Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा

  • जठराग्नी शमवाया भूतां « मागील भाग

    जीवसृष्टीतील प्रत्येक जिवाच्या अन्न आणि निवारा (संरक्षण) या दोन मूलभूत गरजा आहेत नि जुगण्याची प्रेरणा ही जीवसातत्याला चालना देणारी भावना. कोणतीही नवी सामाजिक, राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली, तरी या दोन गरजांच्या पूर्तीसाठी पुरवठ्याचे व्यवस्थापन तिला करावे लागते. तरच तो समाज नि ती व्यवस्था स्थिर राहू शकते.


    पुरवठा नव्हे साठा

    ‘प्लरिबस’मधील समूहजीवी व्यवस्था सर्व सजीवांना अभय देत असल्याने आजवर शेती, नि पशुपालन या दोन मार्गाने आपले अन्न मिळवणार्‍या अर्वाचीन मानवाला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या व्यवस्थेमध्ये अन्नाची गरज भागवणारी जी व्यवस्था निर्माण केली गेली आहे, ती दीर्घकाळ उपयोगी ठरणारी नाही. ज्या नव्वद कोटी कलेवरांच्या पुरवठ्यावर ही व्यवस्था अवलंबून आहे, तो साठा आहे, उत्पादन-व्यवस्था नाही. एका मनुष्यप्राण्याचा दैनिक आहार ध्यानात घेतला, तर हा साठा काही दिवसांतच– निदान महिन्यांत संपून जाणार आहे. तसंच प्रत्येक कलेवराला प्रथिनामध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही काही घट होणार आहे. या दरम्यान त्या साठ्यामध्ये पडणारी ‘भर’ ही गरजेच्या तुलनेत नगण्य असणार आहे. हे चक्र सतत फिरते ठेवण्यास आवश्यक इतकी ती असूच शकणार नाही. मग लवकरच अशी स्थिती येईल की गरज ही आवश्यकतेपेक्षा/मागणीपेक्षा कमी असेल, आणि मानवी समाज पुन्हा परिचित अशा तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचतो आहे.

    ही समस्या केवळ अन्नाच्याच संदर्भात उद्भवते असे नाही, जगण्याला आवश्यक सर्वच गोष्टींसंदर्भात ही समस्या उद्भवणार आहे. व्यवस्थाबदलाच्या धक्क्यामध्ये जगाची लोकसंख्या प्रचंड घटली. यामुळे आधीच उत्पादित वस्तू नि ग्राहक यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने सुरुवातीच्या काळात उपभोग सुकर झाला असेल. परंतु हा साठाही कधीतरी संपणार आहे. त्यानंतरच्या भविष्यातील उपभोगासाठी उत्पादनव्यवस्था शिल्लक ठेवावीच लागेल. पण यात अडचण अशी की ‘सजीवांना धक्का लावायचा नाही’ या नियमामुळे यातील अनेक उत्पादनांसाठी पुरेसा कच्चा मालच उपलब्ध नसेल. त्यामुळे लवकरच हे व्यस्त प्रमाण उलट दिशेने– म्हणजे ‘ग्राहक/मागणी अधिक नि पुरवठा कमी’ या बाजूला झुकणार हे ओघाने आलेच.


    एक भाकर दोन माणसे

    ‘सर्वांना समान हक्क’ हा साम्यवादी व्यवस्थेचा नियम तेव्हाच पाळता येतो जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अधिक– निदान पुरेसा असतो. समजा प्रत्येक माणसाची भूक एका भाकरीइतकी आहे. एकच भाकर उपलब्धही आहे, पण एक नव्हे तर दोन भुकेले जीव तिथे आहेत. आता दोघांपैकी एकाचीच भूक भागवता येत असते. म्हणजे निवाडा करणार्‍या व्यक्तिला निर्दोष असा पर्यायच उपलब्ध नाही. तिला दोघांपैकी एकाची भूक भागवून दुसर्‍याला भुकेला ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो किंवा दोघांना (समान म्हणून) अर्धी अर्धी भाकर वाटून द्यावी लागते. पहिल्या पर्यायामध्ये एक जण असमाधानी राहातो तर दुसर्‍या पर्यायामध्ये दोघेही.

    SharingBread
    https://www.istockphoto.com/ Credit: Shaiith.

    भांडवलशाही जगामध्ये मात्र मागणी नि पुरवठा यांच्यामध्ये ही जी तफावत निर्माण होते, तिला इष्टापत्ती मानले जाते. कारण पुरवठ्यामधील तुटवडा भरून काढण्यासाठी नव्या उत्पादकतेला, नव्या श्रमाला चालना मिळते. त्यातून नवे रोजगार नि संपत्ती निर्माण होते. तथाकथित प्रगतीचे चक्र अधिक वेगाने फिरू लागते.

    पण ही जी नवी उत्पादकव्यवस्था निर्माण होते, ती कच्च्या मालाची मागणी वाढवणारी असते. आणि तिच्या पुरवठा-साखळीच्या थेट उगमापाशी जाऊन पाहिले तर निसर्गाच्या विध्वंसाच्या चक्राची गतीही वाढवणारी ठरते.

    निसर्गाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी, कच्चा माल पुरेसा उपलब्ध नसेल, तर अशी निरर्गल उत्पादनवाढ शक्य होत नाही. तसंच ही नवी उत्पादन-व्यवस्था उत्पादन वाढवत असली तरीही पुरवठा-साखळी, ग्राहकांची खरेदी-क्षमता, कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार उत्पादनावर येणारी बंधने, टिकाऊपणा (shelf-life) नि साठवण-क्षमता (storage capacity) यांच्या मर्यादांमुळे ‘हवे त्याला मिळेल’ ही आकांक्षा पुरी करता येत नाहीच.


    नव्या व्यवस्थेसमोरील पेच

    आता मागणीपेक्षा उपलब्धता कमी असल्याने मागणीमध्ये/गरजांमध्ये प्रतवारी लावून त्यानुसार उपभोगाचा प्राधान्यक्रम लावण्याचा दुसरा पर्याय स्वीकारावा लागतो. ग्राहकांमधील कोणाची गरज अधिक निकडीची आहे त्यांची गरज प्राधान्याने भागवत जावे लागते. परंतु यासाठी ‘कुणाची गरज अधिक निकडीची’ याचा निवाडा देणारी नियंत्रक व्यवस्था आवश्यक असते. त्यामुळे ‘राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप कमीत कमी असावा’ यावर कटाक्ष असणार्‍या भांडवलशाहीला हा मार्ग पसंत नसतो.

    राजकीय व्यवस्थेऐवजी बाजाराला सार्वभौम मानणारी ही व्यवस्था हा निवाडा तथाकथित खुल्या स्पर्धेवर सोडून देते. ‘उत्पादनाच्या मालकीसाठी ग्राहकांनी स्पर्धा करावी नि जेत्याने उपभोग घ्यावा’ असे ती सांगते. या मालकी-युद्धामध्ये चलन हे प्रमुख शस्त्र आहे, ते ज्याचे बळकट त्याला पुरवठ्याचा आवश्यक वा त्याहून अधिक हिस्सा मिळवता येतो. ‘चलनाची, स्पर्धेची व्यवस्था बाह्य हस्तक्षेपापासून दूर आणि म्हणून निकोप आहे’ असा तिचा दावा असतो… जो वास्तवात केव्हाच मोडीत निघालेला असतो. शिवाय यातून निकडीची गरज असलेले वंचित राहाण्याचा धोका असतो. पण स्पर्धा नि चलन हे सार्वभौम मानणारी ही व्यवस्था त्याबाबत पूर्णपणे निर्मम भूमिका घेत असते.

    Who Gets The Seat?

    चलनाला मोडीत काढलेल्या आणि त्याचवेळी व्यापक अशा नियंत्रक व्यवस्थेचा अभाव असलेल्या Pluribus मधील व्यवस्थेमध्ये वरीलपैकी दोनही पर्याय (खुली स्पर्धा वा प्राधान्यक्रम लावणे) अंमलात आणता येणार नाहीत. त्यातच Pluribus ची ही व्यवस्था निसर्गस्नेही आहे. निसर्गाला मन:पूत ओरबाडणे तिला मान्य नाही. त्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेप्रमाणे कच्च्या मालाची मागणी वाढवणारे नवे उद्योग उभारणेही तिला शक्य नाही. म्हणजे पुरवठा कमी असेल तेव्हा फारतर गरजांची प्रतवारी नि त्याआधारे ग्राहकांमध्ये प्राधान्यक्रम निश्चित करणे ही पद्धत तिला स्वीकारता येईल.

    पण इथेही दोन समस्या आहेत. पहिली म्हणजे अशी प्रतवारी वा प्राधान्यक्रम निश्चित करणारी नियंत्रक व्यवस्था अस्तित्वात नाही. कुणाची/कोणत्या ठिकाणची गरज अधिक महत्त्वाची नि कोणती कमी महत्त्वाची याचा निवाडा करणार कोण? दुसरी समस्या म्हणजे ही पद्धत केवळ वरकड वस्तूंच्या मागणीसंदर्भात मान्य करण्याजोगी आहे. मूलभूत गरजेच्या वस्तू– जसे वस्त्र, प्रवासासाठी वाहन, आरोग्य नि उपचार, उत्पादनप्रक्रियेत सामील असणार्‍यांसाठी कच्चा माल वगैरे बाबतीत डावे-उजवे करता येणार नाही. तसे केले तर या ‘सर्व समान’ व्यवस्थेच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासला जातो. भांडवलशाही व्यवस्थेसमोर हा पेच नाही, कारण तिने समानता हे आपले उद्दिष्टच (objective) ठेवलेले नाही.

    एकुणात मालिकेमध्ये अशा तुटवड्याच्या परिस्थितीमध्ये वितरणाच्या पद्धतीबद्दल,निकषांबद्दल काही स्पष्ट उल्लेख नाही. तिच्या पुढील टप्प्यांमध्ये, पुढील भागांमध्ये त्याबद्दल काही संदर्भ आले, तर तेव्हाच त्याचा अधिक उहापोह करणे शक्य होईल.


    जेवढे अन्न तेवढीच भूक

    उत्पादकता वाढवण्याचे फार स्वातंत्र्य नसणार्‍या, केंद्रीय नियंत्रक नसणार्‍या आणि निसर्गाला बांधलेल्या या व्यवस्थेने अपरिहार्यपणे ‘पुरवठ्याच्या प्रमाणात उपभोग’ हे सूत्र स्वीकारले आहे. यातून असमानता काही प्रमाणात दूर करता येईल. पण त्यासाठी किमान गरजा निश्चित कराव्या लागतील. त्या निश्चित केल्यानंतर त्यांना आवश्यक साधनांचा संपूर्ण मानवजातीला सुरळीत नि पुरेसा पुरवठा होत राहील अशी यंत्रणा उभारण्याला प्राधान्य देण्याची गरज निर्माण होते. जगाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येकाच्या गरजा संपूर्णपणे भागल्यानंतरच पुढील– कमी गरजेच्या उत्पादनांकडे वळावे लागेल.

    Prioritize

    उदाहरणाने स्पष्ट करायचे झाले तर, ‘प्रचंड विस्तार असलेली एक इमारत बांधायची आहे. परंतु जिचा एक एक मजला संपूर्णपणे बांधून पुरा राहण्यायोग्य झाल्यावरच वरील मजल्याचे बांधकाम सुरु करण्यास परवानगी आहे’ अशा स्वरुपाचे हे नियोजन असेल. आधी चार मजल्यांचे आरसीसी काम केले. मग दोन मजल्यांचे वीटकाम केले. मग त्यांचे प्लॅस्टरिंग चालू करतानाच वरच्या मजल्यांवर भिंती बांधणे सुरू केले… अशा समांतर कामांना इथे परवानगी नाही. तसंच इथे संपूर्ण इमारतीच्या जमिनीवरील विस्ताराचे (Carpet-spread) विभाग करुन त्या-त्या विभागावरील बांधकाम स्वतंत्रपणे करण्याची परवानगी नाही. कारण तसे केले तर हा आप-परभाव, भेदाभेद ठरेल.

    तसेच एका मजल्याचे बांधकाम पुरे होण्यापूर्वीच वरील बांधकाम चालू केले आणि निधी वा कच्चा माल संपला, तर एकाच वेळी दोन मजले अपुरे राहाण्याचा धोका संभवतो. त्याच धर्तीवर उत्पादक व्यवस्थेमध्ये ‘विविध उत्पादनांसाठी एकच कच्चा माल वापरला जात असेल नि त्या सार्‍यांसाठी पुरेसा पुरवठा नाही’ अशी स्थिती असेल, तर एकाच वेळी एकाहुन अधिक उत्पादनांच्या निर्मितीला खीळ बसण्याचा धोका संभवतो. यातून पुरवठ्यामध्ये विषमता निर्माण होऊन काहींची गरज न भागण्याचा धोका निर्माण होतो.

    या नव्या व्यवस्थेमध्ये आहार वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा-साखळी कशी असेल हे स्पष्ट होत नाही. कारण सर्वच बाबतीत ‘आहे त्यात भागवा’ हा मंत्र कामी येणार नाही. माणसाच्या आयुष्यात अन्नाप्रमाणेच अनेक गरजांना नाशवंत वस्तूंच्या – उदा. औषधे – पुरवठ्याची आवश्यकता असते. यांचे उत्पादन करणे अपरिहार्य आहे. ही उत्पादनव्यवस्था तिला लागणारा कच्चा माल कुठून उभा करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. आज आपण वापरत असलेल्या बहुतेक वस्तूंची उत्पादनसाखळी ही निसर्गापाशीच उगम पावते आहे. नव्याने निसर्ग-विध्वंस करायचा नाही म्हटले तर वनस्पतीजन्य, प्राणिजन्य कच्च्या मालाचा पुरवठा तर थांबतोच, पण खनिज पदार्थांच्या पुरवठ्यालाही ‘एक्स्पायरी डेट’ मिळून जाते. कारण नव्या खाणी खोदायच्या, तर एखाद्या भूभागावरील जीवसृष्टीचा विध्वंस केल्याखेरीज गत्यंतर नसते.

    पुरवठ्याच्या मर्यादेत गरजा कमी करत नेण्याचा हा मार्ग काहीसा अध्यात्मिक मार्गाचे प्रतिबिंबही दाखवतो. माणूस असमाधानी असतो याचे कारण तृष्णा, लालसा असे म्हटले जाते. उपभोगाने लिप्त, अधिकाधिक मिळवत राहायला हवे या लालसेने हपापलेला माणूस समाधानी नसतो. याउलट अनेकदा गुलामगिरीतही माणसे समाधानाने जगताना दिसतात. म्हणजे समाधानी असण्याच्या मुळाशी तृष्णेचे, आकांक्षेचे दमन असते. साहजिकच अपेक्षांची सांगड उपलब्धतेशी घातली तर समाधानी होण्याची शक्यता अधिक, तर लालसेने गरजांना जमिनीवर सोडून आभाळी भरारी घेतली, की त्या दोहोंशी एकाच वेळी जोडून असलेला माणसाच्या शरीर-मनावर तणाव वाढत जातो.

    समूह-मनाच्या या व्यवस्थेमध्ये म्हणूनच तृष्णेला खुडून काढत ‘आम्ही सारे सुखी आहोत’ ही भावना प्रत्येक माणसामध्ये रुजवलेली आहे. त्या मानसिकतेमध्ये मर्यादापालनाची शिस्त रुजवणे अधिक सोपे जाते आहे.


    वैय्यक्तिक संपत्तीचा लोप

    ‘जेवढे अन्न तेवढीच भूक’ या दृष्टिकोनाचे उदाहरण मालिकेमध्ये ऊर्जावापराच्या संदर्भात दिसून येते. आजचा मनुष्यप्राणी सर्वाधिक अवलंबून आहे तो ऊर्जेवर. या ऊर्जेची गरज प्रामुख्याने जैविक इंधनांने भागवली जाते. त्याखेरीज भारतासारखी आशियाई राष्ट्रे आजही प्रामुख्याने कोळशावर आधारित औष्णिक विजेवर भर देते. या दोनही प्रकारांमध्ये निसर्गाची प्रत्यक्ष हानी होते नि प्रदूषणही. याखेरीज अणुऊर्जा हा ऊर्जेचा तिसरा स्रोत आहे. पण नष्ट करता न येणारा किरणोत्सारी कचरा निर्माण करण्यापासून परिसर पर्यावरणाच्या तपमानावर– नि म्हणून परिस्थितिकीवर (Ecosystem) होणारा अनिष्ट परिणाम आदींमुळे आर्थिकदृष्ट्या स्वस्त असलेली ही ऊर्जा प्रत्यक्षात निसर्ग नि भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीने प्रचंड महाग आहे. परंतु मोजावयाच्या किंमतीचे गणित हे फक्त चलनाच्या भाषेत करण्याची सवय भांडवलशाहीने आपल्याला लावलेली असल्याने, याची जाणीव सुखोपभोगाच्या मागे धावणार्‍या समाजांना नाही. त्यामुळे बाटलीतून एकदा बाहेर आलेला हा जिन्न आता पुन्हा आत जाण्याचे नाव घेत नाही.

    गमावण्याजोगे बरेच काही जमवून ते सांभाळण्याचा आटापिटा करणारी माणसे सर्वाधिक वांझोटा ऊर्जाऽपव्यय करतात तो रात्री. घराच्या बाहेर, रस्त्यांवर सुरक्षिततेच्या कारणाने रात्रभर पेटते ठेवले जाणारे दिवे, जे पाहाण्यास त्या अवकाळी अक्षरश: शून्य माणसे असून झगमगत राहाणारे जाहिरातींचे बोर्ड, वगैरे गोष्टींची गरज नाहीशी करण्यासाठी निदान रात्रीपुरता तरी त्यांनी समूहवसतीचा प्रयोग अंमलात आणला आहे. त्या त्या शहरांतील खेळांच्या स्टेडियमवर ही विशाल मानवजीवाची अनुषंगे एकत्र होतात नि विश्रांती घेतात. त्यामुळे प्रत्यक्ष वसतीस्थानांच्या परिसरातील ऊर्जेचा पुरवठा संपूर्णपणे बंद करता येतो(१).

    हे लोक आपला दिनक्रम संपताच घरी जाण्याऐवजी जिथे असतील तेथून जवळच्या अशा एखाद्या समूह-वसतीस्थानी जाऊन सायंकाळ नि रात्र व्यतीत करु शकतात. यातून प्रवासाचे अंतर बहुधा कमी झाल्याने इंधनात बचत नि पर्यावरण हानी कमी होते. पुढे दैनंदिन कामाचे स्थान नि हे समूह-वसतीस्थान इथेच बहुतेक वेळ व्यतीत केला जाऊ लागल्याने वैय्यक्तिक मालकीच्या घराची गरज हळूहळू संपुष्टात येणार आहे. आणि वैय्यक्तिक मालकीचे घरच नाही म्हटल्यावर इतर वस्तूंचा संचय करण्याची जागाच संपते. त्यामुळे वैय्यक्तिक मालकी ही संकल्पनाही संपुष्टात येते.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » अंत:स्फोटाची अपरिहार्यता

    टीपा:

    (१). या दृष्टिकोनाला छेद देणारा एक प्रसंग आहे. कॅरोल या समूह-मनाच्या बाहेर राहिलेल्या स्त्रीची सहकारी म्हणून ज्या स्त्रीची निवड होते, ती स्त्री इराणमधून थेट अमेरिकेमध्ये एकटी एक विमान घेऊन जाते. यामध्ये ‘बाहेरील’ व्यक्तीला व्यवस्थेच्या आत खेचण्याची असलेली निकड अधोरेखित होत असली तरी, एका व्यक्तीसाठी एवढे प्रचंड जैविक इंधन– ज्याचे आता पुनर्भरण होणार नाही – जाळणे हे व्यवस्थेच्या तत्त्वाशी विसंगत आहे. कदाचित ‘ही व्यवस्था तात्पुरती आहे, तिला कालमर्यादा आहे; आणि म्हणून पुनर्भरणाची आवश्यकताच राहाणार नाही’ याचे हे निदर्शक असू शकते.[↑]

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १२ : जठराग्नी शमवाया भूतां

  • अद्यतनीकरण (Update) « मागील भाग

    कुठलेही तत्त्वज्ञान, विचार माणसाला आकर्षक वाटला नि ‘आपण तो स्वीकारला आहे’ असा दावा त्याने केला, तरी त्याच्याकडून तो पूर्णांशाने आत्मसात होतोच असे नाही. त्याच्या वास्तविक, व्यावहारिक जीवनातील काही प्रिय, काही अंगवळणी पडलेल्या, काही आवश्यक गोष्टींचा त्याच्याशी संघर्ष होऊ लागला, की त्याची मनस्थिती द्विधा होते. ‘याच्यासाठी ते सोडवत नाही, की त्याच्यासाठी हे’ अशी संभ्रमित अवस्था होऊन बसते. मग यातून Best of Both असा पर्याय (वा पळवाट) काढण्याची खटपट सुरू होते.


    आपद्धर्माचा महामार्ग

    मला ओशोंनी सांगितलेली, बुद्धाशी संबंधित कथा आठवते आहे(१). बुद्धांनी अहिंसेचा संदेश प्रसृत केल्यानंतर त्याने प्रभावित झालेले अनेक जण त्यांचे अनुयायी झाले. परंतु यात अनेक क्षत्रिय होते. मांसाहार हा त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग होता. त्यात अचानक बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. अति-उत्तरेकडील हिमाच्छादित भागात राहाणार्‍यांना शाकाहारापेक्षा मांसाहार अधिक सहजपणे उपलब्ध होत असे. या नि अशा कारणांनी जेरीस आलेली काही मंडळी बुद्धांकडे गेली, त्यांना आपली अडचण सांगितली.

    बुद्धांनी त्यावर विचार केला नि म्हणाले, ‘हत्या करणे पाप आहे हे तर खरे. पण जर तो जीव आधीच नैसर्गिकरित्या मृत झालेला असेल, तर हत्येचा दोष तुमचा नव्हे. तेव्हा अशा प्राण्याचे मांस खाल्ले तरी चालू शकेल.’(२) (‘अपने आप मरे हुए प्राणियों का मांस खाना वर्जित नही है।’) ओशो सांगतात, “यथावकाश असे घडले की या मांसाहारप्रेमींच्या सोयीसाठी जागोजागी ‘यहाँ अपने आप मरे हुए प्राणियों का मांस मिलेगा’ चे बोर्ड दिसू लागले.” बुद्धांनी आपद्धर्म म्हणून दिलेली ही सवलत मूळ तत्त्वाला मुरड घालण्याचा महामार्गच होऊन बसला.

    आपद्धर्माच्या नावाखाली ‘कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू नये’ या नियमांतून अशी पळवाट न काढता, अशा समाजातील आहाराची समस्या कशी सोडवावी हा लाखमोलाचा प्रश्न आहे. तो कसा सोडवला जातो, यावर ती समाजव्यवस्था टिकून राहाण्याची शक्यता नि संभाव्यता अवलंबून असतात. ‘या प्रश्नाचे काही वेगळे उत्तर मिळते का?’ हे पाहाण्यास मी उत्सुक होतो. पण Pluribus मधील व्यवस्थेनेही ‘अपने आप मरे हुए प्राणियों का…’ ही पळवाटच वापरली आहे.

    Vegetarian food not available.

    जे जीव आधीच मृत झाले आहेत त्यांपैकी ज्यांचे मृत होण्याचे कारण जर जीवाणू, विषाणू, विषजन्य असेल, त्यांचे मांस खाण्यास निरुपयोगी असणार, ते सोडून द्यावे लागणार. हे झाले प्राण्यांचे, त्यांच्या मृत्यूनंतर काही मिनिटे तरी त्यांचे मांस खाण्यायोग्य राहाते. पण वनस्पतींच्या बाबत तर त्यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणजेच त्यांच्या शरीराच्या उपयुक्ततेचा शेवटही असणार. वारा, पाऊस आदी नैसर्गिक आघाताने तुटून जमिनीवर पडलेली पाने, फुले, फळे, त्यांतील बिया यांचे सेवन या व्यवस्थेमध्ये त्याज्य नाही. परंतु अशा प्रकारे हाती लागणार्‍या अन्नाचे प्रमाण अतिशय नगण्य नि बिनभरवशाचेच राहाणार. थोडक्यात शाकाहाराला या व्यवस्थेत नगण्य स्थान आहे.

    अर्वाचीन महानगरी, रिटेल स्टोअर्सच्या जगात डबाबंद अथवा पूर्व-प्रक्रिया केलेल्या अन्न उपलब्ध असते. ‘प्लरिबस’मध्ये त्या जागतिक बदलापूर्वी तयार झालेल्या अशा अन्नाचा साठाही शिल्लक असणारच. ‘त्यात वापरलेले जैविक घटक मिळवण्यासाठी झालेली सजीव-हत्या ही नवी व्यवस्था अस्तित्वात येण्यापूर्वी झालेली आहे. ‘अपने आप मरे हुए प्राणी’च्या धर्तीवर त्याचा आता नव्याने दोष मानण्याची गरज नाही’ असे गृहित धरले, तर त्याचे सेवन त्याज्य ठरवण्याची आवश्यकता राहात नाही. जोवर हे अपघातपूर्व काळात तयार केलेले शिल्लक आहे, तोवर ‘हवे ते खाद्य’ मिळू शकते(३). परंतु ही उपलब्धता मर्यादित काळापर्यंतच असणार आहे.

    याहून अधिक अक्राळविक्राळ प्रश्न निर्माण होतो, तो हा की ‘समस्त पृथ्वीवरील मनुष्यप्राण्यांचे पालनपोषण होईल इतके ‘अपने आप मरे हुए’ प्राणी कुठून मिळणार? नि त्यांचा नियमित पुरवठा कसा होत राहाणार?’ पण त्या व्यवस्थेच्या निर्मितीक्षणात या प्रश्नाचे उत्तरही दिले गेलेले आहे.


    क्रांतिचे बळी

    सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे Pluribus च्या या नव्या समूह-मन अवस्थेची प्रतिष्ठापना एका जगद्व्यापी अपघातातून झालेली आहे. काही क्षण सारे मानवप्राणी स्तंभित झाले होते. त्यानंतर ते पुन्हा सचेतन झाले ते नव्या व्यवस्थेचे पाईक म्हणून. पण हा बदल काही सुरळित झालेला नाही. ते सचेतन होत असताना त्या बदलाचा धक्का पचवता न आल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे हा आकडा जवळजवळ ९० कोटी– म्हणजे आजच्या लोकसंख्येचा विचार करता दहा टक्क्यांहून अधिक– इतका प्रचंड आहे. म्हणजे हा व्यवस्था-बदल अनेकांचा बळी घेऊनच झालेला आहे.

    Memorial gravestones of Soviet soldiers whose remains were unearthed by volunteers and buried in Rossoshka. Credit: Sergey Ponomarev for The New York Times

    धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था असो, धर्माधिष्ठित समाजरचनेला नि राजकीय भांडवलशाहीला विरोध करत उभी राहिलेली कम्युनिस्ट व्यवस्था असो, की कम्युनिस्टांना क्र. १ चा शत्रू मानत त्यांना निखंदून काढण्यासाठी देशोदेशींचे नेतृत्व नि राजकीय व्यवस्था उलथून टाकणारी भांडवलशाहीसमर्थक व्यवस्था असो; आपापल्या सोयीची सामाजिक राजकीय व्यवस्था उभी करण्यासाठी या सार्‍यांचेच मुख्य हत्यार हे प्रतिस्पर्ध्यांचा, आपल्याला अनुकूल नसणार्‍यांचा नि:पात करणारे बंड वा उठाव अशा स्वरूपाचे असते. जुनी व्यवस्था मोडून हे सर्वस्वी नवी व्यवस्था स्थापन करतात ते हजारो, लाखो नरबळी देऊनच. Pluribus ची ही नवी व्यवस्थाही त्याच पंक्तीत जाऊन बसलेली आहे.

    असं म्हटलं जातं की ‘युद्धाने/रक्तरंजित क्रांतीने जुने प्रश्न संपतात नि नवे निर्माण होतात.’ तसेच त्यात झालेल्या विध्वंसातून निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होतात, नवे रोजगार निर्माण होतात. बळी गेलेल्यांना पायामध्ये चिणून नव्या व्यवस्थांच्या इमारती उभ्या केल्या जातात. Pluribus मध्येही व्यक्तिप्रधान समाजव्यवस्था उलथून ‘सर्वे सुखिन: सन्तु:’ या तत्त्वाधारे उभ्या राहू पाहाणार्‍या व्यवस्थेला, या नव्वद कोटींच्या मानवी जीवांच्या मृत्युमुळे ‘अपने आप मरे हुए प्राणियों का’ एक प्रचंड साठाच उपलब्ध झाला आहे.


    मानवजन्य प्रथिन (Human Derived Protein)

    पण याचा खाद्य म्हणून वापर करण्यामध्ये दोन अडचणी आहेत. पहिली म्हणजे असे ‘स्वजनाहारी’ (cannibal) होणे हे आजच्या मानवी संस्कारांना प्रचंड धक्कादायक वाटणारे आहे. जरी शिल्लक मानवांची मने नांगरून त्यांची नव्याने घडी बसवली गेली असली, तरी त्यांच्या सामूहिक माहिती-साठ्यामध्ये हे भूतकाळाचे अवशेष शिल्लक आहेतच. ते पूर्णांशाने नाहीसे झालेले नाहीत. कारण त्यांच्या केवळ सामाजिक जाणीवा बदलल्या आहेत, स्मृतिकोष तसेच आहेत(४). त्यामुळे आहारातील हा आमूलाग्र बदल त्यांना स्वीकारणे फारच अवघड होणार आहे. दुसरी समस्या अशी की ही मानवी कलेवरे ती नाशवंत असल्याने त्यांचा आहारोपयोगी कालखंड फार कमी आहे. तेवढ्या काळात एवढ्या प्रचंड संख्येने ती ग्रहण केली जाणे अवघड आहे.

    या दोनही समस्यांवर उपाय म्हणून या मानवी कलेवरांपासून आहारोपयोगी प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया अंमलात आणली आहे. आज फ्लेवर्ड मिल्क, फळांचे ज्यूस ज्याप्रमाणे बाटल्या वा टेट्रापॅक स्वरूपात मिळतात, तशाच स्वरूपात ही मानवजन्य प्रथिने प्रत्येकापर्यंत पोहोचवली जात आहेत. ही नवी समूहजीवी मानवजमात त्याच्या आधारे जीवनावश्यक उर्जा मिळवते आहे.

    सजीवांना इजा न पोहोचवता मांसाहार करणे अशक्य आहे हे खरे. पण नागर झाल्यानंतर मानवी समाजातील बहुसंख्य मांसाहारी हे स्वत: प्राणिहत्या करत नाहीत. हे ध्यानात घेतले तर त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आहारात येणारे मांस हे ‘अपने आप मरे हुए’ (खरंतर इतर कुणी मारल्याने मेलेले) प्राण्यांचेच असते. त्यामुळे त्या जीवहत्येचा दोष आपल्या माथी नाही अशी सोयीस्कर समजूत त्यांच्या नेणिवेत जाऊन बसलेली असते.

    एवढेच कशाला खुद्द त्यांना मांसविक्री करणारेही केवळ एवढा दोष इतरांच्या माथी मारून उरलेला व्यापार नि त्यातून मिळणारे चलन आपल्या हाती राखत असतात. आपल्या भारतातील काही समाजामध्ये मांसविक्री करणारेही खाटिककाम– म्हणजे प्रत्यक्ष जीवहत्या करण्यास अन्य व्यक्तीची– बहुधा मुस्लिम खाटकाची – मदत घेताना दिसतात. अनेक खेड्यांतून, लहान शहरांतून केवळ एवढ्याच कामासाठी एखाद-दुसरे मुस्लिम घर तगून राहिलेले दिसते.

    याचा पुढचा टप्पा म्हणजे एखाद्या प्राण्याच्या आपल्या नजरेसमोर झालेल्या मृत्यूने ज्यांना धक्का बसतो, वेदना होतात, अशा व्यक्तीही रांधलेले मांसाहारी पदार्थ सहजपणे खाऊ शकतात. याचे कारण म्हणजे ‘दृष्टीआडच्या सृष्टी’शी त्यांची तेवढी घट्ट नाळ जुळलेली नसते, तेथील सुखदु:खांनी त्यांना वेदना होत नाहीत. तशा त्या व्हाव्यात यासाठीच कदाचित ‘प्लरिबस’मधील व्यवस्था प्रत्येकाच्या संवेदनांची एकमेकांशी गाठ घालून देत आहे.

    आजच्या पर्यावरण-विध्वंसक विकासाच्या भांडवलशाही प्रारूपाचे महानगरी लाभधारकही याच वृत्तीने जगतात. यांच्या सुखासीनतेसाठी आवश्यक असणार्‍या उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल ज्या निसर्ग-विध्वंसातून निर्माण होतो, तो विध्वंस त्यांच्या दृष्टीआड झाल्याने त्यांच्या संवेदनशीलतेला बाट लागत नाही. भांडवलशाहीने कच्चा माल ते उपभोग ही लांबलचक साखळी निर्माण केली आहे, तिच्यामधील कोणत्याही टप्प्यावरचा लाभधारक त्यातून होणार्‍या त्या विध्वंसाला, नाशाला, नुकसानीला स्वत:ला जबाबदार मानत नाही.

    या साखळीच्या सर्वात वरच्या थरातील लाभधारक आपल्या बंदिस्त फ्लॅट, बंगला वा पेंट-हाऊस मध्ये राहातात नि बंद काचेच्या वाहनातून एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करतात. त्यायोगे त्या प्रारूपाचे बळी असलेल्या निम्नवर्गीय माणसांच्या अवस्थेकडे ‘मला काय त्याचे’ वृत्तीने पाहातात आणि महानगरापासून दूर कुठेतरी घडणार्‍या पर्यावरण विध्वंसाबाबत संपूर्णपणे संवेदनाशून्य होऊन जातात. याच धर्तीवर ‘Pluribus' मधील मानवी अनुषंगे, या जीवनदायी प्रथिनाचे सेवन करणारे जीव, एका चार भिंतीआड घडणार्‍या स्वजनाहारी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याकडे सोयीने दुर्लक्ष करू शकतात.

    इथे आणखी विशेष काही घडते आहे. सजीवसृष्टीमध्ये मानव हा एकच प्राणी असा आहे, जो केवळ ‘उदरभरण’ या एकाच हेतूने आहार घेत नाही. चवीसाठी, वैविध्य म्हणून, आवश्यक जीवनसत्वांची गरज भागवण्यासाठी, अशा विविध कारणांच्या आधारे आहार निश्चित करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. अन्नग्रहणाच्या पातळीवर पाहिले, तर मानवजन्य प्रथिने हा एकच आहार प्रामुख्याने घेणारा हा नवा जीव, पुन्हा एकवार प्राणिसृष्टीतील इतर प्राण्यांच्या पातळीवर उतरलेला आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » गरजा, मागणी आणि पुरवठा

    टीपा:

    (१). हे प्रत्यक्षात घडले, की ही ओशोंनी आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ रचलेली बोधकथा आहे, मला ठाऊक नाही. मी त्यांच्या एका - बहुधा ‘नास्तिक कौन? - व्याख्यानाच्या तुकड्यामध्ये ऐकली. Revolutionary आणि Rebel या दोनपैकी एका पुस्तकात आली असावी. कथानक जसे आठवले तसे देतो आहे. तपशीलात चूक असू शकते. [↑]

    (२). खरंतर इथे या बोधकथेबद्दल शंका निर्माण होते. सामान्यत: एक नियम म्हणून नैसर्गिकरित्या मृत झालेल्या प्राण्याचे मांस खाऊ नये असे आहारतज्ज्ञ सांगतात. याला सोपे कारण आहे. जो जीव नैसर्गिकरित्या मृत झाला आहे त्याला कुठल्या न कुठल्या स्वरूपाची बाधा (infection) असण्याची शक्यता बरीच असते. अशा प्रकारचे अन्न खाणे म्हणजे ती बाधा पोटात घेण्यासारखे असते. तसेच मृत्यू होऊन जसजसा काळ जातो, तसतसे त्याचे कुजण्याची नि विघटनाची प्रक्रिया वेग घेत असते. यातून ते खाणार्‍याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावते.[↑]

    (३). पण यात मागणी-पुरवठ्याचे गणितही ध्यानात घ्यावे लागते. त्याबद्दल उहापोह पुढच्या भागात करू. [↑]

    (४). पुन्हा संगणकीय भाषेत सांगायचे तर त्यांची ‘संचालन-प्रणाली’ (operating system) बदलली आहे, हार्ड-डिस्क अथवा तत्सम साठवणुकीच्या उपकरणांवरील माहिती बदललेली नाही. [↑]

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - ११ : अद्यतनीकरण (Update)

  • नव्या व्यवस्थेकडे « मागील भाग


    अद्यतनीकरण (Update)

    संगणक वा स्मार्ट फोन वापरणार्‍यांना ‘अद्यतनीकरण’ (Update) ही संकल्पना चांगलीच माहित झाली आहे. या दोन्ही उपकरणांवर Microsoft Office, WhatsApp, iTunes यांसारख्या विविध प्रणाली असतात. तुम्ही या दोन उपकरणांचा वापर करत असताना अनेकदा तुमचा संगणक वा फोन ‘अमक्या अ‍ॅपचा अपडेट उपलब्ध आहे’ किंवा ‘पुढचे व्हर्शन उपलब्ध आहे’ असा संदेश देत असतो. हे अद्यतनीकरण करण्यास तुम्ही संमती दिली की ती प्रक्रिया आपोआप– तुमच्या हस्तक्षेपाखेरीज पार पाडली जाते.

    पण हे ही जुने झाले. आता अनेक प्रणाली – विशेषत: browsers – हे तुम्हाला विचारता, तुमच्या माघारी, परस्पर अद्ययावत करून मोकळे होतात. उलट त्यांना तसे करता येऊ नते यासाठी बरेच सव्यापसव्य करावे लागते. बहुतेक वापरकर्ते (Users) हे आळशी असल्याने हे त्यांच्या पथ्यावर पडते. त्यातील धोक्याकडे दुर्लक्ष करुन ते सुखाने काम करत राहातात.

    https://www.eetimes.com/ येथून साभार.

    उपग्रह मनोरंजनाच्या (satellite television) जमान्यात तुम्हाला विविध दूरचित्रवाणी वाहिन्या पाहाण्यासाठी ‘सेट-टॉप बॉक्स’ नावाचे उपकरण वापरावे लागते. यावर सेवादात्या कंपनीने आपल्या नियंत्रणातील संचालन-प्रणाली (Operating system) बसवलेली असते. वापरकर्त्याकडून वेगळी संमती न घेता त्यांच्याकडून त्याचे अद्यतनीकरण परस्पर केले जात असते. अनेकदा एखादा कार्यक्रम चालू असतानाच ते जिच्या माध्यमातून पाहात आहोत त्या प्रणाली (system वा app) मध्ये हा बदल होऊ लागतो. त्यासाठी तुमचा कार्यक्रम सरळ थांबवून हे काम केले जाते.

    तुम्ही खासगी वा शासकीय कार्यालयात काम संगणकावर काम करत असाल, तर हा संगणक एका जाळ्याचा भाग असतो आणि या जाळ्याचे नियंत्रण ‘सर्व्हर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगणकाकडे असते. याच्या नियंत्रणात असलेल्या सर्व संगणकावर असे अद्यतनीकरण करण्याचे, वापरकर्त्यांच्या कामावर देखरेख करण्याचे काम हा सर्व्हर करत असतो.


    एक मेंदू चार हात

    पण ही सारी अर्वाचीन उदाहरणे झाली. यापूर्वीच्या भागांत जसे मानवी जीवनप्रवासाच्या उदयकाळाचा मागोवा घेतला, त्याच धर्तीवर संगणकाच्या उदयकाळाकडे जाऊ. या काळामध्ये संगणकांची उपलब्धता कमी होती नि किंमत सर्वसामान्यांच्या तर सोडाच, अनेक कार्यालये नि कंपन्यांच्याही आर्थिक कुवतीबाहेर होती. शिवाय तो एका वेळी एकच व्यक्ती वापरू शकत असे. मग आहे त्याच संगणकाचा वापर अधिकाधिक करता यावा यासाठी ही मर्यादा दूर करण्याचा प्रयत्न झाला. ज्याला CPU (Central Processing Unit) म्हणतात तो मुख्य विभाग अधिक महत्त्वाचा नि किंमतीचा फार मोठा हिस्सा त्याच्यासाठीच दिला जाई. मग हा भाग एकाहुन अधिक व्यक्ति वापरू शकल्या, तर खर्च विभागला जाईल या हेतूने, इतर तीन आवश्यक उपकरणे– मॉनिटर, की-बोर्ड नि माऊस– मिळून तयार झालेले एकाहुन अधिक Terminals या एकाच CPU संगणकाला जोडले गेले.

    ही टर्मिनल्स (Terminal) स्वतंत्रपणे काही कार्य पार पाडू शकत नसल्याने, काही वेळा यांना Dumb – म्हणजे बुद्धिमंद - Terminals असेही म्हटले जाई. एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये अथवा पोस्ट ऑफिससारख्या सरकारी कार्यालयांतून असते तशी ही टर्मिनल्स म्हणजे त्याच्या वापरकर्त्याला मूळ संगणकाशी संवाद साधण्यासाठी दिलेली केवळ एक खिडकी असे. या खिडकीचा वापर वेग-वेगळी व्यक्ती करु शकत असे. तिच्या मार्फत वापरकर्त्याने पुरवलेली वा मागितलेली माहिती, वा करायला सांगितलेली प्रक्रिया (process) हे सारे मुख्य संगणकाकडे पाठवत असे. तिथेच त्यावर आवश्यक ते काम होऊन, अंतिमोत्तर तेवढे या खिडकीकडे येत असे. मग वापरकर्ता ती माहिती या खिडकीमार्फत पाहू शके, आवश्यक वाटल्यास मुख्य संगणकाला जोडलेल्या प्रिंटरवरुन छापून घेऊ शकत असे.

    ही संकल्पना आज आभासी खासगी जाळे (Virtual Private Network - VPN) मध्ये रूपांतरित झाली आहे. याचा फायदा असा की परस्परांसोबत काम करणारे सारे वापरकर्ते आता एकाच ठिकाणी, एकाच भूभागावर असण्याची गरज उरलेली नाही. एखाद्या अमेरिकन कंपनीसोबत काम करणारे काही जण भारतात, काही इंडोनेशियामध्ये, काही चीनमध्ये तर काही एखाद्या स्कँडिनेवियन देशात बसून काम करु शकतात. हे सारे काम करताना प्रथम VPN मार्फत अमेरिकन कंपनीच्या सर्व्हरवर लॉग-इन करतात. आता त्या कंपनीच्या सर्व्हरच्या कक्षेतील प्रणाली नि डेटा यांचाच वापर त्यांना करता येतो. या कामाशी त्यांच्या स्वत:च्या संगणकाचा संपर्क होत नाही. जणू ते त्या अमेरिकन कंपनीच्या कार्यालयात बसूनच काम करत असतात.

    ही संकल्पना सजीवाला– विशेषेकरुन मानवाला लावून पाहाता येईल. एका मानवाची डोळे, नाक, कान, ही ग्रहणेंद्रिये; हात, पाय हे चल (movable) अवयव, त्यांवरील बोटे, ही सारी अनुषंगे वरकरणी स्वतंत्रपणे कार्यरत असली, तरी ती अंतिमत: मेंदू या एका नियंत्रकाच्या अधिपत्याखाली असतात. या सर्वांनी केलेल्या कार्याचे अहवाल या केंद्रीय नियंत्रकाकडे जातात, त्यानंतर त्या माहितीचे पृथक्करण, विश्लेषण करुन तो आवश्यक पुढील कृतीचा निर्णय घेतो नि ती करण्याची जबाबदारी असणार्‍या त्या-त्या अनुषंगाकडे आवश्यक तो संदेश पोहोचवतो.

    संगणकाचा वा तुमच्या उपग्रह मनोरंजन सेवादात्याचा सर्व्हर जसा एकाच क्षणी त्याला जोडलेल्या सर्व उपकरणांना अद्ययावत करतो, तसे मानवी मेंदूंबाबत करता आले, तर समूह-मन प्रस्थापित करणारी ही नवी प्रणाली त्यांच्या मेंदूत आरोपित करता येईल. यातून या मानवी मेंदूंचे अस्तित्व स्वतंत्र व्यक्ति म्हणून न राहाता एका व्यापक समूह-मनाचे अनुषंग म्हणून बदलता येईल. Pluribus या मालिकेमध्ये हीच कल्पना वापरून एका समूह-मनाची निर्मिती केली आहे.


    Pluribus : समूह-मनाचा उदय

    मालिकेतील घटनांची सुरुवात होते ते एका जगद्व्यापी अपघाताने. एका विशिष्ट क्षणी जगातील बहुतेक सारे मानवप्राणी अचानक स्तंभित (stand-off) होऊन जातात, टीव्हीवरील चालू चित्रमालिका रिमोटवरील ‘Pause’ बटन दाबून मध्येच थांबवावी तसे. काही वेळानंतर टीव्हीवर pause केलेला चित्रपट बटन दाबून पुन्हा सुरु करावा तसे मानवी जग पुन्हा सजीव होते.

    एखाद्या सर्व्हरने एकाच आदेशाने त्याला जोडलेल्या सर्व संगणकांवर/टर्मिनल्सवर असलेल्या संचालन-प्रणाली (operating system) बदलून टाकल्याप्रमाणे– या सार्‍यांच्या मेंदूंचे जणू ऊर्ध्वश्रेणीकरण (upgrade) झाले आहे. (जगभरात विखुरलेल्या तेरा जणांचा अपवाद वगळता) सर्वांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल झालेला आहे. मनुष्यप्राणी म्हणून त्यांच्या मनाची काम-क्रोधादी षड्रिपुयुक्त जी जडणघडण असते, ती पुसून टाकण्यात आली आहे. तिथे नवी मानसिक जडणघडण, नवी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे. आता त्यांचे चेहरे काहीसे भावनाहीन दिसू लागले आहेत. भयपटांतून दिसणार्‍या ‘पुनरुज्जीवित कलेवरांची’ (Zombie) आठवण होते आहे.

    या सार्‍या माणसांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले आहे. पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज हा आता एकच जीव म्हणून जगणार आहे. या सर्व माणसांचे माणसाचे भौतिक अवयव वेगळे असले, तरी स्मरणकोष (memory) नि जाणीवा (Senses) या केवळ समानच नव्हे तर सामायिक (common) आहेत. एकाला झालेले ज्ञान हे आपोआप इतरांच्या स्मरणकोषात पोहोचते आहे. एकाला लागलेली ठेच सार्‍यांच्या चेतासंस्थेमध्ये वेदनेची लहर उमटवून देते आहे. एकाच्या मनात उमटलेली सुखाची, आनंदाची लाट सर्वांच्याच चेहर्‍यावर समाधानाची भावना प्रतिबिंबित करते आहे. आता प्रत्येक व्यक्ती मानवी शरीराच्या हात, पाय, डोळे, इत्यादी अवयवांप्रमाणे या विशाल मानवजीवाचे केवळ एक अनुषंग झालेले आहे’(१).

    एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करुन ठेवायचा, तो असा की, ‘या व्यवस्थेमध्ये मानवी मेंदू वा संगणक-जाळ्याच्या सर्व्हरप्रमाणे एखादी केंद्रीय व्यवस्था नाही. इथे निर्णय समूह-मनानेच होतात,’ असे ही सारी अनुषंगे– ही पूर्वाश्रमीची माणसे– सांगताना दिसतात. (कथानकाच्या प्रवाहामध्ये इथे मला प्रथम ठेच लागली. पण याबद्दल इतर काही मुद्द्यांसह पुढे बोलेन.)

    हा जैविक भाग वगळला, तर उरलेल्या व्यवस्थेचे मुख्य सूत्र हे साम्यवादी व्यवस्थेचे सूत्रच आहे. संपूर्ण मानवी समाज हा एकच असल्याने देशांची निर्मिती करणार्‍या सीमा नाहीत. इथे वैय्यक्तिक मालकीला थारा नाही. इथे कुठलेही चलन नाही नि राज्यव्यवस्थाही नाही. अर्थ नि अधिपत्य ही दोनही मुख्य कारणे निकालात निघालेली असल्याने संघर्ष, लढाया, युद्धे नाहीत. भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहिले असता पतंजलीसूत्रांतील अहिंसा, सत्य, अस्तेय या यमनियमांचे पालन करणारा हा समाज आहे.

    ब्रह्मचर्य नि अपरिग्रह हे इतर दोनही काही अंशी आचरणात आणत आहेत. वैयक्तिक संग्रह नसला, तरी सामूहिक गरजेच्या गोष्टींचा संग्रह– तर काही प्रमाणात उत्पादनही केले जाते आहे. ब्रह्मचर्याबाबत मात्र काहीशी संदिग्ध स्थिती आहे. साम्यवादी व्यवस्था लग्नसंस्थेलाही राज्यव्यवस्थेप्रमाणे शोषणाची पोषक मानून तिलाही मोडीत काढण्याचा प्रस्ताव देते. प्लरिबसच्या व्यवस्थेमध्ये याबाबत थेट उल्लेख नसला, तरी रात्रीच्या समूहवसतीचा प्रयोग पाहाता ती ही मोडीत निघाली असावी असे म्हणता येते.

    पण ही व्यवस्था साम्यवादी व्यवस्थेप्रमाणे केवळ मनुष्यप्राण्यांतील बंधुभावापाशी थांबत नाही. ती निसर्गाशी बंधुभावही प्रस्थापित करते आहे. मनुष्येतर जीवमात्रांशीही आपलेपणाचे सौहार्दमय सहजीवन असायला हवे असा तिचा आग्रह आहे. त्यामुळे आता कोणत्याही सजीवाला हानी न पोहोचवण्याचे तिचे धोरण आहे. त्याअर्थी ती बुद्धाच्या करुणामय दृष्टिकोनाचा अंगीकार करते आहे. परंतु प्राणी, पक्षी, वनस्पती वा कीटक हे सजीव समूह-मनाच्या या जाळ्यामध्ये समाविष्ट नाहीत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे नि नव्या व्यवस्थेचे अभयही. त्यामुळे समूह-मनाच्या निर्मितीनंतर सर्व प्राणिसंग्रहालये, कुक्कुटपालन केंद्रे, वराहपालन केंद्र, मांस व दुधासाठी चालवली जाणारी गोपालन केंद्र बंद करुन त्या प्राण्यांना मुक्त करण्यात येते. अगदी वनस्पतींनाही इजा पोहोचवणे निषिद्ध ठरले आहे.

    पण ‘जीवो जीवस्य जीवनम्‌’ या निसर्गरचनेमध्ये एका सजीवाने दुसर्‍याला हानी करायची नाही म्हटले, तर खायचे काय? जगण्याला आवश्यक ऊर्जा कुठून मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. आणि हे झाले मूलभूत प्रश्न. जिवंत राहाणे नि जगणे या दोन अवस्थांतील फरक दाखवणार्‍या मनुष्यप्राण्याला इतरही बर्‍याच गरजा असतात, त्या कशा भागवायच्या? या प्रश्नांना नवी व्यवस्था सामोरे जाते आहे.

    - ( क्रमश:) -

    पुढील भाग » जठराग्नी शमवाया भूतां

    टीपा:

    (१). प्लरिबसच्या व्यवस्थेकडे या दृष्टिकोनातून पाहाताना मला सुबोध जावडेकर यांच्या ‘पदार्पण’ या विज्ञानकथेची (कथासंग्रह: ‘वामनाचे चौथे पाऊल’) आठवण झाली. त्याबद्दल या मालिकेच्या अखेरीस एका परिशिष्टामध्ये विस्ताराने लिहितो आहे. [↑]

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १० : नव्या व्यवस्थेकडे

  • सर्वे सुखिन: सन्तु « मागील भाग

    शिकारजीवी, शेतीजीवी, आणि व्यापारजीवी असे मानवी समाजव्यवस्थांचे प्रमुख टप्पे दिसतात. यातील पहिले दोन अनायासे सहजीवी होते. शिकारजीवी, शेतीजीवी समाजांमध्ये प्रामुख्याने टोळ्यांचा परस्पर-संघर्ष वा स्पर्धा होती, तर व्यापारजीवी समाजाने त्याला आपल्यामध्ये आतच सामावून घेतले. या बदलाने सहभावनेला दुर्बल केले. त्यातून समाज शबल होत गेला. साम्यवादी व्यवस्था तर खर्‍या अर्थाने ‘सर्वे सुखिन: सन्तु’ स्वरूपाची म्हणता येईल, समूह-हिताच्या हेतूने पाहिले तर तिच्यामध्ये न्यून दिसत नाही. तरीही व्यावहारिक पातळीवर तिचा पहिला– श्रमजीवींच्या एकाधिकारशाहीचा– टप्पाही मूळ हेतू साध्य करण्यात यशस्वी झालेला दिसत नाही.

    शेती नि पशुपालन या दोहोंमार्फत आपले अन्न मिळवू लागलेला मनुष्यप्राण्याला – अगदी मोजक्या वन्यजीवी जमाती सोडल्या तर – शिकारजीवी राहण्याची गरज उरलेली नाही. मानवी इतिहासाच्या प्राचीन अध्यायामध्ये प्रबळ असलेले संग्रह (gather), अपहार (steal) आणि शिकार (hunt) हे तीन जीवनाधार आज अदखलपात्र वा संदर्भानुसार गुन्हेही ठरत आहेत. उत्पादन आणि विनिमयप्रधान समाजामध्ये शेती आणि पशुपालन यांचे महत्त्वदेखील ‘अनेकांपैकी एक’ उत्पादन-व्यवस्था इतकेच राहिले आहे. आता सर्व प्रकारच्या सामाजिक नि राजकीय व्यवस्था यांना छेदून जाणारी व्यापारजीवी वृत्ती सर्वत्र प्रबळ आहे. भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेली राष्ट्रे असोत, कम्युनिस्ट एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत की धर्माधिष्ठित एकाधिकारशाही राबवणारी राष्ट्रे असोत, या सार्‍यांनीच उद्योग नि विनिमयप्रधान व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तिच्याशी निगडित गुणदोषांचा आढळ त्या सर्वच व्यवस्थांमध्ये दिसतो आहे.


    असमाधानी अस्थिर अस्तित्व

    या सर्व देशांतून, समाजांतून प्रगतीच्या विविध वाटा फुटलेल्या दिसतात, आणि तरीही यातील कोणतीही एक व्यवस्था समाधानी नि स्थिर असा समाज निर्माण करु शकलेली नाही. युरपमधील अति उत्तरेकडील नॉर्डिक राष्ट्रे(१) वगळता सर्वच समाज हे अंतर्गत संघर्षांनी आणि विषमतेच्या वाळवीने पोखरलेले आहेत. याला काही सोपी, तर काही अतिशय गुंतागुंतीची कारणे आहेत. बहुतेक व्यवस्थांची पुस्तकी मांडणी कितीही आकर्षक असली, तरी त्याची अंमलबजावणी ही भ्रष्ट स्वरूपातच होताना दिसते. याला षड्रिपुयुक्त मानवी मनाची जडणघडण, वंश-धर्म-भाषा आदी पर्यायी व्यवस्थांचा जाणारा छेद नि होणारा संघर्ष वगैरे बरीच कारणे असतात.

    ‘माणसाने समाधानी असणं’ ही मनाची प्रवृत्ती आहे. एखादा एक वेळ पोटभर अन्न मिळाले तरी आनंदी राहील, तर उद्योजकांसारखी नि राजकारण्यांसारखी मंडळी कोट्यवधींचा संचय पचवूनही ‘अजून द्या, अजून द्या’ म्हणत राहतील. वास्तविक पोटात जाणार्‍या अन्नाचे प्रमाण पोटभर असणे एवढी खरी गरज आहे. उरलेला सारा संचय हा बाह्य वस्तूंचा आणि म्हणून मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाला फारसा हातभार न लावणारा असतो. सर्व नमस्कार ‘केशवं प्रतिगच्छती’ असं म्हटलं जातं, तसं चलनाच्या उदयानंतर माणसाची सारी इच्छाशक्ती, सारी ईर्षा अधिकाधिक चलन मिळवण्याकडे नि साठवण्याकडे केंद्रित झाली आहे. आणि हा वरकड संचयही पुन्हा आणखी चलन मिळवण्याचे मार्ग चोखाळण्यासाठी अथवा लालसेने निर्माण केलेल्या काल्पनिक सुखांच्या लहरी निर्माण करण्यासाठी वापरला जातो आहे.

    त्यामुळे होते असे की माणसाला समाधानी असणे पुरेसे वाटले नाही, की विषमतेला खतपाणी मिळते आणि विषमतेमधून नव्या असमाधानाला. व्यवस्थेचा, नेत्याचा चेहरा कुठलाही असला, कुठलेही उद्दिष्ट (objective) त्यांनी समोर ठेवलेले असले, तरी समाजातील माणसांमध्ये असमाधान, लालसा असली की विषमता रुजतेच. तेव्हा मुद्दा समाजातील व्यक्तींच्या दृष्टिकोनाचा असतो. म्हणून महात्मा गांधी माणसांतील नैतिकतेला आवाहन करतात नि त्यावर आधारित भारतीय समाजाची कल्पना मांडतात.


    बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌

    या मुद्द्याचे आणखी एक अनुषंग आहे ते बंधुभावाचे. वर ‘अर्थकारणाचे सहजीवन’ या भागामध्ये समाजाअंतर्गत, संघटनेअंतर्गत अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक बाबांच्या अनुयायांचे एक उपसमाज, अर्थकारणाचा पाया म्हणून उभे राहाण्याबद्दलदेखील लिहिले आहे. बुवा-बाबांचे, राजकीय नेत्यांचे वा अर्थकारणाने बांधल्या गेलेल्या उपरिनिर्दिष्ट व्यापक संघटनेचे अनुयायी केवळ अर्थकारणाच्या बाबतच नव्हे, तर आपापल्या बाबांनी, नेत्यांनी, अध्वर्यूंनी व्यक्त केलेल्या मतांच्या बाबतही एकमताने ‘बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌’ वृत्तीने जगतात. ते बाबा अथवा नेते म्हणाले, ‘अमुक पदार्थ खाण्याने माणूस शूर होतो’ की त्या विधानाचा प्रसार करण्याचा धडाका अनुयायी लावतात. याला सिद्ध करण्याचे आव्हान देणार्‍यावर तुटून पडतात.

    पण समजा काही काळानंतर एखाद्या हे बाबाच म्हणाले की, ‘तो पदार्थ खाल्ल्याने माणूस दुबळा होतो’ की अनुयायी तसे म्हणू लागतात. मग ‘आधी असे सांगितलेत ते का ?’ असा जाब ते विचारत नाहीत. कुणी बाहेरच्याने विचारलाच तर उलट,‘आमचे बाबा असे म्हटलेच नव्हते, कुण्या हितशत्रूंनी त्यांच्या नावे हा खोटा संदेश कसा पसरवला होता’ यावर ते आवेशाने बोलू लागतात. त्या-त्या श्रेष्ठींच्या संदर्भात ते एक गट, एक विचार या सूत्राने वागत असतात. त्यात मतभिन्नतेला थारा नसतो. आयुष्यात इतर बाबतीत भानावर असणारेही आपापल्या या स्वयंघोषित श्रेष्ठींसंदर्भात संपूर्ण अविवेकी श्रद्धा ठेवून असतात.

    म्हणजे (आर्थिक) हितसंबंधांमुळे वा सहप्रवासी असल्याच्या भावनेतून या सामूहिक दृष्टिकोनाचा– एका प्रकारच्या समूह-मनाचा उगम होताना दिसतो. त्या पंथाचा, पक्षाचा वा संघटनेचा डोलारा या परस्पर-संबंधांवर उभारलेला असतो. या आधी आपण कर्मकांड वा टोळीच्या ओळखीबाबत जसे पाहिले, तसेच इथेही कार्यकारणभाव उलट करून पाहिले तर? आर्थिक असोत वा भावनिक, परस्परसंबंध निर्माण करण्याचा टप्पा वगळून व्यापक मानवी समाजामध्ये सामूहिक दृष्टिकोनाची थेट रुजवणूक करता आली तर…?


    समूह-मनाची गरज

    बुवाबाबांचे पंथ, वर उल्लेख केलेली सांस्कृतिक संघटना यांसाठी अध्यात्म, धर्म, संस्कृती या आधीच प्रस्थापित सामाजिक बंधांची शिडी करुन हे साध्य करताना दिसतात. पण मनाचे हे दुय्यम (secondary) उद्भव पकडण्याऐवजी थेट ‘या मनाचे त्या मनाशी’ बंध निर्माण केले, तर त्यातून तयार झालेल्या समाजाला आर्थिक, सामाजिक, कर्मकांड, नीतिनियम यांच्या शिवायही एकत्र बांधून घालता येईल, त्यांचा एक विशाल सहजीवी समुदाय निर्माण करता येईल. एका ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थेचे बीज रुजवता येईल.

    संकल्पचित्र: https://jonathanwarden.com/the-hive-mindयेथून साभार.

    अशा व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तिच्या मनामध्ये इतरांच्या भाव-भावनांची स्पंदने उमटतील. त्याने होईल असे की बेगुमानपणे चलन-संकलन करत मोकाट धावणार्‍याच्या मनामध्ये त्याने तुडवलेल्या, सामाजिक वा आर्थिक स्तरावर त्याच्याहून खाली असणार्‍याच्या आयुष्यातील गरजांचे, वेदनांचे प्रतिध्वनी उमटतील. त्याचवेळी या दोघांच्याही मनात या सार्‍यांच्याच गरजा नि सुखलोलुपतेचे चोचले पुरवण्यासाठी विध्वंस झालेल्या निसर्गाचे आक्रंदनही प्रतिबिंबित होईल. नागरी, सुखलोलुप आयुष्याने नाहीशी केलेली संवेदनेची पुरी साखळी जोडली जाऊन विकास अथवा प्रगतीचे प्रत्येक पाऊल काय काय किंमत वसूल करते याची जाणीव प्रत्येक मनात उमटत राहील.

    यातून हव्यासाला मोकाट न सोडता, निसर्गाचा तसंच श्रम नि ऊर्जेचा अपव्यय टाळून प्रगतीच्या वाटा धुंडाळण्याचा डोळसपणा त्यांच्या रुजेल. फक्त त्यासाठी या समूहजीवी व्यवस्थेला असलेली बाह्य प्रतिस्पर्ध्यांची गरज मोडून काढून, शत्रूलक्ष्यी विचारांना आणि मांडणीला तिलांजली देण्याची गरज आहे. ‘प्लरिबस’ या मालिकेमध्ये रुजवली गेलेली समाजव्यवस्था या समूह-मनाच्या संकल्पनेच्या आधारे उभी केली आहे.

    एकुणात समूह-मालकी, समूह-वसती, सहकार या संकल्पना समाजाला पुरेशा एकसंघ करीत नाहीत असे सिद्ध होत आले आहे. समाजातील व्यक्तिंच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्वच लयाला गेल्याखेरीज एकसंघता साधणे शक्य नाही(२) हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर अशी व्यवस्था ही केवळ भौतिक व्यवस्था असणार नाही, ती समूहाच्या मानसिकतेलाच एकत्र आणणारी असावी लागते. मग त्याचा परिणाम म्हणून भौतिक जगण्याचे धागेही एकत्र गुंफले जाऊ लागतात. या निष्कर्ष वा निकषाच्या आधारे पुढचा टप्पा म्हणून पातळीवर ‘समूह-मना’ची (Hive Mind) ही संकल्पना उभी आहे.


    समूह-मनाची रुजवणूक

    एक प्रस्ताव म्हणून समाज-व्यवस्थेचे नवे प्रारूप मांडणे सोपे आहे. पण त्याची अंमलबजावणी (roll out) करण्यामध्ये व्यावहारिक अडचणी येत असतात. कारण त्यामध्ये अशी ‘अंमलबजावणी करण्यासाठी साधने कुठली असावीत, रुजवण्याची पद्धत काय असावी?’ याचाही जास्तीचा विचार करावा लागतो.

    ही अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम विचारांची रूजवणूक करून त्याआधारे पुढील आराखडा रुजवत जावा? की निव्वळ वैचारिक प्रेरणेवर भर देऊन पुढील बदल सेंद्रीय पद्धतीने होतील अशी आशा करावी? की साम्यवादी प्रारूप म्हणते तसे आधी सत्ता ताब्यात घेऊन त्या सत्तेमार्फत राजकीय व्यवस्था म्हणून लादली जावी? एखाद्या भूभागातील समाजात ही रुजवणूक व्हावी, की एकाच वेळी पुर्‍या मानवी समाजात व्हावी? व्यापक पातळीवर राबवण्यासाठी सर्वत्र एकदम रुजवणूक व्हावी, की एका छोट्या तुकड्यावर आधी रुजवून त्याच्या यशापयशाच्या आधारे, चुका सुधारून नि तेथील यशाची द्वाही फिरवत पुढील टप्प्यांकडे जावे?

    मानवी उत्क्रांती ही हजारो वर्षे चालू असलेली प्रक्रिया आहे. पण ती काही कुणी हेतुत: चालना दिलेली प्रक्रिया नव्हे, तसंच असुरक्षित, भयगंडाने ग्रासलेली माणसे मानतात त्या कुण्या एका सर्वशक्तिमान नियंत्रक व्यवस्थेच्या संपूर्ण कह्यात असलेली यंत्रणाही. तिथे बहुविध प्रेरणा नि कृती आहेत, त्यांचा एकत्रित परिणाम दाखवणारे प्रारूप असे त्याचे ढोबळ स्वरूप आहे. ती काही एका निश्चित दिशेने केली जाणारी वाटचाल नव्हे की नियंत्रित करण्याजोगी प्रक्रियाही. त्यामुळे प्रवास चालू असलेली गाडी थांबवून, वळवून ‘अप’ ची पुन्हा ‘डाऊन’ करता यावी इतके ते सोपे नाही. आजवरच्या मानवी वाटचालीमधून असंख्य अपरिवर्तनीय असे बदल झाले आहेत, त्यांना पोटात घेऊनच नवी व्यवस्था उभी राहायला हवी.

    https://t3.ftcdn.net/ येथून साभार.

    त्यामुळे ही नवी ‘समूह-मनाची’ व्यवस्था समाजामध्ये आरोपितच (install) करावी लागेल, उत्क्रांतीप्रमाणे अकर्मक पद्धतीने रुजत जाण्याची वाट पाहाणे शक्य नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्य व्यवस्थेचे लाभधारक असलेल्या, बदलांच्या विरोधात उभे असलेल्यांची संख्या– संख्येपेक्षाही सत्ता, तिला उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार, हे ही ओघाने आलेच. त्यांना प्रत्याघातासाठी पुरेशी संधी वा उसंत न देता, लहानशा कालखंडात एखाद्या शस्त्रक्रियेसारखी ही व्यवस्था वेगाने प्रस्थापित व्हायला हवी.

    अल्पावधीत घडवून आणलेल्या अशा बदलांना मानवी इतिहासात ‘क्रांती’ असे म्हटले जाते. परंतु हा शब्द प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेमधील बदलाच्या संदर्भात वापरला जातो. आपण या क्षणी बोलत आहोत ती मानवी मनाची जडणघडण बदलणार्‍या क्रांतीबाबत. मानवी मनाच्या संदर्भात ही क्रांती कशी साध्य करावी याचा विचार करताना, मला संगणक-क्षेत्रातील एक रूपक वापरण्याचा मोह होतो आहे. माणसाच्या आदिम टोळीजीवनाकडून एक वळसा (detour) घेऊन मी थेट संगणकाच्या जगात शिरणार आहे.

    - (क्रमश:) -

    पुढील भाग » अद्यतनीकरण (Update)

    टीपा:

    (१). यामध्ये डेन्मार्क, नॉर्वे नि स्वीडन ही स्कँडिनेविअन राष्ट्रे आणि फिनलंड, आईसलंड या दोन राष्ट्रांचा समावेश होतो. मध्य युरपमधील स्वित्झर्लंड हे राष्ट्रदेखील बहुतेक वर्षी समाधानी राष्ट्रांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवते आहे. [↑]

    (२). मुळात अशी व्यक्ति-ओळख पुसून टाकणारी एकसंघता आणावी का, ती व्यवस्था खरंच कल्याणकारी असेल का? प्रत्येकाच्या विचारक्षमतेचे स्वतंत्र अस्तित्व लयाला जाण्यामध्ये गुलामगिरीची व्यवस्था निर्माण होण्याचा मोठाच धोका निर्माण होतो. मोजक्यांच्या हाती सत्ता नि उरलेला स्वतंत्र विचारक्षमता नसलेला त्यांच्या आदेशांवर चालणारा व्यापक समाज अशी व्यवस्था निर्माण होऊ शकते. ही व्यवस्था सर्वकल्याणकारी होऊ शकेल का? या प्रश्नांचा विचारही करायला हवा. गांधींजीनी मांडलेली श्रेष्ठींच्या विश्वस्तपणाची कल्पना अथवा सामाजिक हिताच्या प्रेरणेने भारलेल्या मूठभरांच्या अधिपत्याखालील साम्यवादी व्यवस्था या काहीशा याच वळणाने जाताना दिसतात. धर्मसंस्थाही व्यवस्था म्हणवून घेत नसली तरी अशीच बहुसंख्येच्या हिताचा विचार करण्याची जबाबदारी नि अधिकार मूठभरांना प्रदान करते. या तीनही प्रकारांत नि लोकशाहीसारख्या अन्य व्यवस्थांमध्येही अखेरीस हे तळे राखणारेच फक्त पाणी चाखताना दिसतात.[↑]