ज्या देशात स्त्रीभ्रूणहत्या सर्रास घडते त्या देशात सम-विषमचा हुकमी एक्का हाती असताना लोकांनी केवळ वीर्यवान पुरुष बालकांची माळ लावली नसती काय? बरं असे झाले असते तर काय झाले असते बरे? या आसिंधुसिंधु देशांत योद्धे, अलौकिक बुद्धिमान पुरुष महामूर संख्येने जन्मले असते. स्त्रीदेह म्हणजे नरकाचे द्वार वगैरे बोलण्याची गरजच उरली नसती.
देश काही शतकांपूर्वीच महासत्ता झाला असता. कारण हुंड्याचे वाचलेले पैसे या जगाला ललामभूत असलेल्या देशाच्या सुपुत्रांनी देशभर अधिकाधिक प्रेरणादायी पुतळे, स्मारके, अधिकाधिक खर्या इतिहासाची पुस्तके, शेजारी देशावर सोडण्यासाठी मिसाईल्स, अण्वस्त्रे, तोफा, रणगाडॆ, जागतिक महत्वाच्या आपल्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था यासाठी दान नसते केले? यातून केवढा बलवान देश निर्माण झाला असता विचार करा.
पण साला पुनरुत्पादनासाठी का होईना चार स्त्रिया जन्माला घालाव्या लागल्या असत्या. नाहीतर सम तारखेला संग कुणाशी करणार हे महान पुरुष? पण स्त्रियांची संख्या कमी नि पुनरुत्पादनोत्सुक पुरुष अनेक त्यामुळे शास्त्रज्ञांनी गर्भ परिपक्व होण्याचा काळ कमी करण्याचे संशोधन केले असते. एखाद्या प्राचीन ग्रंथात त्यांना महिन्याभरात स्त्रीचा गर्भ पुरा विकसित होऊन ती बाळंत होण्याचे हुकमी उपायही सापडले असते. (ग्रंथात लिहिलेले सगळॆ बरोबरच असते.) त्यातून ती स्त्री लगेचच पुढच्या गर्भधारणेस तयार झाली असती.
त्याचबरोबर स्त्री संख्या कमी नि पुरुष अधिक त्यामुळे बलात्काराची प्रेरणा वाढीस लागली असती. त्यातून शारीरदृष्ट्या बलवान पुरुषच स्त्रियांना बलाने स्वत:च्या अंकित ठेवू शकले असते. त्यांना अन्य पुरुषांच्या वासनेचे शिकार होऊ न देण्यासाठी त्यांनी त्या स्त्रियांना घरात कोंडले असते. म्हणजे आज माजघरात आहेत त्या तळघरात गेल्या असत्या. म्हणजे दरमहा बाळंत होणारी, बंदिस्त वातावरणात राहणारी स्त्री जणू आधुनिक पोल्ट्रीमध्ये अंड्यांसाठी राखलेली कोंबडीच झाली असती. देशाला भरपूर अंडी मिळाली असती. देशाच्या थोर यशोंदुंदुंभिचा नंगारा गंगंनंचुंबिंत आकाशापर्यंत पसरला असता.
तेव्हा पुन्हा सांगतो, देशाचा विचार करा आणि सम तारखेला संग करा.
(गुरुचरित्रातील दाव्याच्या आधारे इंदुरीकरबुवांनी ’सम तारखेस संग केल्यास मुलगा जन्मतो आणि विषम तारखेस संग केल्यास मुलगी’ असे तारे तोडले त्यासंदर्भात.)
#विषमबुद्धी
#गाढवानेलिहिलीगीताकोल्ह्यानेकेलाधर्म
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा