मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

खांडेकर आणि अमृतवेल

खांडेकरांनी बहुतेक कादंबर्‍यांमध्ये 'भारतकुमार' पोज घेतलेली आहे. अपवाद दोन कादंबर्‍यांचा ययाती आणि अमृतवेल. पैकी ययाती ही पुरस्कारविजेती असली तरी बाळबोध आहे. अमृतवेल मध्ये खांडेकर प्रथमच वाट बदलतात.

अमृतवेल’ची तुलना मला शरदचंद्रांच्या कादंबर्‍यांशी करावीशी वाटते. त्यांच्या कादंबर्‍यांतही - चरित्रहीन, श्रीकांत आणि सर्वात महत्वाची शेषप्रश्न - स्त्रिया आपली कक्षा सोडून बाहेर येऊ पाहतात पण शरदबाबू त्यांना फार बाहेर पडू देत नाहीत. (माझ्या आठवणीप्रमाणे ’शरदबाबूंच्या स्त्रिया’ या शीर्षकाचा लेखही कुणीतरी लिहिल्याचा उल्लेख जीएंच्या पत्रांत आहे. तो अनेकदा शोधूनही पुन्हा सापडला नाही मला. बहुधा माधव आचवल असावेत.) शेषप्रश्नमधील कमल तर इतकी स्वतंत्र विचाराची आहे की संस्कृतीगुंडांचा त्रास नको म्हणून त्यांनी तिला अ‍ॅंग्लो-इंडियन दाखवली आहे.

अर्थात मराठीत कक्षेबाहेरचे लेखन वाचायला मिळत नाही वगैरे बोलणे सोपे असते. त्या परिस्थितीतही अशा लेखकांनी ज्या कक्षा ओलांडल्यात ते स्पृहणीयच आहे. श्रीमान योगी, मृत्युंजय, राधेय, वगैरे भूतकालभोगी लेखनात रमलेल्या, १०० मीटर चालणार्‍या समाजाला एकदम मॅरेथॉन धावायला भाग पाडणॆ म्हणजे त्यांना आपल्या लेखनाकडे पाठ फिरवण्यास भाग पाडणेच असते.

अमृतवेल ही माझ्या मते खांडेकरांची सर्वात उत्तम कादंबरी आहे. देवदत्त आणि नंदाचे नाते अतिशय तरलपणॆ, नेमके फुलवले आहे. ते सुफळ संपूर्ण करणे हे उलट बाळबोधपणाचेच ठरले असते. त्या अर्थी उलट खांडेकरांनी कक्षा ओलांडलेलीच आहे. नाव नसलेले, ज्याला खर्‍या अर्थाने प्लेटॉनिक म्हणता येईल असे इतके सुरेख नाते उभे केल्याबद्दल मी तर त्यांना सलामच केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा