झाशीवाली(!) नव्हेस कन्या, नव्हेस अंबामाय
उसनवारीची कंठी मिरविसी रुंडमाळ की काय
प्याद्यासी(!) या म्हणेल राज्ञी, बॉलिवुडी का कुणी?
वाचाळ तू मैत्रिणी
बदनामीचे अस्त्र उपसले, मुळी न धरलीस चाड
तुला पाहता लावून घेतो, मम सदनाचे कवाड
नकोच दर्शन अंशमात्रही, मज हे कैदाशिणी
वाचाळ तू मैत्रिणी
कशांस पंगा घेतलास तू, पाय आणि खोलात
उर्मिलेस(!) त्या दूषण देता, कां नच झडले हात?
कित्येकांसी वैर घेतले, ट्विटरावरती, जनीं
वाचाळ तू मैत्रिणी
राणी(!) असुनि झालीस प्यादे, घरटे तुटले आज
पाठीवरचा हात दगा दे, उतरुन गेला माज
समर्थनासी परी धावले, झुंडीच्यासह कुणी
वाचाळ तू मैत्रिणी
तुला पाहता प्रदीप्त होते, मम शब्दांची धार
होईल शोभा पुन्हा म्हणुनि करत नाही मी वार
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा झणी
वाचाळ तू मैत्रिणी
मरुस्थलासम तव बुद्धीचे भान होई वैराण
कशास भांडुन तंडुन केले जन हे तू हैराण
ताळतंत्र हे पुरे सोडले, तुवा गतसाजणी
वाचाळ तू मैत्रिणी
भगिनीसह शब्दांनी केले तूच वार अनेक
दुखावले जे तव शब्दांनी, दुरावले जे लोक
कुठल्या वचने तव सुहृदांची करशील समजावणी?
वाचाळ तू मैत्रिणी
चला राऊता(!), द्या सेनेला(!) एक आपुल्या हाक
नटीसंगती सुसज्ज असतील ट्विटर-ट्रोल हे लाख
तव पोस्टींच्या सवे असू दे ’सामना’ची(!) पुरवणी
वाचाळ तू मैत्रिणी
जमेल तेथे, जमेल तैसी करु काव्य-पैदास
हाच एकला ध्यास आणखी, हीच एकली आस
शब्दप्रभूचे काव्य विडंबी, कुंपणावरचा मुनी
वाचाळ तू मैत्रिणी
- काव्यभुभू रमताराम
- oOo -
|