पेज

SearchAndFollow

Follow-It

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

प्रश्नोपनिषद - १: पुनर्जन्म

मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही. पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ( हे असं आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ऑपरेशनल बाजूबद्दल.

आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती पुनर्जन्म असतो की नाही. नि आमच्या टकुर्‍यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्ही करंटेच.

पण ते असो. निदान आता प्रश्न टकुर्‍यात आलेच आहेत तर निदान त्यांची उत्तरे मिळाली तर ते नुस्कान थोडे तरी भरून काढू म्हटलं नि हे प्रश्न त्या दोघांना विचारले. पहिला प्रश्न पुरा होण्याच्या आतच आमच्यासारख्या मूर्ख माणसाला पुनर्जन्म नसावा - निदान माणसाचा नसावा - याबाबत त्या दोघांचे ताबडतोब एकमत झाले. पुनर्जन्म असतो असा दावा करणार्‍याने माझ्याकडे कीव आलेल्या नजरेने पाहिले नि म्हटले ’तू फक्त आमचे ऐकत जा, जरा तरी अक्कल येईल उगाच तोंड उघडून आपले शहाणपण पाजळू नकोस.’

तर मंडळी मित्र हे असे, आमची ज्ञाननतृष्णा तर ज़ब्ब़र, प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर चैन पडणार नाही (भूत होऊन त्या दोघांच्या मानगुटीस बसतो झालं). मग काय आयतेच सापडलात तर राम जेठमलांनीना.... आय मीन त्यांच्या दहा प्रश्न रोज विचारण्याच्या परंपरेला स्मरून यातले दहा प्रश्न - उपप्रश्नांसह - तुम्हालाच विचारून टाकतो झालं.

ManyQuestions
  • मागल्या जन्मातले आठवते असेच बरेचदा कुणी कुणी दावा करत असल्याचे अधून मधून ऐकायला मिळते. ही आठवण नेहमी मनुष्यजन्माचीच कशी असते? त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते, त्यांना 'लक्ष-चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळण्याची लॉटरी लागलेली असते? तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे शरीराबरोबर मनालाही लकवा भरलेले लोक अश्लील-अश्लील म्हणून ओरडू लागतील*. तसाही तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर आमचा विश्वास आहेच.
  • मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही?
  • मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का?
  • समजा वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार. भारताऐवजी मी बुर्किना फासो नावाच्या देशात जन्मलो, तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार, की मी भारतीय कायद्याच्या 'ज्युरिस्डिक्शन' मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार?
  • आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या बाबत असे असेल, तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का? दोघांचे पाप-पुण्याचे अकाऊंट सेपरेट ठेवायचे की एकाच आत्म्याला दोनदा मनुष्यजन्म मिळाला असे गृहित धरून नव्या पासबुकमध्ये कॅरी-फॉरवर्डची एन्ट्री टाकायची?
  • नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते ब्वा?
  • मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या काँट्रॅक्टमधे धरला जातो की नाही?
  • मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय.) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हज्बंड-वैफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का?
  • दोन जन्मांच्या मधे भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणतो. त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे. म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी- फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी- फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत 'टीडीआर' असतो का?
  • लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात?
  • (आईन्स्टाईनच्या रिलेटिविटीला स्मरून...) एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग 'भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या, तर त्याला मनुष्य जन्म मिळतो.' असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का?
  • प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात?
  • पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हा समतोल(equilibrium) अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा, उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची पावर आहे त्याला रेकमेंड करून) 'अकाउंट क्लोज्ड' चा शिक्का का मारत नाहीत?
  • पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते?
  • काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते?
  • वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यू.ए. देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती?
  • माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का?
  • मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट मिळते का? याचे उत्तर 'हो' असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर - थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर - हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही 'मोक्षपत्र' करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल?
  • फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का? त्याचे अर्ज कुठे मिळतात?
  • पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 'सिविल सोसायटी'च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे - खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले - विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?

आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर 'सास भी कभी बहू थी' सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होतेच म्हणे ) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?

- oOo -

* पु.लं.च्या ’रावसाहेब” मधून साभार.