महानगरातील मागासवस्तीत
दहा-बाय-दहाच्या खोलीत
आई-वडिलांसोबत राहणारा
एक तरुण.
आई-वडील...
सार्या आयुष्यात
वस्तीबाहेर न पडलेले
जगण्याचे वर्तुळ वस्तीतच
पुरे होणारे.
तो...
म्हणे, एक शंखवंशीय...
त्याच्या रिक्षावर त्याने
अभिमानाने लिहिलेले
’होय शंखच’...!
तो...
त्यांच्या देशव्यापी संघटनेच्या
पायातील एक दगड
त्यावर उभे शंखनेत्यांचे
राजकीय इमले.
एकदा...
शाखाप्रमुखाचे प्रेरणादायी,
अंगारलिप्त विचार ऐकून
तो शिंपलावंशीयद्वेषाने
अती प्रदीप्त.
समोर...
चुकून शुद्धीत असलेला बाप!
हा शिंपलावंशीय निखंदून
काढण्याचे आपले स्वप्न
त्याच्यासमोर ओततो.
बाप हादरतो...
मग बोलता होतो. 'शेजारच्या-
हा मुलगा.'
दंगलीत...
त्या जोडप्याने या जोडप्याचे
पण...
झोपडीत झोपलेल्या याला
कसाबसा वाचवून बाहेर काढला
नव्या जागी, नव्या नावाने
वाढवला.
बाप सदोदित बाटलीला
शरण.
याच्या डोक्यात...
आता विचाराचा भुंगा.
फळ बीजाचे की पोसणार्या
भूमीचे?
दुसर्याच दिवशी...
वस्तीतील नाल्याच्या कडेला
आई-वडिलांची कलेवरे
...याचा आवाजी(!) शोक.
मग...
आईवडिलांची हत्या
करणार्या शिंपलावंशीयांचा
सूड घेण्याचा त्याने केलेला
पण.
आता...
रिक्षावरील ’होय शंखच’
या शब्दांच्या फॉंट्चा
आकार दोनने(!)
वाढवलेला...
- रमताराम
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा