बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

धूर्ताची चलाखी नि मूर्खांची झुंड

देशात एकुणातच श्रीमंती - आर्धिक असो वा बौद्धिक - बद्दल सामान्यांना राग असतो. यातल्या एकाचीही लायकी नसताना, केवळ अनधिकाराने किंवा गैरमार्गानेच, हे आमच्या पुढे गेले असा त्यांचा ठाम समज असतो.

त्यामुळे ’आर्थिकदृष्ट्या श्रीमंतांना धडा शिकवण्यासाठी’ असे म्हटले की स्वत:चा खिसा रिकामा करणार्‍या नोटाबंदी सारख्या मूर्ख निर्णयालाही ते आनंदाने पाठिंबा देतात.

त्याचमुळे ’विद्यार्थ्यांवर, विशेषत: उच्चशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर तुम्हा टॅक्स पेअर्सचा पैसा वाया जातो’ असे म्हटल्यावर हे बैल विद्यार्थ्यांच्या निमित्ताने शिक्षणावर, शिक्षणपद्धतीवरही आगपाखड करु लागतात नि सर्वांना अज्ञानी ठेवण्याचा धूर्तांचा डाव यशस्वी होत जातो.

श्रीमंतांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करण्यास अनेक उत्तम मार्ग आहेत.

* अडाण्यांना ते माहित नसतात,
* धूर्तांना वापरायचे नसतात
* द्वेषांधांना तर असलेलेही बंद करायचे असतात
आणि...
* त्यांच्या पाठीमागे उभ्या राहणार्‍या फक्त कान असलेल्यांच्या झुंडीला मेंदू आणि डोळेच नसल्याने ते दिसत वा जाणवत नसतात.

-----

बुद्धी गुलाम झाली की,

* शिकलेलेच अशिक्षित राहण्याचे फायदे सांगू लागतात,

* शिकलेल्या स्त्रियाही बुरखा किंवा घुंघट हा कसा त्यांच्याच सुरक्षिततेसाठी आहे असे आग्रहाने सांगत राहतात,

* गरीब श्रीमंतांना धडा शिकवण्यासाठी स्वत: दोनवेळा जेवणाऐवजी एक वेळ जेवून राहायला तयार होतात,

* विज्ञान शिकून त्याच्याआधारे पोट भरणारे अंधश्रद्धेचे समर्थन करु लागतात,

* दोन हैड्रोजन आणि एक ऑक्सिजन यांच्या अणूंपासून पाणी तयार होण्यासाठी ’डिव्हाईन इंटरव्हेन्शन’ला कॅटलिस्ट म्हणून मान्यता देतात,

* एअर ट्रॅफिक कंट्रोल, सॅटेलाईट वगैरे नसलेल्या जमान्यात - अर्थात देवाच्या मार्गदर्शनाखाली - विमाने उडत होती म्हणतात...
---

*** शिक्षणाने अज्ञान दूर करता येते, मूर्खपणा नाही. ***

तो उपजत असतो... किंवा वारसाने मिळतो. आणि ’कुठलाही वारसा हा जतन करण्यायोग्यच असतो’ हा समज हा त्या मूर्खपणाचा ॐकार किंवा श्रीकार असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा