Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - परिशिष्ट : ‘पदार्पण’ - एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)

  • विज्ञान-काल्पनिका प्रकारातील ‘प्लरिबस’ या मालिकेचा पहिला टप्पा नुकताच पाहाण्यात आला. ‘एका नेमक्या क्षणी पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एका समूह-मनाच्या समाजामध्ये अथवा जीवामध्ये परिवर्तित होते’ अशी कल्पना आधारभूत धरून त्याभोवती तिचे कथानक उभे राहिले आहे. पूर्वाश्रमींच्या मानवी प्राण्यांमध्ये आता सामूहिक मन प्रस्थापित झाल्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज म्हणजे एक व्यापक जीव आणि ही पूर्वाश्रमीची माणसे त्याची स्वतंत्रपणे वावरणारी उपांगे अशी व्यवस्था आकाराला येते आहे.

    एक जीव नि त्याची चल (roaming) उपांगे ही व्यवस्था पाहाताना काही वर्षांपूर्वी वाचलेल्या ‘पदार्पण’ या सुबोध जावडेकर यांच्या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. ‘प्लरिबस’मध्ये एका जगद्व्यापी समूह-मनाच्या व्यवस्थेतून बाहेर राहिलेल्या तेरा जणांच्या त्या समूह-जीवाशी निर्माण झालेला परस्पर-संबंध, सहकार नि संघर्ष याभोवती कथानक उभे राहाते आहे. तर ‘पदार्पण’मध्ये अशाच उपांगजीवी वृक्ष-जीवाच्या संदर्भात नवी शक्यता मांडली आहे. ‘प्लरिबस’मध्ये समूह-मनाची संकल्पना प्राणिसृष्टीमध्ये रुजलेली आहे, तर ‘पदार्पण’मध्ये वनस्पतीसृष्टीमध्ये. दोनही कथानकांची पार्श्वभूमी वेगळी असली तरी पूर्वसूत्र बव्हंशी एकच आहे.

    परंतु दोहोंमधील बदलाच्या दिशेतील फरकही ध्यानात घ्यायला हवा. ‘प्लरिबस’मध्ये स्वतंत्र जीवांचे संमीलन (Confluence) होऊन व्यापक पण उपांगजीवी सजीवाची निर्मिती होते आहे. तर या उलट आजच्या जीवसृष्टीच्या संदर्भात पाहिले तर ‘पदार्पण’मध्ये एका सजीवाचा विग्रह होऊन विलग झालेली त्याची उपांगे स्वतंत्रपणे कार्यरत झालेली आहेत.

    मनुष्यप्राण्याच्या सामाजिक इतिहासामध्ये समूह-मनाची नसली, तरी समूह-जीवनाची विविध व्यवस्था-प्रारूपे सापडत असल्याने, त्यांचा मागोवा घेत ‘प्लरिबस’च्या निमित्ताने एक दीर्घ मालिका इथे नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे. वनस्पतीसृष्टीमध्येही भिन्न जातीय जीवांच्या सह-जीवनाची, परस्पर-सहकार्याची अनेक उदाहरणे सापडतात. परंतु एकाच प्रजातीमधील भिन्न जिवांच्या सहजीवनाची उदाहरणे दुर्मीळ आहेत. त्यामुळे या क्षेत्रात ‘प्लरिबस’वरील मालिकेप्रमाणे दीर्घ उहापोह करणे शक्य नसले, तरी या दीर्घ लेखामधून ‘पदार्पण’मधील कल्पनेचा वेध घेऊन व्यापक शक्यता उभी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या मालिकेचे परिशिष्ट म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.


    सहजीवी

    मधमाश्यांसारखे, मुंग्यांसारखे सहजीवी कीटक आपल्या समाजामध्ये, वसतीमध्ये नेमक्या कार्यविभागणीचे नियोजन करत असतात. पुनरुत्पादनाचा एकाधिकार नि जबाबदारी असणारी राणी माशी वा मुंगी, पुनरुत्पादनात सहभागी असणारे मोजके नर, आणि त्या तुलनेत बर्‍याच अधिक संख्येने असणारे कामकरी नि लढाऊ कामगार अशी विभागणी पोळ्यांमध्ये किंवा वारूळांमधून दिसते. मानवी समाजाने ही संकल्पना कैकपट विस्तारत प्रगतीच्या अनेक वाटा पादाक्रांत केल्या आहेत.

    हे सारेच समूहजीवी जीव आहार मिळवण्यासाठी भ्रमंती करतात. त्यांचे वसतीस्थान हे केवळ विश्रांतीस्थळ असते… काहींचे ते ही निश्चित नसते. या सजीवांच्या वसतीस्थानाच्या आसपास अभावाची परिस्थिती निर्माण झाली, तर ही भ्रमंती स्थलांतरामध्येही परिवर्तित होत असते. मानवी समूहामध्येही प्रशासन जरी स्थिर असले तरी इतर उपांगे– म्हणजे माणसे चल (moving) असतात. जशी गरज निर्माण होईल तसे, जिथे ती भागवता येईल, आवश्यक गोष्टी जिथे उपलब्ध असतील, तिकडे जाऊन ते आपली कार्ये पार पाडत असतात.

    वनस्पतीसृष्टी याला अपवाद आहे. तिला हा पर्याय उपलब्ध नाही! कारण त्यातील जीव अचल, स्थानबद्ध आहेत. ते ज्या स्थानी रुजले आहे तिथेच त्यांना पाणी, सूर्यप्रकाश वा आवश्यक जीवनद्रव्ये पुरेशी मिळाली नाहीत, तर त्यांचे अस्तित्व खुरटे होते वा संपून जाते.


    पदार्पण

    परंतु त्यातील वृक्षवर्गाचा विचार केला तर वृक्षाची उपांगे– म्हणजे मूळ, खोड, पाने, बीजे यांची कार्येही निश्चित आहेत. मुळांनी पाणी शोषून आणावे, पानांनी प्रकाश-संश्लेषणाचा वापर करुन सर्व उपांगांना आवश्यक असणारा जीवनरस निर्माण करावा, बियांनी नव्या जीवनिर्मितीच्या शक्यता निर्माण कराव्यात आणि खोडाने या सार्‍यांना एकत्र राखणारी प्रशासन व्यवस्था म्हणून काम करावे, असे एकुण नियोजन आहे. त्याअर्थी एक वृक्ष एखाद्या पोळ्यासारखा, वारूळासारखा वा मानवी समुदायासारखाच आहे असे म्हणता येईल.

    ‘मधमाश्या, मुंग्या अथवा माणसे या त्या-त्या समाजाच्या उपांगांप्रमाणेच झाडाची मुळे, पाने आदी उपांगेही चल आहेत नि परस्परांशी केवळ गरजेनुसारच जोडली जातात’ या कल्पनेच्या पायावर ‘पदार्पण’ ही कथा उभी आहे.

    इथे पुरा वृक्ष स्थानबद्ध नाही, त्याचे एकटे खोडच तेवढे जमिनीला बांधलेले आहे. परंतु पाणी जमा करण्याचे काम करणारी मुळे, प्रकाश-संश्लेषणातून अन्न निर्माण करणारी पाने मुक्तपणे अनुक्रमे पाणी नि प्रकाशाच्या शोधात फिरु शकतात. जिथे खोड उभे आहे तिथे आवश्यक प्रमाणात प्रकाश, पाणी उपलब्ध नसेल, तर चल असणारी मुळे नि पाने ते उपलब्ध असलेल्या भूमीच्या दिशेने प्रवास करु शकतात. तिथे त्या त्या गरजेची पूर्ती करुन परत येऊ शकतात नि खोडामार्फत त्या दोहोंची देवाणघेवाण पुरी करू शकतात. अभावाच्या परिस्थितीत त्यांच्या चल असण्याचा फायदा मिळून वृक्ष खुरटण्याची वा वठण्याची संभाव्यता कैकपट कमी होते आहे.

    खोडाचे काम पानांकडून मिळणारा जीवनरस नि मुळांकडून उपलब्ध होणारे पाणी एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचे (आणि आपल्या अस्तित्वासाठी या दोहोंतला वाटा राखून ठेवण्याचे) काम हे मध्यस्थासारखे आहे. फिरत्या मुळांना नि पानांना परतून येण्यासाठी नेमका ‘पत्ता’ सापडावा यासाठी खोडाला नेमक्या ठिकाणी स्थानबद्ध राहाणे आवश्यक ठरते आहे.

    आता मुळे स्वतंत्र झाली नि प्रवासही करु लागल्यामुळे ती जमिनीच्या वरही आली. त्याचा अधिकचा फायदा असा झाला की त्यांना केवळ जमिनीतील थेंबभर पाण्यावर अवलंबून राहाण्याची गरज उरली नाही. त्याहून मुबलक पाण्याचे साठेही त्यांना शोधणे शक्य झाले. किंबहुना कथेतील ग्रहावर मुळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यानेच उत्क्रांतीच्या प्रवाहात अशा प्रकारची ‘उपांगजीवी’ वृक्षाची व्यवस्था विकसित झाली वा असलेली टिकून राहिली असावी. परंतु त्या दुर्भिक्ष्याचा परिणाम म्हणून पाण्याचा अंश सापडताच ती अतिशयक आक्रमकपणे तो शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतात. उत्क्रांतिच्या ‘नैसर्गिक निवडीच्या’ (Natural Selection) नियमानुसार जी मुळे तशी आक्रमक होती, त्या वृक्षांचा वंशच त्या अभावाच्या जगात टिकून राहिला असावा.

    पण उत्क्रांतिमध्ये केवळ टिकून राहाणे पुरेसे नाही, वंशविस्ताराचा संभवही आवश्यक असतो. कथेचा निरास या वंशविस्ताराची एक धक्कादायक शक्यता उभी करतो. ‘पदार्पण’ ही कथा असल्याने त्यात कथन होते नि एक निरासही. परंतु निव्वळ त्या कल्पनेवर न थांबता त्या स्वरूपातील सजीवाचे अस्तित्व आजच्या जीवसृष्टीमध्ये संभव आहे का, असल्यास त्या जीवाच्या– आता जीव-समूहाच्या म्हटले पाहिजे– अस्तित्वामुळे एकुण जीवसृष्टीमध्ये काय फरक पडेल, आपले आकलन कसे बदलेल, याचा विचार करणे रोचक ठरेल.


    एक कल्पनाविस्तार

    वृक्षांची उपांगे वेगळी झाली आणि आपली कामे साध्य करण्यासाठी स्थलांतरही करू लागली. मूळ पाण्याच्या शोधात हिंडणार, जिथे पाणी मिळेल तिथून ते शोषून घेणार; साठा पुरेसा झाला की परत येऊन खोडाशी विनिमय करून पाणी देऊन त्याकडून जीवनरस अथवा ऊर्जा प्राप्त करणार. असाच विनिमय व्यवहार पानेही करणार. खोडाचे काम साधारणत: बँकेसारखे– दोन्हींचा साठा नि विनिमय करण्याचे.

    आता पुढचा टप्पा म्हणजे या एकास-एक विनिमयाचा विस्तार करुन मानवाने निर्माण केलेल्या व्यापारव्यवस्थेप्रमाणेच व्यापक विनिमय व्यवस्था झाडांमध्येही निर्माण होऊ शकेल. मूळ एकदा सुटे झाले की ते स्वतंत्रही होऊ शकेल. त्याला एका विशिष्ट वृक्षाला बांधील राहाण्याची गरज नाही. माणूस जसा परगावी असताना एखाद्या परक्या घरात वा होटेलमध्ये आसरा घेतो, तसेच जीवनरसाची पातळी घसरली तर ते मूळ दूर असलेल्या आपल्या खोडाऐवजी जवळच्याच एखाद्या सजातीय वृक्षाच्या खोडाशी देवाणघेवाण पुरे करून आपली गरज भागवू शकेल.

    आणखी एक पाऊल पुढे म्हणजे खोडही सजातीय वृक्षाचे असायची गरज नाही. रासायनिक प्रक्रियेमध्ये ‘संयुजा’ (valency) म्हणजे संयोग-क्षमता हा कळीचा मुद्दा असतो. इलेक्ट्रॉन देऊन व घेऊन आपली कक्षा पुरी करु पाहाणार्‍या दोन मूलद्रव्यांमध्ये हा व्यवहार पुरा होऊन दोघांची गरज भागते आणि संयुगाची निर्मिती होते. त्याच धर्तीवर ज्या मुळा-खोडामध्ये देवाणघेवाणीची शक्यता आहे अशा कोणत्याही जातीच्या झाड (खोड) नि मुळामध्ये ही देवाणघेवाण होऊ शकेल. हे शक्य झाले की आणखी एक रोचक शक्यता निर्माण होते…

    मुळांना नि पानांना मोजक्या सजातीय खोडांऐवजी अनेक वृक्षजातीच्या खोडांचा पर्याय उपलब्ध झाला, की त्यांच्यातही निवडीचे उद्दिष्ट (objective) निर्माण होईल. ‘प्रवासाचे अंतर मर्यादित केल्यास ऊर्जा-बचत होत असल्याने’ मुळे नि पाने शक्यतो जवळच्या खोडाशीच व्यवहार करू लागतील. मग दूरच्या खोडांची व्यवहार्यता कमी होत जाईल. म्हणजे अभावाच्या भूमीमध्ये खोडेही तगून राहू शकणार नाहीत. मग कदाचित खोडांचेही ‘स्थलांतर’ (अथवा अस्तित्व टिकून राहाणे) हे पुन्हा अन्न पाणी अधिक उपलब्ध असलेल्या भागात एकवटले जाईल. उपांगजीवी व्यवस्था ज्या अभाव-स्थितीवर मात करत उभी राहिली ते कारण आता गैरलागू (redundant) ठरण्याची शक्यता बळावेल. कारण ही उपांगे पुन्हा विशिष्ट भूभागातच केंद्रित होत जातील…

    …ही कारणमीमांसा माणसाच्या जगातील महानगरांच्या अवाढव्य विस्तारालाही लागू पडते! मानवी इतिहासात ही व्यवस्था भांडवलशाहीची नांदी ठरली होती. विनिमयातील बचत अधिकाधिक करण्यासाठी परस्परावलंबी व्यवसाय नि सेवा आणि त्यांच्याशी निगडित मनुष्यप्राण्यांची वसती सोयीच्या, सलग अशा भूभागावर एकवटत गेल्याने महानगरांची निर्मिती झाली.

    या नव्या जैविक व्यवस्थेमध्येही पाने नि मुळे चल झाल्यामुळे अभावाच्या क्षेत्रात झाडे रुजण्याची वाढलेली संभाव्यता पुन्हा कमी होत जाईल. याला चालना मिळेल ती मूळ-खोड-पाने ही बांधिलकी मोडून निर्माण झालेल्या व्यापक विनिमयाच्या व्यवस्थेमुळे. प्रजातीबाह्य विनिमयातून वृक्षसृष्टीमध्येही अशी एखादी भांडवलशाही व्यवस्था उदयाला येईल का? मग त्यातून उभ्या राहिलेल्या जीवघेण्या स्पर्धेत बलवंतांनी बळाने मागे ढकललेले दुबळे जीव तगून राहाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन एकमेकांना बांधिलकीची हमी देत मूळ-खोड-पाने ही व्यवस्था निर्माण होईल का…?

    अभावाची परिस्थिती नवी शक्यता निर्माण करते, ही नवी शक्यता पुरवठ्यामध्ये वाढीच्या वाटा निर्माण करते. पुरवठ्यामध्ये झालेली वाढ सजीवाच्या (खरंतर ही प्रवृत्ती केवळ माणसांत दिसते) मनामध्ये लालसेला जन्म देते. त्यातून पुरवठ्याचा अधिकाधिक वाटा खेचून घेत संचयाचा राक्षस वाढू लागतो. या संचयाच्या फुगवट्यामुळे पुन्हा नवी अभावाची क्षेत्रे निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आपणच दूर केलेल्या मूळ सहजीवी व्यवस्थेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवू लागते! कारण सामूहिक वापर, ‘गरजेनुसार वापरा’मध्ये रूपांतरित होतो. यातून अतिरिक्त संचयाची (reserve) आवश्यकता नाहीशी होते आणि एकुण समाजाच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक उत्पादन अथवा संग्रहाची (foraging) गरजही लक्षणीयरित्या कमी होते.

    - (क्रमश:) -

    « उत्तरार्ध