मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

त्र्यं. वि. सरदेशमुख साहित्य-सूची आणि नीतिन वैद्य

जगण्यातील निव्वळ स्पर्धाच नव्हे तर निस्वार्थ सहकार (altruism) हा ही मानवी उत्क्रांतीचा एक मूलाधार आहे असे डार्विनचा वारसा चालवणार्‍यांनी मान्य केले आहे. वैयक्तिक स्वार्थापेक्षा समूहाचा स्वार्थ, खरेतर प्रगतीला प्राधान्य देणारे लोकही समाजात काही रुजवण्यास हातभार लावत असतात. अर्थात मधमाशांसारख्या प्रजातींमध्ये हा गुण प्रकर्षाने असला तरी माणसांत तसा दुर्मिळ. फारतर देवघेवीच्या सोयीसाठी गट बनवून राहणॆ दिसते इतकेच. साहित्याचे क्षेत्रही याला फारसे अपवाद नाही.

एखाद्या साहित्यिकावर, त्याच्या साहित्यावर जिवापाड प्रेम करणारे, स्नेह राखणारे बरेच असतील. त्यातले बरेचसे ते (आजच्या जमान्यात त्याच्या/तिच्यासोबत सेल्फी टाकून वा त्यांच्या सहीचे पुस्तक दाखवून) मिरवतही असतील. एक टप्पा पुढे जाऊन त्याच्या लेखनाबद्दल थोडे लिहून आपल्या आकलनाच्या मर्यादेत का होईना त्याचे वैशिष्ट्य, सकारात्मक बाजू, लेखनाचे परिशीलन मांडणारेही दुर्मिळ. मग आवडत्या लेखकासाठी, स्नेह्यासाठी आर्थिक पदरमोड करुन, कित्येक महिने वेळ खर्चून, शारीर ऊर्जेला पणाला लावून एखादे काम करणारा/री तर गुलबकावलीच्या फुलाहून दुर्मिळ. त्यातून समजा पीएच.डी. सदृश काही पदरी पडत असेल तरीही समजण्याजोगे. पण ते ही हाती लागत नसताना हा ’वेडेपणा’ करणार्‍याबद्दल काय बोलावे?

काल संध्याकाळी हे संकलन हाती आले. आज त्यातील प्रास्ताविक वाचले नि वर लिहिले तसेच काहीसे डोक्यात आले. नीतिन वैद्य हे त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गेले वर्षभर फेसबुकवर नोंदी अपलोड करत होते. त्र्यं.वि.ची अफलातून साइखेड ट्रिलजी - विशेषत: ’डांगोरा: एका नगरीचा - वाचण्यात आल्यानंतर मी त्यांचा चाहता झालो होतो. त्यामुळे वैद्य यांच्या नोंदी पाहून त्यांच्याशी इथे जोडून घेतले होते. त्या सार्‍याची परिणती या एका सुरेख सूचीमध्ये झालेली पाहून त्यांच्या कष्टाचे चीज झाले म्हणावे लागेल.

प्रास्ताविकामध्ये सरदेशमुखांच्या लेखनाची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी केलेली वणवण वाचून अक्षरश: अवाक् झालो आहे. शासकीय विभागीय ग्रंथालयासारख्या धुळींच्या अड्ड्यामध्ये बसून अक्षरश: अंधारात तीर मारल्यासारखे विविध नियतकालिकांचे अंक चाळत एक एक लेख जमा करत जाण्यातील त्यांची चिकाटी पाहून त्यांना दंडवत घालावेसे वाटले. इतकी चिकाटी मी स्वत: लेखक असतो तर माझ्या जुन्या लेखनासाठीदेखील केले असते का मला शंका आहे. एक लहानसा तुकडा मुद्दाम इथे पेस्ट करतो आहे.

"शारदीय चंद्रकळा’ मधला सुरुवातीचा दीर्घलेख ’स्व-रूप आणि साहित्य’चा पूर्वार्ध तीन ठिकाणी आला आहे, अशी नोंद पुस्तकात सुरुवातीला आहे. यापैकी ’सोलापूर तरूण भारत’ दिवाळी १९९०, तिथे दीर्घकाळ संपादनात काम केलेल्या मानसी मोकाशींनी मिळवून दिला. ’आदित्य’च्या दोन दिवाळी अंकांच्या संपादनात सर होते, तरी दोन्ही अंक घरी नव्हते, सर्व संबंधितांकडेही ते नव्हते. काय करावे अशा विचारात असताना एक दिवस ’आशय’मधले सहकारी जयंत राळेरासकर यांचा फोन आला. सोलापुरातल्या सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन रद्दी डेपो शेजारच्या चहा कॅन्टिनमध्ये त्यांचा रोजचा मित्रमंडळींसह ठिय्या असे. तिथे त्यादिवशी ’आदित्य’चे दोन्ही अंक रद्दीत आले होते. ’लगेच घ्या’ एवढेच त्यांना कसेबसे सांगू शकलो. त्यातल्या आदित्य दिवाळी ८५ मध्ये ’साहित्य जीवनाचे आधारमूल्य’ हा लेख आढळला."

याचा अर्थ वैद्य स्वत: यासाठी राबत होते नि वर असे जागरुक मित्रही जोडून ठेवले होते. यातून चिकाटीने एक एक संदर्भ जमा करत तयार झालेली सूची सरदेशमुखांच्या लेखनाचा एकुण पल्ला दाखवणारी आहे. त्यांच्या तीन कादंबर्‍या आणि प्रदेश साकल्याचा’ हे समीक्षात्मक पुस्तक इतकेच मला ठाऊक होते. पण गडकर्‍यांच्या नाटकांवरचे लेख नि त्यांचे पुस्तक, माझ्या आवडत्या गोपुंच्या ’उध्वस्त धर्मशाळा’ची समीक्षा, एलकुंचवारांच्या ’वाडा ट्रिलजी’चे अवलोकन, हर्मन हेसे च्या सिद्धार्थ सारख्या गाजलेल्या कादंबरीचा, खलील जिब्रानच्या पुस्तकांचे अनुवाद, त्यांच्या स्वत:च्या कविता, त्याशिवाय गोविंदाग्रज, बालकवींपासून ग्रेसपर्यंत अनेक कवींच्या कवितेवरील समीक्षा... असा प्रचंड पैस सरदेशमुखांच्या लेखनाला लाभलेला आहे. वैद्य यांनी चिकाटीने केलेले हे काम एखाद्याने सरदेशमुखांच्या लेखनावर पीएच.डी. साठी वा समीक्षेसाठी वापरले तरच त्याचा व्यावहारिक वापर होईल. एरवी ’याचा काय उपयोग’ असा प्रश्न त्यांना करणार्‍याचा व्यावहारिक दृष्टीकोन पाहता तो प्रश्न अगदी चुकीचा म्हणता येणार नाही. पण आपल्या दिवंगत स्नेह्याच्या प्रेमाखातर केलेल्या या कामाने जे अपार समाधान मिळते त्याची कल्पना त्या प्रश्नकर्त्याला येणार नाही हे उघड आहे.

वैद्य यांच्या त्या कष्टाला कुर्निसात करुन या सूचीचा आनंदाने स्वीकार करतो आहे. आणि तुमच्या कष्टाची ही फलश्रुती पाहण्यासाठी सोलापूरला लवकरच टपकणार आहे ही धमकीही देऊन ठेवतो.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा