('मुक्त-संवाद' या मासिकात प्रसिद्ध होत असलेल्या ’जम्प-कट’ या मालिकेतील पहिला भाग)
पन्नास वर्षांपूर्वी ‘२००१ अ स्पेस ओडिसी’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील वानरमानव नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो. ते इतके उंच जाते की थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासात संस्मरणीय मानला जातो.
चित्रपटाच्या परिभाषेमध्ये जम्प-कट याचा अर्थ एकाच प्रसंगामध्ये काळात बदल होऊन, मधला बराच काळ वगळून, कथानक अथवा त्यातील एखादे पात्र काळाच्या बर्याच पुढच्या तुकड्यामध्ये प्रवेश करते. उदा. एखाद्या हिंदी चित्रपटात एक लहान मूल फुटबॉल खेळत असते, त्याने मारलेला फुटबॉल हवेत उंच जातो. तिथून खाली येतो तो थेट तारुण्यातील त्याच मुलाच्या पायाशी. मधला काही वर्षांचा काळ कथानकातून वगळलेला असतो.
‘ओडिसी’ मधील वरील प्रसंगाला चित्रपट इतिहासातील सर्वात दीर्घ जम्प-कट मानले जाते. रोचक बाब ही की क्युब्रिकने ‘ओडिसी’ची सुरुवात सर ऑर्थर सी. क्लार्क यांच्या ‘द सेन्टिनेल’ या एक-पानी कथेपासून केली होती. क्लार्क यांच्या मदतीने त्याने तिचे एका अविस्मरणीय चित्रपटाच्या पटकथेमध्ये रूपांतर केले. एका अर्थी हा ही एक जम्प-कटच म्हणावा लागेल.
हाडाचा साधन म्हणून वापर करण्यापासून सुरू झालेली मानवी प्रगतीची वाट नक्की कुठली यावर मतमतांतरे आहेत. कुणी असं म्हणतं की देव नावाच्या कुण्या हलवायाने झारा घेऊन बुंदी पाडावी तशी माणसे निर्माण करुन पृथ्वीवर वस्तीस सोडून दिली. कुणी मानवाचा प्रवास हा देवत्वाकडून अवनत होत प्राणिमात्रांच्या पातळीकडे (अवक्रांत) होतो आहे असे मानले. तर वैज्ञानिक विचारांच्या, अनुभवसिद्ध ज्ञानाच्या पुरस्कर्त्यांनी प्रत्यक्ष पुरावे, चिकित्सा आणि निष्कर्षाच्या पद्धतीला अनुसरत मानवी उत्क्रांतीला सर्वाधिक संभाव्य (probable) शक्यता मानले आहे. मानवी उत्क्रांतीच्या या वाटेचा कुणी अधिक्षेप करते(१) तर काही विज्ञानवादी म्हणवणारे, पण वैज्ञानिक दृष्टीचा अभाव असणारे तिला तंतोतंत वास्तव मानून चालतात. मी स्वत: या दोनही टोकांच्या मतांशी सहमत नाही.
उत्क्रांतीच्या तत्त्वामागचा मुख्य तर्क हा रोजच्या जीवनात सहज दिसून येणार्या संक्रमणाचा आहे. माणसाच्या आहारात, विचारात, जीवनशैलीमध्ये एका आयुष्यातच मोठा फरक पडलेला दिसतो. प्राकृतिक, भौगोलिक तसंच तांत्रिक बदलांशी माणसे कशा तर्हेने जुळवून घेत पुढे जातात हा आपल्या अनुभवाचा भाग आहे. त्याच अनुभवाला तर्काच्या साहाय्याने लांबवून उत्क्रांतीची कल्पना मांडता येते.
असे असले तरी उत्क्रांती ही अखेर एक प्रक्रिया आहे, काळाच्या एका तुकड्यावर घडलेली घटना नव्हे. त्यामुळे पिढ्यानुपिढ्या काळाच्या प्रत्येक तुकड्यावर तिच्यासंबंधी निरीक्षण करणे आणि नोंदी ठेवत तिला तंतोतंत वास्तव म्हणून सिद्ध करणे हे मानवी कुवतीच्या बाहेरचे आहे. भूतकालात घडलेल्या एखाद्या घटनेचे तिच्यावरील नोंदींच्या आधारे केलेले आपले आकलन वास्तव म्हणणेही धाडसाचे ठरते. तिथे लाखो वर्षे चालू असल्याचा दावा असलेली एखादी प्रक्रिया वास्तव म्हणणे ही फारच मोठी उडी म्हणता येईल.
संख्याशास्त्रीय परिभाषेत ज्याला अनुमान-प्रारूप(२) (prediction model) म्हणतात, तसे काहीसे उत्क्रांती सिद्धांताचे स्वरूप आहे. (खरेतर तितके ठोसही नाही.) भूतकालातून जमा केलेल्या वास्तविक पुराव्यांच्या साहाय्याने प्रथम ते तयार केले जाते. त्याच्या साहाय्याने काढलेल्या अनुमानांना पुढे वास्तविक पुराव्यांचे आधार मिळत गेल्यास ते विश्वासार्ह प्रारूप म्हणून मान्य होत जाते. अनुमान, पुरावा, चिकित्सा, निष्कर्ष या वैज्ञानिक मार्गाने उत्क्रांतीचाही हा दावा बळकटही होत जातो. तिच्या अन्य स्पर्धक पर्यायांचे स्वरूप प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांचे प्रामाण्य स्वरूपाचे असल्याने त्यांना वास्तवातील निरीक्षणांचा कोणताही आधार नाही.
माणसाला विविध कालखंडातील मानवाच्या जगण्याच्या पाऊलखुणा सापडलेल्या आहेत, सापडत आहेत. माणूस आपल्या वैज्ञानिक साधनांच्या, प्रक्रियांच्या मदतीने त्या वस्तुमात्रांची कालनिश्चिती करतो. या पद्धतीमध्ये कालनिश्चितीचा बिनचूकपणा किती यावर त्या वस्तुमात्राचा काळ ढोबळमानाने निश्चित होतो. मग या पुराव्यांच्या जंत्रीला तो कालक्रमानुसार मांडून त्यातून एक सुसंगत चित्र सापडते का याची चाचपणी करतो.
सापडलेला सर्वात जुना पुरावा आणि सर्वात अर्वाचीन पुरावा यातून निश्चित झालेल्या कालपटावर ‘तुलनेने’ मोजक्या संख्येने असलेल्या पुराव्यांच्या साहाय्याने या पुर्या कालाचे चित्र रेखाटण्याचे आव्हान वैज्ञानिकांसमोर असते. दोन पाठोपाठच्या पुराव्यांच्या काळातही काही सहस्रकांचे अंतर असू शकते. यातील मधल्या काळात काय घडले असावे, हे केवळ अनुमानितच करता येते. त्या गाळलेल्या जागा तर्काने भरल्या जातात. याशिवाय पुराव्यांमध्येही विश्वासार्ह(३), महत्त्वपूर्ण कोणते याचा निवाडा वैज्ञानिकाला करावा लागत असतो. एकाने अविश्वासार्ह मानून सोडून दिलेला पुरावा दुसर्या वैज्ञानिकाने (कारणमीमांसेसह) विश्वासार्ह मानला, तर दोघांकडे अभ्यासासाठी असलेल्या पुराव्यांची संख्या नि संच वेगवेगळा असू शकतो. यातून दोघांच्या चित्राच्या तपशीलात फरक पडू शकतो.
हे काहीसे लेगो अथवा मेकॅनो या खेळासारखे आहे. तुम्ही वस्तू बनवण्यासाठी कोणते तुकडे निवडता नि कोणते सोडून देता यावर तुम्हाला कोणती वस्तू बनवता येईल ते ठरते. एकाने बस बनवली तर दुसरा कार बनवू शकतो. पण लेगोंचे वास्तव कारही नसते वा बसही. लेगोंच्या तुकड्यांचा तो पुरा संच हाच तुमच्या दृष्टिने वास्तवाच्या सर्वात जवळचा असतो. कार अथवा बस हे तुमच्या आकलनाच्या सोयीखातर, तुमची अभ्यासाची गाडी चालती करण्यासाठी बनवलेली प्रारूपे असतात इतकेच. जास्तीत जास्त लेगोचे तुकडे वापरून केलेली वस्तू ही त्यांच्या समुच्चय असलेल्या अज्ञात वास्तवाच्या अधिक जवळ असू शकते असे म्हणता येईल. पण त्यातही जोडण्याची क्रमवारी आणि ते जोडणार्याची कल्पकता यांचे हीण मिसळलेले असणारच.
पण लेगोचे तुकडे मोजके असतात, मानवी इतिहासाचा पल्ला प्रचंड आहे. त्यामुळे वैज्ञानिकांना अनुमानाच्या अधिकाधिक चांगल्या पद्धतींच्या सतत शोधात राहावे लागते. नवी, अधिक कार्यक्षम पद्धत सापडली, की जुन्या निरीक्षणांच्या आधारे नवे प्रारूप, नवी अनुमाने मांडली जातात. त्यांच्या आधारे भूतकालाचा, त्यातील घटितांचा नि प्रक्रियांचा अधिकाधिक नेमका वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो... माणसाच्या जिज्ञासेचा प्रवास असा अखंड चालू राहातो.
या लेखमालेचा उद्देश उत्क्रांतीचा वेध घेणे, विरोध करणे वा तिचे समर्थन करणे हा नाही. लाखो वर्षे चालू असलेल्या प्रक्रियेचे समर्थन अथवा विरोध करण्यापेक्षा सरळ ‘तेव्हा आणि आता’ अशा काळाच्या दोन तुकड्यांवर अथवा टप्प्यांमध्ये मानवी जीवन जसे दिसते, त्यांची तुलना करुन मधल्या प्रवासाच्या साहाय्याने कुठून कुठे पोहोचलो याचा अदमास घेण्याचा आहे. ‘ओडिसी’बाबतच्या पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे याची मांडणी एखाद्या जम्प-कटसारखी आहे.
उत्क्रांती-समर्थक असोत, अवक्रांतीचे समर्थक असोत की कुण्या देवबाप्पाने बुंदी पाडल्यासारखी अथवा मूर्तिकाराने बनवल्यासारखी माणसे बनवली असे मानणारे; या सार्यांचे एका मुद्द्यावर एकमत होऊ शकते. आणि ते म्हणजे माणूस एकदम नागरजीवी नक्कीच झाला नाही. जंगलजीवी ते स्थिर-जीवन ही वाट त्याला तुडवावीच लागली आहे. आणि ही प्रगतीची वाट ही निरीक्षण, अनुकरण, विश्लेषण, सुधारणा आणि निर्मिती या गुणांच्या साहाय्याने त्याने पार केली आहे.
इतर प्राण्याने केलेली शिकार पळवणे त्याने कदाचित तरसासारख्या प्राण्याकडून उचलले असेल, आरोग्याची समस्या निर्माण झाली की विशिष्ट वनस्पती शोधून ती खावी हे एखाद्या मार्जारकुलातील प्राण्याचे अनुकरण असेल, एखादे सावज शिकारीसाठी सोयीच्या ठिकाणी कसे हाकून न्यावे हे लांडगे, जंगली कुत्रे वा त्यांच्या कुण्या पूर्वजांकडून शिकला असेल. निवारा म्हणून गुहा शोधण्याऐवजी आपली ‘गुहा’ स्वत:च बांधण्याची कल्पना त्याने कदाचित घरटे बांधणार्या पक्ष्यांकडून घेतली असेल. दुसरीकडे डोंगर उतारावरून गडगडत जाणारा धोंडा पाहून चाकाची प्राथमिक कल्पना त्याच्या डोक्यात उमटली असेल. ‘ओडिसी’तील प्रसंगात दाखवल्याप्रमाणे हाडांचा वापर हत्यार म्हणून केल्यानंतर अन्य कोणत्या वस्तूंचे हत्यार अधिक परिणामकारक ठरेल हे त्याने वारंवारतेच्या प्रयोगातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असेल का? हे नि असे प्रश्न विचारुन मानववंशशास्त्रज्ञ त्यांचा वेध घेत राहतात.
याच धर्तीवर अर्वाचीन(modern) मानवाच्या प्रगतीच्या प्रेरणा कोणत्या? त्या प्राचीन मानवाच्या प्रेरणांशी कितपत जुळतात. निरीक्षण, अनुकरण, विश्लेषण, सुधारणा आणि निर्मिती या पलिकडे आणखी कोणती उद्दिष्टे अर्वाचीन मानवी जीवनात प्रेरक ठरत असतात. त्यांची प्राचीन मानवाच्या भावभावना, वृत्ती-प्रवृत्ती, कौशल्ये, दृष्टिकोन आदिंशी कितपत सांगड घालता येते असे प्रश्न विचारून त्यांना ‘हे चित्र आणि ते चित्र’ म्हणून परस्परांसमोर ठेवून तुलना करुन पाहता येईल. तेव्हा ‘माकड ते माणूस’ की ‘थेट माणूस’ हा वादाचा मुद्दा आपण वाद-संवादप्रिय भारतीयांवर सोडून आपण ‘तेव्हा’ नि ‘आता’ अशा निव्वळ निरीक्षणांच्या साहाय्याने काही आकलन होते का ते पाहू.
यातून कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाची अपेक्षा अर्थातच नाही. कोणतीही सैद्धांतिक मांडणी करण्याचा उद्देश नाही. त्यामुळे शास्त्रीय वा वैज्ञानिक चौकटीचाही विचार केलेला नाही. निव्वळ जिज्ञासा, त्याला अनुसरून निरीक्षणे आणि माफक विश्लेषण इतकेच करावे असे धोरण राखले आहे. विश्लेषणाचा भाग वगळला तर हे साधारणपणे पत्रकारितमधील रिपोर्ताजच्या व्याप्तीमध्ये बसेल असे वाटते.
अन्न, संरक्षण आणि मैथुन या प्राणिजगतातील मूलभूत गरजा मानल्या आहेत. जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला जिवंत राहण्यास अन्न लागते, प्यायला पाणी लागते या दोन गोष्टींच्या आधारे त्याचे पोषण होते. प्रत्येक प्राण्याचे अन्न आणि ते मिळवण्याच्या पद्धती भिन्न असतात. जंगलवासी अथवा आदिम मानवाचे अन्न कुठले होते, ते मिळवण्याच्या पद्धती कोणत्या होत्या, त्यांचा शोध त्याला कसा लागला असावा असे प्रश्न विचारता येतील.
मनुष्य सोडून जगातील यच्चयावत प्राणिमात्र पाण्याला तोंड लावून पितात, मानव हा एकच प्राणी पाण्याला तोंडाकडे घेऊन येतो. ही कृती प्रथम त्याने कोणत्या प्रेरणेने अथवा विचाराने केली असेल? शिकारीला आवश्यक असणारे मजबूत सुळे, जबडा, धावण्याचा वेग, धारदार नखे असे कोणतेही नैसर्गिक अवयव नसतानाही त्याला शिकारीची प्रेरणा कशी मिळाली असेल? त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्याने कसे अंगीकृत केले असेल? टोळी ते समाज हा स्थित्यंतराची प्रेरणा काय असावी?
मानवी जगण्याला पुरी वेटाळून राहिलेली ‘देव’ नावाची संकल्पना त्याला कशी स्फुरली असेल? त्यामागच्या प्रेरणा आणि तिच्या भूमिका कोणत्या? साहित्यिकांच्या लाडक्या हिंसा नि लैंगिकता या आदिम प्रेरणांपलिकडे(४) आणखी कोणत्या प्रेरणा होत्या ज्यांच्या साहाय्याने मानवाने आपली प्रगतीची वाट वेगाने पादाक्रांत केली? त्यातील कोणत्या प्रेरणांचे अवशेष वा रूपे आजच्या मानवात नि समाजात आजूनही आढळून येतात?
हे नि असे प्रश्न, त्या मागची जिज्ञासा आणि त्यातून माणसाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या सदरात केला जाणार आहे. या प्रवासादरम्यान माणसाने काय कमावले नि काय गमावले, त्या आदिम काळातील मानवाच्या वृत्ती-प्रवृत्तीच्या पाऊलखुणा आजच्या माणसांत दिसतात का? जनावरांहून असामान्य अशी बुद्धी लाभलेल्या माणसाने बौद्धिक प्रगती तर केलीच, पण ती करत असताना त्याचे आहार, वर्तन, समाज, संघर्ष, अधिवास, साधने कशी बदलली आहेत, त्यात आदिम काळातील माणूस आजही डोकावतो का? या प्रश्नांचा वेध घेणारे हे सदर, मानवी संस्कृतीच्या उगमाचा धाग एक जम्प-कट घेऊन थेट वर्तमानाशी जोडून पाहणारे.
- oOo -
(१) ‘उत्क्रांती ही वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे’ असे प्रतिपादन करणार्या एका पुस्तकाला नुकताच राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले(!) यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
(२) उदाहरणार्थ: पावसाचे अथवा एकुणच तपमानाचे वा बर्फवृष्टीच्या शक्यतांचे अनुमान करण्यासाठी वापरली जाणारी मॉडेल्स अथवा प्रारूपे.
(३) ‘पिल्टडाऊन मॅन’ या नावाने ओळखल्या गेलेल्या तथाकथित आदिमानवाची कवटी वास्तवात एका अर्वाचीन मानवाची आणि एका ओरांग उटानची कवटी यांच्या मिश्रणातून बनवण्यात आली होती. उत्क्रांतीवादाच्या समर्थकांना अडकवण्यासाठी लावलेला हा एक प्रकारचा सापळा होता असे मानले जाते.
(४) साहित्यिक भाषेच्या प्रेमात पडलेले याऐवजी चुकीने ‘पुनरुत्पादनाची किंवा आपल्यासारखा जीव निर्माण करण्याची प्रेरणा’ अशी वाक्यरचना करतात. परंतु मनुष्य सोडल्यास बहुतेक प्राण्यांना देहभोगातून अपत्य-जन्म होतो याची जाणीव असण्याइतपत प्रगल्भ बुद्धिमत्ता नसते. त्याची प्रेरणा देहभोगाचीच असते.
---
पुढील भाग >> अन्नं वै प्राणिनां प्राणा
उत्तम. याचे सगळे भाग आता पूर्ण कराच. उत्क्रांतीला strong probability दर्जा दिल्याबद्दल काही आक्षेप आहेत. भेटल्यावर अधिक बोलू - विशाल
उत्तर द्याहटवा