रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

एक झुंज वार्‍याशी

#नाटकआणिमी

’हशिवनारा बाबा’ असा शिक्का मारून उच्चनासिकान्यायाने अर्वाचीन स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्यिकांनी बाद केलेल्या पुलंच्या नाटकांबद्दल फारसे बोलले जात नसले तरी नाट्यस्पर्धांमधून ’सदू आणि दादू’, ’एक झुंज वार्‍याशी’ सारखी त्यांची नाटके वारंवार सादर केली जातात. मागे कुण्या दिग्दर्शकाने - बहुधा चंद्रकांत कुलकर्णी - त्यांच्या अतिरेकाबद्दल वैतागही व्यक्त केला होता. त्यातले ’तुझे आहे तुजपाशी’ वगळता बहुतेक सारी परदेशी रूपांतरित नाटके आहेत किंवा कथाबीज तिकडून उसने आणलेले आहे हे कदाचित त्याचे कारण असावे. यापैकी एक 'झुंज वार्‍याशी’ हे सर्वस्वी वेगळ्या धाटणीचे नाटक. तुलनाच करायची झाली तर मी त्याची उध्वस्त धर्मशाळा’ या गोपुंच्या नाटकाशी करेन. अर्थात फरक आहेतच. पण त्याबद्दल नंतर केव्हातरी.

'झुंज वार्‍याशी’ या नाटकाकडे दोन प्रकारे पाहू शकतो. पहिले म्हणजे तो एक प्रकारचा कोर्टरूम ड्रामा आहे. खरोखरीचे कोर्ट नसले तरी एक घटना आहे, तिचा निवाडा करणे चालू आहे. कुणी एक आरोपी आहे, कुणी एक त्याच्यावर आरोप करतो आहे आणि पुरावे आणि तर्कांचे वाग्बाण भिरकावले जात आहेत. दुसरा दृष्टीकोन माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि तो म्हणजे या नाटकातील मुख्य पात्र म्हणजे ’तो’ ही आरोपीची- म्हणजे उपमंत्री डॉ. देशमुखांची सदसद्विवेकबुद्धीच (या शब्दाचा सद्सद्विवेकबुद्धी असा उच्चार तीनही पात्रे करतात. तो मात्र खड्यासारखा टोचत होता) आहे. याला पुष्टी देणारा नाटकातील भाग म्हणजे ’तो’ ने उपमंत्र्यांकडे राजीनामा दॆण्याची केलेली मागणी. जी घटना घडली आहे, ज्या आधारे ’तो’ देशमुखांवर आरोपांच्या फैरी झाडतो आहे, ते आरोप खरेतर ’मंत्री’ देशमुखांवर नव्हे, तर ’डॉ. देशमुखांवर’ आहेत. त्यामुळे ’तो’ हा जर स्वतंत्र व्यक्ती असता, तर त्याने कायदेशीर शिक्षेची मागणी करायला हवी. पण ’तो’ ’आजच्या’ देशमुखांची सदसद्विवेकबुद्धी आहे, म्हणूनच त्याच्या दृष्टीने सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे काय तर आजच्या स्थानापासून- मंत्रिपदावरून पायउतार होणे. संहितेमध्ये दुसर्‍या अंकाच्या अखेरीस ’तो’ जेव्हा देशमुखांना नैतिक पातळीवरुन आव्हान देतो, जाब विचारतो तेव्हा ते जणू देशमुखांनी स्वत:च स्वत:ला कन्फ्रन्ट केल्यासारखे भासते.

नाटकाच्या संहितेत ’तो’ हे पात्र केंद्रस्थानी आहेच, पण रंगमंचावर त्याला केवळ यथातथ्यच नव्हे तर त्यात काही भर घालून अक्षरश: जिवंत करण्याचे काम श्रीनिवास नार्वेकरांनी केले. खरंतर संहितेमध्ये असलेला ’तो’ हा माझ्या डोळ्यासमोर एक करारी, तत्त्वनिष्ठ आणि त्याचवेळी एक प्रकारे ’लष्कराच्या भाकरी भाजणारी’ समाजसेवी प्रवृत्ती असलेला असा होता. केवळ संहितेचा भाग पाहिला तर तो तसाच दिसतो. पण नार्वेकरांनी यात थोडी गंमत केली आहे, आणि ती मला एकदमच पसंत पडली आहे.

या ’तो’ मध्ये त्यांनी ’सामना’ या चित्रपटातील मास्तरचे काही रंग मिसळून दिले आहेत. त्यामुळॆ त्यांचा हा ’तो’ हावभावांनी मास्तरची आठवण करुन देतो. विशेषत: दोनही हात मागे नेऊन त्यांची अढी घालणे हे चटकन जाणवणारे साम्य. आपण पाहिलेला लागूंचा मास्तर हा एक मुद्दा लावून धरणारा, चिवट मानसिकतेचा पण निदान वरकरणी फार खोल विचार करणारा नसला तरी मार्मिक प्रश्न उभे करणारा आहे.

यातला पहिला मुद्दा ’तो’च्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहेच. परंतु तो मास्तरसारखा बेफिकिर मानसिकतेचा नाही. हाती घेतलेल्या कामाचा त्याने बारकाईने अभ्यास केला आहे. त्याला आवश्यक ती पूर्वतयारी करुन, पुरावे यथास्थित जमा करुनच तो आला आहे. इतकेच नव्हे तर उपमंत्री डॉ. देशमुखांना तो नेमके प्रश्न विचारुनच थांबत नाही तर त्यांनी न दिलेल्या उत्तराकडे त्यांना घेऊन जाण्यासाठी आवश्यक ते पुरावे तो एकामागून एक सादर करतो आहे. सामना’मधला मास्तर हा फारसा विचार करताना दिसत नाही. उलट नार्वेकरांचा ’तो’ हा उघड अतिविचारी माणूस आहे. एखादे वाक्य उच्चारतानाच डोक्यात पुढचा विचार चालू असल्याने त्यांचा छेद जाऊन डोक्यात उडणारा गोंधळ त्यातून एखादे वाक्य, एखादा शब्द अर्धवट सुटून नि:शब्द होणे असेल किंवा एखादा शब्द एका भावनेने, हेतूने उच्चार करत असतानाच अचानक विचारांच्या सरमिसळीमुळे शब्दाचा उच्चार पुरा होईतो पट्टी बदलून खाली जाणॆ यातून ही वैचारिक सरमिसळ नार्वेकरांनी सुरेख उभी केली. अतिविचारी, अति तीव्र बांधिलकी, नैतिकतेचा टोकाचा आग्रह असे गुणसमुच्चय असलेली व्यक्ती ज्या एका सर्वसामान्यांच्या दृष्टीने काहीशा विक्षिप्त पातळीवर दिसते तसाच हा ’तो’ नार्वेकरांनी उभा केला.

मग त्यांच्या त्या अभिनयाला एक कुर्निसात करुन संहिता वाचून माझ्या मनात निर्माण झालेल्या ’तो’च्या शक्यतेशेजारी यालाही जागा देऊन टाकली.

उणीपुरी चार- खरेतर तीनच म्हणायला हवीत - पात्रे असणार्‍या नाटकात ’तो’च्या आरोपांचे लक्ष्य आहे ते उपमंत्री डॉ. देशमुख. हे अस्सल मध्यमवर्गीय जाणीवेचे पात्र आहे. याला प्रगती करायची आहे, पण त्यासाठी विधिनिषेध खुंटीला टांगणारा ’फास्ट ट्रॅक’ निवडतानाही नैतिकतेचे पेच अथवा वेढे त्याच्याभोवती कायम असतात. नियमबाह्य वर्तन करताना तो कच खातो. मग त्यासाठी तो इतरांना - प्रामुख्याने स्वीय सहाय्यक डॉ. चौधरी याला - मध्ये घालतो. हे साधारणपणॆ राजकारणी धोरणच झाले. अगदी ढोबळ निवाडा करायचा म्हटले तर ’तोबर्‍याला पुढं नि लगामाला मागं’ अशी वृत्ती असलेला. सारे नाट्य उभे आहे ते त्याच्यामधील प्रगतीचा वारु आणि नैतिकतेच्या लगामातील संघर्षामुळे. दीपक करंजीकर यांना हा मंत्रीही बर्‍यापैकी सापडला. अर्थात मूळ संहितेचा बाज पाहता यात प्रस्थापित निर्ढावलेपणाची छटाही दिसायला हवी, ती तेवढी दिसली नाही असे म्हणावे लागले.

तिसरे महत्त्वाचे पात्र म्हणजे देशमुखांचे स्वीय सहाय्यक डॉ. चौधरींचे. आणि इथे मात्र मी पुरेसा समाधानी झालो नाही म्हणावे लागेल. एकुणात डॉ. चौधरी हा महत्त्वाकांक्षी, बेरकी माणूस आहे. त्याला आपण वृत्तीने डॉक्टर नाही तर मॅनेजर, व्यवस्थापक प्रवृत्तीचे आहोत हे पक्के ठाऊक आहे. त्याने स्वत:ला जसे अचूक ओळखले आहे तसेच डॉ. देशमुखांच्या कचखाऊ महत्वाकांक्षेलाही. त्यामुळे त्याने एक प्रकारे त्यांना खांद्यावर घेऊन वाटचाल केली आहे. किंवा मर्यादित अर्थाने देशमुख हे त्याने ’गुळाचा गणपती’ करुन ठेवले आहेत. त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यानेच आखला आहे. त्या मार्गावर आवश्यक त्या तडजोडी निर्ममपणे, प्रसंगी निष्ठुरपणेही केल्या आहेत आणि देशमुखांनाही करण्यास भाग पाडले आहे. देशमुख हे त्याचा मुखवटा आहेत किंवा प्रगतीची शिडी. देशमुखांच्या त्या शिडीवर एक पायरी मागे असला तरी त्यांच्या सोबत तो ही वर वर चढत जातोच आहे. अशी व्यक्ती धूर्त, बेरकी आणि बव्हंशी मितभाषी किंवा आत्मविश्वासपूर्ण जरब असलेल्या आवाजात बोलण्याची शक्यता अधिक असते.

नाटक मी जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा मला तो जाळ्यात अडकलेल्या माशीभोवती धूर्तपणे जाळे विणणार्‍या कोळ्यासारखा दिसला होता. वास्तव ठाऊक असूनही ’थांबा मी पेंडसेला फोन करतो.’ म्हणत केलेला अभिनय असो, की ’तो’ अखेर निघून गेल्यावर, या सार्‍या नाट्याचा कणभरही परिणाम मनावर शिल्लक राहू न देता, ताबडतोब उद्याच्या शेड्युलची चर्चा मंत्र्यांशी करु लागणे असो. ही दोन त्याच्या निर्लिप्त धूर्तपणाची उत्तम उदाहरणे आहे्त. पण इथे मात्र डॉ. चौधरी साकारणारे आशुतोष उणे पडले असे मला वाट्ते. इथे मला डॉ. चौधरी दिसले ते काहीसे अननुभवी, त्रागा करणारे. धूर्तपणाचा लवलेशही त्यांच्यात दिसला नाही.

नाटकाच्या अखेरीस ’मेला तो’ या दोन शब्दांत डॉ. चौधरींचा मूर्तिमंत धूर्तपणा अथवा कुटीलपणा, खरंतर काही प्रमाणात तुसडेपणाअथवा तुच्छताही दिसायला हवी. ते दोन शब्द प्रेक्षकांच्या जाणीवेवर येऊन आदळायला हवेत. तसे घडले नाही. ते वाक्य इतक्या अदखलपात्र पद्धतीने उच्चारले गेले की त्याने क्लायमॅक्सला थोडे उणेपण दिले. एकुण या सार्‍या नाट्याचा सूत्रधार म्हणून हे पात्र ठसायला हवे ते घडले नाही.

पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे नाटक रंगमंचावर पाहायला मिळाले. नार्वेकरांनी ’माझ्या कल्पनेहून वेगळ्या, कदाचित सरस अशा ’तो’ ची भेट घडवून आणली. दिवस सत्कारणी लागला.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा