सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

मार्क्सासि वाट पुसता

जिचा तो कट्टर शत्रू आहे असा आभास निर्माण केला जातो, ती भांडवलशाही ही मानवी प्रगतीमधील एक संक्रमणशील अवस्था आहे असे म्हणत असताना, मार्क्सने पददलितांच्या, गुलामांच्या, भूदासांच्या मुक्तीमधील तिचे योगदान नाकारले नव्हते. त्यापुढे जाऊन समाजवादी व्यवस्था ही देखील त्याला अपेक्षित असलेल्या साम्यवादी (कम्युनिझम चा हा मराठी प्रतिशब्द खरंतर मला अजिबात पसंत नाही.) व्यवस्थेकडे जाण्याच्या मार्गावरचा एक आवश्यक टप्पा आहे असेही तो मानत होता. कदाचित आज शंभर वर्षांनंतर त्याने नवी अपेक्षित व्यवस्था पुढे ठेवत साम्यवादी व्यवस्था ही त्या अपेक्षित व्यवस्थेच्या मार्गावरचा अपरिहार्य थांबा मानले असते.

स्वत:च्या ज्ञानाला सतत अपडेट करत राहण्याच्या, खर्‍या अर्थाने पुरोगामी (पुढे जाण्याच्या) त्याच्या वृत्तीमुळे माझ्या दृष्टीने तो जगातला सर्वात शहाणा माणूस ठरतो. ज्या व्यवस्थांच्या मर्यादा दाखवत आपली व्यवस्थेचा पुरस्कार तो करत होता, त्या व्यवस्थांचे ऋण मानण्याइतका मनाचा मोठेपणा त्याच्यामध्ये होता. 'काही शतकांपूर्वीच जगातील सर्व ज्ञान निर्माण झाले, त्याला आत्मसात करणे, अनुसरणे इतकेच आपले काम आहे' या खुज्या मानसिकतेच्या बहुसंख्येमध्ये राहून त्याची उंची अधिकच प्रकर्षाने जाणवत राहाते.

त्याच्या विचारांतील अनेक मुद्द्यांबाबत मतभेद राखूनही, त्यांबद्दल आक्षेप असूनही तो माझा सर्वात लाडका अर्वाचीन विचारवंत आहे ते त्यामुळॆच.

मार्क्सवादी म्हणवणार्‍यांबद्दल मात्र मी गांधींचे म्हटले जाणारे एक वाक्य उधार घेऊन ते माझ्या सोयीने बदलून घेईन नि म्हणेन,

I love your Marx, but don't like your Marxists. Your Marxists are so unlike your Marx.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा