकाकडेही ढुंकून न पाहता सभेच्या व्यासपीठावर गेले.

तू गेल्यापासून चाणक्य काका देशभरातले सारे गल्ली-बोळ पालथे घालत आहेत (निवडणुकीसाठी, असा कुत्सित आरोप सहन करुन). तू न सापडल्याने सीबीआय, ईडी, आयटी डिपार्टमेंट्स सह देशाच्या दंडव्यवस्थेतील सर्व विभागांना त्यांनी विरोधकांच्या मागे लावले आहे. विरोधकांनी लपवून ठेवलेला आमचा विकास शोधून काढला नाहीत, तर तुम्हाला न्यायाधीश होण्याची शिक्षा देईन असा सज्जड दमच त्यांनी दिला आहे.

तू गेल्यापासून योगीकाका ’याऽ हूऽ. आता हिंदुत्व हे माझे पोरच राजा होणार’ असं म्हणून खाणे-पिणे विसरुन दिवस-रात्र बेभानपणे नाचत आहेत. त्यातून त्यांचं बरं-वाईट होण्याच्या आता परत ये.

तू गेल्यापासून अनिलकाका दु:खावेगाने आपले सारे व्यवसाय विकून (आलेल्या पैशातून कर्जे फेडता आली तर ती फेडून) हिमालयात जाण्याचा विचार वारंवार बोलून दाखवत आहे.

तू गेल्यापासून नोटाबंदीवाले अनिलकाका तर ’अब मैं किसी को मूँह दिखानेके काबिल नहीं रहा.’ असे म्हणत भूमिगत झाले आहेत.

तू गेल्यापासून स्मृती मावशी तर अतीव दु:खात भ्रमिष्ट झाल्यासारख्या वागत आहेत. आपण पदवीधर आहोत हे विसरुन उमेदवारी अर्जावर बारावी पास असे लिहून आल्या.

तू गेल्यापासून...
पंकजा काकूंना चिक्की गोड लागत नाही
तावडेंना विनोद सुचत नाहीत,
आठवलेंना कविता होत नाहीत,
अण्णा हजारे दुप्पट जेवू लागले आहेत,
संबित पात्रा चक्क सुसंगत बोलू लागले आहेत,
रविशंकर प्रसाद एकदा ’राहुल गांधी देशका भविष्य’ अशी घोषणा देऊन आले
विप्लब देब इंटरनेट हे जुन्या कॉंग्रेस सरकारने दिलेले वरदान आहे म्हणू लागले.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,
तू गेल्यापासून...
.
.
.
.
.
.
.
’आम्ही विकासाला मत दिलं’ म्हणणार्‍या 'शेळीचे कातडे पांघरलेल्या लांडग्यांना' तोंडे लपवत फिरावे लागते आहे.
तेव्हा त्यांच्याखातर तरी तू परत ये. तुला कोणी काही बोलणार नाही.

तुझी,

- गोमाता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा