मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - २ : माझी वाटचाल

मागील भाग << माझी ब्लॉगयात्रा - १ : माध्यमे
---

मराठी समाजमाध्यमे

Manogat

माझ्याबाबत बोलायचे तर माझी वाटचाल ही मराठी समाजमाध्यमांवरून सुरू झाली. अगदी थोड्या काळासाठी मायबोली (maayboli.com) व मनोगत (manogat.com), मग बराच काळ मिसळपाव (misalpav.com) आणि अखेरीस मीमराठी (mimarathi.net ... हे आता अस्तंगत झाले) आणि अगदी अधूनमधून उपक्रम (mr.upakram.org... हे आता वाचनमात्र करण्यात आले आहे.) अशा मराठी संस्थळांवर मुक्काम झाला. यांची मांडणी प्रासंगिक, अप्रासंगिक आणि मूलभूत मुद्द्यांवरच्या दीर्घ लेखनाला सोयीची अशी आहे. तुम्हाला जसा वापर करायचा तसा करावा. यापैकी 'मनोगत’चे वैशिष्ट्य हे की त्यांनी प्रथमच शुद्धलेखन-चिकित्सा प्रणाली उपलब्ध करुन दिली. गमभन’ नावाचाच सोपा एडिटर आणि ही सुविधा यांमुळे लेखनाच्या वाचनीयतेमध्ये कमालीची सुधारणा झाली. त्यामुळे लेखनास सरसावलेल्या मंडळींनी मराठीचा झेंडाही उंच करत काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द जन्माला घातले. विकांत हा आठवड्याच्या अखेरीसाठी वापरला जाणारा इंग्रजी-मराठी संकरित शब्द असो की पर्सनल मेसेजसाठी प्रचलित केलेला 'व्य.नि.' अर्थात व्यक्तिगत निरोप हा शब्द असेल, या संस्थळांनी मराठी भाषेमध्ये स्वत:ची अशी भर घातली आहे.

यातील बहुतेक संस्थळांना ड्रुपल या माध्यमदात्याच्या मूळ मांडणीचा आधार असे. संगणकाच्या भाषेत हे 'कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम' या वर्गात येते. म्हणजे कंटेंट/लेखन लिहिणे/निर्माण करणे, वाचणे नि जपून ठेवणे सुलभ व्हावे या दृष्टीने याची जडघडण केलेली आहे.मी इथे किरकोळ पोस्ट, भंकस करणार्‍या पोस्ट्स, प्रासंगिक लेखनाबरोबरच राशोमोन चित्रपटावरच्या दीर्घ मालिकेचे लेखनही केले.

पण लोक इथे प्रामुख्याने येत ते गप्पा मारणे, माफक चेष्टामस्करी करणे, त्यातून मैत्री झालीच तर वास्तव जगात भेटीगाठी वाढवणे या उद्देशाने. त्यातून ही फेसबुकपूर्व समाजमाध्यमे म्हणूनच अधिक वापरली गेली. जे लोक तिथे दीर्घकाळ सोबत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या भिडूंच्या तुलनेत अधिक संवाद होणार हे ओघाने आले. त्यात पुन्हा मंडळी एकत्र येऊन कट्टे करत. ज्यातून मैत्री अधिक दृढ होत जाई. अशा परिस्थितीत नव्या व्यक्तीला बस्तान बसवणॆ अवघड जाई. त्यात मी मुळात गर्दीत न रमणारा माणूस आहे. क्वचित या कट्ट्यांना गेलो, तरी मुळात मला एकास-एक संवाद अधिक पसंत आहे. त्यामुळे काही काळासाठी थोडे मित्र झाले, तरी मी इथे फार रमलो नाही असेच म्हणावे लागेल.

शिवाय आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार हे चिरंतन वाद नित्याचेच. त्यातच मागे कधीतरी झालेल्या वादाचे, समोरच्याने अज्ञान उघडे पाडल्याचे शल्य जपून ठेवून कुठेतरी त्याच्यावर सूड उगवणे हा क्षुद्रपणाही दिसू लागला. गट बनून मित्र राष्ट्रे विरुद्ध अक्ष राष्ट्रे असे उघड शड्डू ठोकणारे दिसू लागले. ’कंपूबाजी’ या कुप्रसिद्ध शब्दाला याच संस्थळांनी नावारूपाला आणले. मग संस्थळांतून फाटाफूट होऊन नवे संस्थळ निर्माण होणे नित्याचेच. (मायबोली अथवा मनोगत या जुन्या संस्थळांचे नागरिक फुटीर संस्थळांना आमचेच म्हणात ’अखंड मायबोली’ किंवा ’अखंड मनोगत’ निर्माण करण्याचा उद्घोष करतात का हो? :) )

मजकुराच्या बाजूने पाहिले तर एकदा तुम्ही तिथे लेखन केले की त्यावर कुणी, कुठल्या दृष्टिकोनातून प्रतिसाद द्यावेत हे तुमच्या नियंत्रणाबाहेर असे. अनेकदा मूळ लेखनाच्या खाली प्रतिसादकांचे डबे मूळ लेखाच्या विषयाचे एंजिन सोडून भलत्याच - बरेचदा एकाहुन अधिक - एंजिनांच्या मागे लागत. नावडत्या व्यक्तीच्या लेखनावर सुसंगत चर्चा होऊ नये म्हणून हे अनेकदा हेतुत:ही केले जाई. याला मी ’धागा- म्हणजे लेखनधागा- काश्मीरला जाणे/नेणे’ असा वाक्प्रचार वापरत असे.

त्याचबरोबर आपण प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये चुका दिसल्या, सुधारणा करायच्या झाल्या तर तो पर्याय नेहमीच उपलब्ध होता असे नाही. वैयक्तिक आयुष्यात आणि लेखनातही ’दिसामाजी स्वत:ला सुधारित जावे’ अर्थात ’continuous improvement mode’मधे असलेला माणूस आहे. (त्याचे मानसिक पातळीवर वेगळे त्रास असतात. पण ते असो.) मला हे अडचणीचे वाटत असे. या दोन मुख्य अडचणींमुळे मी पर्याय शोधू लागलो. याच वेळी फेसबुक लोकप्रिय होऊ लागले होते. इथे ’मित्र’ ही संकल्पना असल्याने वाचक व प्रतिसादक यांची निवड नि नियंत्रण करणे शक्य झाले आणि मी तिकडे सरकलो.

त्याचवेळी या संस्थळावर लिहिणार्‍या काही मंडळींनी आपले विषयाधारित वा मुक्त लेखन, कविता आदी गोष्टींचे ब्लॉग लिहिणे सुरु केले होते. त्यावरुनच मी ब्लॉगकडे वळलो. दरम्यान फेसबुकवर सक्रीय झाल्यावर मागील लेखाच्या शेवटी उल्लेख केलेल्या नोट्सचा वापर सुरू केला. फेसबुकचा भाग असल्याने त्यांचा पल्ला साहजिकच ब्लॉगहून अधिक होता. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉगचा वापर प्रथम केवळ संस्थळावरील लेखनाचा बॅक-अप एवढाच माफक उद्देश होता.

त्यातच मित्रवर्य राहुल बनसोडेने घोड्यावर बसवल्याने सठीसहामाशी वृत्तपत्रांतही लिहिले. वृत्तपत्रांचा पल्ला मोठा असल्याने आपले लेखन अधिक लोकांपर्यंत पोचते असा सल्ला अनेकांनी दिला म्हणून हे पाऊल उचलले. 'दिव्य मराठी’मध्ये लिहिलेल्या स्तंभामुळे त्याची प्रचीतीही आली.

पण असे असले, तरी वृत्तपत्रीय लेखनाच्या मर्यादाही दिसू लागल्या. एकतर वृत्तपत्र हा ’चालू जमाना’ असतो. त्यात कालातीत, अप्रासंगिक लिहिण्याची संधी क्वचित मिळते. त्यासाठी तुम्ही आधीच प्रस्थापित व्यक्ती असण्याची गरज असते. आणि त्याला कुठेतरी तुमच्या अ‍ॅकेडमिक वाटचालीचा आधार लागतो. बहुतेक वेळा समकालीन घटना वा प्रश्नाला जोडून काही लिहिण्याची फर्माईश त्यांच्याकडून येते. कारण वाचकही प्रासंगिकतेच्या आहारी गेलेलाच असतो. पण असे लेखन केले आणि त्याला जिथे पाठवले तिथे जागा मिळाली नाही, तर अन्यत्र देण्यास फार वाव राहात नाही. कारण काही दिवसांतच त्याचा संदर्भ पुसट होऊन तो लेख कालबाह्य होऊन जाणार असतो. म्हणजे ते छापील माध्यमांच्या दृष्टीने ते ’वाया’ जाते. म्हणजे लिहिण्याची सारी मेहनत फुकट गेली म्हणायची.

ब्लॉगेतर डिजिटल माध्यमे

पण ’आता हे लेखन ब्लॉग वा डिजिटल माध्यमांत देता येईल की’ असे म्हणता येईल. ते बरोबरच आहे, पण त्यात एक मेख आहे. एखादा व्यापक विचार वा विश्लेषण, माहिती छापील माध्यमांत देण्यासाठी शब्दमर्यादेत बसवताना त्यात काही आनुषंगिक मुद्दे गाळावे लागतात. ’हे मुद्दे/माहिती कसे नाहीत’ असा एखाद्या जागरुक वाचकाचा आक्षेप सहन करत, केवळ जागा नाही म्हणून काहींना वगळावे लागते.

पण डिजिटल माध्यमांत ही सूट नाही. हवे तितके तपशीलाने लिहिले तरी चालते. असे असूनही तुम्ही मुद्रित माध्यमासाठीच लिहिलेला लेख छापलात, तर तो तोकडा राहतो. म्हणजे आता मुद्रित माध्यमासाठी लिहिलेल्या लेखनाचे बाजूला ठेवलेल्या मुद्द्यांसह पुनर्लेखन करावे लागते. आणखी एक मुद्दा म्हणजे वृत्तपत्रीय लेखनाची शैली आणि डिजिटल माध्यमांतील लेखनाची शैली यात केलेला फरकही उपयुक्त ठरतो. अगदी वृत्तपत्रांचीच पोर्टल वगळली, तर इतर बहुतेक ठिकाणी थोड्या अनौपचारिक भाषेला वाव असतो. यातून थोडे संवादी लिहिणे शक्य होते. मुद्द्यांच्या जोडीला वैय्यक्तिक अनुभवांची, उदाहरणांची जोड देणे शक्य होते. त्यातून लेखन वाचकांसाठी अधिकाधिक सुलभ करता येते. हे सगळे लक्षात घेतले जवळजवळ एक नवाच लेख लिहावा लागतो. माझी खात्री आहे हा फरक बहुतेकांच्या गावीही नसतो.

Askharnama

ब्लॉगेतर डिजिटल माध्यमांमध्ये वर उल्लेख केलेल्या मराठी समाजमाध्यमांखेरीज बातम्या, त्यांवर आधारित लेखन आणि एकुणातच स्वतंत्र लेखन प्रसिद्ध करणारी विविध संस्थळे अथवा पोर्टल्सचा समावेश होतो. गेल्या आठ-दहा वर्षांत यांची संख्या वेगाने वाढते आहे. मराठी समाजमाध्यमे नि यांच्यात एक महत्वाचा फरक म्हणजे वृत्तपत्रांप्रमाणॆ यांच्यावर संपादकांचे थेट नियंत्रण आहे. मराठी समाजमाध्यमांत संपादकाचे काम बव्हंशी अग्निशामक दलाचेच असे. एरवी लेखन, प्रतिसाद यांच्या संपादनात तर सोडाच, निवडीतही तो/ती हस्तक्षेप करत नसे.बहुतेक मराठी वृत्तपत्रांची स्वत:ची पोर्टल्स आहेत आणि छापील वृत्तपत्रांतील मजकुरापलिकडचे असे बरेच काही तिथे प्रसिद्ध होत असते. त्यापलिकडे वृत्तपत्रांच्या बाजाची पण स्वतंत्रपणॆ उभी असणारी काही पोर्टल्सदेखील आहे. हिंदी-इंग्रजी पोर्टल ’वायर’चे मराठी भावंड असेल की समकालीन विषयांपासून साहित्यापर्यंत सर्वच विषयांना स्थान देणारे 'अक्षरनामा' यांसारखी शब्दप्रधान पोर्टल्स आहेत. त्यापलिकडे शब्दांसोबत व्हिडिओ कंटेंट महत्त्वाची मानणारी तर अनेक आहेत.

डिजिटल माध्यमांच्या त्यांच्याही मर्यादा आहेत. त्यांची मांडणी/आराखडे/लेआऊट ठरलेले आहेत. माझा लेखासोबत काही व्हिडिओ, रेखाचित्रे, फोटो, आकडेवारी, ग्राफ वगैरे जोडायचे असेल, तर त्यांच्या मांडणीच्या मर्यांदामुळे ते किचकट होते. मोबाईलच्या आगमनानंतर, आणि संगणकाऐवजी तोच अधिक वापरला जात असल्याने, त्याच्या मर्यादित जागेत बसेल अशी अगदी मर्यादित वकुबाची मांडणी बहुतेक संस्थळे (वेबसाईट्स) वापरतात. ज्यामुळे मजकुराच्या मांडणीचे स्वातंत्र्य आणखी कमी होते. पण एकदा ब्लॉग हे माध्यम निवडले, की आता मजकुरासोबतच त्याची मांडणीही तुमच्या कह्यात येते... फक्त त्यावर थोडे अधिक कष्ट घेण्याची गरज मात्र आहे.

गड्या आपला गुगल बरा

ब्लॉग ही तुमची स्वत:ची वेबसाईट असते. त्यात तुम्हाला हे स्वातंत्र्य पुरेपूर उपभोगता येते. त्यासाठी थोडे कष्ट करावे लागले, तरी इच्छा असेल तर निव्वळ मजकुरापलिकडे बरेच काही देता येते, साध्य करता येते. गुगलची मालकी असलेला ब्लॉगर(blogger.com) आणि वर्डप्रेस (Wordpress.com) ही दोन सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगमाध्यमे आहेत. व्यावसायिक मंडळी लिंक्ड-इनचा (in.linkedin.com) वापर अधिक करतात. याशिवाय विक्स (wix.com),  वीबली(weebly.com), टम्बलर(tumblr.com) वगैरे अन्य काही पर्यायही उपलब्ध आहेत. मी स्वत: सोपा म्हणून गुगलचा ब्लॉगर निवडला.

BloggerPlatforms

पुढे वर्डप्रेसचा गवगवा झाल्यावर माझा ब्लॉग तिकडे नेण्याचा विचार केला होता. पण लवकरच वर्डप्रेस हा प्रकार म्हणजे बाईक्समध्ये Yamaha Rx-100, मोबाईलमध्ये iPhone आहे असे लक्षात आले. नाव मोठं नि लक्षण खोटं. निव्वळ माध्यमदंगा घालून पत वाढवून ठेवलेली. त्याचे महात्म्य विचारले तर ’सेफ आहे’ ’बेष्ट आहे’ या मोघम दाव्यांपलिकडे त्यांच्या मालकाला नेमके काहीच सांगता येत नाही असे.

एकतर या वर्डप्रेसचा डॅशबोर्ड अतिशय गुंतागुंतीचा. नॅव्हिगेशन ’रस्त्यावर सलग तीन वेळा एकाच दिशेने (डावीकडे वा उजवीकडे) वळले की आपण पुन्हा मूळ जागी पोहोचतो’ या नियमाला अपवाद करणारा. वर त्यांनी दिलेल्या किमान पर्यायांपलिकडे अगदी किरकोळ बदलही करायचे म्हटले, तरी लगेच एक विजेट/गॅजेट (तयार प्रोग्राम अथवा कोड) समोर फेकून ’द्या पैसे’ म्हणून हात पुढे करणारी सर्व्हिस पाहून वैतागलो. आपण काहीतरी पाहतो, ऐकतो, विचार करतो, खरडतो नि ते ब्लॉगवर लिहून ठेवतो. त्यापलिकडे त्यातून उत्पन्न अपेक्षितच नाही. मग असे प्रत्येक विजेटला पैसे देत बसणे शक्यच नाही. बरं ही विजेट इतकी छोटी, की भूमितीमधे ’दोन भिन्न बिंदूतून जाणार्‍या एक आणि एकच रेषेसारखे’ एक आणि एकच काम करणार. दुसरे काम करण्यासाठी दुसरे विजेट घ्या. ते नको असेल तर बक्कळ पैसे भरुन आम्हालाच काम द्या. ’गड्या आपलं गुगल भलं’ म्हणून तिकडे जाण्याचा बेत रद्द केला. पुढे ब्लॉगरमध्ये त्यात इतक्या गोष्टी केल्या (सभ्य भाषेत ’काड्या केल्या’) की फुकट गुगलमध्ये इतके काही करता येत असेल, तर लोक पैसे देऊन वर्डप्रेसच्या नादी का लागतात हे मला समजेनासे झाले.

(क्रमश:)

पुढील भाग >> माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा