ते सरकार आले तरी शिव्या खाणार, नाही आले तरी मार खाणार.
समाजवादी निवडणुकीआधी त्यांना पक्ष विसर्जित करा, राहुल गांधी राजीनामा द्या म्हणणार नि निवडणुकीनंतर कॉंग्रेस दुबळी होती म्हणून, त्यांनी आळशीपणा केला म्हणून, त्यांचे नेते स्वार्थी आहेत म्हणून... भाजप आला म्हणून शिव्या देणार.
कम्युनिस्ट उलट करणार, ते निवडणुकीनंतर कॉंग्रेस विसर्जित करा, राहुल गांधी चालते व्हा म्हणणार. पुन्हा काही दिवस त्यांचे नाव ऐकू आले नाही की त्यांनी मैदान सोडून पळ काढला म्हणून लेख वा पोस्ट लिहिणार.
सेनेचे लोक लवकर पाठिंबा देत नाही म्हणून शिव्या देणार...
बाहेरुन पाठिंबा दिल्यावर, 'यांना जबाबदारी घ्यायला नको’ म्हणून गळा काढणार...
आणि सामील झाले तर ’जनतेने नाकारुनही आम्ही तुम्हाला मंत्रिपदे’ दिली म्हणून टेंभा मिरवणार...
पाठिंबा नाकारला तर ’पाठीत खंजीर खुपसला’ म्हणणार...
परवा एका मित्राशी बोलताना वागळे यांचा विषय निघाला. कॉंग्रेसने सेनेला तातडीने पाठिंबा न दिल्याने ते भलतेच गरम झाले आहेत. वागळे शैली अधिक सेना शैली असा मनोहर संगम घडून त्यातून कॉंग्रेसवर शरसंधान चालू आहे.
हा मित्र म्हणाला अरे सध्या असे आहे की भाजपवर टीका केली की ट्रोल धावून येतात, सेनेवर केली तर सैनिक फोडून काढतात, मनसेवाले खळ्ळ् खटॅक करतात, राष्ट्रवादी नि वं.ब.आ चे आग्या वेताळ ट्रोलही आहेतच. फक्त कॉंग्रेस ही अशी पार्टी आहे की जिच्याबद्दल काहीही बोलले तरी कुणी फटकावत नाही.
म्हणूनच सगळे वागळे, समाजवादी, माजवादी, कम्युनिस्ट, बिगर-कम्युनिस्ट, डावे समाजवादी, उजवे कम्युनिस्ट, भांडवलदार समर्थक, ’आप’वाले, परके, वंबआवाले, बंबवाले, संघवाले, चंगवाले, ट्रोल, विट्रिओल, हे सारे...
इतकंच काय रमतारामासारखे य:कश्चित ब्लॉगरसुद्धा...
कॉंग्रेस उभी राहिली तर 'उभी का राहिली?', बसली तर 'का बसली?' म्हणून टीका करत राहतात...
पटलंच मला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा