’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

अविचारी नेते नि अंध अनुयायी

----
सुनील लांडे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट:


चिमणीमुक्त देश


माओ म्हणाला,
‘देशातली एकेक चिमणी टिपून मारा.

फार नाही, दोन चार दिवस
सगळ्यांना कष्ट करावे लागतील.
एकदा का देश चिमणीमुक्त झाला की
सगळ्यांच्या थाळीत भरपूर अन्न पडेल.
कोणी उपाशी राहणार नाही.
पोरंबाळं पोट फुटेपर्यंत जेवतील.
थोडी, अगदी थोडीच कळ काढा,
देशासाठी एवढं करा!’
कोणतंही ध्येय गाठण्यासाठी
त्याग करावाच लागतो. थोडीफार झीज सोसावी लागते. किंंमत द्यावी लागते.
ती किंंमत सामान्य लोकांनी
नाही द्यायची तर कुणी?
शेवटी या सामान्य लोकांचा
देशाला उपयोग तरी काय?
सृष्टीची निरागस आनंदनिर्मिती म्हणजे चिमणी. निश्चिंत मनानं पडवीत गिरक्या मारणारी. गॅलरीत घरटं करणारी. तुमचं अंगण चिवचिवाटाने भरणारी. इटुकला आकार, पिटुकला संसार.
वळचणीला घर, नितकोर जेवण. वितभर आयुष्य. उगाच हव्यास नाही, भलत्यासलत्या अपेक्षा नाहीत. अध्यात नाही मध्यात नाही. सगळ्यांशी दोस्ती. लहानगी बाळं ‘एक घास चिऊचा’ घेतच वाढणार.
आता ही अशी गाणी चिनी भाषेत आहेत काय आणि माओनं ती लहानपणी म्हटली होती काय? - कुणास ठाऊक. कदाचित बालपणीसुद्धा त्यानं ऐकली असतील फक्त क्रांतीची गाणी. लाल क्रांतीची गाणी.
चीनमधल्या महान क्रांतीनंतर सत्तावन्न वर्षांचा माओ राज्यकर्ता बनला तेव्हा त्यानं निर्धार केला होता. त्याला पूर्ण समाज बदलायचा होता, देश बदलायचा होता; जगसुद्धा बदलायचं होतं. त्याचा मागास देश अलम दुनियेत अव्वल करायचा होता. दोन तपांच्या संघर्षानंतर त्याची स्वप्नं पूर्ण करण्याचा क्षण आला होता आणि हा क्षण तो सहजासहजी हातचा दवडणार नव्हता. आधीच उशीर झाला होता. आता आणखी कालहरण चालणार नव्हतं. माओला हवा होता शक्तिमान, उत्साही, भविष्यवेधी लोकांचा एकजूट समाज! असा समाज जो नेत्याच्या शब्दासाठी जीव ओवाळून टाकतो; जो नेत्याच्या शब्दानुसार चालतो, धावतो; झेपावतोे.
झेपावतो अविचल निष्ठेने ध्येयाकडे.
समाज असावा तर असा.
अठ्ठावन सालच्या जानेवारीत माओने ती मोठी झेप घेण्यास आपल्या देशबांधवांना हाक दिली : द ग्रेट लीप फॉरवर्ड. केवढा स्फूर्तिदायी मंत्र!! गोळीबंद घोषणा. झपाटलेली जनता.
माओने सगळ्यांमध्ये देशभक्तीची हवा भरली. तो म्हणाला,
‘ध्येय ठरलं आहे, उत्साही लोकसेनाहाती आहे मग यश आपलंच आहे यात शंका नको. ती अमेरिका, ते इंग्लंड, ते भांडवलशाहीचे दिमाखदार किल्ले आता लाल लाटेमध्ये जमीनदोस्त होणार निश्चितच! ही मोठी लढाई आहे. लढाईत संकटं येतील. अकल्पित अडथळे येतील. आधीच्या राज्यव्यवस्थेनं करून ठेवलेली घाण साफ करावी लागेल. खणून ठेवलेले खड्डे भरावे लागतील. छुपे हल्ले होतील. जुन्या व्यवस्थेचे हस्तक घातपात करतील. बुद्धिभेद करतील. पण त्यांना दाद द्यायची नाही. आता नसत्या शंकांमध्ये अवसान गमवायचं नाही!’
जनता एकदिलाने कामाला लागली. तिला वाटू लागलं, आमचा नेता धडाडीचा आहे. शत्रूच्या वर्मावर अचूक हल्ले कसे करायचे हे त्याला ठाऊक आहे. तो आदेश देईल, आपण त्याचा अंमल करायचा.
नेत्यानं एके दिवशी आदेश दिला - सगळ्या चिमण्या मारून टाका! हो, चिमण्याच. असं दचकायला काय झालं?
नेता म्हणाला, ‘या चिमण्या देशाच्या शत्रू आहेत. त्या क्रांतीच्या शत्रू आहेत. देशातील सगळे कॉम्रेड भाई आणि कॉम्रेड ताई पक्षाच्या सामूहिक शेतात राबतात. देशासाठी धान्य पिकवतात. पण त्यांची म्हणजे सरकारचीच पिकं या उनाड चिमण्या खाऊन टाकतात. कष्टकरी जनता उपाशी आणि चिमण्या टर्रर तुपाशी. हाकलायला गेलं तर उडून जातात भुर्रकन. पार कुंपणापार जातात. परत येतात. आमचे दाणे खातात. परत उडून जातात. यामुळेच तर देश ग्रेट होण्यात अडथळा येत आहे. त्यांचा समूळ नायनाट केल्यानंच क्रांतीचं स्वप्न साकार होणार आहे.’
माओनं सांगितलं, भावांनो आणि बहिणींनो, उद्यापासून तीन दिवस सगळ्या लोकांनी एकच काम करायचं, चिमण्या मारण्याचं. देशभरात एकसुद्धा चिमणी ठेवायची नाही. जो जास्तीत जास्त चिमण्या मारेल त्याला आम्ही शाब्बासकी देऊ. त्याला देशभक्त असल्याचं सर्टिफिकेट देऊ!!
पहाट फुटण्यापूर्वीच लोक उठले आणि हाती लागेल ते हत्त्यार घेऊन लढायला निघाले. बायका, बाप्ये, म्हातारे, तरणे. मुलंसुद्धा निघाली. त्यांच्याकडं होते ढोल आणि डफडी. नाहीच तर त्यांनी जुनीपुराणी डबडीच घेतली. काही गृहिणी पाण्याच्या कळश्या नि जेवायच्या थाळ्या नि चमचे घेऊन जमल्या. तरुणांनी मोठमोठे बांबू गोळा केले. तरुण मुली गलोरी घेऊन निघाल्या. सूर्याेदयाला चिमण्या न्याहारीसाठी घरट्यातून उडण्याआधीच ही राष्ट्रभक्त जनसेना सज्ज होती.
स्ट्रॅटेजी फार हुशारीची होती. शत्रूच्या वर्तनाचा नीट अभ्यास करून आखलेली. शत्रूला कल्पना करता येणार नाही आणि कुठंच पळवाट सापडणार नाही अशी जबरदस्त स्ट्रॅटेजी होती ती माओची. योजना अशी की देशभर, खेड्यांमध्ये आणि शहरांमध्येसुद्धा, लोकांनी ढोल-ताशे-डबे-थाळ्या बडवून एवढा गजर उठवायचा की एकाही चिमणीला जमिनीवर उतरायची संधीच मिळणार नाही. अखंड गोंगाट असा चालवायचा की चिमणीला पाय टेकवायलासुद्धा वाव मिळणार नाही. शेतात नाही, घरात नाही. शहरात नाही. मैदानात नाही. जंगलातसुद्धा झाडावर बसू देणार नाही. त्यांना अन्न मिळणार नाही.
पाणी मिळणार नाही. त्यांना सारखं उडत ठेवायचं. कुठंही उडाल्या तरी देशभक्त सेनेचा वाद्यघोष त्यांचं शेपूट सोडणार नाही. किती वेळ उडतील? एक तास, दोन तास? दिवसभर? दोन दिवस? शेवटी थकतील उडून उडून. धापा टाकत कोसळतील. आणि मरतील.
नेता सांगत होता, ‘फार नाही, दोन चार दिवस सगळ्यांना कष्ट करावे लागतील. एकदा का देश चिमणीमुक्त झाला की सगळ्यांच्या थाळीत भरपूर अन्न पडेल. कोणी उपाशी राहणार नाही. पोरंबाळं पोट फुटेपर्यंत जेवतील. थोडी, अगदी थोडीच कळ काढा, देशासाठी एवढं करा!’
- तीन दिवसांच्या होलपटीत लाखो चिमण्या मेल्या. ज्या वाचल्या त्यांना बंदुका उडवून मारलं गेलं. गलोरीनं टिपण्याच्या स्पर्धा खेळल्या गेल्या. पोरापोरींनी क्रांतीची गाणी गात रानं धुंडाळली आणि एकूण एक चिमणी मेल्याची खात्री केली. उंच झाडांवर चढून घरटी उचकटली, त्यांतील अंडी भिरकावून फोडली. उंच इमारतींच्या आडोशाला बांधलेली इवली घरटी बांबूनं पाडली.
ही महान मोहीम यशस्वी करताना थोडीफार अनुषंगिक हानी म्हणजे कोलॅटरल डॅमेज म्हणतात ते झालं. ते होणारच होतं. उत्साही म्हातारे चिमण्यांना दमवण्याच्या नादात स्वत:च धापा टाकत काळीज फुटून कोसळले. कोणी घराच्या छपरावरून चिमणीसंहाराचा दंडोरा पिटताना तोल सुटून धारातीर्थी पडले. कुणी चिमण्यांवर उडवलेली बंदुकीची गोळी स्वत:च खावून देवांना प्रिय झाले. कोणी एकेका चिमणीचा पाठलाग करता करता तलावात बुडाले, दलदलीत फसले. कोणी झाडावरून पडून कायमचे जायबंदी झाले. पण त्यांनी मिळवलेला देशासाठी महान त्यागाचा आनंद अवर्णनीय होता.
देशकार्य करताना एखादा पाय गमावला, किंबहुना जीव जरी गमावला तरी त्यांना वाईट का वाटेल? खरोखर धन्य म्हणावी ती चिनी जनता जी केवळ नेत्याच्या शब्दावर विश्वास टाकून अशी विलक्षण लढाई लढायला तयार झाली; देशासाठी असा बेभान त्याग करू शकली.
- खरं तर त्या जनतेचा सगळ्या जगानं कित्ता गिरवला पाहिजे, नाही का? तिला दणदणीत लाल सलामसुद्धा ठोकला पाहिजे. आणि प्रत्यक्षात तसंच घडणार होतंसुद्धा!! - जर बिनडोक निसर्गानं अकल्पित ढवळाढवळ केली नसती तर!!
एक महान कार्य पूर्ण केल्याबद्दल देशनेत्यांनी एकमेकांची पाठ थोपटण्याचा कार्यक्रम दोन वर्षं चालला. त्यानंतरच्या साली पिकं चांगली भराला आली असताना उगवतीलाच दूर क्षितिजावर एक अवकाळी काळा ढग दिसला. तो मोठ्ठ्या विमानासारखा गुरगुरत, वेगानं झेपावत जवळजवळ आला तेव्हा कळलं, तो ढग नव्हता तर ती टोळधाड होती. हजारो, नव्हे लाखो टोळांचे अगणित थवे देशभर उतरले आणि त्यांनी हा हा म्हणता उभं पीक फस्त केलं. एक दाणा मागे ठेवला नाही. लोक आडोशाला दडून विस्फारल्या डोळ्यांनी पाहत राहिले. ते ढोल, ती डफडी, डबडी, ती क्रांतीची गाणी काही काही कामाचं राहिलं नाही. सरकारी फौजांच्या बंदुकासुद्धा गपगार पडल्या त्या राक्षसी टोळांपुढं. हे खरं की चिमण्या कणसातले दाणे खायच्या तशा टोळांनासुद्धा खायच्या. पण हे थोर झेप घेणाऱ्या नेत्यांना आधी कुठं पटलं होतं? आणि त्यांना हे सांगायची हिंमत तरी करायची कुणी? अहो, आदेश म्हणजे आदेश. तो मुकाटपणे पाळायचा असतो. नाही तर आपलाच चिमणा व्हायचा!
सरकारनं चिमण्या खत्म केल्या आणि टोळांची वीण दसपटीनं वाढली. आता सगळं वावर त्यांचंच होतं. टोळांच्या पाठोपाठ दुष्काळ आला. मोठा महामारीचा दुष्काळ. घासभर अन्न मिळेना. रानातली जनावरं, कावळे आणि घुबडं, जमिनीतील कंदमुळं, झाडाच्या फांद्या-बुंधे, किडेमुंग्या, पाली, झुरळं, साप सगळं सगळं खाऊन संपलं तरी भूक संपेना. देशभरात लोक खंगून खंगून मेले. माणसानं माणसाला खाण्यापर्यंत पाळी आली. एकूण आकडा किती? निश्चित गणती नाही. पण आता चार दशकांनंतर इतिहासकार हिशेब मांडतात की तीन ते चार कोटी चिनी लोक यमदूतांनी ओढून नेले.
सरकारच्या लेखी असं काही घडलं नाही. थोडंफार इकडंतिकडं झालं असेल, नाही कोण म्हणतो? पण लोकांचे फार हाल झाले, लोक मेले वगैरे हे काही खरं नाही. तसं असतं तर ते सरकारला कळलं नसतं का?
... शिवाय, लोकांचं देशनेत्यावर प्रेम होतं. नेत्यानं क्रांतिकारी कार्यक्रम समोर ठेवला आणि लोकांनी तो निष्ठेनं राबवला! परिणाम सोडून द्या, महत्त्व आहे ते ध्येय गाठण्याला. कोणतंही ध्येय गाठण्यासाठी त्याग तर करावाच लागतो. थोडीफार झीज सोसावी लागते. किंमत द्यावी लागते. ती किंमत सामान्य लोकांनी नाही द्यायची तर कुणी? शेवटी या सामान्य लोकांचा देशाला उपयोग तरी काय? लोकांनी हाल सोसले तर ते स्वेच्छेनंच. देशासाठी.
हे गृहीतच होतं की काही थोडे लोक कुरकुरतील, विरोध करतील, लोकांचा बुद्धिभेदसुद्धा करतील, आणि त्यासाठीच तर अशा लोकांना छळछावण्यांमध्ये राहण्याची शिक्षा लोकांनीच केली, नव्हे का?
बाकी सगळा देशाच्या शत्रूंचा अपप्रचार आहे. देशभक्त जनता अशा खोट्या प्रचाराला भुलत नाही. क्रांतीची आगेकूच चालू राहणार आहे. हो ना?
... आता तुम्ही म्हणाल, माओने मारलेल्या चिमण्यांची आठवण आजच का?
तर सहजच!!
----- दै. लोकमत मधून साभार

मित्रांनो ही कुठली काल्पनिक कथा किवा व्हॉट्स अँप ढकलपत्र नसून सत्य घडलेला इतिहास आहे, आपण नेटवर शोध घेऊन खात्री करून घेऊ शकता.

पुढील शब्दसमूह Google search करा

four pests campaign  किंवा The Great Sparrow Campaign

आणि रिझल्ट पहा

----

सादरीकरणकौशल्य, वक्तृत्व, नेतृत्वगुण, माहितीसिद्धता, बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता हे सारे वेगवेगळे गुण आहेत. यातील अलिकडील टप्प्यावर असलेल्याला थेट विद्वत्तेचे प्रशस्तीपत्रक देणे नि त्याच्या पायी लोटांगण घालत आपले भविष्य त्याच्या हाती सोपवून देण्याचा मूर्खपणा ही काही चिनी लोकांची मक्तेदारी आहे असे नव्हे. असेच एक चिडीमार कॅम्पेन ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतातही सुरु झाले, ज्याची फळॆ आज मंदीच्या रूपात आपल्याला दिसत आहेत.

भांडवलशाहीला समृद्धीचा हुकमी एक्का आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना तिच्या यशाचे शिखर समजणारे तर त्याहून विद्वान. त्यांना तर असले एखादे भाबडे, अडाणी कारणही नको असते. मानसिक कमकुवतपणामुळॆ सतत भीतीच्या छायेत राहायचे, त्यावर उपाय म्हणून बंदुका हव्यात आणि बंदुका आहेत म्हणून मग त्या उडवून शौर्य दाखवायला हवे. पण माणूस मारणे - निदान सिव्हिलियन मंडळींसाठी तरी - बेकायदेशीर असल्याने मग ते शौर्य पक्षी नि जनावरांवर दाखवणे. मग त्यासाठी पुन्हा स्पेशलाईज्ड शस्त्रे हवीत. (यूएस डव्ह हंटिंग सर्च करुन पाहा.) या महाभागांच्या पूर्वजांनी केवळ शिकारीच्या हौशीखातर आणि चविष्ट मांसाखातर पॅसेंजर पिजन नावाची अख्खी जमात नष्ट केली. (यामुळॆ अमेरिकन वनसंपत्तीवरील झालेल्या दुष्परिणामांबाबत अभ्यास झाल्यावर त्यांच्या डीएनए-पुनरुज्जीवनाचे प्रयत्न चालू झाले आहेत.) डोडो या पक्ष्याच्या अस्तानंतर बी रुजण्यासाठी त्याच्यावर अवलंबून असणार्‍या झाडांची संख्या रोडावत गेल्याने त्यांच्या परिसंस्थेत झालेली उलथापालथही अभ्यासनीय आहे.

थोडक्यात विकास, क्रांती वगैरे बाता करणारे व्यावहारिक अभ्यासात अनेकदा खुजे असतात, त्यांची आमूलाग्र बदलाची मॉडेल्स एखाद्या उपयुक्त क्षेत्रात समूळ उच्चाटनाचीही असू शकतात. ते समजून घेण्याइतकी फुरसत, समज आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे नसते. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नेतृत्वगुण शून्य असलेल्या पण आपापल्या क्षेत्रात निष्ठेने काम करणार्‍यांची आवश्यकता समजून घ्यायला हवी. पण नेत्याच्या वाचाळतेच्या अफूने धुंद झालेल्या बहुसंख्येची सारासारविवेकबुद्धी लुळी पडते आणि आपल्याच हिताचे सांगणार्‍यांना विकासविरोधी म्हणून झटकून टाकले जाते.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा