गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

A word makes picture thousand times better

A moment before a disaster...
By Maciej Dakowicz

"A picture is better than a thousand words" असे म्हटले जाते. एकप्रकारे शब्दापेक्षा फोटो/चित्र अधिक सांगते तेव्हा शब्द दुय्यम वगैरे वगैरे एकांगी तर्क लढवण्यासाठी हा क्वोट सामान्यपणे दिला जातो. पण एका साध्या चित्रासोबत असणारे चार शब्द त्याला अचानक किती वेगळी मिती देऊन जातात याचे उत्तर उदाहरण असलेले हे चित्र.

आधी नुसता फोटो पाहा नि नंतर फोटोग्राफरने त्याला दिलेले शीर्षक पाहा. आता तुमच्या आकलनात फरक पडला की नाही? आता छायाचित्रकाराने पकडलेल्या त्या क्षणापलीकडचे दृश्य तुमच्या नजरेसमोर आले की नाही? या एका क्षणाने पाहणार्‍या प्रत्येकाला त्याचा भविष्यकाळ समोर ठेवला आहे. गंमत म्हणजे प्रत्येकाच्या नजरेसमोर उलगडलेला तो भविष्यकाळ, त्याने कल्पनेने चितारलेले पुढचे प्रसंग नि घटिते, हे प्रत्येकाचे त्या भविष्याबद्दलचे भाकितच फक्त आहे. या क्षणाचा भविष्यकाळ घडून गेला असला असल्याने तुमच्या आमच्या दृष्टीने आता भूतकाळात असला तरी तुम्हा-आम्हाला ठाऊक नाही. (त्या कुण्या श्रॉडिंजरची मांजर आठवली का?) छायाचित्रकारानेही तो अनुभवला तरी पकडलेला नाही. तेव्हा त्याचा अनुभव नि आपले प्रत्येकाचे भाकित-चित्र यांच्यात फरक असण्याची शक्यता भरपूर आहे.

पूर्वी असे एखादे चित्र देऊन ’कल्पनाविस्तार करा’ अशा शीर्षकाखाली निबंध लिहिण्याचा एक प्रश्न आमच्या भाषेच्या परीक्षेत हटकून असे. आता अधिकाधिक पढीकतेकडे हाकलत नेलेल्या अभ्यासक्रमात आहे की नाही कुणास ठाऊक. त्या प्रश्नाच्या आधारावर या क्षणाच्या भविष्याचे शब्दचित्र रंगवा अशी स्पर्धा घ्यायला हवी. प्रत्येकाचे कल्पनाविश्व, पूर्वग्रह, वय यांचे प्रतिबिंब त्यात कसे पडते हे पाहणे रोचक असेल.

ता.क.:
संख्याशास्त्री असल्याने आकडे जितके अचूक वास्तव सांगतात त्याच्या दशांशाने ग्राफ सांगत नाहीत असे आमचे ठाम मत आहे. किंबहुना ग्राफ (म्हणजे चित्र) हे दिशाभूल करण्यासाठी, लोकास्नी गंडिवन्यासाठीच अधिक वापरले जातात (आणि म्हणून जाहिरातदारांचे, मार्केटिंगवाल्यांचे, यम्बीयेवाल्यांचे लाडके असतात.) सरकारी कामगिरीबाबतचे असे अनेक मजेशीर ग्राफ आपण २०१४ ते २०१६ या दोनेक वर्षांत पाहिले आहेतच. तेव्हा अंक आणि अक्षर (शब्द) विरुद्ध चित्र/ग्राफ यांच्या संघर्षात आम्ही आपली वाणी आणि कळफलक परजून ’अ’ पार्टीच्या बाजूने उभे असतो.

#कुठूनहीकुठेही

(स्वगत: ’साध्याही फोटोस काळे फाटे किती फोडती’ असे केशवसुतांच्या कवितेच्या चालीवर कुणी म्हटले तर ते अगदीच गैर म्हणता येणार नाही.)

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा