शनिवार, २१ मार्च, २०२०

चल दोस्ता, समाज बदलण्याची चर्चा करू !

दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?
बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही!
भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ,
आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र,
प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय,
राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच उपाय,
वाटल्यास सिंचन, कृष्णा-गोदेचा समाचार घेऊ,
दिवस कसे बदलताहेत, पावलोपावली, ते पाहू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

विकासाच्या धोरणासाठी हवी त्यांना सारी पॉवर,
अनुशेषाचे रडगाणे, पॅकेजला कसा घालावा आवर?
ग्लोबल, लोकल करीत आपण नव्या मांडणीचेही बोलू,
सध्याच्या धोरणांपायी राज्याचं घडलंय-बिघडलंय पाहू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

जातीअंताचा कुठे नारा, कुठे वर्गांताचा पुकारा;
जातीसाठी आरक्षणावर, क्रिमी लेयरचा उतारा,
छत्रपतींच्या स्मारकाचा या साऱ्यावर इशारा,
फुले, आंबेडकर तर कायम आहेतच साथीला,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

धरणात बुडाले ते आपलेच, धरणाने घडवले तेही आपलेच,
शेतमजूर, कष्टकरी, दलित, आदिवासी हेही आपलेच,
समाजातील ही 'विविधता'च जाती-वर्गांताची आवश्यकता,
त्यासाठी काय करता येईल, त्याचेही विश्लेषण करू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

प्रचारसाहित्यावरून होणाऱ्या अटका आणि सुटका,
कॉंक्रिट सिच्युएशन आणि नक्षलवादाचा विळखा,
मरणाऱ्या पोलिसांचे आकडे तपासत नवी भरती मागवू,
देशभरात काय आहे, याचेही एकदा ठरवून घेऊ,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

नवे साहित्य, जुने वाङ्मय, विदेशातील संमेलन,
कवितांचे तेच तेच, कथांमध्ये तर नाहीच दम,
कादंबरीत ना कस, असंतोष यांच्यात नाही दिसत,
नव्या सांस्कृतिक धोरणाचा यासंबंधी निकाल करू,
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये, नाटकं केवळ पेपरांत,
पथनाट्ये सुरवातीलाच बरी, संगीत उरले समुहात,
फैज आणि गालीबची फेरउजळणी एकदा करू,
शहरीकरणात सांस्कृतिकतेची, नवी जाणीव जमवून पाहू
दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!

चौथा पेग होईल तेव्हा चिकन चिली संपली असेल,
जेवणाची गरज नसेल म्हणून आणखी एक निप मागवू,
उठताना क्रेडिट कार्डाऐवजी, बिल दोघंही शेअर करू,
आपल्याच 'सच्चेपणा'ला आपणच सलाम ठोकू,
अन्
दोस्ता, भेट पुन्हा एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!!!

-श्रावण मोडक
________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा