सोमवार, २१ मार्च, २०१६

एवरीबडी लव्ज् रेमंड...

BoardLicker

विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ’बोर्डचाट्याच्या शोधात’ या शीर्षकाखाली ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवली आहे.

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

ते काहीच म्हणाले नाहीत...

HeDidntSpeak
काल 'ते म्हणाले', 
	आज 'ते काहीच म्हणाले नाहीत'.
त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले, 
	'There I spoke, here I remain silent'

त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले
'याची जीभ कापा, पाच लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले
'याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

यांच्या ’संन्यासी’ नेत्या म्हणाल्या
'त्यांना' पुरे निखंदून काढा
...
ते काहीच म्हणाले नाहीत

त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली
'त्या' लोकांना गो़ळ्या घाला
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला
'ते' सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांची वानरसेना म्हणाली
सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

दुष्काळाने त्रस्त जनता म्हणाली
पाणीपुरवठ्याचे काहीतरी करा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

शेतकरी कळवळून म्हणाले
'पाच वर्षे दुष्काळ आहे, कर्ज माफ करा'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

सुरकुतलेली भुकेली तोंडे म्हणाली
'डाळीचे भाव परवडत नाहीत हो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांच्या 'उच्चशिक्षित' सहकारी म्हणाल्या
विरोधकांना चुटकीसरशी संपवीन
...
आणि...
’बोलूकाका’ बोल बोल बोलले.

 - oOo - 

	

हे वाचले का?

गुरुवार, १७ मार्च, २०१६

ते म्हणाले...

YouMustObey
ते म्हणाले,
तुम्ही 'भारतमाता की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'जय जगत्', कुणी म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
'शिवाजी महाराज की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'केम?', कुणी म्हटले 'आम्ही म्हणणार नाही'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
गोल टोपीवाले म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही तिरंगा उंच फडकवलाच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
तळमजल्यावरचे म्हणाले 'आम्हाला शक्य नाही.'
तळमजल्यावरच्यांना त्यांनी 'निलंबित' केले.

ते म्हणाले,
'जय श्रीराम, जय रामराज्य' म्हटलेच पाहिजे
थोडे कुणी बरेच काही खुश झाले
वैतागले कुणी म्हटले, 'ज्जा. म्हणणार नाही.
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'जय महिषासुर' म्हणताच कामा नये
थोडे कुणी थोडे काही खुश झाले,
एक म्हणाला 'गर्वाने म्हणणार आहे.'
तसे म्हणणार्‍याला त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणताच कामा नये
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
असे कुणी, तसे कुणी म्हणून मोकळे झाले
त्यातल्या फक्त 'परक्यां'नाच त्यांनी निलंबित केले.

दरम्यान दोन तहानबळी, काही भूकबळी पडले
उन्हाळ्याच्या सुटीसाठी ते उटी, स्वित्झर्लंडला गेले
हे म्हणा, ते म्हणू नका करता करता अधिवेशन सरले
तीन महिने गेले, पुन्हा नवे अधिवेशन आले.

ते म्हणाले,
आता कसे सगळे रान साफ झाले, करू हवे तसे
काय करू नि कसे करू तेवढेच नव्हते समजले
अरेच्या, आता झाली पंचाईत, काम करणे आले
काय करावे, कसे करावे इथेच गाडे अडले.

बराच खल केला, 'श्रेष्ठीं'चा सल्लाही मागितला
आत बाहेर, संस्थांमधून बरेच चिंतन मंथन झाले
त्या मंथनातून अखेर अमृतमय उपाय काढले
नवे अधिवेशन आले, सारे सज्ज झाले

एका फटक्यात त्यांनी सारी निलंबने रद्द केली आणि
'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे'ची पुन्हा घोषणा केली
सारे पुन्हा सुरू झाले, जुनेच सारे पुन्हा नवे झाले
दरम्यान चार भूकबळी, तहानबळी, कर्जबळी पडले

देशात राष्ट्रप्रेमाचे अमाप पीक काढले
पोटभर खाऊन माणसे, ढोरे तृप्त झाले
एकाच उपायाने देश आबादीआबाद झाला
वेदातील विमाने उडवून अंतराळी पोचला

ओबामा दाती तृण धरून शरण आला
शरीफ तर दारचा दरवान झाला.
दुष्ट चीनचा पाऽर सफाया झाला
पायघड्या घालत पुतीन स्वागताला आला.

राष्ट्राचा डंका सार्‍या विश्वात वाजू लागला
दशलक्षी कोटावर तिरंगा झळकू लागला
पण' देश म्हणजे 'माणूस की भूमी?' हा
अवघड प्रश्न मात्र कायमचा अडगळीत पडला
 
- oOo - 
	

हे वाचले का?

मंगळवार, ८ मार्च, २०१६

ऐलपैल - ३ : रानिया - एक मॉडर्न आणि मॉडेल राज्ञी

जानेवारी महिन्यात फ्रेंच नियतकालिक 'चार्ली हेब्दो'ने एक व्यंगचित्र प्रकाशित केले. त्यात त्यांनी 'अलान कुर्दी' या भूमध्य समुद्रात जलसमाधी मिळालेल्या तीन वर्षाच्या सीरियन निर्वासिताबद्दल अश्लाघ्य टिपणी केली होती. हा तोच 'अलान' होता ज्याच्या समुद्रकिनारी वाळूत विसावलेल्या मृतदेहाचे छायाचित्र गेल्या सप्टेंबर महिन्यात जगभर पसरले आणि देशोदेशीच्या शांततावाद्यांना झडझडून जागे केले होते.

हे 'चार्ली हेब्दो' तेच होते ज्याच्या कार्यालयावर इस्लामी माथेफिरुंनी हल्ला करून त्यांच्या अकरा सदस्यांना ठार मारले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या शांततावादी समाजाला या निमित्ताने त्यांनी तोंडघशी पाडले आणि जगात शांततावादी, स्वातंत्र्यवादी किती अल्पमतात आहेत यावर जणू शिक्कामोर्तब केले.

या व्यंगचित्रात 'अलान मोठे होऊन काय होऊ शकला असता?' असा प्रश्न विचारून 'एक लैंगिक माथेफिरु' असे उत्तरही देण्यात आले होते. अनेक स्वयंघोषित पुरोगामीदेखील वंशवादाने किती पछाडलले असतात याचे हेब्दो हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. आजच्या जगात जिथे संघर्षाला प्रति-संघर्षाने, हत्येला हत्येने, अपमानाला अपमानानेच उत्तर दिले जाते तसे याही बाबतीत झाले. याला फक्त एक अपवाद ठरला. मात्र मध्यपूर्वेतील एका अरब राज्ञीने याला दिलेले उत्तर संस्मरणीय ठरले.

ChalieHebdo
'चार्ली हेब्दो'ने प्रसिद्ध केलेले व्यंगचित्र.
RaniaReplies
रानिया यांनी ट्विट केलेले उत्तर.

तिने ट्विटरवर एक व्यंगचित्र प्रकाशित केले, ज्यात अलान 'डॉक्टर' होऊ शकला असता असे सुचवले होते. तिने लिहिले होते "अलान हा एक उत्तम डॉक्टर बनू शकला असता, तो एक उत्तम शिक्षक बनू शकला असता, एक प्रेमळ पिताही!"

या उत्तराला अनेक अंगांनी पहायला हवे.

पहिले म्हणजे डॉक्टर याला आज जरी 'व्यवसाय' म्हणून पाहिले जात असले तरी मूलतः त्याची भूमिका ही संकटमोचकाची, जीवनदात्याची मानली जाते. नागरी जीवनात ही जाणीव क्षीण झाली असली तरी, शिक्षक हा देखील समाजाच्या दृष्टीने एक पथप्रदर्शकच मानला जातो. सारेच मुस्लिम माथेफिरु असतात हा पाश्चिमात्य देश रुजवू पाहात असलेला समजही खोटा आहे; इथेही प्रेमळ पिता, पती असतात, त्याअर्थी तुमच्यात नि आमच्या काही फरक नाही असेही शेवटी तिथे सुचवले होते.

थोडक्यात स्वतःवरील हिंसेला हिंसेनेच प्रतिवाद करणार्‍या, शस्त्र वा शब्द यापैकी कोणतेही हत्यारे वापरणार्‍यांना दिलेली ही सणसणीत चपराक आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी 'हेब्दो'चेच माध्यम वापरून त्या माध्यमाचा विधायक वापरही करता येतो असा मार्मिक टोलाही त्यांना दिला आहे.

तिसरे महत्त्वाचे म्हणजे ही राज्ञी त्या मध्यपूर्वेतील आहे ज्या भूभागाला युरपिय वर्चस्ववादी, वंशवादी लोक कायम तुच्छ लेखत आले आहेत.

QueenRania

मूळच्या पॅलेस्टिनी आईवडिलांच्या पोटी 'कुवेत'मधे जन्मलेल्या आलेली ही बुद्धिमान स्त्री 'व्यवसाय व्यवस्थापन' शास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ सिटिबँक' या अमेरिकन बँकेत मार्केटिंग क्षेत्रात उमेदवारी केली आणि त्यानंतर प्रसिद्ध 'अ‍ॅपल' या कंपनीसाठी जॉर्डनची राजधानी अम्मान इथे रुजू झाली. तिथेच एका पार्टीत तिची आणि त्यावेळच्या राजाचा वारस म्हणून निवडलेल्या गेलेल्या प्रिन्स अब्दुल्ला बिन अल-हुसैन याच्याशी पडली आणि वर्षभरातच त्याच्याशी लग्न करून क्राऊन प्रिन्सेस झाली.

सुमारे सहा वर्षांनंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अब्दुल्ला राजा झाला आणि त्याने रानियाला राज्ञी घोषित केले. पुढे २०११ मधे'हार्पर अँड क्वीन्स' या नियतकालिकाने घेतलेल्या चाचणीतून तिला 'सर्वात देखणी फर्स्ट लेडी' म्हणून गौरवण्यात आले होते. पण तीच केवळ तिची ओळख आहे असे म्हणणे मात्र साफ चुकीचे ठरते.

रानिया ही एका मुस्लिम राज्याची - किंग्डम, सल्तनत नव्हे! - जॉर्डनची राज्ञी आहे. 'राणी' या सोप्या शब्दाऐवजी तिला 'राज्ञी' असे संबोधन वापरायचे कारण ते संस्कृतला अधिक जवळचे आहे म्हणून नव्हे, तर 'राणी' म्हटले की 'राजाची पत्नी' असा अर्थ डोक्यात उमटतो. राज्ञी हा वरवर समानार्थी भासणारा शब्द स्वतः शासक असलेली अशी आत्मनिर्भर स्त्री हा अर्थ अधिक ध्वनित करतो. रानिया ही राजाची राणी असली तरी एखाद्या युरपिय देशाच्या पंतप्रधानाच्या वा अध्यक्षाच्या 'बोलक्या बाहुल्या' पत्नींपेक्षाही कितीतरी स्वतंत्र असे स्थान तिने निर्माण केले आहे. सत्तेचा वापर कुठल्या कामांसाठी करावा याचा एक आदर्शच तिने निर्माण केला आहे.

एका धर्माने इस्लामबहुल आणि वंशाने हशेमाईट, अरबबहुल देशाची ती फर्स्ट लेडी आहे. असे असूनही ती संपूर्णपणे पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव करते. परंतु असे असतानाच मुस्लिम स्त्रियांना बुरखा वापरण्याचा वा न वापरण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, इतकेच नव्हे तर ज्यांनी तो वापरण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे त्यांनाही तो हव्या रंगाचा वा पोताचा वापरता यायला हवे असे तिचे मत आहे. हे मत विद्रोहापेक्षा स्वातंत्र्य या मूल्याला अधिक मानणारे आहे. पण तिचे स्वतंत्र असणे हे पेहरावापुरते स्त्रीस्वातंत्र्य नाही. त्यापलिकडेही तिची स्वतंत्र ओळख आहे, आणि ती इतकी प्रभावी आहे की त्यातून तिची आतापर्यंत करून दिलेली ओळख जवळजवळ साफ पुसली जाते आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन पातळ्यांवर आपली उद्दिष्टे, तत्त्वे आणि कामाचा आराखडा तिने व्यवस्थित आखून घेतला आहे. तिच्या स्वतःच्या वेबसाईट्च्या, फेसबुक पेजच्या, ट्विटर हँडलच्या आणि यू ट्यूब वीडिओ, चॅनेल्स यासारख्या अन्य प्रचलित इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याबद्दल माहिती देणे आणि घेणे हे आजच्या जगाचे हुकमी हत्यार तिने यशस्वीरित्या राबवले आहे.

'टेकक्रन्च' या तंत्रज्ञानाशी संबंधित बातम्या आणि माहिती देणार्‍या ऑनलाईन नियतकालिकाला 'How twitter can change the world?' या विषयावर एक सविस्तर मुलाखतच दिलेली आहे. त्यात ती म्हणते "त्याचा (सोशल मीडियाचा) वापर हा खालील कामांसाठी करता येऊ शकेल.

१. सोशल मीडिया' या नावाने ओळखले जाणारे हे माध्यम सकारात्मक सामाजिक बदलांचे साधन म्हणून वापरावे लागेल.

२. त्याच्या माध्यमातून ज्यांचा आवाज समाज आस्थेने ऐकतो अशांना, ज्यांचा आवाज समाजापर्यंत पोचत नाही त्यांच्यासाठी बोलण्यास उद्युक्त करता येईल

३. अशा व्यक्तींची गुणवत्ता, ज्ञान, कौशल्ये आणि संसाधने वापरून अधिकाधिक मुलांना शिक्षणाकडे वळवता येईल.

४. आपण निवडलेल्या प्रतिनिधींवर 'जागतिक शिक्षण' हा विषय प्राधान्यक्रमात वर नेण्यासाठी दबाव निर्माण करणे शक्य होईल.' आणि ती स्वतःदेखील या माध्यमांचा यथास्थित वापर करताना केवळ वैयक्तिक माहितीपलिकडे जाऊन आंतरराष्ट्रीय घडामोडी, समस्या, त्यावरील उपाय, सक्रीय पाठिंबा याबाबत वेळोवेळी भाष्य करत आली आहे.

देशांतर्गत अजेंड्यामधे शिक्षण, सामाजिक सबलीकरण आणि देशातील तरुणाई या तीन मुख्य मुद्द्यांवर तिने लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षण क्षेत्रात शालेय शिक्षणासाठी तिने निर्माण केलेला 'मद्रेसाती' किंवा माझी शाळा' हा उपक्रम जास्तीत जास्त मुलांपर्यंत शिक्षण पोचावे यासाठी प्रयत्नशील आहे, तर उच्चशिक्षणासाठी 'राज्ञी रानिया प्रज्ञावृत्ती' कार्यक्रमाअंतर्गत अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करून आपल्या देशातील विद्यार्थ्यांना तिथे उच्चशिक्षणासाठी जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

'जॉर्डन रिवर फाउंडेशन'च्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाला राजकीय, सांस्कृतिक बंधनांपलिकडे नेऊन प्राधान्य मिळावे यासाठी ती प्रयत्नशील आहे. याच फाउंडेशनने मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. मध्यपूर्वेत ठाण मांडून बसलेल्या युद्धाने पोरक्या झालेल्या मुलांसाठी तिने 'अल्-अमान फंड' च्या माध्यमातून शिक्षण आणि कौशल्य यांची सोय केली आहे.

तरुणांसाठी 'इंजाज़ अल्-अरब' अर्थात 'अरबांचे यश' या कार्यक्रमाखाली केवळ जॉर्डनच नव्हे तर पुर्‍या अरब प्रदेशातील तरुणांना एकत्र केले. त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते. खुद्दा रानियादेखील यातील काही वर्गातून शिकवते ज्यातून तिचा या कार्यक्रमाशी कायम जवळून संबंध राहतो. याच माध्यमातून तिने '२०१८ पर्यंत दहा लाख अरब उद्योजक' निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक शिक्षण, आंतर-संस्कृती संवाद, मायक्रोफायनान्स या तीन विषयांवर ती काम करते आहे. युनिसेफच्या 'ग्लोबल लीडरशिप इनिशिएटिव' मधे सामील होण्याचे आमंत्रण तिला देण्यात आले. २००७ मधे तिच्या तेथील कामाबद्दल 'मुलांच्या हिताची सर्वात महत्त्वाची पुरस्कर्ती' म्हणून गौरव करण्यात आल. तसंच युनोच्या 'गर्ल्स एज्युकेशन इनिशिएटिव', ग्लोबल कँपेन फॉर एज्युकेशन' अशा इतर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातही तिने सक्रीय सहभाग घेतला आहे.

पण हे जग अजूनही पुरुषप्रधान समाजांचे कडबोळे आहे. त्यातून मुस्लिमबहुल देशांत तर एका स्त्रीने इतके पुढे जाणे समाजाला फारसे रुचत नाहीच. त्यातून मग ती राज्यकारभारात फार जास्त ढवळाढवळ करते आहे अशी हाकाटी सुरू झाली. चार मुलांची माता असलेल्या रानियाने मग सुज्ञपणे दोन वर्षे काही प्रमाणात माघार घेतली. पण गेल्या वर्षापासून ती पुन्हा सक्रीय झाली आहे. आपल्या देशातल्या आणि देशभरातल्या मुलांच्या शिक्षणाची आणि उत्तम आयुष्याची पायाभरणी करण्याचे काम ती करतच राहणार आहे.

- oOo -

(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना, मार्च २०१६)

अधिक माहितीसाठी:
http://www.queenrania.jo/en
http://www.biography.com/people/queen-rania-23468


हे वाचले का?