शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

द्वेषोत्सुकं जगत्सर्वं


केवळ आपल्याच निर्मात्यावर उलटला म्हणून भस्मासुर निर्माण करु नये इतका संकुचित अर्थ त्याच्या कथेतून घ्यायचा नसतो. भस्म हे सर्वंकष नाशाची परिणती आहे. उपासनेसाठी भस्माची सोय करण्यासाठी म्हणून दिलेला हा वर प्रत्यक्षात बुद्धीहीनाच्या हाती दिलेले सर्वनाशाचे हत्यार असते .

व्यावहारिक जगातही बुद्धीची जोड नसलेल्या विद्रोहाचेही अनेकदा हेच होताना दिसते. आपल्या विरोधकांविरोधात पहिले यश मिळताच ’हाच रामबाण उपाय’ समजणार्‍या त्या गटातील लोक एक-एक करुन एकमेकांविरोधात उभे राहात विद्रोहाचाच विध्वंस करत नेतात हा इतिहास... नव्हे, वर्तमान आहे. एका बाजूला बुद्ध्यामैथुनात रमलेले विद्रोही आणि दुसर्‍या बाजूला बुद्धी बाजूला ठेवून विध्वंसालाच विद्रोह समजणारे अर्धवट, यात विद्रोहाचे शतखंड विभाजन होत प्रस्थापित पुन्हा बळकट होत जाणे ही शोकांतिका आपण पाहतोच आहोत.

पण हे विद्वेषाचे हत्यार केवळ त्याच्या निर्मात्यालाच भस्म करते असे मात्र नव्हे. निव्वळ एखाद्यावर हात ठेवून त्याचे पुरे भस्म करणारे सक्रीय झाले की जगातील सार्‍या निर्मितीची घटिका भरली समजावे. भस्मासुराला एकदा भस्म करण्याची चटक लागली, त्या उपायाला तो ’हर मर्ज की दवा’ समजू लागला की मग अमुक एका गोष्टीचा विध्वंस का करायचा याला कारण शोधायचीही गरज उरत नाही. अगदी क्षुल्लक कारणानेच नव्हे, तर कोणत्याही कारणाशिवाय, ’कुणाचेही मी भस्म करु शकतो’ या उन्मादात तो समोर दिसेल त्याचे भस्म करु शकतो. सोबतीला अहंकाराची जोड मिळाली की मग 'लग्नाचा प्रस्ताव नाकारला', ’दारुला पैसे दिले नाहीत’, ’जेवण दिले नाही’, ’माझ्याकडे टक लावून पाहिले’, ’आमच्या नेत्याला नावे ठेवली’, ’इतिहासातील आमच्या जातीच्या/प्रदेशाच्या/राज्याच्या/देशाच्या/धर्माच्या नेत्याच्या कार्यशैलीतील, कृतीमधील न्यून वा चुका दाखवल्या’ या आणि अशा असंख्य कारणाने कुणा-कुणाची हत्या घडवली जाते हे आपण नित्य पाहात आलो आहे.

समूळ नाशाची ही प्रेरणा माणसाच्या आदिम मानसिकतेचा भाग आहे. विरोधी टोळीचा वंश खणावा म्हणून अर्भकांनाही ठार मारण्याची ही मानसिकता आपल्या मनाच्या तळाशी सतत खदखदत असते. या ना त्या प्रकारे ती उसळी मारुन वर येत असते. मग एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोराचे नाव तैमूर आहे, या एकाच धाग्यावर त्याच्या जमातीचा जहरी विद्वेष करणारी एखादी आई, ऐतिहासिक तैमूरच्या कृत्यांवरुन त्या बालकाचे मूल्यमापन करणारी किळसवाणी विधाने करते. किंवा भारतातील क्रिकेट वर्ल्ड कप च्या दरम्यान आपल्या जिंदादिल कमेंट्रीने एखाद्या क्रिकेटरच्या तोडीस तोड लोकप्रियता मिळवलेल्या ’सायमन डूल’सारख्या व्यक्तीला ठार मारण्याची इच्छा एखाद्या धंदेवाईक टीमच्या समर्थकाला होते.

राजकारणात गेल्या पाच वर्षात भाताची रोपे तयार करावीत तशी विद्वेषाची रोपे बनवून देशभरात रुजवली गेली आहेत. एकदा ही विषवल्ली रुजली, की ती समूळ उखडणे अवघड. निर्मितीला कष्ट लागतात, बुद्धी लागते, सामूहिक कृती लागते. ते जिकीरीचे पण अपार समाधान देणारे काम असते. अर्थात ’आमच्याकडे आहे तेच सर्वात भारी, तसे सिद्ध होत नसेल तर सारे स्पर्धक नष्ट केले की पुरते’ असे समजणार्‍या, ’आपली उंची वाढवण्यासाठी स्पर्धकांचे पाय कापा’ मानसिकतेच्या मंडळींना ते कधीच समजणार नसते. ते न केलेली निर्मितीसुद्धा बहुमताने सिद्ध करु पाहात असतात. आणि त्यासाठी जी टोळी जमवावी लागते, ती विचारापेक्षा विखाराने अधिक चटकन जमते, हे त्या धूर्तांना चांगलेच ठाऊक असते. कारण निर्मितीच्या कामापेक्षा विध्वंस अधिक सोपा असतो, विशेषत: टोळी जमवून केलेला.

---
(बातमी: आयपीएल’ या क्रिकेट लीग मधील बंगळुरु संघाच्या एका चाहत्याने सायमन डू’ल या कमेंटेटरला ठार मारण्याची धमकी दिली.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा