(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)
पाऊस << मागील भाग
---
काही वर्षांपूर्वी ‘सिंडरेला’ या गाजलेल्या परीकथेवर आधारित एक चित्रपट पाहिला होता. मध्यरात्रीचे टोले ऐकून घाईने निघून गेलेल्या सिंडरेलाचा काचेचा(१) बूट निसटून पडतो. तिच्या प्रेमात पडलेला राजपुत्र तो घेऊन तिचा शोध घेण्याचा मनोदय जाहीर करतो. ‘इतक्या सार्या प्रजेमध्ये हा बूट कुणाचा असेल हे कसे शोधणार?’ या प्रश्नावर राजपुत्र म्हणतो, ‘Every shoe has a foot that fits.’ आणि तो त्या बुटाच्या मालकिणीच्या शोधात निघतो.
आज भांडवलशाहीच्या जमान्यामध्ये विशिष्ट व्यक्तिच्या पायाच्या नेमक्या मापानुसार पादत्राणे, बूट शिवणारे चर्मकार दुर्मिळ झाले आहेत. पावलांच्या निव्वळ लांबीवरून बारा-चौदा आकारांत ठोक वर्गीकरण करून जगभरातील सर्व माणसांसाठी पादत्राणांचे घाऊक उत्पादन करणार्या ‘उत्पादकांनी’ त्यांची जागा घेतली आहे. दुसरीकडे अगदी लहान शहरांतूनही एखाद्या विशिष्ट बुटाशी सोयरिक करू शकतील अशी शेकडो ‘पावले’ सापडतील. त्यामुळे एखादा बूट हाती घेऊन आपल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात निघालेल्या त्या प्रिन्स चार्मिंगची कदाचित एखाद्या ‘क्रुएला’शी(२) गाठ पडण्याची शक्यता आहे.
परंतु तुम्ही बिम्मच्या वयाचे असता, तेव्हा तुम्हाला जगाच्या या व्यापाची फारशी समज नसते. त्यामुळे त्या वयात सिंडरेलाची कथा वाचलेली असो वा नसो, ‘या बुटाची मालकीण कोण?’ असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पडू शकतो का– पडलाच होता. एकदा त्याला एक पितळी किल्ली सापडली. त्याने ती घरातील प्रत्येक कुलुपाला लावून पाहिली. पण तिने कुठलेच कुलूप उघडेना. शेवटी तो आईकडे आला नि म्हणाला ‘आई, या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’
पुस्तकामध्ये बिम्मचा हा प्रश्न वाचल्यावर वाचणार्याच्या चेहर्यावर हमखास हसू फुटते. ‘दाराच्या कुलुपाची किल्ली कुठे पाहिलीस का?’ ‘माझ्या गाडीची किल्ली...’ ‘तिजोरीची किल्ली...’ असा किल्लीचा परावलंबी उल्लेख ऐकण्याची आपल्याला सवय असते. आपल्याला कपाट उघडायचे असते, गाडी चालू करायची असते, तिजोरीमध्ये पैसे ठेवायचे वा त्यातून काढायचे असतात... म्हणून आपण त्या त्या वस्तूची किल्ली शोधतो. हे प्रश्न आपल्याला परिचित असल्याने, ‘या किल्लीचे कुलूप कुठे आहे?’ हा उलट प्रश्न हास्यास्पद असल्याचा ‘प्रथमश्रवणी’ ग्रह होत असतो. असा विचार करणार्या बिम्मला आपण हसत असतो. काचेचा बूट घेऊन आपल्या प्रेमिकेला शोधत जाणार्या राजपुत्राची कथा परीकथा– अवास्तव म्हणून सोडून देत असतो.
पण बिम्मचा हा हास्यास्पद वाटणारा प्रश्न तुम्हीही कधी न कधी, वेगळ्या संदर्भात विचारलेला असतो. फक्त तो तुमच्या ध्यानात आलेला नसतो. किल्ल्यांच्या जुडग्यामध्ये, किल्ली ठेवण्याच्या बोर्डवर अथवा ड्रॉवरमध्ये एखादी अपरिचित किल्ली दिसली तर ‘ही कशाची– कुठल्या कुलुपाची किल्ली आहे?’ असे आपण विचारतो ना? प्रश्न तोच असला, तरी रोख उलट असतो. ‘हिने एखादे कुलूप उघडत असेल तरच तिचा उपयोग, एरवी ती इथे का सांभाळून ठेवली आहे?’ असा या प्रश्नाचा रोख असतो. यात किल्ली ही दाराच्या कुलुपापेक्षा, गाडीपेक्षा, तिजोरीपेक्षा दुय्यम, परावलंबी वस्तू मानली जाते. तिच्या अस्तित्वाचे कारण तिचे उपयुक्ततामूल्यच हेच असते, आणि ते मूल्य या अन्य वस्तूंच्या संदर्भातच निश्चित होत असते.
माणसांच्या बहुतेक समाजांत स्त्रीची ओळख तिच्या पुरुषाची जोडीदार इतकीच असते. तिला स्वतंत्र ओळख या सामाजिक व्यवस्था देत नाहीत. जिच्या पोटी मूल जन्माला आलेले नाही, अथवा येऊ शकत नाही, अशा विवाहित स्त्रीचे अथवा पतीचे निधन झाल्याने निरूपयोगी(!) ठरलेल्या स्त्रीचे सामाजिक स्थान शून्य होऊन जाते. आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या, समाजाच्या अर्धा हिस्सा असलेल्या जिवांकडे अशा दृष्टीने पाहिले जाते, तिथे किल्लीसारख्या जड वस्तूंकडे याच दृष्टिकोनातून पाहिले जाणार हे उघडच आहे.
पण हे संस्कारांचे, व्यवस्थांचे जोखड मानगुटी बसण्यापूर्वी तुम्ही बिम्म असता. या संस्कारांनी, व्यवस्थांनी लादलेल्या तयार उत्तरांच्या वैचारिक शृंखला अद्याप तुमच्या मेंदूंना वेटोळे घालू शकलेल्या नसतात. अनुभवांना नाकारून, पोथ्यांना वास्तव मानून चालण्याची झापडबंद वृत्ती अद्याप पुरेशी प्रबळ झालेली नसते... जगण्याने समोर ठेवलेल्या प्रश्नांना भिडण्याची तुमची तयारी असते.
बिम्मच्या वयात स्वार्थ समजू लागला असला, तरी व्यक्तिनिरपेक्ष अशी ‘मालकी हक्क’ ही संकल्पना फारशी ठळक झालेली नसते. त्यामुळे ही किल्ली दुसर्या कुणाच्या कुलुपाची असेल, ही शक्यता त्याच्या डोक्यात येणे अवघड आहे. त्याच्या विचारशक्तीवर अद्यापही जिज्ञासेचा बराच प्रभाव शिल्लक असतो. त्यामुळे हा उलट शोध बिम्मला घ्यायचा असतो.
प्रत्येक कुलुपाला किल्ली असेल, तर प्रत्येक किल्लीचे एक कुलूप असणारच की! किंबहुना कुलूप आधी तयार होणार नि नंतर त्याच्यासाठी किल्ली बनवली जाणार हे उघड आहे. त्यामुळे प्रत्येक किल्लीला तिचे असे एक कुलूप असायलाच हवे. मग एखाद्या कुलुपाची हरवलेली किल्ली शोधण्यात हसण्याजोगे काही नसेल, तर एखाद्या किल्लीचे कुलूप शोधण्यात हसण्यासारखे काय आहे? न जाणो, काचेच्या बुटाची मालकीण शोधताना एखाद्या बिम्मला एखादी सिंडरेला भेटेलही.
बिम्मच्या या प्रश्नासारखे इतर काही प्रश्न तुमच्या बिम्मपणीही परिचयाचे असतात आणि ते उपयुक्तही असतात. उदाहरणार्थ, ‘अमुक शर्ट कुणाचा आहे, बिम्मचा की त्याच्या बाबांचा?’ या प्रश्नामध्ये शर्ट हा एखाद्या किल्लीसारखा किंवा सिंडरेलाच्या बुटासारखा नाही का? तो बिम्मचा असेल तर तो बाबांच्या अंगावर बसणार नाही. म्हणजे तो त्या कुलुपाची किल्ली नाही. त्यामुळे तो शर्ट जर नीट घडी करून कपाटात ठेवलेला नसेल, तर त्याबद्दल बिम्मला रागे भरावे की बाबांना, हे आईला समजते की नाही? शर्टऐवजी तिथे एखादा फ्रॉक असेल, तर तो या दोघांचाही नसून बब्बीचा आहे, हे आईला ठाऊक असते की नाही? म्हणजे एकप्रकारे ‘किल्ली पाहून याचे कुलूप कुठले’ हे आई ओळखते की नाही?
आता तुम्ही म्हणाल,“पण या ‘किल्ल्या’ अनेक कुलुपे उघडतात. तसंच एका कुलुपाच्या एकाहुन अधिक किल्ल्या असतात/असू शकतात. बिम्मचा शर्ट त्याच्याच अंगकाठीच्या एखाद्या मुलाला– अथवा मुलीलाही वापरणे शक्य आहे. त्यामुळे हे एकास-एक नाते नाही.” पण बिम्म प्रत्येक किल्लीला कुलूप असण्याबद्दल बोलतो आहे. ‘एकही किल्ली अनाथ नाही, तिला ‘किमान’ एक कुलूप असते. आणि हे खरे असल्याने ते कोणते आहे?’ असा त्याचा प्रश्न आहे. ‘ती एकच किल्ली एकाहुन अधिक कुलुपे उघडते का?’ याबद्दल तो बोलत नाही. कदाचित तो प्रश्न त्याला अजून पडलेला नाही. एक अनायासे हाती आलेली किल्ली असे एकाहुन अधिक प्रश्न तुमच्यासमोर उभे करू शकते, त्यांना सामोरे जाण्याची तयारी मात्र हवी.
You-Tube वा त्यासारख्या व्हिडिओ-शेअरिंग साईट्सवर मांजरांचे, माकडांचे वा अन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सापडतात. त्यातील काहींमध्ये त्यांना आरशासमोर अथवा टीव्हीसमोर उभे केले असता त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होतात त्या टिपलेल्या असतात. त्यामध्ये आरशाच्या, टीव्हीच्या वा संगणकाच्या पडद्याच्या मागे डोकावून पाहणे ही एक प्राधान्याने दिसते.
प्रत्येक गोष्टीला, सजीवाला पुढची, समोरची बाजू असते तशीच मागची बाजूही असणार असा सामान्य प्राण्यांचा कयास असतो. कारण ते कायमच त्रिमित जगात जगत असतात. संस्कारांनी, शिक्षणाने विचाराची एक मिती नाहीशी करून आरसा वा संगणकासदृश द्विमितीमध्ये फिरणार्या मानवी दृष्टिकोनाशी त्यांचा फारसा परिचय नसतो. त्यामुळे आरशात दिसणारा सजातीय प्राणी तिथे आहेच असे समजून एखादे मांजर अथवा कुत्रे त्या आरशाच्या मागे जाऊन पाहात असते. टीव्हीच्या पडद्यावरून दिसेनासा झालेला एखादा प्राणी त्याच्या मागे कुठे दडला आहे, हे ती मांजर वा कुत्रे डोकावून पाहात असते.
माणूस हा प्राणी मात्र बहुतेक वेळा जे आणि जेवढे पाहातो, ऐकतो तेवढेच तंतोतंत खरे मानून चालतो. त्याच्या रूपाचे पुरे आकलन होण्यासाठी विश्लेषण-विचाराच्या साहाय्याने त्याची पाठीमागची बाजू तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. विचार करून पाहा– ‘समोर दिसणार्या जगातील नियमांच्या उलट असेल तर काय घडेल?’ किंवा ‘आपण अनुसरतो त्या क्रियांचा क्रम बदलला, उलट करून पाहिला तर परिणाम काय असेल?’ असा विचार तुमच्या मनात येऊन किती दिवस झाले?
हा एक व्हिडिओ पाहा. ब्राझीलमध्ये घडलेली घटना आहे ही. अर्थात त्या विशेष आहे असे नाही. कारण हैदराबादपासून पंजाबपर्यंत अनेक ठिकाणचे अगदी नेमक्या याच प्रकारे अडचणीत सापडलेल्या मुलांचे व्हिडिओ मी पाहिले आहेत.
मांजर, कुत्रे अथवा मूल खिडकीच्या, जिन्याच्या गजांमध्ये आपले डोके अडकवून घेणे हा देशोदेशी पसरलेला ‘आजार’ आहे. पश्चातबुद्धीने पाहिले, तर सोपा वाटणारा त्यावरील उपाय बहुतेकांना बराच उशीरा सापडलेला दिसतो.‘जिथून डोके आत गेले, तिथूनच ते बाहेर काढावे लागेल’ या धोपटमार्गी विचाराने यातील बहुतेक वय वाढलेले चकले आहेत. पठडीबाज विचार म्हणायचा तो हा. डोके मागे ओढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी उरलेल्या शरीराला डोक्याकडे पाठवावे हे उत्तर सुचण्यास बहुतेकांना बराच वेळ गेला आहे... ब्राझीलमधील या वडिलांना तब्बल दोन तास लागले.
बिम्मच्या वयात असताना कदाचित त्याच्यामध्ये ते कुतूहल, ती जिज्ञासा, तो पर्यायी विचार (lateral thinking) जिवंत असेल. पुढे संस्कार-शिक्षणाची झापडे लागली, विचारांची पठडी निश्चित झाली की त्याला नजरेच्या टप्प्यात आहे तेवढेच पाहण्याची, एखाद्या घोड्याप्रमाणे त्या चाकोरीतूनच पुढे जाण्याची सवय अंगवळणी पडून जाते. त्याचबरोबर त्याची जिज्ञासाही त्या घोडागाडीच्या चाकांवर लावलेल्या लोखंडी धावेसारखी जणू त्या एका केंद्राभोवती फिरत राहते.
आपल्या संस्कार-शिक्षणाचा उद्देशच मुळी तुमच्या-आमच्या मनातील ही स्वतंत्र, पर्यायी विचारांची शक्यता खुडून तुमच्या विचारक्षमतेला एका पठडीमध्ये बांधून घालण्याचा असतो असे म्हणता येईल. त्यामुळे या ‘पर्यायी विचारा’साठी तुम्हा-आम्हाला खास क्षमता विकसित करावी लागते.
लहानांच्या परीकथांमधे वा मोठ्यांच्या भयकथा वा गूढकथांमधे – ज्यांना अलीकडे हास्यास्पद शौर्यकथांचे स्वरूप आले आहे– अवास्तव असे भौतिक नियम आपण पाहतो. त्यात अमानवी अथवा अलौकिक पातळीवर जगणारे हीरो, त्यांचे विरोधक अथवा व्हिलन, चित्रविचित्र प्रकारचे प्राणी वगैरे गोष्टींबाबत वगैरेंबाबत आपण वाचतो वा पाहतो. परंतु ‘ते जग आपले नाही, वास्तव नाही’ याची पक्की खूणगाठ आपल्या मनात बांधलेली असते. त्यामुळे आपल्या अनुभूतीच्या वा विचार-मूल्यमापनाच्या पातळीवर ते कधीच येत नाहीत.
पण बिम्मसारख्या ‘शेजारघरच्या मुला’च्या (a boy next door) बाबतीत आपण हे वाचतो, तेव्हा ते सारे आपल्या अगदी जवळचे भासते. आता त्याच्याकडे पाहण्याचा, त्याबाबात विचार करण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो. मग आपण सापडलेल्या एखाद्या किल्लीचे कुलूप कुठले असावे असा विचार करून पाहतो, आसपास दिसणार्या विविध रंगांच्या उत्पत्तीचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करून पाहातो. पक्ष्याचा नि पिंजर्याचा आकार यांचा मेळ बसत नसेल, तर दोहोंपैकी एकाच्या आकारमानानुसार दुसरा आणण्याऐवजी पक्ष्याला पिंजर्याच्या आकाराचे होण्यास भाग पाडतो आणि उडणार्या नव्हे तर ‘उडवणार्या’ पतंगाला लटकून आभाळाची सैर करून येतो.
बिम्म वयाने वाढतो, यथावकाश बाबांच्या वयापर्यंत पोहोचतो, तोवर एका बुटाच्या आधाराने माणूस शोधण्यामध्ये असलेली यशाची नगण्य शक्यता त्याला जाणवू लागलेली असते. त्याचबरोबर तिच्या आधारे लिहिलेल्या परीकथेतला त्याचा रसही संपून गेलेला असतो. ‘पिनोकिओ’सारखा एखादा लांबनाक्या बिम्म तर सिंडरेलाच्या कथेला ’हुं: मेलोड्रामा सगळा.’ म्हणून उडवूनही लावतो. एका दुबळ्या धाग्याच्या आधारे गमावलेल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचण्यातली असोशी, जिद्द वा प्रेम त्याच्या जाणिवेतून हद्दपार झालेले असते. जगण्याऐवजी आता त्याची वाटचाल जिवंत राहण्याकडे, चोख व्यावहारिक जिण्याकडे वळलेली असते. माणसाचा पुन्हा मनुष्यप्राणी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते.
(क्रमश:) पुढील भाग >> (आगामी)
-oOo-
(१). तो काचेचा असण्यातही एक औचित्य आहे का? असा एक प्रश्न मला पडलेला आहे. जगभरातील सर्व समाज, सर्व काळ चामड्यांचीच पादत्राणे वापरत आलेला आहे. मानवी संस्कृतीच्या उदयकाळात शिकारी मानवाला वस्त्रप्रावरणांसाठीही चामडेच उपलब्ध नि उपयुक्त असे. त्यामुळे पादत्राणेही चामड्याची असणे अपरिहार्यच होते. परंतु आज प्रगत मानवी समाजातही - प्रक्रिया केलेले का होईना- चामडेच वापरले जाते हे विशेष
या खेरीज काच हा पदार्थ बव्हंशी मानवनिर्मित आणि तसा प्रकृतीने नाजूक असल्याने पादत्राणांसाठी सर्वस्वी निरुपयोगी. पण सिंडरेलाच्या कथेमध्ये हा उल्लेख महत्त्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणी त्या कथेचे शीर्षकच मुळी ‘ द लिट्ल ग्लास स्लिपर’ असे आहे. इसवी शतकाच्या सुरूवातीला ग्रीक तत्त्वज्ञ स्ट्राबोच्या लेखनात तिचे आद्य रूप सापडते. त्यानंतर या कथेची विविध रूपे जगभरातील अक्षरश: प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये लोकप्रिय झालेली आहेत.
(२). क्रुएला डी’विल: डोडी स्मिथ हिच्या ‘हंड्रेड अँड वन दाल्मेशिअन्स’ या कादंबरीतील एक प्रमुख पात्र. ज्यांचे बाह्यरूप आवडले अशा प्राण्यांना ठार मारून त्यांच्या कातड्यांपासून विविध प्रकारची वस्त्र-प्रावरणे व आभूषणे तयार करून मिरवणारी स्त्री.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा