राजकारणात असो की व्यावसायिक क्षेत्रात, एका पार्टीच्या दोन पार्ट्या झाल्या की नकळत आपण म्हणजे समाज एका बाजूला झुकतो. अमुक एक हाच खरा वारसदार असे आपण समजू लागतो. पुढे हाच प्रगती करेल नि दुसऱ्या बाजूला माघार घ्यावी लागेल, असा काहीसा आपला होरा असतो. अनेकदा यात त्या त्या व्यक्तीची जाहीर छबी किंवा त्याने उभी केलेली आपली प्रतिमा यांचा मोठा वाटा असतो किंवा आपल्या विचारात संस्कृती वा परंपरा यांच्या रूपाने रुजवलेले पूर्वग्रह असतात.
भारतातील बहुतेक राजकीय पक्ष हे एकचालकानुवर्ती कार्यपद्धती असलेल्या घराणेशाहीवरच चालतात. पक्षाच्या प्रमुख नेत्याचा मुलगा, मुलगी, पत्नी, नातू, अजून शेंबूड पुसता न येणारा पणतू हे त्याचे जन्मसिद्ध वारस मानले जातात. ‘एन. टी. रामाराव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी वा मुलगा हेच त्यांचे वारस असतील. चंद्राबाबू नायडू या त्यांच्या जावयाला पारंपरिक भारतीय मनात असणाऱ्या त्या सहानुभूतीच्या लाटेपुढे टिकाव धरता येणार नाही’ असे म्हणणाऱ्यांना आणि आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना संपूर्ण धोबीपछाड देऊन चंद्राबाबूंनी आपला पक्ष काढला, इतकेच नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्रीपदही भूषवले. एन. टी. आर. यांच्या पत्नीचा ‘मूळ’ पक्ष अखेर चंद्राबाबू यांच्या पक्षात विलीन होऊन संपला! एन.टी.आर. यांच्या मुलांना तर राजकारणात बस्तानच बसवता आले नाही. अशीच किमया तमिळनाडूमध्ये जयललिता यांनी अण्णाद्रमुकबाबत साधली. मात्र चंद्राबाबूंनी आंध्रात केलेली किमया राज ठाकरे यांना महाराष्ट्रात साधली नाही.
![]() |
जरी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मिळालेली ‘पुढे चाल’ आणि आयता मिळालेला पक्ष या दोन गोष्टी उद्धव यांना मिळालेल्या असल्या, तरी त्यांनी युती तोडूनही आपल्या आमदार संख्येत केलेली वाढ आणि त्याच वेळी राज ठाकरे यांना निवडणुकीच्या राजकारणातच नव्हे, तर एकूणच राजकारणातच आलेले अपयश पाहता, हा होरा चुकला आहे हे पुराव्यानिशी म्हणता येते. आता एक बाजूला, मोदी लाटेने भारावून जाऊन लोकसभेच्या वेळी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन आत्मघात ओढवून घेणारे राज ठाकरे आहेत, तर दुसरीकडे भाजप हाच किंवा निदान हाही आपला प्रतिस्पर्धीच आहे हे ओळखून त्याला कायम शिंगावर घेण्याची भूमिका स्वीकारलेले उद्धव ठाकरे आपली भूमी वाचवू पाहत आहेत.
राज यांना सामाजिक वा राजकीय अशी भूमीच निर्माण करता आलेली नाही हे त्यांचे मोठे अपयश आहे. ‘मराठी अस्मिता’ ही हिंदू अस्मितेच्या नि विकासाच्या भूलभुलय्यामध्ये पाचोळ्यासारखी उडून गेली नि राज यांचा मुद्दा संपला. आज नवी भूमिका, नवी भूमी शोधताना ते चाचपडताना दिसत आहेत. इकडे रिलायन्स पॉवर, रिलायन्स एनर्जी या दोन कंपन्यांच्या माध्यमांतून मूळ ‘रिलायन्स’ला टक्कर देऊ पाहणारे अनिल अंबानी यांना तो संघर्ष पेलला नाही. उलट ‘जिओ’च्या माध्यमांतून अभिनव योजना राबवून थोरल्या अंबानींनी ‘RCOMM’च्या अपयशाला अधिकच अधोरेखित केले. त्या त्या क्षेत्रांतले तज्ज्ञ या दोन्ही वारसदारांच्या घसरगुंडीचे आपापल्या परीने मूल्यमापन करतीलच, पण ते करत असताना त्यांच्या या स्पर्धक वारसदारांच्या यशाचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यातूनच कदाचित यांच्या अपयशाची कारणे अधिक स्पष्टपणे समजून येतील, अशी शक्यता आहे.
![]() |
पण आज इतक्या वर्षांनंतर गाळात रुतलेला धाकल्या अंबानींचा रथ आणि थोरल्या अंबानींची घोडदौड पाहता सुरुवातीची अपेक्षा पूर्ण चुकीची ठरली आहे. धाकट्या अंबानींची ‘रिलायन्स पॉवर’ ही कंपनी मूळ रिलायन्स इंडस्ट्रीजला पाहता पाहता मागे टाकून एक मोठी ‘कॉन्ग्लमरेट’ म्हणून उभी राहील, असे स्टॉक मार्केटमध्ये बोलले जात होते. सोबतच असलेली रिलायन्स एनर्जी (जी आज अदानींनी ताब्यात घेतली), प्रथम तिरोडकरांना विकलेला टॉवर बिजनेस, मग थोरल्या बंधूंनी विकत घेऊन वाचवलेली आरकॉम आणि तरीही शिल्लक राहिलेले भले थोरले कर्ज, अशा एक एक पायऱ्या ते उतरत गेले आहेत. त्या गाळातून बाहेर पडण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी केलेले साटेलोटे, त्यातून आर्थिक बदनामीसोबतच पदरी पडत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या दलदलीत धाकले अंबानी खोल खोल रुतत जात आहेत.
आजच्या राजकारणातले विविध ध्रुव पाहिले, तर राज ठाकरेंच्या पक्षाला फारसे स्थान उरलेले नाही, आज त्या पक्षाला उर्जितावस्था यावी, यासाठी राबवायला राज यांच्याकडे कोणतेही धोरण दिसत नाही. धाकल्या अंबानींनीदेखील सत्ताधाऱ्यांशी लगट करून राफेल किंवा रशियन मिसाइल्सची कॉट्रॅक्ट मिळवली असली, तरी ती पार पाडण्यास लागणारे तांत्रिक कौशल्य त्यांच्याकडे आज नाही. मिळवणे नि राखणे यातला फरक मोठा असतो आणि त्यांचा तोल राखण्यास कशी दमछाक होते याचा पुरेपूर अनुभव राज आणि अनिल अंबानी दोघेही आज घेत असतील. त्यांच्या करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याने आता त्यांच्या भावी यशाला अधिकच स्वच्छ नि सुस्पष्ट स्वरुपात समोर यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या गाडीला पुढचा सिग्नल मिळणे अवघड असणार आहे
-oOo-
(दै. 'दिव्य मराठी’ च्या आजच्या 'दिव्य मराठी - रसिक' पुरवणी मध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)
https://divyamarathi.bhaskar.com/news/mandar-kale-article-on-raj-thackeray-and-anil-ambani-5972211.html