सोमवार, ६ जानेवारी, २०२०

उंटावरचे शहाणे

कोणत्याही विदारक घटनेनंतर, सुंद-उपसुंदांच्या नव्या पराक्रमानंतर...

१. समाजवादी: हे अपेक्षितच होतं. शेवटी कॉंग्रेस नि भाजप एकाच माळेचे मणी.

२. कम्युनिस्ट: समाजवादी नि कॉंग्रेस वाले आहेत म्हणून हे असे होते. समाजवादी माती खातात... कॉंग्रेसने अमुक करायला पाहिजे... कॉंग्रेस विसर्जित करायला पाहिजे... राहुल गांधींनी रिटायर व्हायला पाहिजे... राहुल गांधी आपली जबाबदारी टाळत आहेत...

३. स्वयंघोषित आंबेडकरवादी: हे सारे संघप्रणित ब्राह्मिनिकल व्यवस्थेचे पाप आहे. समाजवादी संघाची चाटतात. कम्युनिस्टांना जातवास्तव कळत नाही.

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्याची ही पोपटपंची. धार्मिकांच्या, परंपरावाद्यांच्या अनुभवहीन गृहितकांच्या, मतांचीच जपमाळ... जप वेगळा इतकेच.

हे पाहता शिवसेना हिंदुत्ववादी असेल, पवारांचे राजकारण बेभरवशाचे असेल, कॉंग्रेस गलितगात्र झाली असेल आणि हे तिघे पुढे माती खातील की कसे हा मुद्दा वेगळा; पण निदान दोन महिने का होईन त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. या स्वयंघोषित पवित्र विचारांच्या मंडळींपेक्षा सध्या तरी यांच्या मते वैट्टं, दुय्यम तिय्यम, बदनाम, भ्रष्ट वगैरे असलेले हे त्रिकूट अधिक व्यावहारिक उपयोगाचे ठरते आहे.

या तिघा श्रेष्ठींचा -प्रत्येकी- सर्वगुणसंपन्न असा राजकीय पर्याय देशात उदयाला येईतो हा देशच शिल्लक राहिल का आणि राहिला तरी त्यातील माणसे माणूस म्हणून शिल्लक राहतीला का अशी शंका असल्याने तूर्त तरी पस्तीस टक्केवाल्यापेक्षा चाळीस टक्केवाला बरा असे म्हणू या.

या स्वयंघोषित बुद्धिमंतांनी आधी परीक्षा द्यावी तर खरे, 'अरेऽ, डिस्टिंक्शनने पास होऊ’च्या नुसत्या गमजा ऐकण्याचा कंटाळा आलाय. बुद्ध्यामैथुनाच्या, परनिंदेच्या व्यसनातून हे बाहेर येतील तेव्हा पाहू.

यांची नापासांची स्पर्धा आहे. नापास झालो असलो तरी त्याच्यापेक्षा एक मार्क जास्त पडलाय मला अशी फुशारकी मारणारी जमात आहे ही. मुळात पास कसे व्हावे याचा विचार करण्याची इच्छा नाही

यांचा निष्कलंक नि श्रेष्ठ राजकीय पर्याय, मोदींचे अच्छे दिन आणि गुलबकावलीचे फूल हे तीनही एकाच पातळीवरचे म्हणायला हवेत. कुठल्या ग्रहावर आणि कधी उगवणार आहेत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.

-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा