शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

मी काय म्हणतो...

बरं पण मी काय म्हणतो...

ते अर्णबने ’पूरा देश महाराष्ट्रमें इस स्थितीके लिए राहुल गांधीसे जबाब चाहता है’ म्हणून अर्धा तास एकट्यानेच ’चर्चा’ केली का?

उरलेल्या अर्ध्या तासात रविशंकर प्रसाद यांनी मोदी हे विश्वभास्कर, विश्वकर्मा, विश्वामित्र, विश्वगुरु आहेत यावर तोंड वाजवतानाच राहुल गांधी कुठे लपून बसले आहेत अशी पृच्छा करणारा कलकलाट करुन झाला का?


’कॉंग्रेसने सेनेबरोबर जाऊन माती खाल्ली’ किंवा ’या अभद्र तडजोडीबद्दल राहुल गांधी यांनी राजकारण संन्यास घ्यावा’ असे लेख कम्युनिस्ट विचारवंतांनी लिहिले का?

’आम्हाला काय फरक पडतो. शेवटी कॉंग्रेस नि भाजप एकाच माळेचे मणी’ हे लाडकं वाक्य उरल्यासुरल्या समाजवाद्यांनी फेकलं की नाही?

’पवारांचं राजकारण आता संपलंय’ हे वाक्य आपल्या मूळ वाक्यात फेरफार करुन एडिटेड वीडिओ पसरवण्यात आला आहे, मूळ वाक्य ’माझं राजकारण आता संपलंय’ असं होतं" असा खुलासा फडणवीसांनी केला की नाही?

’आमचा एकही मंत्री कसा नाही?’ असा प्रश्न पडलेल्या कॉंग्रेसी नेत्याला ’अरे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नीतिन राऊत हे दोघेही तुमचेच आमदार आहेत की?’ असे सांगितल्यावरही त्याचा संभ्रम दूर झाला की नाही?

महाविकासआघाडीला तुमच्या आमदाराचा पाठिंबा आहे’ असे कम्युनिस्टाला सांगितल्यावर ’आपलाही आमदार निवडून आलाय’ या विचाराने झालेल्या हर्षवायुतून तो बरा झाला की नाही?

पुढचे निदान दोन-चार दिवस तरी आपण मुख्यमंत्री नाही, आता वर्षा बंगला सोडायलाच हवा हे फडणवीसांना अखेर पटले की नाही?

’अजित पवार सत्ताधारी पक्षाचे नेते की विरोधी पक्षाचे नेते आहेत?’ या गणपाच्या प्रश्नाला उत्तर मिळाले की नाही? गेलाबाजार अजित पवार यांना स्वत:ला तरी ते मिळाले की नाही?

”आता राज्यपाल विरोधी पक्षनेते होणार ना?’ असा प्रश्न पडलेल्या गण्याला नागरिकशास्त्रात पास कुणी केले याचे उत्तर मला मिळेल का?

राष्ट्रवादी ते भाजप व्हाया अपक्ष असा प्रवास करणार्‍या राणा दांपत्याला मातोश्रीला किती नंबरची बस जाते हे अखेर समजले की नाही?

कार्यकारी संपादकपदावरुन संपादक पदावर बढती मिळालेल्या संजय राऊत यांना ’सामना’ हे छापील वृत्तपत्र आहे, ट्विटर अकाऊंट नव्हे हे ध्यानात आहे ना?

महाराष्ट्र हा भारताचाच भाग आहे, आपला पक्ष तिथेही निवडणुका लढवतो आणि सेना-राष्ट्रवादी कृपेने आजच सत्तेत वाटेकरी झाला आहे हे राहुल गांधींना कुणी समजावून सांगितले की नाही?

आणि हो,

निवडणुका संपल्या, निकाल लागले, सरकारही स्थापन झाले... आता राजकारणावरच्या पोस्ट पुरे असे मंदार काळेंना कुणी सांगितलं की नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा