-
गरजा, मागणी आणि पुरवठा « मागील भाग
विकासाच्या नावाखाली ज्या बेगुमानपणे निसर्गाचा विध्वंस होतो आहे ते पाहाता, अशी इच्छा कधी कधी तीव्र होते की,
“एक प्रचंड प्रलय यावा नि सारी मानवजात नष्ट व्हावी; म्हणजे इतर जीव सुखाने जगू शकतील.”
मानवी वंशविच्छेदपण मानवी बुद्धीच्या मर्यादेत अशा सर्वंकष विध्वंसाची सोय ही केवळ बाह्य हल्ल्याद्वारेच - शस्त्राघात, जैविक, रासायनिक वा आण्विक - केली जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे असा सर्वंकष संघर्ष नि व्यापक विध्वंस व्हायचा, तर किमान दोन समबल असे प्रतिस्पर्धी समोरासमोर यायला हवेत. सारासार विवेकाला उध्वस्त करुन जाईल इतपत सत्तेची, अस्मितेची, असुरक्षिततेची वा उन्मादाची भावना त्यांच्यात ओसंडून वाहायला हवी. ‘समोरच्या टोळीचे संपूर्ण निर्दालन केल्याखेरीज आपण नि आपली टोळी जगूच शकणार नाही’ इतका अतिरेकी विचार इतर सार्या पर्यायांची साफ धूळदाण करुन शिल्लक राहायला हवा. खरंतर हा विचार कमी-अधिक प्रमाणात सर्वच समाजरूपी मानवी टोळ्यांमध्ये रुजलेला आहे, त्याला भरपूर खतपाणी घालून प्रमाण तेवढे वाढवावे लागेल.
वर उल्लेख केलेल्यांपैकी हत्यार कोणतेही वापरले असो, त्या विध्वंसाची झळ इतर जीवसृष्टीलाही बसणार आहे. इतकेच नव्हे तर अशा विध्वंसानंतरही मानवी कलेवरांचा जो खच पृथ्वी व्यापून राहील, त्याद्वारे त्यातील प्रदूषण इतर मांसभक्षी जिवांमध्येही संक्रमित होणार हे ओघाने आले. म्हणजे मानवी संहार हा प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष अशा दोनही प्रकाराने उरलेल्या जीवसृष्टीला बाधक ठरणार आहे. हे टाळायचे असेल तर दोन उद्दिष्टे साध्य व्हायला हवीत. पहिले म्हणजे केवळ मानवी प्रजातीचाच घात करेल असे नवे संहारक हत्यार शोधायला हवे. आणि दुसरे– त्या संहारातून निर्माण झालेल्या मानवी कलेवरांनाही इतर जिवांपासून काळजीपूर्वक दूर ठेवायला हवे. Pluribus मधील व्यवस्थेतून ही दोनही उद्दिष्टे साध्य करेल असा एक पर्याय उदयाला येतो आहे.
‘सर्वे सुखिन:’ ची दास्य-शृंखलाHDP चा वापर माणसांना जगवण्यासाठी करणे ही एक प्रकारे स्वयंपूर्णता असली, तरी ती घटत्या उपलब्धतेची आहे. एकाच आघाताने ही समूह-मनाची व्यवस्था प्रस्थापित झाली तेव्हा कामी आलेल्या नव्वद कोटी जिवांनी सुरुवातीचे काही महिने उरलेल्यांची अन्नाची गरज भागवली. पण हा ‘पुरवठा’ उत्तरोत्तर कमी होत जाणार आहे आणि जित्यांना इतरांच्या/काहींच्या मरणाची कामना करण्याची वेळ येणार आहे. आणि हे त्यांच्या ‘सर्वे सुखिन:’ या जीवनसूत्राला छेद देऊन जाणारे असेल.
अन्नपुरवठा कमी झाला की उपासमारीचे संकटही उभे राहू शकते. (त्यातून ‘पुरवठा’ वाढू शकतो, पण लोकसंख्या– आणि म्हणून कार्यक्षम हातही वेगाने कमी होतात हे ही विसरता येत नाही.) मग कदाचित आहाराची गरज भागवण्यासाठी काही माणसे या समूह-मनाच्या व्यवस्थेविरोधात बंड करुन, मानवेतर जिवांना अभय देण्याचा नियम मोडून माघार घेण्याचा मार्ग निवडू शकतात. पण स्वतंत्र विचारशक्ती (free will) नसलेल्या, सहजीवनाचे सूत्र काळ्या दगडावरच्या रेघेसारखे मनावर कोरलेल्या जिवांना ते शक्य होईल का, शंकाच आहे.
जगण्यातले संघर्षHDP हे केवळ प्रथिन आहे. माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी केवळ तेवढे पुरेसे नसते. त्या उत्पादनाच्या नावात ‘प्रथिन’ असूनही त्यांत इतर जीवनसत्त्वे असली तर गोष्ट वेगळी. परंतु मानवी शरीरातील यांच्या प्रमाणांचा विचार करता ही शक्यता कमीच आहे. प्रथिने वगळता इतर आवश्यक घटक - जरी HDP मृत जीवापासूनच निर्माण होत असले तरी- प्रत्येक पुढच्या टप्प्यात घटत जाणारे आहेत. एखाद-दोन पिढ्यांतच त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटणार आहे. ती तूट भरून काढण्यास अन्य सजीव पर्याय वापरण्याचे स्वातंत्र्य नसल्याने पुढील पिढ्या बव्हंशी असंतुलित, घटत्या रोगप्रतिकारशक्तीच्या असणार आहेत.
दुसरीकडे समूह-मनाच्या निर्मितीनंतर माणसांनी जरी संघर्ष थांबवला असला, तरी इतर जिवांमध्ये असे काहीही घडलेले नाही. त्यामुळे साथीचे आजार, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींसोबतच मोकाट सोडलेल्या प्राण्यांमुळे प्राणिजन्य आजारांचे प्रमाण वाढणार आहे. इतकेच नव्हे तर प्राण्यांशी थेट संघर्ष उद्भवले तर समोरच्या प्राण्याचा प्रतिकार करावा की नाही, केलाच तर किती मर्यादेपर्यंत करावा याबाबत या नव्या ‘सर्वजीव मंगलम्’ व्यवस्थेला नियम घालून द्यावे लागतील.
https://www.firstpost.com/ आणि https://www.etsy.com/ येथून साभार.याखेरीज आणखी एका नव्या समस्येचा सामना या मानवी जिवांना करावाच लागणार आहे. उपचारासाठी आवश्यक औषधांतील बहुतेक रसायने ही सजीवांकडूनच येत असल्याने, ‘सजीवांना हानी न पोहोचवण्या’च्या नियमांमुळे त्यांची निर्मिती ठप्प होणार आहे. त्याचबरोबर औषधनिर्मिती प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा हा प्राण्यांवरील चाचण्यांचा असल्याने पुढील संशोधन हा विषय तर बादच ठरावा. समजा या प्राथमिक चाचण्या थेट मानवांवर करायचे म्हटले, तर मानवही सजीव असल्याने एकीकडे नियमभंग तर होतोच, पण तो अपवाद केला तर या सुरुवातीच्या टप्प्यांत अधिक असलेल्या अपयशाच्या संभाव्यतेला (greater risk) मानव जमातीला थेट सामोरे जावे लागेल.
घटते जीवनमान, त्यामुळे लोकसंख्या घटण्याचा वाढलेला वेग यांना प्रतिरोध करायचा तर पुनरुत्पादनाचा वेग त्या प्रमाणात वाढायला हवा.
कुटुंबव्यवस्थापरंतु कुटुंबव्यवस्था(बहुधा) मोडीत निघाल्याने, वैय्यक्तिक मालकीचा लोप झाल्याने (आणि काही आशियाई समाजांमध्ये असते ते ‘म्हातारपणची काठी’ हे उद्दिष्टही न उरल्याने) मूल जन्माला घालण्यासाठी आवश्यक प्रेरणाच उरणार नाही.
पितृत्व निश्चित नसले की लैंगिक संबंध ही नराच्या दृष्टीने केवळ प्रासंगिक सुखोपभोगाची क्रिया होऊन राहाते, एकाहुन अधिक पर्याय उपलब्ध असलेली. त्यातून त्याची बांधिलकी निर्माण होत नाही. पर्यायाने अपत्य-संगोपन ही बव्हंशी आईची– म्हणजे स्त्रीची जबाबदारी राहाते. ‘सर्वांशी सारखीच बांधिलकी’ या मानसिक जडणघडणीमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले, तरी ते प्रस्थापित करणार्या दोन व्यक्तींमध्ये त्या नात्यातील विशेष भावनिक आपुलकी कितपत शिल्लक राहील शंकाच आहे.एकुणात पुनरुत्पादन प्रेरणा न राहाता परिणाम म्हणूनच शिल्लक राहाते.
https://yourteenmag.com/ येथून साभार.लग्नसंस्था स्थिर होण्यापूर्वी आदिम टोळीजीवनाच्या काळात मूल हे पुर्या टोळीचे असे. तिच्या भविष्याचा आधार असे. अन्य टोळ्या, शिकारी प्राणी यांच्याशी होणार्या संघर्षामध्ये ते मूल एक भावी लढवय्या अथवा त्याच्या उत्पादनासाठी लागणारी भूमी असे. संख्याबळ या अस्तित्वाच्या लढाईतील सर्वात महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे त्यांचे संगोपन ही पुर्या टोळीची गरजही होती. ही एक प्रकारे टोळीच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असे. पण ‘प्लरिबस’मधील समाजामध्ये संघर्षही नाही नि सर्वांच्या गरजा सारख्याच भागवल्या जात असल्याने प्रगतीला निश्चित साध्यही नाही. त्यामुळे मूल हे Asset वा Investment म्हणूनही पाहाता येत नाही. त्यामुळे ‘मूल सार्या समाजाचे’ हा नियम म्हणून कितीही रुजवला, तरी त्यामागची भावना सर्वांची सारखी राहील असे नाही. अनेकांच्या दृष्टीने त्याचे संगोपन ही बांधिलकी न राहाता, केवळ जबाबदारी म्हणून पाहिले जाणार आहे.
या सार्याचा एकत्रित विचार करता या समाजातील माणसांचे जीवनमान आणि लोकसंख्या आजच्या मानवाच्या तुलनेत घटत जाणार आहे असा निष्कर्ष निघतो. परिणामी मानवी लोकसंख्या ही हळूहळू घटत जाणार आहे. म्हणजे ही व्यवस्था प्रगतीच्या नव्हे, तर अंत:स्फोटाच्या (impload) दिशेने वाटचाल करणारी आहे हे स्पष्ट होत जाते.
माणसांनी समाजातील मृत जिवांची HDP च्या स्वरूपात विल्हेवाट लावण्याने, त्यांची कलेवरे अन्य प्राण्यांपासून दूर राहात आहेत, इतर जीवसृष्टीशी संपर्क न येता विरून जात आहेत. म्हणजे ही व्यवस्था अन्य जीवसृष्टीला मानवी हस्तक्षेपापासून नि संसर्गापासून वेगळे करुन स्वतंत्रपणे विकसित होण्यास मोकळी करत आहे. एकीकडे ही व्यवस्था मानवी प्रजातीचा वंशखंड (extinction) करणारी व्यवस्था असेल. दुसरीकडे ही एक प्रजाती विरुन जात असताना, उरलेल्या जीवसृष्टीने तिच्या अस्तित्वाला वगळून नव्या उत्क्रांतीची सुरुवातही केलेली असेल... ती रुजवणार्यांनाही(!) हेच अभिप्रेत असावे का?
https://blog.naver.com/stoppoint/223503646610 येथून साभार.- (क्रमश:) -
पुढील भाग » उपसंहार
शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा