गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ६ : रंगांचे कोडे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

खेळ सावल्यांचा << मागील भाग

---

एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. ही वस्तू बिम्मने प्रथमच पाहिली. ते काय आहे नि त्याचा उपयोग काय असा प्रश्न चौकस बिम्मला पडला नसल्यासच नवल. तो एक पिंजरा आहे नि ते एका ’पिवळ्या’ पक्ष्याचे घर आहे.’ असे आईने त्याला सांगितले. मागच्या आवारात वा बागेत खेळताना त्याने अनेक पक्षी पाहिले होते, त्यामुळे त्याला पक्षी ठाऊक होते. पण आईने वापरलेला ’पिवळा’ हा शब्द, ही गोष्ट काय असावी असा प्रश्न त्याला पडला असेल. त्यातून वस्तू वा जीवमात्रांमध्ये दिसणारे रंग हे त्याच्या कुतूहलाच्या कक्षेत येऊ लागले असतील.

बिम्मच्या वयाचं मूल घरात रांगू लागतं, भिरभिर फिरु लागतं, घराबाहेर पाऊल टाकतं तेव्हा त्याला ते रंग दिसत असतात. तेव्हा रंग म्हणजे काय हे त्याला समजत नसले, तरी विविध गोष्टींचे वेगळेपण त्याच्या मनात नोंदले जात असेल. नीनमच्या- त्या पिवळ्या पक्ष्याच्या शोधात भटकताना बिम्मला वेगवेगळ्या रंगांचे पक्षी भेटले. त्यातून विविध रंगांची ओळख त्याला झाली. पण रंग हे काही फक्त पक्ष्यांनाच असतात असे नाही. आजूबाजूच्या सजीव-निर्जीव सर्वच गोष्टींना रंग असतात असे हळूहळू लक्षात येऊ लागते. ज्याप्रमाणे आईच्या बोलण्यात ’पिवळा’ हा शब्द पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणून आला, तसेच शर्ट, पिशवी, पडदे, उशीचे अभ्रे वगैरे गोष्टींच्या संदर्भात हिरवा, लाल, पांढरा, काळा वगैरे उल्लेख आले असतील.

CrowAndCuckoo
काक: कृष्ण: पिक: कृष्ण:

मग रंगाचे नाव नि वस्तू अथवा पक्ष्यांसारखे सजीव यांची सांगड बसू लागते. आतापावेतो तो रंग हीच पक्ष्याची ओळख असते. नीनम पिवळा होता, कोकीळ काळा होता, राघू हिरवा. ओळख सोपी होती. पण पुढच्या टप्प्यामध्ये ’कोकीळही काळा नि कावळाही काळा’ असे लक्षात येते. हा जरा गडबडीचा मामला होतो. पंचाईत अशी होते की दोघांनाही एकच रंग असेल तर या नावे वेगळी कशी? असा प्रश्न उभा राहतो. त्यातून त्याला वस्तू वा जीवापासून रंग हे वेगळे असे काही असते नि विविध वस्तूंमध्ये ते एकाच वेळी दिसू शकते याचे आकलन होऊ लागते. नीनमच्या शोधात भटकणारा बिम्मला ’भारद्वाज हा बदामी कोट घातलेला कावळा आहे’ असे म्हणतो किंवा ’साळुंकीची चोचच फक्त पिवळी का असते?’ असे प्रश्न पडतात, तेव्हा एकच रंग अनेकांत जसा दिसतो तसेच एका सजीव वा वस्तूंमध्ये एकाहुन अधिक रंगांची सरमिसळही असू शकते याचे आकलन त्याला झालेले असते.

त्यानंतर पडलेला प्रश्न असतो तो ’अमक्या वस्तूला, पक्ष्याला, प्राण्याला अमुकच रंग का असतो?’ म्हणजे ’कावळा काळाच का असतो, पिवळा का नाही?’ ’कोंबड्याचा तुरा लाल का असतो, हिरवा का नाही?’ ’ढगांत मात्र वेगवेगळ्या वेळी पांढरे नि काळे असे दोन रंग दिसतात, काहीवेळा आणखी मधला-अधला तिसराच रंग दिसतो. असे का?’ ’गायींना, कुत्र्यांना वेगवेगळे रंग एकाच वेळी मिळतात; पण म्हैस मात्र नेहमीच काळी का?’ असे प्रश्न निर्माण होत असतील. जीएंच्या बिम्मला हे प्रश्न पडले असणारच. यातील काही प्रश्नांची उत्तरे वय वाढून बसलेली मोठी माणसेही देऊ शकणार नाहीत. ती जिज्ञासा हरवलेले लोक कुण्या ’आकाशातील कर्त्याची मर्जी’ असे शरणागत वृत्तीचे उत्तर देऊन मोकळे होतात. पण जीए आपल्याला थेट यापुढील प्रश्नांकडे घेऊन जातात.

GreenCow
हिरवे गवत खाल्ल्यानंतरची गाय.

बिम्म वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतो. त्यासाठी त्याच्याकडे विविध रंगांचे, नक्षीचे एकाहुन अधिक बुशकोट, शर्ट वा चड्ड्या असतात. बिम्मला आई वा वडील शर्ट, चड्डी वा इतर गोष्टी आणून देतात. त्यातील हिरवा शर्ट चढवला की बिम्म हिरवा दिसू लागतो. त्याने पिवळा शर्ट घातला की तो त्या रंगाचा दिसू लागतो. पण त्याने पाहिलेले पक्षी वा प्राणी कायम एकाच रंगाचे कसे दिसतात. त्यांनाही ’कपडे’ बदलावेसे वाटत नसावेत का? हे कुतूहल डोके वर काढते. एखादी गाय वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रंग परिधान करते का? आणि ’गायीला रंग बदलावासा वाटला तर ती कसा बदलत असेल?’ असा एक प्रश्न डोक्यात येऊन त्याचे उत्तर बहुधा त्याच्या मनात तयार होत असावे. गायीच्या अंगावर नवा रंग चढायचा असेल वा तयार व्हायचा असेल, तर बिम्मच्या शर्टप्रमाणे बाहेरून चढवायला हवा. मग आता गायीला तो कशाकरवी मिळावा? थोडक्यात या गायीला ’शर्ट’ कसा चढवायचा?

हे प्रश्न गायीसंदर्भात पडले आहेत. मग त्यांची उत्तरेही तिलाच ठाऊक असायला हवीत. आणि उत्तरे गायीने द्यायची म्हणजे ती प्रथम बिम्मच्याच डोक्यात तयार व्हायला हवी हे ओघाने आलेच. त्यामुळे तिची कल्पनाशक्तीही बिम्मसारखीच स्वैर फिरत असते. ती त्याला सांगते की गवत खाऊन ती हिरवी होते. मग तो घालवण्यासाठी कुरकुरीत ऊन खाल्ले की तिला पिवळा रंग मिळतो.

बिम्म बाहेरुन शर्ट चढवतो नि आपला रंग बदलतो. आता बाहेरून गायीकडे (पोटात) काय जाते तर अन्न. मग अन्नाच्या रंगानुसार तिचा रंग बदलायला हवा. म्हणजे बघा, गाय कडबा खाते, गवत खाते. कडबा पिवळा असतो, गवत हिरवे असते. हे दोन्ही गायीच्या पोटात जाते तेव्हा हे रंग कुठे जाणार ? बिम्मने हिरवा शर्ट परिधान केल्यावर तो हिरवा दिसू लागतो. तसे हिरवे गवत खाल्लेली गायही हिरवी व्हायला हवी असा निष्कर्ष बिम्मच्या मेंदूने काढलेला दिसतो. कृती आणि परिणामांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न त्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत असतो.

पण हे हिरव्या नि पिवळ्या रंगाचे झाले. तिच्या अंगावर आधीच असलेला तपकिरी, पांढरा हे रंग कुठून मिळाले? तसंच ती कधी काळी होते का? असे आनुषंगिक प्रश्नही जिज्ञासू बिम्मला पडलेले आहेत. त्यावर गायीच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना भरपूर अंधार पिऊन घेतला की ती काळी होते नि झोपते. पण तोवर अंधार पडल्याने आणि रात्री आई बाहेर जाऊ देत नसल्याने साहजिकच बिम्मला ती दिसत नाही.

गाय अंधारात बसते तशीच ती उन्हात हिंडते. ती ज्या परिसरात असेल त्याचा पिवळा वा काळा रंग ती लेवून राहात असते. माणसाच्या पिलाचेही असेच नसते का? ज्या आई-वडिलांच्या छत्राखाली ते राहते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, संस्काराचे रंग घेऊन ते वाढत असते. पुढे खेळगडी, शाळेतील शिक्षक, ज्या समाजात वा गावात राहते तो समाज वा गाव यांच्या धारणा, अस्मिता-अभिमान व वारशाचे रंग घेऊनच ते वाढत असते. उन्हासाठी पिवळी नि अंधारासाठी काळी असणार्‍या गायीसारखे ते आई-वडिलांचे मूल असते, बहिणीचा भाऊ असते, शाळेत विद्यार्थी असते, झुंडीत त्या त्या जातीचे अथवा धर्माचे असते, बायकोचा नवरा होते, मुलाचे वडील होते... आयुष्यभरात असे वेगवेगळे रंग त्याला परिधान करावे लागत असतात. जिथे जो रंग आवश्यक वा सोयीचा असतो तो परिधान केला जात असतो.

रंगांची ओळख होत असताना आगेमागेच बिम्मला आकार (shape), व्याप्ती (size), परिमाणे (dimensions) आणि इतर पैलू (aspects) यांच्याबाबत समज वाढू लागते. फक्त रंगाचा विचार केला तर काळा पक्षी दिसला की तो कावळा असतो, कोकीळ असतो वा भारद्वाज. पण त्यांच्यामधील सर्वात लहान आकाराचा किंवा लहान चोचीचा पक्षी हा कोकीळ, त्याहून थोडा मोठा नि जाड चोचीचा हा कावळा आणि आकाराने सर्वात मोठा- लांब शेपटी असलेला नि भगवा कोट घातलेला तो भारद्वाज अशी ओळख पटवली जात असते. कोकीळ नि कावळा यांचे आकार सारखे असते, तर त्यांच्या तोंडून येणारा ध्वनी हा आणखी एक निकष वापरून त्यांची ओळख पटवता आली असती. या कोकीळाच्या बायकोचा धूर्तपणा ध्यानात येण्यासाठी बिम्मला पुढे शाळेत पाऊल ठेवावे लागते. तिथे कदाचित तो-

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद: पिककाकयो:।
वसन्तकाले सम्प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।।

-हे सुभाषित शिकणार असतो. पण त्यापूर्वीच त्या दोहोंतला भेद केवळ निरीक्षणाने त्याला समजलेला असतो.

कावळा नि कोकीळाप्रमाणेच रेडाही काळाच असतो, पण दोहोंचा आकार नि परिमाणे वेळी असतात. उडण्याच्या कौशल्याच्या आधारे फरक करायचा, तर राजकारणातील त्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ’उडाला तो कावळा, खाली राहिला तो रेडा’ असे म्हणता येईल. गोळाबेरीज ही की ’रंग हे सजीव-निर्जीवांच्या अंगभूत वैशिष्ट्यांपैकी केवळ एकच वैशिष्ट्य आहे’ हे बिम्मच्या आकलनात रुजत जाते.

या सार्‍या चक्षुर्वैसत्यम्‌ गुणवैशिष्ट्यांपलिकडच्या- म्हणजे सजीवांच्या नि विशेषत: मनुष्यप्राण्यांच्या अन्य ज्ञानेंद्रियांच्या कक्षेतील गुणवैशिष्ट्येही हळूहळू जाणीवेत मुरत जात असतात. डोळे, नाक, कान, स्पर्श आणि जिंव्हा या पाच ज्ञानेंद्रियांच्या खिडक्यांतून माणसाला त्याच्या जगातील माहिती वा ज्ञानाची ओळख होत असते. मुख्य वाटा अर्थातच डोळ्यांचा नि कानांचा. रंग, आकार, व्याप्ती हे या डोळ्यांनीच अनुभवण्याचे पैलू. यांचे दर्शन माणसाच्या पिलाला अगदी जन्मापासून होत असले तरी आकलन थोडे उशीरा होत असते. त्या पूर्वी जाणीवेच्या कक्षेत येते ती चव. कारण आहार हा जन्मापासूनच सुरू होतो.

RawMangoAndGuava
कैरी हिरवी, पेरूही हिरवा

पक्ष्यांच्या रंग-रूपाबाबत बिम्मला जे प्रश्न पडले आहेत काहीसे तसेच प्रश्न फळांच्या संदर्भात पडले असल्यास आश्चर्य नाही. कावळा नि कोकीळ जसे एकाच रंगाचे, तसेच फळांमध्येही पेरूही हिरवा नि कैरीही हिरवी असल्याने दोघांत फरक कसा करायचा? पक्ष्यांप्रमाणे हे दोघे काही ध्वनी निर्माण करत नाहीत. त्यामुळे तो निकष बाद आहे. आकार हा निकष वापरला जाऊ शकतो, परंतु एकाच जातीचे प्रत्येक फळ चोख एका आकाराचे वा व्याप्ती असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे हे दोन निकष पुरेसे नाहीत. पण हे दोन्ही ’खाद्य’ असल्याने त्यांची चव हा आणखी एक नवा निकष बिम्मला उपलब्ध होतो आहे. मग हिरवा पेरू नि हिरव्या कैरीच्या या भेदावर संस्कृत जाणणारा एखादा बिम्म वर दिलेल्या सुभाषिताच्या धर्तीवर एखादे सुभाषित लिहूनही काढेल कदाचित.

पण बिम्मच तो. मग त्याला पुढचे प्रश्न पडू लागतात. (सर्वच मुले इतकी जिज्ञासू असतील तर काय बहार येईल.) फळे झाडावर जन्माला येतात नि वाढतात हे त्याने पाहिले आहे. पण नारळाचे झाड वेगळे, पेरूचे वेगळे नि आंब्याचे आणखी वेगळे. आता बिम्मला ही सारी फळे खायची असतील तर दारी फळे तितकी झाडे लावावी नि वाढवावी लागतील. हे फारच कष्टाचे काम झाले ना. पण प्रश्न असा की एकाच झाडावर कैरी, संत्रे, सफरचंदे अशी सारीच फळे आली तर काय बहार होईल. तेवढे एकच झाड सांभाळले की झाले.

आता गायीच्या रंगाचे कोडे गायीकडूनच सोडवून घ्यावे लागते तसेच फळझाडाबद्दलचा प्रश्न एखाद्या फळझाडानेच सोडवायला हवा. मग बिम्मने आपला हा प्रश्न परसातल्या आंब्याच्या झाडाकडेच नेला. हे झाडही गायीसारखेच मिश्किल असल्याने ते बिम्मला सांगते, ’मला सगळीच फळे येतात. फक्त ती सारी कैरीसारखीच दिसतात. तुला संत्रे खायचे असेल तर एक कैरी तोड, ती खाताना डोळे मिटून घे नि आपण संत्रे खात आहोत असे समज. मग तुला ती संत्र्यासारखी लागेल.’

आता हा किस्सा, हा प्रसंग एवढाच आहे. पण ते उत्तर मार्मिक आहे. फळ हे खाद्य आहे. तेव्हा त्याची चव हेच त्याचे व्यवच्छेदक तसंच दखलपात्र वैशिष्ट्य आहे. आकार वा रंग कोणताही असला तरी जोवर चव तीच आहे तोवर त्या फळाची ओळख अबाधित राहाते. तीच बाब बहुतेक खाद्य म्हणून वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक उत्पादनांची. म्हणूनच आज तथाकथित सेंद्रिय उत्पादनांच्या काळात हिरव्या रंगाला सोडचिठी देऊन पिवळी, लाल, जांभळी वस्त्रे परिधान केलेली ढोबळी/सिमला मिरची आपली मूळ ओळख राखून असते.

दुसरा अर्थ असा की वास्तव जगामध्ये अनेकदा प्राप्य ते साध्य नसते. अशा वेळी जे साध्य असते त्याच्यावरच प्राप्य असण्याचा शिक्का मारून समाधान करुन घ्यावे लागते. आकांक्षांना मुरड घालण्याची सुरुवात त्या वयातच व्हावी लागते.

MultiFruitTree
अनेक फळांचे पोशिंदे झाड

एखादा वय वाढूनही बिम्मची जिज्ञासा न सोडलेला कुणी यातून असा प्रश्न विचारेल, की ’जर सर्व फळांना पोसणारे जीवनद्रव्य एकच असते तर त्यांना पोसणारे झाड एकच का असू शकत नाही?’ पण वय वाढते तसे वैशिष्ट्यांपेक्षा विभागणीकडे माणसांचा कल वाढत जातो आणि जिज्ञासेचा मैलाचा दगड मागे सोडून तो पुढे धावू लागतो. मग तो ’आंब्याचे झाड लावू की संत्र्याचे?’ असा परिस्थितीशरण प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतो.

माणसाच्या जीवनप्रवासात बिम्मच्या वयात असतानाच अधिक प्रश्न पडतात. त्यांची मोठ्यांनी दिलेले उत्तरे बहुधा पटत नसतात. मग तो आपल्या तत्कालीन मर्यादित बुद्धिनुसार, आकलनानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ’काळा म्हणजे अशुभ आणि पांढरा म्हणजे शुभ’ किंवा ’अमुक रंग हा विशिष्ट व्यक्तिला अधिक लाभ देणारा (लकी) असतो’ वगैरे माणसाने रंगांचे केलेले अशास्त्रीय मूल्यमापन त्याच्या जाणीवेमध्ये अद्याप पोहोचलेले नसते. तिच्या निरभ्रतेला तो तडा जाण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागणार असतो.

पुढे संस्कार नि शाळा यांसारख्या बाबींचे जू खांद्यावर बसले, की प्रश्न पडणे कमी होत जाते आणि पिवळा सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर नाहीशा होणार्‍या गायीच्या हिरव्या रंगासारखी जिज्ञासाही विरून जाते आणि एका दारी येणार्‍या आंब्याच्या पेटीतले आंबे झाडावर तयार होतात की कुठल्या कारखान्यात याबाबतही बिम्म उदासीन होत जातो.

FruitSalad
शहरी बिम्मची फळांशी नि रंगांशी होणारी ओळख: फ्रूट सॅलड

जीएंच्या बिम्मला पक्ष्यांच्या निमित्ताने रंगांचे कोडे पडले आहे. आकाराचे कोडे अप्रत्यक्षपणे ’प्रतिबिंबांचे प्रश्न’ मध्ये पडलेले आहे. चवीचे कोडे आंब्याच्या झाडाने सोडवले आहे. पण गंधाचे कोडे मात्र जीएंच्या बिम्मला पडलेले दिसत नाही. बिम्मच्या बखरीमध्ये तो एका टप्पा राहून गेला आहे.

(क्रमश:) पुढील भाग >> अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन     

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा