गुरुवार, २६ मे, २०१६

वादे वादे जायते वादंग:

जात आणि इतिहास या दोन विषयांवर लिहायचे नाही हा माझा नियम मी तात्पुरता बाजूला ठेवून ही पोस्ट लिहितो आहे. याला कारण Anand Shitole ने टाकलेली पोस्ट. हे त्याचे उत्तर आहे. आनंदने हे लिहायला भाग पाडले याबद्दल त्याच्याकडून नंतर दंड वसूल करेन. :)


त्याचा मूळ मुद्दा हा की 'सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.
-------
आनंद तू अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. 'इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल' हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे. अर्थात एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असे लोक आहेत, तसे लोक आहेत. त्यातल्या एकाच प्रकारचे लोक हे 'प्रातिनिधिक' समजून - ते ही टीकेच्या सोयीचे - वागत गेलो तर धागे जुळणारच नाही. एक नक्की की द्वेषाचे पेरणी अधिक सोपी नि सोयीची असल्याने तीच अधिक केली जाते. द्वेषाच्या आधारे जमाव लवकर जमतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आरक्षणाने देशाचे वाटोळे होत आहे म्हणून गळे काढणारी ब्राह्मणांतली सुमार बुद्धीची पोरे आणि शंभर मुद्द्यावर एकमत असलेला ब्राह्मण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर असहमती दाखवतो म्हणून लगेच बरोबर आहे, शेवटी तुम्हाला काय कळणार 'आमची' बाजू' म्हणून त्याची जात काढणारा आता सुखवस्तू आयुष्य जगणारा दलित हे एकाच पंथाचे (आणि असे म्हटल्याबद्दल आमची 'त्यांच्या'शी तुलना कशी करू शकतोस' म्हणत माझ्यावर धावून येणारे दोघेही.) मानले पाहिजेत. मुळात एकदा 'ते' आणि 'आपण' वेगळे मानून चालू लागलो की तिथेच सहकाराची शक्यता मावळते. केवळ दोषारोपासाठी मुद्दे शोधण्यात सारा वेळ नि ऊर्जा खर्च होत राहते. आणि यावर प्रत्येक बाजूकडून 'मग त्यांनी पण हे समजून घ्यायला नको का, त्यांना आधी सांगा' म्हणत आपली जबाबदारी झटकून टाकली जाते. मग ते ण ला ण म्हणणारे असोत की जगातला प्रत्येक प्रश्न ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाकडे ओढून नेऊन वाद घालणारे एकांगी असोत.

आता मूळ मुद्द्याकडे. मी तुझ्या मुद्द्याच्या एक पाऊल मागे जातो. मुळात 'मी अमुकवादी आहे' हे सांगण्याची गरज का पडावी. मी आंबेडकरवादी आहे असे नुसते म्हटल्याने मी तसा होतो का? आणि तसे न म्हणता मी त्यांच्या तत्त्वांना अनुसरून - जाणीवपूर्वक वा अजाणता - वागत असेन तर मी आंबेडकरवादी नसतो का? दुसरा मुद्दा, मुळात आपल्याला एखादा विचार पटला म्हणून मी अनुसरत असेन तर कुणी एखादा मला 'आंबेडकरवादी' असल्याचे सर्टफिकेट नाकारत असेल तर मी त्याला का महत्त्व द्यावे. जसे मोदीभक्तांना राष्ट्रभक्तीचे सर्टफिकेट वाटायचा ठेका दिलेला नाही तसाच स्वतःला आंबेडकरवादी 'म्हणवणार्‍या' कुणाला तो दिलेला नाही. मग तो म्हणाला की तू आंबेडकरवादी नाहीस तर मी त्याला म्हणेन तू 'डॉकिन्सवादी नाहीस', क्विट्स. कारण ही दोन्ही वाक्ये वांझ आहेत, त्यांना काडीचाही आधार नाही. कुठेही वस्तुनिष्ठ मूल्यमापन नाही, तेव्हा मी असल्या शेरेबाजांना काडीची किंमत देत नाही. दुसर्‍यावर शेरे मारणे हे आपले स्थान बळकट करण्यासाठीच असते असे मी समजतो. इतरांना राष्ट्रद्रोही ठरवल्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होते असे अनेकांना वाटते, तसेच समोरचा आंबेडकरवादी नाही किंवा छुपा संघिष्ट आहे हे सिद्ध केले की आपले आंबेडकरवादी असणे आपोआप सिद्ध होते अशी अनेकांची धारणा असावी असे दिसते.

शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मुळात मी अमुकवादी आहे असे कानाच्या पाळीला हात लावून घराणे सांगण्याची गरज का पडावी. आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असावे. ते सतत तपासून घेत रहावे, चूक सापडली तर दुरुस्त करत राहावेत. आणि विचार नि मूल्यमापनाची पद्धत अधिकाधिक समृद्ध होत रहावी म्हणून आंबेडकरांसह जगातील सर्वच सुज्ञ माणसांचे विचार वाचत राहावेत, तपासून पाहावेत, कोणते आपल्या परिस्थितीत, कुवतीत अंमलात आणता येतात ते पाहावे, अंमलात आणावेत. माझे विचार हे माझे आहेत, माझ्या विचारातून सिद्ध झाले आहेत याचा अभिमान का बाळगू नये? मग कदाचित असे होईल की तुमचे विचार बरेचदा आंबेडकरांकडून आलेले असतील, उत्तम आहे. कधी ते रिचर्ड डॉकिन्सकडून आले असतील, कधी मार्क्स कडून तर कधी एखाद्या उपनिषदातून. स्रोतावरूनच अस्पृश्यता पाळणे हा दोष जोवर जात नाही तोवर अशी घराण्यांची गरज आपल्याला पडत राहणार आहे आणि त्या सार्‍याच घराण्यांचे टोळ्यांमधे रूपांतर होत राहणार आहे. टोळ्यांना फक्त मित्र कोण शत्रू कोण इतकेच समजते, त्यांना घराण्याचा विचार पुढे नेण्यासाठी विचार करायची गरज वाटत नाही. आणि जे तसे करतात त्यांना 'परंपरा मोडल्याचा' आरोप सहन करावा लागतो, याला आंबेडकरवादी म्हणवणारेही (मी म्हणवणारे असा उल्लेख यासाठी करतो आहे की तसे म्हणवणारे वास्तवात असतीलच असेही नाही, आहेत की नाही ते तपासायचे कसे मला ठाऊक नाही की मला तो अधिकारही कुणी देणार नाही ) अपवाद नसतात.

हे खरे की आयुष्यात आपल्या जगण्याची चौकट घडवण्यासाठी अनेक स्रोतांचा अभ्यास करावा इतका वेळ नि ऊर्जा उपलब्ध असेलच असे नाही. तेव्हा मग पूर्वसुरींनी दिलेल्या काही विचारव्यूहांच्या आधारे ते आपले जगणे उभे करतात. मग कुणाला आंबेडकरांचे विचार पटतात, कुणाला सावरकर, कुणाला मार्क्स, कुणाला लोहिया. पण हे विचारव्यूह झाले. अगदी धर्माचेही घ्याल तर जगण्याची रेडिमेड चौकट म्हणूनच तिची निर्मिती झाली आहे. ज्याला स्वतःची चौकट घडवण्याची कुवत नाही, इच्छा नाही, ताकद नाही त्याने साधकबाधक विचाराने उपलब्ध धर्मातून एक निवडावी असे अपेक्षित आहे. बाजारातून ३४, ३६ किंवा ३८ च्या मापाचा तयार शर्ट आणण्यासारखे आहे हे. एखाद्या आडमाप देहाला तयार प्रमाणबद्ध शर्ट बसत नाही, त्याने स्वतःच्या मापाचा शर्ट शिवून घ्यावा. त्याने तयार मापांतून निवडला नाही म्हणून त्याला आपण दोष देऊ का? मग अमुकच एक विचारव्यूहाला तुम्ही स्वीकारले नाही म्हणजे तुम्ही दुय्यम, घातक वृत्तीचे असे समजायचे कारण नाही, त्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आचरणाचेच मूल्यमापन व्हायला हवे, निव्वळ घोषणेवर नव्हे. शिवाय मी अमुकवादी आहे याचा उद्घोष कुणी करू लागतो तेव्हा तो तसा नसण्याची आणि ते झाकण्यासाठी अधिक उच्चरवाने ते ठसवू पाहात असल्याचीही एक शक्यता निर्माण होते.

आता माझे वैयक्तिक मत सांगतो. मी स्वतः माझे विचार विकसित करण्यावर विश्वास असलेला माणूस आहे. समाजवादी विचारांबद्दल मला आस्था असली तरी मी समाजवादी आहे असे मुळीच म्हणणार नाही. मला असल्या उसन्या ३६ मापाच्या शर्टची गरज आहे असे मला वाटत नाही. माझा शर्ट मी शिवून घेणार आहे. त्यात आंबेडकरवादाचे धागे असतील, सावरकरांचा ठणकावून सांगणारा विज्ञानवाद असेल, मार्क्सचे द्रष्टेपण असेल, गांधीबाबाची दूरदृष्टी असावी अशी इच्छा असेल, नेहरुंचा वास्तवाचे भान असलेला व्यवहारी दृष्टीकोनही. हे ही पुन्हा अगदी ढोबळ वर्गीकरण आहे आणि इतर अनेक व्यक्ती नि विचारव्यूहांची नावे यात आलेली नाहीत. माझ्या विचारात या सार्‍या पूर्वसुरींच्या विचारांची प्रतिबिंबे दिसतील पण ते पूर्णांशाने त्यांचे नसतील, नसावेत. तेव्हा मी अमुकवादी आहे असे म्हटले तर मी ही एकसाचीकरणाच्या मार्गाने चाललो आहे असे मला वाटेल नि ते मला कधीच आवडणार नाही. तेव्हा मुद्दा हा की माझे पुरेसे आंबेडकरवादी नसणे कुणाला खटकत असेल तर मी तसा आहे हे सिद्ध करायला मी मुळीच जाणार नाही.

-oOo-