सोमवार, १६ मार्च, २०२०

पुठ्ठ्याचे सैनिक


१६ मार्च, २०१९

पॅनफिलोबचे शूर २८ सैनिक

दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली ही घटना. कशी उलगडत जाते बघा.

1941 च्या नोव्हेंबरात जर्मनीचे सैन्य मॉस्कोवर चाल करुन जात होते. दरम्यानच्या प्रवासात त्यांना जागोजागी रशियन सैन्याकडून प्रतिकार झाला. अनेक ठिकाणी जर्मनांनी तो मोडून काढला. परंतु एका तगड्या जर्मन युनिटला रशियन सैनिकांच्या ३० जणांच्या एका छोट्याशा गटाने फारच कडवी झुंज दिली. ह्या ३० रशियन सैनिकांसमोर ५४ दमदार जर्मन टँकचे एक मोठे युनिट चालून येत होते. आपले ठाणे सोडायचे नाही व जर्मनांना जमेल तसा प्रतिकार करायचाच असा हा वीर बहादूर रक्षणकर्त्यांनी निर्णय केला. का तर? आपली पोस्ट सोडून जायचे कुठे? मॉस्को तर अगदी आपल्यामागेच आहे. घाबरुन पलायन करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन साथीदारांना त्यांनी स्वतःच गोळ्या घालून संपवले. जर्मनांशी टक्कर घ्यायचा पण केलेल्या हा निधड्या छातीच्या बहादूरांकडे मात्र टँक युनिटशी लढण्यायोग्य कोणतीही परिणामकारक अशी हत्यारे नव्हती. जुनाट पद्धतीच्या बंदूकी, जर्मन टँकसमोर बिलकूल कुचकामी अशा अँटीटँक रायफली आणि ग्रेनेड्स एवढीच त्यांची तयारी. परंतु मनात आपला देश, आपली माती, आपली माणसे ह्यांच्यासाठी असलेली सर्वोच्च भावना, प्रचंड प्रेम असेल तर कोणत्याही विपरित परिस्थितीत सैनिक आपले कर्तव्य पूर्ण करतोच. त्यामुळे आपल्या तुटपुंज्या सामर्थ्यासह ह्या कडव्या रशियन सोल्जरांनी जर्मन टँक युनिटवर निकराचा हल्ला केला, अंदाधुंद लढाई झाली. अजेय समजल्या जाणार्‍या जर्मन टँक्सना त्यांनी चांगलीच धूळ चारली. अठरा टँक गारद केले, अनेक जर्मन सोल्जर मारले, जखमी केले. परंतू जर्मनांच्या संख्याबळापुढे, आधुनिक हत्यारांपुढे ते २८ जण टिकू शकले नाही. तरी त्यांनी जर्मनांना सळो का पळो करुन सोडलेच. अखेर सगळ्या २८ रशियन शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले.

सदर बातमी रशियन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. सर्व रशियातून, सैनिकांमधून, जनतेतून ह्या शूर अठ्ठावीस नायकांबद्दल खूप बोलले जाऊ लागले. जर्मन आक्रमणामुळे मनोबल गमावलेल्या रशियन सैनिकांमध्ये ह्या बातमीने नव्या उत्साहाची पेरणीच जणू केली. त्यांच्या शौर्याच्या कथांनी रशियनांना जर्मनांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. ह्या बातम्या जेव्हा रशियन आर्मीच्या वरिष्ठांच्या कानावर आल्या तेव्हा त्यांनी ह्या २८ जणांबद्दल अधिक माहिती मागवा असे आदेश काढले. त्यांची नावे अजून कळलेली नव्हती. पॅनफिलोब नावाच्या मेजर जनरलच्या रायफल डिविजनमधले ते सैनिक होते असे कळल्यामुळे त्यांचा 'पॅनफिलोबचे २८ सैनिक' अशाच नावाने उल्लेख केला जात होता. आता जनतेत त्यांची चर्चा होऊ लागल्याने त्या सर्वांना त्यांच्या नावानिशी मरणोपरांत काही पदके वगैरे सन्मान देऊन, तसा सोहळा घडवून आणला तर त्यानिमित्ताने जनतेला, सैन्याला आणखी प्रेरणा मिळू शकेल अशी वरिष्ठांची संकल्पना होती.

आता पुढे गंमत घडते. त्या २८ नावांचा शोध घेत असतांना टप्प्याटप्प्याने असे कळत जाते की ही सर्व शौर्यगाथा सांगोवांगीची आहे. अमक्याने मला सांगितले, तमक्याने तमक्याला असे सांगितले अशा मार्गाने हा शोध जाऊ लागला. जसे जसे अधिक उत्खनन होऊ लागले तसे ह्या सर्व घटनेचे तपशीलही बदलू लागले. अखेर रशियन वरिष्ठांना ह्या घटनेची रितसर चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागले. ह्या प्रकरणातले सत्य काय आहे ते त्या अधिकृत अहवालातून पुढे आले. तर त्या दिवशी नेमके काय झाले होते?

जर्मनांच्या आक्रमणाला अनेक रशियन डिविजन्सने जागोजागी प्रतिकार केला. त्यात २८ जणांची एक तुकडी होती खरेच. त्यांची नावेही कळली. पण त्या तुकडीने वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याप्रमाणे कोणताही पराक्रम गाजवला नव्हता. रशियन आर्मीच्याच काय तर खुद्द जर्मनांच्या त्या दिवशीच्या नोंदीं मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टँक नष्ट झाले किंवा त्यांच्या आक्रमणाच्या प्रवासात असे काही मोठे विघ्न आल्याचे आढळले नाही. जर्मनांनी आपले त्यादिवशीचे टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण केले होते. तर ह्या २८ जणांच्या तुकडीमध्ये जे मृत समजले गेले होते त्यातले सहा जण प्रत्यक्षात जीवंत होते. त्यातला एक तर चक्क जर्मनांना सामील झाला होता आणि नंतर जर्मन पोलिसात मस्तपैकी नोकरीही करत होता. त्या नोकरीदरम्यान त्याने रशियन लोकांवर जर्मनांनी केलेल्या अत्याचारांत साथ दिली. जेव्हा जर्मनीचा पाडाव होणार आहे हे त्याला कळले तेव्हा परत फिरुन तो रशियन आर्मीत रुजू झाला. अर्थात नंतर त्याच्यावर खटला दाखल होऊन त्याला त्याच्या देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.

अशा तर्‍हेने पॅनफिलोबचे २८ सैनिक तर होते परंतु ते शूरवीर हुतात्मे नव्हते. सर्व पराक्रम गाथा चक्क खोटी होती आणि हे लगेच १९४८ च्या अधिकृत चौकशी अहवालात सिद्ध झाले होते. परंतु जनतेच्या मनावर ह्या नव्या बातमीचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून हा अहवाल दाबून ठेवण्यात आला. जनतेला त्या शूरवीरांच्या प्रेरणादायी कथांमध्ये रमत राहू दिले गेले.

रशियाचे अध्यक्ष पुतिन ह्यांनी रशियन जनतेला आपला शूर इतिहास कळावा आणि रशियाने कसा बलाढ्य जर्मनीवर विजय मिळवला हे कळावे ह्यासाठी ह्या कथेवर आधारित चित्रपटाला प्रोत्साहन दिले. त्या विरोधात रशियन स्टेट अर्काइव चे डायरेक्टर मिरोनेन्को यांनी असे विधान केले की "उपलब्ध कागदपत्रांनुसार ही सर्व दंतकथा आहे. असे प्रत्यक्षात काहीच घडले नव्हते. " त्यांना आता त्या पदावरुन हटवण्यात आले आहे.

रशियाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या नुसार "जरी अशी कोणती घटना खरेच घडली नसेल, जरी असे कोणी २८ लोक प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नव्हते, तरीही ही आठवण रशियन जनतेच्या मनाचा तो हळवा आणि पवित्र कोपरा आहे. त्या पवित्र राष्ट्रप्रेमी भावनेला धक्का लावण्याचे घाणेरडे कृत्य कोणी सडक्या डोक्याचेच करु शकतत..."

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पुतिन ह्यांनी रशियन शाळांत शिकवला जाणारा इतिहास 'सुधारुन' घेतला आहे. आता ह्या इतिहासातील अनेक प्रकरणे 'पवित्र' आहेत ज्याविरुद्ध बोलणे अयोग्य असणार आहे. रशियन सरकारतर्फे तयार केलेला अधिकृत इतिहास हाच ह्यापुढे ग्राह्य धरला जावा असे सरकारचे मत आहे.

तर मंडळी, जग कोण्या टप्प्यावर येऊन पोचले आहे ते बघा. असे काही तुमच्या देशात होतांना दिसते आहे का?

(संदीप डांगे यांची पोस्ट)---


जनतेच्या आणि सैन्याच्या ढासळत्या आत्मविश्वासाला उभारी देण्यासाठी अशी प्रतीके उभी करावी लागतात.

रशियाच्याच एका तथाकथित स्नायपरवर ’एनिमी अ‍ॅट द गेट्स’ नावाचा सुरेख चित्रपट आहे. एका जर्मन स्नायपरची अजेय अशी झालेली इमेज, त्यातून त्याची निर्माण झालेली दहशत, याला प्रतिरोध करण्यासाठी सायबेरियातील एका शिकार्‍याला त्याची तोड म्हणून पद्धतशीरपणे कसे प्रोजेक्ट करत नेले जाते याचे सुंदर चित्रण आहे त्यात.

मनावर कोरला गेलेला त्यातील सर्वात परिणामकारक, मार्मिक आणि दु:खदायक असा प्रसंग आहे तो छोट्या साशाच्या मृत्यूचा !

युद्धखोरांच्या पिसाटलेपणाचा पहिला बळी माणसातील निरागसताच असते. वय वाढल्यावर माणसांतले माणूसपण हळहळू कमी होत जाते आणि जनावराची रक्तपिपासा अधिकाधिक प्रबळ होत जाते.

मग त्या संहारापासून सुरक्षित अंतरावर राहिलेले आणि म्हणून जिवंत राहिलेले लोक ’त्यांचे अधिक मारले गेले की आपले’ याची गणित करुन जय-पराजयाचे दावे आणि समारंभ साजरे करतात. हुतात्म्यांना श्रद्धांजलीच्या नावे त्यांच्या स्मारकावर आपले नावही उद्घाटक म्हणून कोरुन ठेवतात, त्याचे फोटो भरपूर प्रसिद्ध होतील याची खातरजमा करुन घेतात... जे मेले त्यांच्या पुढच्या पिढीचे काय झाले याची कणभर फिकीर न करता.

- oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा