मंगळवार, २८ मे, २०१९

सावरकर आणि हिंदुत्ववाद्यांची नि पुरोगाम्यांची पंचाईत

Ravindra Pokharkar's post

सावरकरांचे बहुतांश भक्त,अनुयायी हे ढोंगी असतात.त्यांना फक्त बोटीतून उडी मारलेले,अंदमानात शिक्षा भोगलेले वगैरे सावरकरच प्रिय असतात.नंतरच्या काळात त्यांनी मांडलेल्या सुधारणावादी विचारांची अमंलबजावणी करणारा मला त्यांचा एकही अनुयायी आजवर सापडला नाही.किंबहुना त्यांना ते विचार माहीतही नसतात.
उदा...

:-  सजीव सृष्टीत गाय आणि गाढव ही समानच आहेत.एक वेळ थोडी गोहत्या झाली तरी चालेल,पण उभ्या राष्ट्राची बुद्धीहत्या होता कामा नये.


:- गायत्री मंत्र म्हणून किंवा सूर्यपूजा करून उन्हाचे चटके निवारता येत नाहीत,त्यासाठी छत्री आणि पादत्राणेच योग्य.मग सूर्याला शिव्या देत चालले तरी हरकत नाही. जपापेक्षा जोड्यानेच शानिसुर्याची पिडा पुष्कळ कमी होते.


:- देव ही कल्पना माणसाच्या बुद्धिहीनपणातून निर्माण होते.


:- भारताला प्रगतीपथावर जायचं असेल तर श्रुतीस्मृतीपुराणं गुंडाळूनच ठेवली पाहिजेत आणि विज्ञानाची पानं उलटली पाहिजेत.


:- धर्मग्रंथांवर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले.या विज्ञानयुगात समाजसंस्थेची जी संघटना करायची ती प्रत्यक्ष ऐहिक आणि विज्ञाननिष्ठ अशाच तत्वावर केली पाहिजे.
वगैरे..वगैरे..


उलट सावरकरांच्या भक्तांपेक्षा आम्ही बरे.आम्ही त्यांच्या एकुण जिवनप्रवासातील जे चुकीचे त्याला चूक म्हणतो आणि त्यांनी जे चांगले,सुधारणावादी विचार मांडले,त्यांचा अंगिकारही करतो.


(घरादारात केवळ दिखाव्यासाठी सावरकरांचा फोटो लावून वर्षातून एकदा आज त्यांच्या जन्मदिनी त्याला हार घालून पाया पडणा-या सर्व महान सावरकरभक्तांना ही पोस्ट समर्पित..)

----

My post-on-post.

पंचाईत अशी आहे पोखरकर, की हे सांगायला हवे म्हटले की अर्धवट अकलेचे, केवळ 'आपण संघ-भाजपविरोधक म्हणजे आपण पुरोगामी' असला बिनडोक समज असलेले कालवा करतात ’माफीवीराचे उदात्तीकरण करु नका.’ म्हणून. खरेतर सावरकरांची ही दुसरी बाजू उचलून धरली तर हिंदुत्ववाद्यांना खिंडीत पकडता येते.

एका ज्येष्ठ स्नेहींनी ’विज्ञाननिष्ठ सावरकर’ यावर चर्चासत्र ठेवले. एकुण एक पुरोगाम्यांनी या ना त्या कारणाने शेपूट घातली. आणि हे स्नेही ’त्यांचे’ अजिबात नव्हते बरं का. म्हणजे ’त्यांच्या व्यासपीठावर जायचे नाही.’ हा पळपुटा नियमही इथे लागू नव्हता. तरीही आपण सावरकरांची ही बाजू सांगितली तर पुरोगामी वर्तुळ आपल्याला ’वाळीत टाकेल’ अशी भीती त्यांना वाटली असावी.


ज्याप्रमाणे हिंदू धर्माची ठेकेदारी संघासारख्या हिंदुत्ववाद्यांनी आणि भाजपच्या गुंडांनी बळकावली आहे तसेच पुरोगामी वर्तुळाची ठेकेदारी एकांगी, अर्धवट विचाराच्या मंडळींनी बळकावली आहे. सावरकरांना माफीवीर म्हटले तरच इथे तुम्हाला प्रवेश आहे.

’बिचार्‍या अडवानींना त्यांच्या चेल्याने कुठे नेऊन टाकले पहा.’ असे म्हटले तर ज्याची मालकीण जपमाळ घेऊन ड्रकारिस चा जप करते आहे अशा ड्रॅगनलाही सहज हरवेल अशा स्वयंघोषित विदुषीने ’अडवानींची बाजू घेऊ नका. ते ही तितकेच नालायक आहेत.’ म्हटले होते. तुलनात्मक विचार, उपहास वगैरे यांनाही भक्तांइतकाच कळतो. थोडक्यात दोन्हींकडे सुमारांची सद्दी आहे.

सावरकरांचा द्विराष्ट्रवाद हेच फाळणीचे मूळ बीज आहे. ते पाप सावरकर-जीनांचेच आहे. कॉंग्रेस फक्त सारे उपाय थकल्यावर त्यावर शिक्कामोर्तब करती झाली इतकेच. तेव्हा जिंनासह सावरकर हेच फाळणीचे जनक आहेत हे ठामपणे सांगायला हवे. पण दुसरीकडे सावरकरांना गांधी-नेहरुंच्या जागी बसवू पाहणार्‍यांना हे सावरकरही स्वीकारण्याचे आव्हान देत राहायला हवे.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा