शुक्रवार, ६ मार्च, २०२०

माझे साक्षात्कारी फेसबुक

केनडी पुलाच्या बाजूला असलेल्या संगीत नाट्य मंडळीची चाळ मधुबालाच्या वडलांच्या मालकीची होती. तिथे तवायफ नाचगाण्याचे कार्यक्रम करायच्या.

मीना कुमारी एका तवायफची मुलगी होती. मात्र मीनाकुमारीचा संबंध रविंद्रनाथ ठाकूरांच्या घराण्याशी होता.
मुद्दा असा की हिंदी चित्रपटात काम करायला घरंदाज म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणार्‍या हिंदू वा मुस्लिम स्त्रिया तयार नसायच्या.
चित्रपटासाठी गाणं म्हणणं हेही प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात नसे.
हे चित्र नेमकं केव्हा बदललं? का बदललं?
बुद्धिमत्ता वा कौशल्य वा प्रतिभा चित्रपटांकडे केव्हा सरकली?
तमाशामध्ये उच्चवर्णीय स्त्रिया वा पुरुष काम करत नसत. पठ्ठे बापूराव हे ब्राह्मण होते. मी महार झालो या आशयाची लावणी त्यांनी लिहीली.
मराठी सिनेमात काय परिस्थिती होती?
याचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला आहे का?
का होत नाहीत असे अभ्यास आपल्याकडच्या महाविद्यालयांतून? त्यावर आधारित लेख, परिसंवाद, चर्चा का घडत नाहीत?
मतं वाचायचा कंटाळा कसा येत नाही, ब्राह्मणांना व अब्राह्मणांना?

(सुनील तांबे यांची ५ मार्च रोजीची फेसबुक पोस्ट)

----
अशा चर्चेत एकतर माहिती असावी लागते आणि दुसरे, महत्वाचे, म्हणजे यात भित्र्या जमातीला जमावातली सुरक्षिततता मिळत नाही. तोंड उघडण्यापूर्वी अथवा नंतरही विधाने अशी करायची की समाजातला एक गट विनाअट आपल्या त्या विधानांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. आणि याला विचारवंतही अपवाद नाहीत! विधानांमध्ये आणि विचारांमध्ये कायम एक देवबाप्पा आणि एक सैतान ठेवून द्यायचा असतो. त्यातून त्या सैतानाचे द्वेष्टे आणि देवबाप्पाचे चाहते तुम्ही काय म्हणत आहात हे न वाचता/ऐकता तुमची बाजू घेऊन उभे राहतात.

धर्म, जात, गाव, राजकीय पक्ष, स्वयंघोषित राजकीय/वैचारिक भूमिका हे यातले पेटंट देवबाप्पा/सैतान असतात. एका गटाचा देवबाप्पा तो दुसर्‍या गटाचा सैतान असल्याने यादी तीच राहते. ( मध्यमवर्ग हा विचारवंतांचा आवडता सैतान आहे. :) ) फक्त तार्किक विरोध केला की ’त्यांना सांगा की’ हा हुकमी राष्ट्रीय प्रतिवाद करता येतो. तुम्ही म्हणता तसल्या चर्चा करायला अक्कल लागते, माहिती लागते, विचारक्षमता लागते. एवढा ताप कोण करणार.

मी तुझ्या गटाच्या पेकाटात लाथ घालतो, तू माझ्या गटाच्या पेकाटाच्या गटात लाथ घाल. हे सोपे असते, लाथ मारणे गाढवालाही जमते. त्यासाठी अक्कल असण्याची, अभ्यासाची गरज नाही. शिवाय फेसबुक कृपेने टवाळ्यांतून आपली बाजू सिद्ध केल्याचा आभासही निर्माण करता येतो. आसपास आपल्यासारखेच गाढव जमवून समोरच्या गाढव-गटाशी ही-हॉ, ही-हॉं ची स्पर्धा करता येते. किंवा शाळॆत सहावी-ड विरुद्ध सहावी-क यांच्यात खुन्नस म्हणून खाजकुयली, अशोकासारख्या एखाद्या झाडाच्या टणक बिया, आखणीच्या पट्ट्या यांनी मारामारी करुन कोण जिंकले कोण हरले याचे हिशोब करावेत या पातळीवरचा भिकार समाज आहे आपला.

आमचे विचारवंतही काही कमी नाहीत. कायम इतर गटातील वा विचारातील न्यूने शोधून त्यांचा सैतान करुन टाकलेला असतो. समोरच्यावर घेतलेले आक्षेप आपल्या बाजूलाही फिट्ट बसतात याची त्यांना फिकीर नसते. एकुणच डावे-उजवे म्हणवणारेही या फुटकळ जातीय, गावांच्या अथवा अगदी आवडीच्या पदार्थांवरच्या लढाया लढवण्यांपेक्षा काही वरच्या दर्जाचे नसतात. आचरटासारखे सगळीकडे एकाच चष्म्यातून बघतात आणि एकाच बाजूला धोपटत बसतात, त्यातून पुन्हा तेच, आपल्या गटाशी बांधिलकी राखून समोरच्या सहावी-क मधल्या मुलांना बिया मारुन लढाई जिंकल्याचे समाधान करुन घेतात.

(माझे साक्षात्कारी फेसबुक - ले. मंदार दंग)
-oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा