बुधवार, १३ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची

माझी ब्लॉगयात्रा - ५ : मजकूर सुरक्षितता << मागील भाग
---

ब्लॉगच्या मजकुराची शक्य तेवढ्या सुरक्षिततेची सोय केल्यावर आता पुढच्या टप्प्यात विचार करायचा, तो ब्लॉगच्या सुशोभीकरणाचा. त्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी, बाबी वा पर्याय वाचकाला उपयुक्त ठरु शकतात याचा विचार करायला हवा. हा विचार तुमच्या ब्लॉगमधील विषयांच्या अनुषंगाने व्हावा. एका प्रकारच्या ब्लॉगसाठी जे तंत्र कामात येईल, तेच सर्व प्रकारच्या ब्लॉग्सना लागू असेल असे नव्हे. व्यावसायिक ब्लॉग्समध्ये उपयुक्त ठरणारे पर्याय साहित्यिक लेखनाच्या ब्लॉगमध्ये तितकेच उपयुक्त असतील असे नाही. आणि तिथे उपयुक्त असणारे पर्याय हे प्रासंगिक लेखनाच्या, 'सुचले तसे' अथवा run of the mill प्रकारच्या लेखनाच्या ब्लॉगवर कामात येतील असे नाही.

BlogArchive

बहुतेक ब्लॉगमंचांवर तुमच्या पोस्ट्सची अनुक्रमणिका तयार करणारे विजेट (widget) असते. डाव्या वा उजव्या समासात ते समाविष्ट केले, की त्या अनुक्रमणिकेतून हव्या पोस्टच्या शीर्षकावर क्लिक करुन ती पोस्ट उघडता नि वाचता येते. ही अनुक्रमणिका अर्थातच कालानुक्रमे केलेली सूची असते. तुमच्या ब्लॉगवरील सर्व पोस्ट्सची सूची देणारे ’ब्लॉग-सूची’ (Blog-Archive) नावाचे तयार विजेट ब्लॉगरमध्ये येते. त्यात सर्वात प्रथम वर्ष, प्रत्येक वर्षांच्या आत महिने आणि प्रत्येक महिन्यांच्या आत - हवे असल्यास - आठवडे आणि अखेरीस दिनांक असा Tree किंवा उतरती भाजणी असते. हव्या त्या वर्षावर क्लिक करुन त्या महिन्याची वा आठवड्याची पोस्ट-सूची उघडून पाहता येते.

परंतु यात एक समस्या आहे. समजा मी पूर्वी तुमच्या ब्लॉगवर एक लेख वाचला होता. त्याचे नावही मला आठवते, परंतु तो प्रकाशित झाल्याचा दिनांक अर्थातच आठवत नसतो. त्यामुळे मला ब्लॉग-सूचीमधून तो लेख शोधणे अवघड जाते. अशा वेळी तुमच्या ब्लॉगवर कालानुक्रमे पोस्ट-सूची जशी असते तशीच अकारविल्हेही (alphabetical) दिलेली असेल तर तो लेख शोधणे मला सोपे जाते.

कुणी म्हणेल शीर्षक ठाऊक असेल तर सर्च पर्याय वापरता येईल. ते बरोबरच आहे. परंतु हा पर्याय अपेक्षित निकाल देतोच असे नाही. विशेषत: देवनागरी लिपीतील मजकुराचा शोध अनेकदा अपेक्षित त्या मजकुरापर्यंत पोहोचवत नाही. शिवाय मला लेखाचे जे नाव आठवते आहे त्यात माझ्या स्मरणशक्तीमध्ये गफलत असेल, तर मला हवी ती पोस्ट सापडणारही नाही. आणखी एक सुप्त हेतू जाहिरातबाजीचाही आहे. सूची स्क्रोल करत असताना त्यातील इतर लेखांची शीर्षके पाहून ’हा ही वाचून पाहू’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात नकळत निर्माण होऊ शकते. त्यातून त्याचा/तिचा तुमच्या ब्लॉगवरचा वावर वाढू शकतो. या ब्लॉगवर डावीकडच्या समासात कालानुक्रमे नि अकारविल्हे अशा दोनही सूची दिलेल्या आहेत. यातील अकारविल्हे सूची तयार करण्याचा कोड मला तयारच मिळाला नि मी तो समाविष्ट केला.

Series

याखेरीज काही वेळा दीर्घ लेखन हे एकाहुन अधिक भागात, एका मालिकेच्या स्वरूपात लिहिले जाते. किंवा वेगवेगळे लेख एका सूत्राने बांधले जाऊन (उदा. यावर्षीच्या ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपटांबद्दलचे लेख) एक मालिका तयार होत असेल तर असे लेख वाचकाला एका पाठोपाठ एक वाचता यावेत यासाठी या मालिकांची स्वतंत्र सूची देणे उपयुक्त ठरते. ब्लॉगसूचीच्या धाटणीची उघड-बंद पद्धतीची सूची मी अशा मालिकांसाठी समाविष्ट केली आहे. एकाच मालिकेतील लेख शोधाशोध करत न बसता, एकाच सूचीतून उघडणे शक्य होते. दुर्दैवाने नवी पोस्ट उघडताना ब्लॉगर समासातील विजेटसह सर्वच नव्याने उघडत असल्याने विजेटची मागची स्थिती राखली जात नाही. पुढच्या लेखासाठी मला ते विजेट पुन्हा उघडून सूचीमध्ये जावे लागते.

याशिवाय तुमच्या ब्लॉग-लेखनाचे विविध categories मध्ये वर्गीकरण करता येते. यासाठी प्रत्येक पोस्टला काही लेबल्स/टॅग्स/कॅटेगरीज चिकटवण्याची सोय असते. उदाहरण द्यायचे तर एखाद्या खादाडीच्या (Foodie) ब्लॉगवर हैदराबादमधील एखाद्या प्रसिद्ध बिर्याणी सेंटर/होटेलच्या मुशाफिरीबद्दल लिहिताना त्यावरील पोस्टला गावाचे नाव म्हणून हैदराबाद, होटेलचे नाव आणि बिर्याणी अशी तीन लेबल्स चिकटवता येतील. पोस्टच्या खाली दिसणार्‍या या लेबल्सपैकी एकावर क्लिक केले असता ते लेबल मिरवणार्‍या सर्व पोस्ट्स एकाखाली एक दिसू लागतात. एखाद्या वाचकाला त्या ब्लॉगवरील फक्त बिर्याणीबद्दलच्या पोस्ट वाचायच्या असतील तर ती पोस्ट त्या गटात दिसेल, किंवा हैदराबादला जाणार्‍याला तिथे कोणते पदार्थ नि कुठे खावेत असा प्रश्न असेल, तर त्या ’स्थान’ निश्चित करणार्‍या ’हैदराबाद’ या गटातही ती पोस्ट दिसेल.

पण पंचाईत अशी, की एका लेबलच्या बर्‍याच पोस्ट्स असतील तर भरपूर स्क्रोल करत जावे लागते. त्याऐवजी त्यांची यादी/सूचीच तयार करुन वाचकासमोर ठेवता आली, तर शीर्षकांकडे पाहून पोस्टची निवड करण्यास तुलनेने कमी वेळ लागेल. दुर्दैवाने निदान ब्लॉगरमध्ये अशी निव्वळ सूची तयार करणारे विजेट नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रोग्राम लिहावा लागतो. तिथे तुम्हाला category-cloud अर्थात वर्गवारी-पुंजका मिळतो. ज्यात सर्व लेबल्स/कॅटेगरीज एका पुंजक्याच्या स्वरूपात मिळतात आणि प्रत्येक लेबल असलेल्या पोस्ट्सच्या संख्येनुसार त्या लेबलच्या नावाचा आकार कमी-जास्त दिसत असतो. पण यातून कोणत्या वर्गवारीसाठी तुम्ही अधिक लेखन केले आहे हे दिसते इतएक्च. याच विजेटला लेबल-सूची स्वरूपातही समाविष्ट करता येते.

पण पुन्हा नवी समस्या अशी आहे, की एकुण ब्लॉगमध्ये भरपूर पोस्टस आणि म्हणून भरपूर लेबल्स/टॅग्सची जंत्री असते. प्रत्येकाची सूची देत बसलो तर त्या सूचींची एक सूची करावी लागेल. अर्थात वर उल्लेख केलेल्या ब्लॉग-सूची विजेटच्या धर्तीवर सर्व लेबल्स/टॅग्सची एक सूची देऊन नंतर प्रत्येक लेबलसाठी उपसूची दाखवता आली तर वाचकाला ते सोयीचे ठरेल. मी मूळ ब्लॉग-सूची विजेटचा प्रोग्राम/कोड घेऊन हा बदल करण्याचा प्रयत्न केला. पण तो भलताच गुंतागुंतीचा होऊ लागला म्हणून सोडून दिला.

आणखी मुद्दा असा की प्रत्येक लेबल/टॅग अथवा वर्गीकरण सारखेच महत्वाचे असेल असे नाही. त्यामुळे सर्वच टॅग्सची उपसूची तयार करण्याची बरेचदा गरजच नसते. मग केवळ महत्वाच्या अशा मोजक्या लेबल्ससाठीच ही सूची तयार करण्याचा निर्णय मी घेतला. ’वेचित चाललो...’ ब्लॉगसाठी विचार करताना मला सुमारे बारा लेबल्स अशी सापडली, की त्यांची स्वतंत्र सूची उपयुक्त ठरेल असे मला वाटले. आता या बरा सूची एकाखाली एक दिल्या, तर वाचकाला समासात बरेच स्क्रोल करत जावे लागेल असे लक्षात आले. एवढी सहनशक्ती व्हॉट्स-अ‍ॅप जेनेरेशनकडे असण्याची शक्यता फारच कमी आहे.

वेचित चाललो...’ वर सुरुवातीला पुस्तकांचे वेचे नि त्याबद्दलचे लेखनच समाविष्ट केले होते. एकदा एका पुस्तकाचा वेचा तिथे समाविष्ट करुन झाल्यावर प्रूफरीडिंग करत होतो. हातातल्या पुस्तकाचे पान उलटताना आर्किमीडिजसारखाच माझाही ’युरेका’ क्षण सापडला. म्हटलं त्या बारापैकी प्रत्येक सूची हे एक पान धरले, तर पुढच्या लेबल-सूचीसाठी ’पान उलटावे’ लागेल. आणि हे टॅब्ड (tabbed) सूचीने साध्य करता येईल. ब्लॉगवर वरच्या बाजूला मेन्यूसारखी पेजेस (Pages) देण्याची सोय ब्लॉगरने केलेली आहे. त्यावर प्रत्येक सूचीसाठी एक पेज तयार करणे शक्य होते. परंतु पेजेसचा जीव मर्यादित असतो. एक पानाचा मजकूर या पलिकडे त्यावर फार काही करता येत नाही. म्हणजे त्यावरील बहुतेक गोष्टी या प्रोग्राम लिहूनच तयार कराव्या लागल्या असत्या. शिवाय निव्वळ सूचीसाठी संपूर्ण स्क्रीनचा वापर करण्याची गरजही नव्हती.

BookList

परंतु विजेटमध्ये टॅब तयार करण्याचे प्रयोग काही जणांनी केले होते. त्यातले काही निवडून माझ्या काही प्रयोगांनंतर त्यातील एक निवडला. परंतु या ना त्या कारणाने तो आहे असा वापरत येईना. पुन्हा प्रथम Javascript मधला कोड वापरला होता. तो पुरेसा 'वर्धनीय व तन्य’ (शाळेतले शब्द बर्‍याच दिवसांनी आठवले) नाही असे लक्षात आले. त्यातच अनेक ब्राउजर हे सुरक्षिततेच्या कारणास्तव Javascriptला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या मार्गावर आहेत हे समजल्यावर त्याला पर्याय शोधणे सुरु केले. मग HTML+CSS असा एक कोड मिळाला.

पण त्याचे स्वत:चे असे प्रॉब्लेम होते. त्यात पुन्हा त्यातील कोड हा देवनागरी लिपीतील शीर्षकांचा वापर केला तर गंमत करु लागला. याचे कारण म्हणजे तो कॅरॅक्टर (character) संख्येच्या गणितावर काम करत होता. पण देवनागरीमध्ये एक अक्षर हे एकाहुन अधिक कॅरॅक्टर्स वापरून लिहिले जाते. उदाहरणार्थ ’किती हा शब्द ’क+पहिल्या वेलांटीचे कॅरॅक्टर+त+दीर्घ वेलांटीचे कॅरॅक्टर’ असा चार जागांमध्ये लिहिला जातो. यातून रोमन लिपीसाठी लिहिलेला मूळ कोड जर देवनागरीसाठी वापरला तर अपेक्षित उत्तर मिळत नाही. त्यामुळे त्यात आवश्यक ते बदल करुन घ्यावे लागले.

त्यापुढे त्यासाठी आवश्यक त्या आकाराची चौकट तयार करणे, सूची तयार करण्याचा प्रोग्राम, सूचीचे स्वरूप, वगैरेसाठी काही प्रयोग करुन अखेर हवे तसे विजेट तयार झाले. माझ्या ब्लॉगच्या समासांच्या आणि निवडलेल्या लेबल्स/टॅग हे शीर्षक म्हणून येताना वापरल्या जाणार्‍या रुंदीचा विचार करुन एका विजेटमध्ये चार लेबल्सची सूची बसवणे निश्चित केले. बारा लेबल्ससाठी तीन वेगळ्या सूचींची योजना केली. हे तीन गट शक्यतो परस्परसंबंधित निवडले. व्हिडिओ या वर्गवारीशी निगडित चित्रपट, मालिका, चलच्चित्र (Animation) आणि लघुपट (short-film) अथवा एकुणच मर्यादित लांबीचा कुठलाही व्हिडिओ- या चौघांचा एक गट झाला. पुस्तकांशी संबंधित चार लेबल्सचा एक गट झाला आणि उरलेले चार एका विजेटमध्ये समाविष्ट केले. ’वेचित चाललो...’ वर डावीकडच्या समासात पुस्तकांसंबंधी सूची तर उरलेले दोन गट उजवीकडच्या समासात समाविष्ट केले आहेत.

SlideShow

ब्लॉगविश्वात मुशाफिरी करत असतात्ना काही ब्लॉग्सवर फोटोंचा स्लाईड-शो पाहण्यात आला. मागे म्हटल्याप्रमाणे ’वेचित चाललो...’ हा प्रथम पुस्तकांतील आवडलेले वेचे संकलित करणे या मर्यादित नि खासगी उद्दिष्ट असलेला ब्लॉग होता. त्यामुळॆ प्रत्येक पोस्ट ही एका पुस्तकाशी निगडित होती. तो फोटोंचा स्लाईड-शो पाहिल्यावर फोटोंऐवजी मुखपृष्ठांचा स्लाईड-शो तयार करुन मुखपृष्ठावर क्लिक केले असता त्या पुस्तकातील वेचे वा त्यासंबंधी लिहिलेले लेखन असलेल्या पोस्ट्स समोर दिसतील अशी सोय करता येईल अशी कल्पना सुचली.

एकप्रकारे ही चित्र-सूची तयार होणार होती आणि वर तयार केलेल्या शब्द-सूचींना पर्याय म्हणून देता येणार होती. थोडक्यात शब्दसूचीमध्ये वर्गीकरणांसाठी वापरलेली एकाहून अधिक टॅब्सची कल्पना आता एकाहुन अधिक इमेजेस अशी बदलून घेतली गेली. शब्द-सूचीमध्ये पुढच्या वर्गीकरणाची सूची पाहण्यासाठी वाचकाला क्लिक करुन टॅब्स बदलावे लागत होते. इथे त्याऐवजी स्लाईड शोचे ’पुढचे’ (Next) किंवा ’मागचे’ (Previous) बटन क्लिक केले की पुढचे मुखपृष्ठ समोर येईल अशी सोय करता येणार होती.

हा पर्याय देणे तुलनेने फार अवघड गेले नाही. ’गुगल डॉक’मध्ये प्रेजेंटेशन्स (पॉवरपॉईंटचा गुगल अवतार) तयार करणे शक्य असल्याने सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे वापरून तिथे एक स्लाईड शो तयार केला. प्रत्येक मुखपृष्ठाची इमेज अपलोड झाल्यावर एकाच आकारात बदलून घेतली, जेणेकरुन स्लाईड-शो मध्ये अनावश्यक झूम होऊन वेगवेगळ्या आकाराच्या इमेज दिसू नयेत. या प्रत्येक स्लाईडला तुम्हाला हायपरलिंक जोडता येते. प्रत्येक पुस्तकाच्या नावाचे लेबल असल्याने त्या त्या मुखपृष्ठाला त्या लेबलची लिंक जोडून दिली.

यानंतर गुगल तुम्हाला हा प्रसिद्ध करण्याचा(web-publish) कोड तयार करुन देतो. तो फक्त तुमच्या ब्लॉगवर जोडला (मी डाव्या समासात स्वतंत्र विजेटमध्ये वापरला) की काम झाले. सुरुवातीला थोडी अडचण अशी झाली, की त्या स्लाईड-शोला खाली कंट्रोल्सही (Next, Previous, Pause वगैरे) असतात. ते हवे तसे कस्टमाईझ केले तरी गुगल त्याचा रंग वा क्रमवारी बदलून टाकून पंचाईत करे. मग त्याचा कोड थोडा बदलून ते काढूनच टाकले आणि ठराविक वेळाने आपोआप पुढचे मुखपृष्ठ लोड होईल अशी सोय करून ठेवली.

वेचित चाललो...’ वर लेखनाची एक विशेष वर्गवारी आहे. पुस्तकातील एखादा वेचा निवडताना त्या वेच्याबद्दल, पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल किंवा त्या अनुषंगाने जे सुचेल त्याबद्दल लिहित असतो. हे परीक्षण नव्हे, समीक्षा नव्हे की कुठलेही पारंपरिक प्रकारचे पुस्तकाविषयीचे लेखन नव्हे. अमुकच प्रकारे लिहिले पाहिजे असे बंधन मी स्वत:ला घालून घेतलेले नाही. या सार्‍या लेखांचे, पोस्ट्सचे शीर्षक नेहमी ’वेचताना... : <पुस्तकाचे नाव>’ असे दिलेले असते. हे स्वतंत्र लेखन असल्याने यांची पुस्तक वेच्यांहून वेगळी सूची करता आली, तर मला स्वत:लाच अधिक उपयुक्त ठरणार होती. परंतु इथे एका विशिष्ट कारणासाठी मी ’वेचताना...’ ही स्वतंत्र वर्गवारी केलेली नव्हती. त्यामुळे त्यावर आधारित सूची मिळणार नव्हती. त्यामुळे जिथे जिथे शीर्षकामध्ये ’वेचताना...’ दिसेल अशा पोस्ट्सची सूची मला करायची होती. ब्लॉगच्या संपूर्ण सूचीची छाननी करुन त्यांच्या शीर्षकांच्या आधारे निवड करत ही उपसूची तयार करायची होती. पुन्हा प्रथम Javascript चा वापर केला होता. त्याच्या मर्यादा दिसून आल्यावर HTML+CSSचा वापर करुन प्रोग्राम लिहिला आहे.

इतके सारे काम झाल्यानंतर यात्रेच्या सुरुवातीला उल्लेख केलेली समस्या प्रथमच समोर आली. मोबाईल थीममध्ये समासांची आणि पर्यायाने विजेट्सची सोय नसल्यामुळे या सार्‍या सूची फक्त लॅपटॉप/डेस्कटॉपवरच पाहता येतात. आता ही नवी समस्या सोडवण्यासाठी मोबाईल थीममध्ये काही अन्य पर्याय शोधावा लागणार होता.

(क्रमश:)

पुढील भाग >> माझी ब्लॉगयात्रा - ७: मोबाईल-विशेष


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा