शुक्रवार, ६ मार्च, २०२०

माझे साक्षात्कारी फेसबुक - २

करोनाचा आजार चीनमध्ये प्रथम उपटला या धाग्याला धरुन चीनपासून समाजवादापर्यंत सार्‍यांना जबाबदार धरणारे, स्वत:ला भांडवलशाही समर्थक समजणारे अर्धवट,

एखाद्या बँकेवर निर्बंध आले की, ’बघा तरी या भांडवलशाहीचं सांगत होतो...’ म्हणत येणारे कम्युनिस्ट.

त्या-त्या वर्गांतर्गत आवश्यक गुणवत्तेअभावी रोजगार हुकला तरी आरक्षण/ब्राह्मणांवर खापर फोडणारे सर्वजातीय जातीयवादी

भारतीय अर्थव्यवस्थेत काही पडझड झाली की लगेच ’मोदी राज्यात...’ म्हणून मोदींवर खापर फोडणारे आमच्यासारखे मोदीद्वेष्टे आणि ’हे मूळचं कॉंग्रेसचंच पाप’ हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणारे चाळीसपैसेवीर

जगात एखाद्या आजाराने थैमान घातलं की निलगिरीचे तेल, गोमूत्रापासून आयुर्वेदापर्यंत सर्वांच्या शपथा घेऊ लागणारे येडचाप छद्म राष्ट्रभक्त

आपापल्या गावच्या एखाद्या पदार्थाच्या ग्रेट असण्याच्या फुशारक्या मारणारे जन्मजात बिनडोक,

’म्हाराजांच्या टायंबाला आमच्या पणज्याचा आजा मोरेसरकारांच्या मंडळींच्या पालखीचा पुढच्या बाजूचा (मागच्या बाजूचा नव्हे हां, आपली लायकी काढू नका, लै म्हागात पडंल) खांदेकरी होता’ म्हणत इतिहासातील फुटकळ यशाच्या गाथा सांगणारे आणि वारशाने रुपयातील पाच पैशाचे क्रेडिट मिळवू पाहणारे भूतकालभोगी,

’अरे अर्धा दिवस गेला तरी बेहत्तर पण रविवारी सक्काळी म्हणजे सक्काळी उठून दहा मैल स्कूटर हाणत जाऊन मार्केटयार्डमधून होलसेलने पहिल्या धारेची भाजी आणतो म्हटलं. वीस टक्के सहज स्वस्त मिळते.’ म्हणणारे ’मी लै हुश्शार काटकसरी’ वीर, (भुसनळ्या पोराबाळांना देण्याऐवजी तिकडे खर्च केलेला वेळ आणि खर्च केलेली ऊर्जा याचा हिशोब त्या वीस टक्क्यांत बसतो का रे टोणग्या?)

माझं कुटुंब, सोसायटी/वाडा/अपार्टमेंट, गल्ली, गाव, तालुका, शहर, राज्य, देश, ग्रह, आकाशगंगा ही ’जग्गात भारी’ (आणी त्याबाहेरचे सारे जग्गात पहिल्या नंबरचे मूर्ख) असा समज असलेली ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ मानसिकतेची के.जी.तील बालके,

या यादीत ’त्यांचा नंबर/आधी लावला नि आमचा नंतर लावला म्हणून तुम्ही छुपे तिकडचे किंवा ’हे अमुक मानसिकतेतून लिहिले आहे’ म्हणून अ‍ॅड होमिनेम तंत्राचा किंवा ’तिकडे/त्यांना/तिथे सांगा/बोला/बोलणार नाही’ हे २०१४ पासून राष्ट्रीय झालेले तर्क देणारे मंदबुद्धी

...

या सार्‍यांना एकसमयावच्छेदेकरुन लाथ घालण्याचे तंत्र वा यंत्र हवे आहे. विहित नमुन्यात निविदा सादर कराव्यात.
 
-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा