रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

इतिहासाचे श्राद्ध घाला

मागच्याच आठवड्यात राखीगढी’च्या संशोधनातून आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध झाल्याची द्वाही फिरली आणि आज हा लेख वाचतो आहे. दोन लेख, दोन परस्परविरोधी दावे! आपण कोणता खरा मानणार? कसा तपासणार?

तपासणार मुळीच नाही. आपले पूर्वग्रह, आपली बांधिलकी असलेल्या गटाच्या सोयीची बाजू स्वीकारणार आणि दुसरी नाकारणार.... इतके सोपे आहे. तुम्ही आधीच आर्य आक्रमणाचा सिद्धांत मान्य केला असेल तर राखीगढीच्या उत्खननाआधारे केलेला दावा तुम्ही ’छद्मराष्ट्रवाद्यांना धार्जिणा खोटा निष्कर्ष’ म्हणून मोडीत काढणार. उलट 'आर्य इथलेच’ वाले असाल तर हा लेख ’कम्युनिस्टांचा कावा’ म्हणून फेकून देणार. विश्लेषण वगैरे गेले तेल लावत. सोपे आहे नाही आयुष्य? सुखी राहा बाप हो.

आमच्या मते इतिहास हे पर्सेप्शन असते. त्यातील घटनांबाबतही परस्परविरोधी दावे असतात, कोणती जड वस्तू पुरावा म्हणून मानायचे याबाबत मतमतांतरे असतात, कालनिश्चितीमध्ये तंत्रानुसार फरक पडतो, त्यातून कालानुक्रमामध्ये फरक पडू शकतो... असे असताना त्या आधारे केवळ ऐतिहासिक दावेच नाही तर उत्क्रांतीसारखे, आर्य आक्रमणासारखे सिद्धांत खरे अथवा खोटे म्हणून माणसे वाद घालत बसतात. यांना सिद्धांत म्हणतानाच त्यात खरे अथवा खोटे करता येणार नाही हे अनुस्यूत असते. कारण हे परिस्थितीजन्य पुरावे आणि विश्लेषणाच्या आधारे उभे केलेले असते. त्यात विश्लेषण वस्तुनिष्ठ असले तरी पुरावे नेहमीच वस्तुनिष्ठ असतील, तुम्ही लावलेली संगती एक आणि एकच असेल याची खात्री देता येत नाही.

त्यामुळे उत्क्रांती सिद्धांत किंवा आर्य आक्रमण सिद्धांत हा ’वास्तव अथवा खरा’ किंवा ’साफ खोटा’ हे दोनही दावे अल्पबुद्धीनेच केले जाऊ शकतात. सिद्धांताला पुष्टी देणार्‍या पुराव्यांनी बळकटी येते किंवा विरोधी पुराव्यांनी त्याची बाजू कमकुवत होते इतकेच. तो ’सिद्ध’ होत नसतो. अनेक शतके जुन्या पुराव्यांचे मूल्यमापन आपण बिनचूकच करतो असा दावा अहंकारीच असतो.

इतिहासातून प्रेरणा मिळते वगैरे दावे पळपुटे असतात. आपल्या सोयीची व्यवस्था वर्तमानात अथवा भविष्यात निर्माण करण्यास अपार कष्ट, नियोजन आणि एकसंघता लागते. इतिहासात ती लेखणीच्या फटकार्‍यासरशी निर्माण करता येते. आपली जमात सोबत घेतली की वास्तव म्हणून माथी मारता येते. म्हणून खरा इतिहास सांगतो म्हणणारा वेगळ्या बाजूचा सोयीचा, स्व-लिखित खोटा इतिहास सांगत असेल हीच शक्यता अधिक. याच कारणासाठी इतिहासाच्या कर्दमात रुतलेला समाज एका बाजूने आत्मसंतुष्ट आणि म्हणून निष्क्रिय आणि दुसर्‍या बाजूने अशा सिद्धांताचे आपले पूर्वग्रहच खरे खोटे करण्याच्या नादात वैचारिक यादवीने ग्रस्त होऊन बसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा