Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

गुरुवार, २९ मे, २०२५

मूषकान्योक्ती

  • MiceLeader

    १.

    सारी धुमश्चक्री संपली. सारे आवाज शांत झाले.

    थोडा वेळ गेला नि मूषकराज न्हाणीघराच्या बिळातून बाहेर डोकावता झाला. त्याने कानोसा घेतला. घरात शांतता असल्याची खात्री झाल्यावर तो बाहेर आला. तेथून तो माजघरात प्रवेश करता झाला.

    कानोसा घेऊन घरची स्त्री तिथे नसल्याची खात्री करुन घेतली. मग तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला.

    घरात नि घराबाहेर मघाशी झालेल्या हाणामारीतील जखमी मंडळी परसात नि मागच्या वाडीमध्ये दिसत होती. त्यांची तावातावाने काही चर्चा चालू होती. इतक्या दूरवरुन त्यातील तपशील ऐकू येत नव्हता. मूषकराज वैतागला.

    त्याने मागचे दार आतून बंद असल्याची खात्री करुन घेतली नि मग तो खिडकीच्या एका गजावर उभा राहिला.

    त्या सार्‍यांना दरडावणारे एक जोरदार भाषण त्याने ठोकले. पण खाली त्याच्या बिळातील पोराबाळांनाही केवळ किचकिचाट ऐकू आला.

    भाषण उरकून मूषकहृदयसम्राट पुन्हा आपल्या बिळात थाटात प्रवेशकर्ते झाले. बिळातून बाहेर येण्याचीही तसदी न घेतलेल्या त्याच्या पोराबाळांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.


    २.

    रात्र पडली. दिवसभरात ‘काय कमावले, काय गमावले’ याचा हिशोबही संपवून माणसे शांत झोपली. सर्वत्र सामसूम झाली. कुत्र्यांच्या टोळ्या अंग झाडून आजच्या सीमायुद्धाची तयारी करु लागल्या.

    घुबडाचा पहिला घुत्कार ऐकला नि मूषकराजा न्हाणीघराच्या गुहेतून (आता बिळाला गुहा म्हणावे असा फतवा त्याच्या प्रचाराधिकार्‍याने काढला होता) बाहेर डोकावला. थोडे बाहेर येऊन त्याने कानोसा घेतला. सारे काही शांत असल्याची खात्री झाल्यावर तो ओट्यावर चढला. त्याच्यासमोरील खिडकीतून बाहेर डोकावला.

    परसात शांतता होती. राखणीचा मोत्या दिसत नव्हता. बहुधा युद्धात आपली पार्टी निवडायला निघून गेला असावा.

    एकुणात आसपास धोका दिसत नव्हता. ‘चार पावले पुढे, दचकून सहा पावले मागे’ अशा गतीने मूषकराज मागल्या दारातून बाहेर पडेतो तास मोडला होता.

    पहिले पाऊल बाहेर टाकतो न टाकतो तोच कुत्र्यांच्या सीमायुद्धाच्या रणभेरी वाजल्या. त्या आवाजाने दचकलेला मूषकराज जिवाच्या आकांताने धावत परत आपल्या बिळात– आय मिन गुहेत घुसला. पुढची काही मिनिटे त्याचे हृदय मालकाच्या ट्रॅक्टरच्या दुप्पट वेगाने धडधड करत होते.

    थोड्या वेळाने मूषकराज शांत झाला. कुत्र्यांच्या सीमायुद्धात अलिकडच्या टोळीची सरशी झाली असावी, त्यांनी थोडा प्रदेश बळकावून पलिकडच्यांना दूर लोटले असावे. कारण भुत्कार आता दुरून येऊ लागले होते. मूषकराजाच्या जिवात जीव आला. पुन्हा एकवार ‘चार पावले पुढे, दचकून सहा पावले मागे’ या वेगाने तो कसाबसा बाहेर परसात आला. धपापलेल्या उराने तो सावधपणे इकडे-तिकडे पाहात होता.

    अखेर मूषकराजाने आपली आजची निश्चित केलेली कामगिरी पुरी करण्याचा निश्चय केला. त्याने खालच्या पट्टीमध्ये आपल्या जातभाईंना हाकारायला सुरुवात केली. त्याच्या घराच्या परसातील बिळात राहाणारे, शेजारच्या घराखालील बिळात राहणारे, परसातील झाडाखालच्या बिळात राहाणारे त्याचे पाच-पंचवीस जातिबांधव एक-एक करुन हजर झाले.

    आता मूषकराज बोलू लागला, “कालच्या युद्धात आमच्या माणूस-सेनापतीला मोठा विजय मिळाला. मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचा पुरेपूर वापर करुन त्याने शेजारच्या त्या कस्पटाबरोबर झालेल्या महायुद्धामध्ये देदिप्यमान विजय मिळवला…”

    “…संध्याकाळी युद्ध संपल्यावर तो महाराजांच्या गुहेसमोर जाऊन साष्टांग प्रणिपात करुन ‘महाराज हा विजय तुमच्यामुळे’ असे डोळ्यांत पाणी आणून म्हणताना मी पाहिला.” महाराजांचा एक चमचा तत्परतेने उद्गारला.

    आपली भाषणाची लिंक तोडल्याबद्दल महाराज त्यावर नाराज झाले. हातानेच त्याला दूर लोटून त्यांनी आपले भाषण पुढे चालू केले. “माझ्यासारख्या श्रेष्ठ मूषकराजाच्या राज्यात तुम्ही राहाता हे तुमचे भाग्य आहे. शेजारच्या त्या कस्पटाला माझी महती ठाऊक नाही. माझ्या रक्तातून लाव्हा वाहात असतो…”

    “पण महाराज चार दिवसांपूर्वी तुम्ही बंदुकीची दारु वाहात असते असे म्हणाला होतात…” एक अज्ञ जातिबांधक मध्येच म्हणाला. इतर जातिबांधवांनी चटकन त्याच्याभोवती कडे करुन त्याचे बोलणे थांबवले नि महाराजांना पुढे बोलण्याची विनंती केली.

    ScaredRunningMouse

    इतक्यात महाराजांची गुहा ज्या घरात होती त्या घरात हालचाल ऐकू आली. महाराज सावध झाले. एक कान घराकडे ठेवून ते पुढे बोलू लागले. बोलताना ते अधूनमधून थांबून पुन्हा पुन्हा चाहूल घेत होते. अचानक घरात ठाण्णकन्‌ आवाज झाला नि महाराज दचकले नि पलायनाच्या हेतूने झाडाकडे धावले.

    इतक्यात एक म्हातारा श्रोता म्हणाला, ‘मालक रातच्याला पाणी प्याला उटलेला दिसतोय.’ महाराजांचा जीव भांड्यात पडला.

    आता ते माघार घेतलेल्या त्या स्थानापाशीच झाडापायथ्याच्या एक दगडावर चढून भाषण देऊ लागले. “अरेऽ, असले छप्पन्न कस्पट मी अनेकदा चिरडून टाकले आहेत. मी पाळलेला माणूसच या सार्‍यांना पुरून उरतो. मला प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घ्यायची गरजही पडत नाही आता.”

    इतक्यात श्वानयुद्धाचे वारे फिरुन पलिकडील श्वानसंप्रदाय वरचढ झाल्याने युद्धभूमी महाभारतात प्रतिदिन सरके तशी अलिकडे सरकली नि भुंकण्याचा कलकलाट जवळून येऊ लागला.

    ते ऐकून महाराजांचे पाय लटपटू लागले. ‘हे असेच चालू राहिले तर आपल्याला पुन्हा एकवार ‘स्थलांतर’ करण्याची वेळ येणार’ हे त्यांच्या ध्यानात आले. तेव्हा त्यांनी ताठ मानेने त्याची तयारी करावी अशी खूणगाठ बांधली.

    श्वानसंवाद अधिकच जवळून ऐकू येऊ लागला नि महाराज घाईघाईने बोलू लागले. “मित्रों, आज श्वानवंशीयांशी आपले घनघोर युद्ध होणार असे दिसते आहे. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कुमक हवी. यासाठी दूरदृष्टीने मी कस्पटाच्या मूषकसैन्यातील काही जणांशी आधीच संधान बांधले होते. ती कुमक आणण्यासाठी मी जातो आहे. दरम्यान इथला मोर्चा तुम्ही सांभाळा. तुम्ही माझे सैनिक आहात. येणार्‍या संकटाशी कसे लढायचे हे तुम्हाला माहित आहे. श्वानवंशीयांना धडा शिकवण्यासाठी मी तुम्हाला खुली छूट देतो आहे.”

    कार्यकर्ते बुचकळ्यात. आपण सैनिक कधीपासून झालो? कुत्र्यांशी कसे लढायचे हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? मग लढणार कसे? त्यातील एकाने धीर करुन म्हटले, “महाराज आम्ही तुमच्यासाठी नक्की लढू. पण लढावे कसे यावर आम्हाला मार्गदर्शन करा.”

    इतक्यात श्वानयुद्धात एका बाजूची फळी फुटली, त्या पार्टीने कच खाल्ली नि त्यातील सैनिक सैरावैरा धावत सुटले. युद्धातून साफ माघार घेतलेला मोत्या मूषकमहाराजांच्या जवळून बुलेट ट्रेनच्या वेगाने पसार झाला. धडकी भरलेले महाराजही मार्गदर्शनाऐवजी ‘मागलं दर्शन’ देत विद्युतवेगाने पसार झाले.

    -oOo-

शुक्रवार, २३ मे, २०२५

सुजन गवसला जो

  • ‘गाणार्‍याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा.परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते.

    त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही.

    गाल ओढायचे नाहीत!

    मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडे, तेव्हा नेमके एक पिलू आई/मम्मा किंवा बाबा/पप्पा यांच्या खांद्यावर बसून आपल्या दादाला शाळेच्या बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेले दिसे. जाताजाता मुद्दाम मान तिरकी करुन त्याच्याकडे बघून अभिवादन केले, शिटी वाजवली, की बोळकंभर हसून प्रतिसाद देई. मग आपला दिवस मस्त चालू होई. त्या पिलाचं नाव मला माहित नाही, ती मुलगी आहे की मुलगा हे ही मला माहित नाही.

    पण ‘आयुष्य ही एक सतत गुंडाळली जात असलेली चटई असून, तिच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत पळापळ करत तिला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करणे हेच आपले जीवितकार्य आहे’ हे मी आता नाईलाजाने मान्य केले आहे. त्याला अनुसरून आमचा मॉर्निंग वॉक मध्येच बंद पडला; मग वेळा बदलल्या आणि आमची ‘भेट’ बंद झाली.

    आता आमची गाडी पुन्हा रुळावर आली असली, तरी (बहुधा) पिल्लूच्या दादूची शाळा बंद असल्याने आमचा हा मित्र/मैत्रिण आम्हाला भेटत नाही. पण त्याऐवजी दुसरीकडे आजोबांबरोबर ढकलगाडीतून येणारा मित्र भेटला आहे. गाडी पुढे गेली की ‘मी इकडे चाललोय नि हा दादा/ काका/ आजोबा/ पणजोबा/ खापरपणजोबा भलतीकडे का चाललाय?’ असा प्रश्नार्थक भाव घेऊन मागे वळून पाहात असतो.

    तुम्ही बळेच एखाद्या मुलाचे गाल वा कान ओढलेत म्हणून मुले तुम्हाला आपले म्हणतीलच असे नाही. त्याच्या चेहर्‍यावर नापसंती लगेच उमटेल. तुमची तार आधी जुळली, तरच तुमचं हे फालतू लाडात येणं ते पिलू चालवून घेईल. तुमच्यामध्ये मूलपण असेल, नि त्याची लाज वाटत नसेल, तर आयुष्यात एकांगीपणा, द्वेष आदि गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा ताबा घेण्याची शक्यता कमी असते.

    पण बालमित्र असलेला मी ही आता ‘या बालां’शी दुरूनच बोलतो; याला कारण झाले दोन मित्र(?). फेसबुकवर फोटो लाईक करण्याबद्दल बोलणे चालू असताना, मुलांची माझे पहिल्यापासून गट्टी होत असल्याने मी फक्त त्यांचे फोटो लाईक करतो, कारण ‘मला लहान मुले आवडतात’ असे मी बोलून गेलो. या माझ्या विधानावर ते दोघे ज्या पद्धतीने फिदीफिदी हसले, त्यावरुन त्यांनी काय अर्थ लावला हे माझ्या ध्यानात आले नि मी दचकलो.

    आता कुठेही लहान मूल दिसले की माझा हात पुढे होत नाही. कारण त्या मुलामध्ये नि माझ्यामध्ये आता त्या हिडिस हास्याची भिंत उभी राहिली आहे. ‘मुलांचे आई-वडीलही यांच्यासारखाच विचार करतील का?’ या भीतीने मी निमूट त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे जातो. जिथे तिथे ‘आदिम लैंगिकता’ शोधत स्वत:च्या वखवखीला बंडखोरीचे सर्टिफिकेट मागणारे लोक, इतरांच्या आयुष्यातले छोटे-छोटे निर्भेळ आनंद कसे हिरावून घेतात, याचे हे उत्तम उदाहरण. ही प्रगती असेल, तर मी मागासलेलाच बरा.

    या मित्रांकडे पाहाताना असे ध्यानात येते की आता हे अपवाद उरलेले नाहीत. या खंडप्राय देशात बालकांच्या शोषणाच्या, त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या नित्य वाचायला मिळतात. त्यातून नागर आई-वडील आपल्या मुलांना अपरिचितांशी तर सोडाच, नातेवाईकांशीही फार जवळीक साधू देत नाहीत.

    वास्तविक एकुण समाजात अशा विकृतवीरांचे प्रमाण किती असेल? पण परिणामाचा विचार करत तेवढा धोका पत्करण्याची तयारी कुणाची नसते; जे परिस्थितीचा विचार करता वाजवी देखील आहे. विचार करुन पाहा:

    बदलापूर प्रकरणातले असोत की पुण्याच्या नामांकित शाळेतील असोत किंवा - विनोदासाठी का होईना पण - तेच सामान्य वर्तन गृहित धरणारे आमचे मित्र असोत, हे असे विषारी मोदक ताट-भरल्या मोदकांची महती शून्य करुन टाकत असतात. यातून होते असे, की माणसाच्या आयुष्यातील एक साधासुधा आनंद आणि मुलाला लहानपणापासून कुटुंबापलिकडे नाती जोडण्याची संधी नाकारली जाते. त्यातून मूल अधिकाधिक एकारलेल्या प्रवृत्तीचे होते. त्यात नागर जगातील ‘एक कुटुंब, एक मूल’ व्यवस्थेत त्याचा एककल्लीपणाही वाढीस लागतो. पुढे वय वाढल्यावर त्याला एखाद्या संघटनेची टोळी सापडली, तर नेमक्या नको त्या सामाजिक धारेला लागून नकारात्मक, दूषित असे प्रवाहपतित आयुष्य जगू लागते.

    दुसरीकडे याचा परिणाम असा होतो की मोठ्यांच्या पदरी हा निरागस आनंद पडायचा, तर व्यक्तीला स्वत:चे मूल जन्माला घालावे लागते. ते ही पहिली दोन-तीन वर्षे झाली की सुटे होते. मग पुढची वाट पाहायची ती नातवंडांची. मधल्या काळात माणूस इतर विखारी आनंदांच्या(?) आहारी केव्हा जातो समजतही नाही. आणि त्याची पडछाया मुलांसोबतच्या नात्यांवरही पडत जाते.

    एक स्त्रीवादी भूमिका अशी, की मला माझे मूल हवे असेल तर त्यासाठी- कदाचित- माझे आयुष्य त्रासदायक करणारा नवरा नावाचा प्राणी मी का गळ्यात बांधून घेऊ? मला ज्याची आवश्यकता वा आस नाही, अशा नवरा-बायकोच्या नात्याची अनावश्यक जबाबदारी मी का स्वीकारु? सुश्मिता सेनसारख्या स्त्रिया जोडीदाराची निवड होईतो आपले वात्सल्य थांबवून न ठेवता दत्तक घेण्याचा मार्ग स्वीकारतात. पण हे अपवाद. इतर सर्व स्त्री-पुरुषांना वात्सल्यपूर्तीसाठी जैविक मूल जन्माला घालणे हाच समाजमान्य मार्ग वाटतो.

    काही वेळा निरागसतेची ही आसक्ती अभिव्यक्त होताना तिची वाट चुकते. स्त्री-पुरुष संबंधांचे जे होते, तेच काही वेळा इथेही होत असावे. ज्या नात्यात मोकळेपणा नसतो, तिथे संधी मिळेल तेव्हा ओरबाडण्याची प्रवृत्ती बळावते. विविध प्रकारच्या नात्यांची अभिव्यक्ती वेग-वेगळ्या प्रकारे व्हावी लागते ही मानवी समज गाडली जाऊन, जनावरांची मोजक्या नि आक्रमक अभिव्यक्तींची प्रेरणा बळावते. त्यातून अत्याचाराच्या प्रसंगांत वाढ होते. निकोप नाती हा आपल्या संस्काराचा भाग उरलेली नाहीत. रांगत्या, धावत्या मुलांसोबत जोडता येतील अशी नातीही त्याला अपवाद नाहीत…

    KidOnRahulsShoulder

    या लेखनासोबत लावण्यासाठी अनुरूप असे फोटो शोधत होतो, तर गुगलने राहुल गांधींचा हा सुरेख फोटो दाखवला. पुढे दंगलग्रस्त मणिपूरमधील तसंच त्यापूर्वीच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान मुलांसोबत काढलेले असे काही प्रांजळ (candid) फोटो पाहण्यात आले… ‘त्यांना तो आपलासा वाटतो’ हे पाहून असूयेने ग्रस्त असलेल्या आमच्या मित्रांसारख्याच अनेकांनी, काहींनी त्यांच्या गट-बांधिलकीतून आलेल्या कुसंस्कारी प्रचार-प्रेरणेतून, त्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही केलेली पाहायला मिळाली.

    या फोटोंमधून दिसणारी या माणसाची सहजता मला भावली. अपरिचित मुले ज्याच्याशी सहज हास्यविनोद करु शकतात, एखादी परकी स्त्री संकोचाला दूर करुन ज्याच्या मिठीत सहज विसावू शकते, तिथे माणूसपणाचा आढळ नक्की असतो. द्वेष नि वासनेने खदखदत असलेल्या समाजात हे माणूसपण दुर्मीळ म्हणावे लागेल.

    लोकशाहीमध्ये माणसांचा प्रतिनिधी हा माणूस असायला हवा, तो माणसांना आपला वाटायला हवा. एखाद्या दगडाचा देव करुन लोटांगण घालण्याने मानसिक पातळीवर तात्कालिक ताणमुक्ती मिळत असेल, पण त्यातून समस्येचे निराकरण होत नाही. त्यासाठी समस्येला भिडावे लागते. ‘महिनोन्‌ महिने तिच्याकडे दुर्लक्ष करुन ती आपोआप सुटेल’ अशी अपेक्षा करणारे नेतृत्व आणि विलासमग्न राजेशाही यांत फार फरक नसतोच.

    देवत्व (त्राता) नि नेतृत्व यात फरक समजून घेण्याची कुवत बहुसंख्येला असत नाही. या दोहोंमध्ये त्यांची नेहमीच गल्लत होत असते. त्राता अथवा देव हा देव्हार्‍यात असतो आणि नेता तुमच्यासोबत. तुमच्या समस्या, गरजा या देवाला सांगाव्या लागतात, गार्‍हाणे मांडावे लागते, नवस वा नैवेद्यरूपी लाच द्यावी लागते, ‘तो जे करेल ते भल्यासाठीच’ अशी एकतर्फी श्रद्धा ठेवावी लागते. त्यातूनही आपल्या अपेक्षा/गरजांची पूर्ती झाली नाही, तर ‘आपणच कुठेतरी कमी पडलो’ अशी आत्मश्लाघाही करुन घ्यावी लागते आणि त्याचे देवत्व आपणच अक्षुण्ण ठेवावे लागते.

    Rahul1
    BharatJodo3

    नेता तुमच्यासोबत असायला हवा, तुमच्या गरजांची, वेदनांची विचारपूस त्याने स्वत: करायला हवी. त्याच्या परिमार्जनाची उपाययोजना हे त्याने आपले कर्तव्य मानायला हवे. मुला-बाळांचा, स्त्रियांचा नेत्यावर विश्वास असेल, तर त्याचे नेतृत्व जनतेमध्ये रुजले म्हणता येईल. त्याच्या कार्याच्या मूल्यमापनाची मुभा त्याचे नेतृत्व मान्य करणार्‍यांना असायला हवी. त्याच्या अपयशाबद्दल त्याला जाब विचारण्याचा हक्कही त्यांना असायला हवा. ‘मी करतो ते सारेच योग्य आहे, तुमच्या हिताचे आहे, असे मानून जगायला शिका’ हा उद्दामपणा नेत्याची नव्हे, तर राजाची, हुकूमशहाची प्रवृत्ती आहे.

    सैनिक, सेनापतींच्या त्यागावर (आणि शत्रूपक्षांतील अनेक घरभेद्यांच्या बळावर) नेतृत्व सिद्ध करणार्‍यापेक्षा सैनिकांसोबत उभे राहणारा, लढणारा अधिक लायक नेता असतो. त्यात नेत्याला पराभवाची, घावांची भीती असते. पण त्यांसकट त्याचे नेतृत्व उभे राहायला हवे. पुढचे यश इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. त्याचा कस पुढे लागतोच.


    पुलंच्या ‘सुंदर मी होणार’मध्ये एक प्रसंग आहे. देश स्वतंत्र झाला आहे. सर्व लहानमोठी संस्थाने विलीन झाली आहेत. संस्थानिक ‘लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेला नंदनवाडीचा प्रतिनिधी कोण तर एका सामान्य मोतद्दाराचा मुलगा’ असं अत्यंत उद्वेगाने सांगतो आहे. त्यावर व्हीलचेअरवर खिळून असलेली त्याची मुलगी कल्पनेनेच त्या निवडून आलेल्या नेत्याच्या विजयी मिरवणुकीचे, त्याच्या झालेल्या कौतुकाचे वर्णन करते.

    त्याचे वास्तवाशी असलेले कमालीचे साधर्म्य पाहून वडील अचंबित होतात. ते विचारतात, ‘हे तुला कसं दिसलं? तू कधी गेली होतीस वाड्याबाहेर?’ त्यावर कधी नव्हे ते ती थोड्या तीव्र स्वरात उत्तर देते, ‘वाड्याबाहेर कशाला जायला हवं? स्वतंत्र नंदनवाडीचा पहिला प्रतिनिधी, त्याचं कौतुक होणार नाही तर काय गावाबाहेर महारोग्यासारखं राहिलेल्या महाराजांचं आणि राजपुत्र-राजकन्यांचं?’ (१)

    गावाबाहेर घर बांधून राहिलेल्या महाराजाच्या पोशाखी अहंकाराशी तुलना करता, राहुल गांधीच्या या फोटोंमधून त्यांची लोकांप्रती सहज दिसून येणारी बांधिलकी पाहून मला तो नेता म्हणून अधिक भावतो आहे. अर्थात अज्ञ-सुज्ञ सार्‍यांना एकाच तराजूत तोलणार्‍या लोकशाहीमध्ये त्याचे नेतृत्व प्रस्थापित होईल न होईल— त्याला इतर अनेक अन्य पैलू तसेच अनुषंगे असतात— प्रस्थापित झालेच तर नेता म्हणून त्यांची कामगिरी कशी होईल, याबद्दल पोपट-भाकिते मी करत बसत नाही. त्याच्यातला हा माणूस मला भावला आहे आणि तेवढ्यापुरता तरी त्याला कुर्निसात करताना मी हात आखडता घेणार नाही.

    - oOo -

    Rahul3

    (१).‘महारोग्यासारखं’ या उपमेमध्ये थोडी गफलत आहे. महारोग्यांना समाजाने नाकारलेले असते, तर इथे उलट संस्थानिक इतर समाजाला महारोग्यांसारखे दूर ठेवतात. [↑]

    (२). शीर्षकासंबंधी:
    रघुनाथ पंडित या सतराव्या शतकातील कवीचे ‘दमयंती स्वयंवर’ हे प्रसिद्ध काव्य. त्यातील खालील दोन ओळी सुभाषित म्हणून प्रसिद्ध आहेत.
    स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
    कठिण समय येता कोण कामास येतो
    लेखाचे शीर्षक त्यातील पहिल्या ओळीवर आधारलेले आहे.

गुरुवार, २२ मे, २०२५

क्रिकेटमधील उपेक्षितास दाद

  • क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम !

    Umpire
    प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार.

    आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते.

    त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत.

    त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा असतो, तर एसी केबिनमध्ये बसून डीआरएसचा निर्णय देणारा तिसरा पंच विविध कोनातून मिळणारे चित्रण, स्टंप माईक, रीअल टाईम सिन्क्रनायजेशन, अल्ट्रा-एज वगैरे संगणकीय तांत्रिक करामतींच्या साहाय्याने आरामात निर्णय घेत असतो. (तिथे बिचार्‍या राष्ट्रपती नि राज्यपालाला घालून दिली तरी कालमर्यादा घालून देणारे कुठले सुप्रीम कोर्टही नसते.)

    त्यामुळे मैदानावरील पंचाचा निर्णय तंत्राने फिरवणे हे अधून मधून घडत असते. खरंतर यात ‘माथा आळ लागे’ असं काही नसतं. त्यांच्या चुकलेल्या निर्णयांचं प्रमाण – माझ्यासारख्या संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या मते– एकुण निर्णय-संख्येशी तुलना करता नगण्यच असते. पण आपापल्या घरात टीव्हीसमोर बसून आपल्या अकलेच्या पातळीशी सर्वस्वी विसंगत असे उद्दाम निवाडे देणारे प्रेक्षक त्याबद्दल त्यांच्या नावे खडे फोडत असतात.

    कसोटीकडून क्रिकेटची गाडी झटपट क्रिकेटच्या हायवेवर शिरली आणि पंचांचे काम अधिक जिकीरीचे होऊ लागले. कारण हे झटपट क्रिकेट ‘आम्हाला काय बुवा, सस्त्यात मजा पाहिजे’(१) म्हणणार्‍या प्रेक्षकांसाठी रोमांचक करणारे नियम येऊ लागले.

    लेग स्टंपच्या गुंजभर जरी बाहेर टप्पा पडला तरी वाईड देणे, खांद्यावरुन जाणारा जास्तीत जास्त एक बाउन्सरच चालवून घेणे, कंबरेच्या वरून जाणारा बिनटप्पी ( फुलटॉस) चेंडू नो-बॉल ठरवणे, ३० यार्डांच्या वर्तुळात वेगवेगळ्या टप्प्यात क्षेत्ररक्षकांची वेगवेगळी संख्या राखणे, ठराविक वेळेत षटके पुरे करणे… असे अनेक नवनवे नियम समाविष्ट होत गेले.

    या सार्‍यांचे भान राखून पंच म्हणून काम करणे किती जिकीरीचे असेल? त्यामुळे या पंचांबद्दल मला खेळाडूंपेक्षा अधिक सहानुभूती आहे.

    आज याची आठवण झाली कारण आयपीएलमध्ये पाहिलेला एक प्रसंग.

    HeightNoBall
    प्रातिनिधिक स्थिरचित्र.

    लखनौ विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या कागिसो रबाडाने एक चेंडू फुलटॉस टाकला. लखनौच्या मार्करमने तो तडकावण्याचा प्रयत्न केला, पण तो चकला. चेंडू साधारणपणे त्याचे कोपर नि खांदे यांच्या मध्याजवळून गेला. कंबरेपेक्षा हा बराच वरुन गेला असे दिसत होते. परंतु पंचांनी तरीही नो-बॉल दिला नाही.

    फलंदाजी करणारे दोघे तर आश्चर्यचकित झालेच, पण धावतं समालोचन करणारेहि बुचकळ्यात पडले. अखेर फलंदाजांनी तिसर्‍या पंचांकडे दाद मागितली. आता डीआरसचा प्रवेश झाला.

    तिसर्‍या पंचांना प्रथम स्लो-मोशन रिप्ले दाखवण्यात आला. त्यात आधी पाहिल्याप्रमाणे चेंडू कंबर ते खांदा यांच्या साधारण मध्यावरुन जाताना दिसला. आता नो-बॉल दिला जाणार नि मैदानावरील पंच खोटे ठरणार हे बहुतेकांच्या मनात ठरुन गेले. पण… एक टप्पा बाकी होता.

    नियम असा आहे की “फलंदाज ‘संपूर्ण उभा असलेल्या स्थितीमध्ये’ त्याच्या कंबरेची जी उंची असेल, तिच्या वरुन चेंडू फुलटॉस जायला हवा.”

    हे समजण्याजोगे आहे, कारण एखादा खेळाडू स्वीप अथवा पुल सारखे डावीकडे मारले जाणारे फटके मारताना अनेकदा खाली बसून वा बरेच खाली झुकून खेळतो. आता चेंडू फुलटॉस येतोसा दिसले, की सोपा उपाय म्हणजे फलंदाज खाली बसेल नि नो-बॉल ठरवून घेईल. फायदा हा, की त्यानंतरचा चेंडू ही फ्रि-हिट असते, त्यावर फलंदाज बाद होऊ शकत नाही (अपवाद धावबाद होण्याचा). त्यामुळे असा ‘फिक्स्ड रेफरन्स’ आवश्यक ठरला.

    आज घेतेल्या रिव्ह्यूमध्ये असे दिसले, की पूर्ण उभ्या खेळाडूची जमिनीपासून कंबरेपर्यंत उंची १.१३ मीटर्स होती तर चेंडू १.११ मीटर्स उंचीवरुन त्याच्या शेजारुन गेला होता. मैदानावरील पंच अचूक ठरले होते. चेंडू नो-बॉल नव्हता.

    प्रत्येक खेळाडूची उंची सारखी नसते हे उघड आहे. तेव्हा हा अदमास सध्या समोर खेळणार्‍या खेळाडूच्या उंचीनुसार घ्यायचा आहे. वाईडसारखा एका निश्चित रुंदीनुसार (आणि आखलेल्या निळ्या पट्ट्याचा संदर्भ घेऊन) नव्हे. हे ध्यानात घेता जेमतेम दोन से.मी.चा फरक केवळ नजरेने अदमास घेऊन आकलन करणार्‍या त्या पंचाबद्दल मला प्रचंड आदर वाटला.

    पण हे झाले कसे? कंबर ते खांदा यांच्या मधून जाणारा चेंडू स्थिर मोजमापात कंबरेखालून कसा गेला?

    आता स्लो-मोशन रिप्ले पुन्हा पाहता असे दिसले की खेळाडू बॅट फिरवत असताना गुडघ्यात किंचित वाकला होता, तसंच मागेही झुकला होता. या दोन बदलांमुळे जमिनीपासूनचे कंबरेचे अंतर कमी झाले होते. हे दोनही बदल ध्यानात घेतल्याखेरीज पंचांना चेंडूची उंची मर्यादेत होती असा निवाडा करणे शक्य नव्हते.

    पूर्ण वेगाने चेंडू गेला तेवढ्या वेळात हे तपशील खुद्द पंच वगळता इतरांना जाणवलेही नव्हते, चेंडू उघड नो-बॉल आहे असे सर्वांनीच गृहित धरले होते.

    चेंडू टाकणारा गोलंदाज अंदाजे १२५-१३५ कि.मी. प्रति तास या वेगाने गोलंदाजी करत होता हे ध्यानात घेता खेळपट्टीचे सुमारे वीस मीटर्स पार करायला त्याला जेमतेम अर्धा सेकंदाचा वेळ मिळत असतो(२). एवढ्या वेळात हे सारे तपशील टिपून त्याला अनुसरून असा बिनचूक निर्णय घेतल्याबद्दल पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांना कडक सॅल्यूट करुन टाकला.

    Congrats-KNA

    - oOo -

    टीपा:

    (१). मध्यमवर्गभूषण, स्वयंघोषितश्रेष्ठनवसाहित्यनिषूदन पुल्देसपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’ मधील तपकिरीच्या विक्रेत्याचे उद्गार. [↑]

    (२). या वेळेचाही काही भाग पूर्वी गोलंदाजाच्या पायाकडे लक्ष देण्यात खर्च करुन, गुड-ओल्ड क्रीझ नो-बॉलचा निवाडा करुन मग समोर पाहावे लागे. आता हा निवाडा थेट तिसर्‍या पंचाकडे दॆऊन टाकल्याने तो वेळ वाचतो. [↑]

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा

  • फार फार… फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता.

    BabelTower
    The Tower of Babel.

    पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मनोरासदृश शहरच बांधून काढण्याची योजना आखली. हा मनोरा थेट देवलोकापर्यंत चढवत नेऊन त्यांनाही आव्हान देण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.

    एक भाषा बोलणारे, एकदिलाने राहणारे असल्याने सारा समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला. परस्पर सहकार्याने हे काम वेगाने होऊ लागले. देवलोकात याहवेह या देवाचे धाबे दणाणले. हे असेच चालू राहिले तर आपल्या खुर्चीलाच आव्हान मिळेल असे त्याच्या ध्यानात आले. थोडा विचार केल्यावर ‘त्यांची एकी भेदली तर आपण सुरक्षित राहू शकतो’ हे त्याने ताडले.

    मग त्याने त्यांच्या भाषा भिन्न केल्या, जेणेकरुन एकाचे म्हणणे दुसर्‍याला समजणे अवघड, दुरापास्त होऊ लागले. त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्या विसंवादातून संघर्ष निर्माण झाले. त्या संघर्षांमुळे हाती घेतलेल्या त्या कामामध्ये वारंवार खीळ बसू लागली. अखेर त्या संघर्षांची तीव्रता इतकी वाढली की ते काम बंद होऊन माणसांचा समाज विसंवाद नि संघर्ष यांतच गतिरुद्ध होऊन राहिला.

    समाज दुभंगत गेला, त्याचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक तुकड्याची दुसर्‍या तुकड्याशी भू-स्वामित्वाच्या अधिकारासाठी युद्धे होऊ लागली. पृथ्वीवर अखंड पसरलेल्या जमिनीवर काल्पनिक रेषा ओढून माणसांचे समाज तुकड्या तुकड्यांत विभागले गेले. माणसांच्या लहान लहान समाजांची राज्ये, धर्म, देश वगैरे तुकडे परस्परांशी सतत संघर्षरत राहू लागले. याहवेह निश्चिंत होऊन गेला.

    बायबलमधील या अपुर्‍या राहून गेलेल्या मनोर्‍याला, शहराला पुढे नागर मानवाच्या भाषेत ‘बाबेलचा मनोरा’ म्हटले जाऊ लागले.


    काही हजार वर्षे गेली…

    या समाजातही काही माणसे पुन्हा शहाणी होऊ लागली. देशांना विभागणार्‍या रेघा काल्पनिक आहेत, दोन्हींकडे हातापायांची प्रत्येकी एक जोडी नि मेंदू असलेले एक मस्तक असणारी माणसेच राहातात, त्यांच्या भाषा वेगळ्या असल्या तरी संवाद होऊ शकतो, असे त्यांच्या ध्यानात आले. परस्पर-सहकार्याचा पहिला टप्पा व्यापाराने सुरु झाला असला तरी जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था यांचा अंगीकार करत माणसांची आर्थिक घोडदौड सुरु झाली. ‘जे माझ्याकडे नाही, ते तुझ्याकडून येऊ दे; जे तुझ्याकडे नाही, ते माझ्याकडून घेऊन जा’ म्हणत देशांच्या सीमारेषा पुसट केल्या जाऊ लागल्या. खाणं, जुगण्याच्या मूलभूत गरजा भागवणे सहज शक्य झाले नि माणसाला बुद्धीचा वापर करण्यास उसंत मिळू लागली.

    हजारो वर्षांपूर्वीच्या त्या रचनात्मक विचार करणार्‍या पूर्वजांना स्मरून काही सुज्ञांनी विटेप्रमाणेच ‘इंटरनेट’चा शोध लावला. माहितीच्या प्रवासाला आता देशांच्या सीमांचे बंधन उरले नाही. त्या सीमांचे अस्तित्व केवळ राजकीय पातळीवरच शिल्लक राहिले. या इंटरनेटच्या आधारे परस्पर-सहकार्याने मोठे मनोरे उभे करता येऊ शकतील, याची चाणाक्ष माणसांना जाणीव झाली. त्यांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.

    हे सारे पाहाता सर्वधर्मीय देवांचे धाबे दणाणले. माणसे असे सहकार्याने जगू लागली, त्यांचे हितसंबंध परस्परांमध्ये इतके गुंतले, की संघर्ष करणे परवडेनासे झाले; उलट सहकार्याचे नवनवे मनोरे उभे राहू लागले, तर आपल्या सर्वांचे स्थान धोक्यात येणार हे त्यांच्या ध्यानात आले. आपले स्थान धोक्यात येणार म्हणजे पृथ्वीवरील आपल्या हस्तकांचेही, हे ध्यानात आल्यावर त्यांनी त्या हस्तकांना धोक्याची जाणीव करुन दिली. हे हस्तक जोमाने फूट पाडण्याच्या कामाला लागले.

    दुसरीकडे देवांनी देशोदेशी उथळ नेत्यांना सत्ताधारी केले, त्यांच्यामध्ये सम्राटपदाची लालसा उत्पन्न केली. ‘माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट’ ही बालक-मनोवृत्ती वाढल्या वयाच्या सर्वसामान्यांमध्ये रुजवली. यातून मनुष्यसमाजांत अस्मिता नि असूया या दोन्हींचा प्रादुर्भाव होईल, परिणामत: देशांदेशांत तसंच समाजा-समाजांत संघर्ष उभे राहतील नि मानवातील होऊ घातलेली एकी विरुन जाईल असा त्यांचा होरा होता.

    पण तेवढे पुरेसे ठरेना. मानवी सहकार्याचा वारू काही थांबेना. अखेर सर्वधर्मीय देवांनीही आपसातले वर्चस्व-संघर्ष तात्पुरते बाजूला ठेवून सहकार्याची गरज मान्य केली. दंगलीनंतर सर्वधर्मीय बैठक बोलावून शांतता कमिटी निर्माण केली जाते त्या धर्तीवर सर्वधर्मीय देवांची एक समिती नेमून सद्य परिस्थितीवर उपाय शोधण्याची विनंती करण्यात आली. या समितीने पृथ्वीवर काही महिने व्यतीत केले नि परत येऊन आपली श्वेतपत्रिका सर्वधर्मीय देव-संसदेसमोर सादर केली.

    त्यात असे म्हटले होते की ‘गरजांची सुलभ-पूर्ती, त्यातून आलेला सुखवस्तूपणा यामुळे मनुष्यजात शिथिल झाली आहे. संघर्ष करण्यास त्याच्याकडे सबळ कारण उरलेले नाही. त्याच्यातील प्राणितत्त्व त्याच्याशी निगडित हिंसेचे विरेचन होण्यास वाट उरलेली नाही. तिला वाट करुन दिल्यास मानवाची सौहार्दाची, सहकार्याची कंड जिरेल नि तो पुन्हा संघर्षाच्या वाटे चालू लागेल.’

    सर्वधर्मीय देव-संसदेमध्ये उपायांवर बरेच मंथन झाले. अखेर एका उपायावर सहमती झाली, त्याला ‘ऑपरेशन बाबेल’ असे नाव देण्यात आले. देवांनी इंटरनेट वापरकर्त्या मेंदूंना प्रेरणा देऊन आपली योजना कार्यान्वित करवली…

    …‘सोशल मीडिया’ची निर्मिती झाली आणि देव निर्धास्त झाले.

    - oOo -

रविवार, ११ मे, २०२५

Will He…?

  • रोममधील कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर नवे पोप म्हणून चर्चच्या सर्वोच्चपदी आरूढ झालेले Robert Fancis Prevost हे गणित विषयातील पदवीधर आहेत. या संयोगवश सुचलेली ही कविता.


    Will He…?

    Pope Leo XIV
    Pope Leo XIV
    Is it a new hope, 
    if a Mathematician 
    becomes a Pope?
    
    Will he count fractions,
    and not just
    whole numbers?
    
    Will he be rational,
    filter out infinite
    irrational?
    
    Will he prefer integration
    over the age-old
    differentiation?
    
    Will he draw a line
    with a color 
    other than white?
    
    Will he connect
    to the point 
    outside his circle?
    
    Will he…?