बुधवार, २० एप्रिल, २०२२

कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने

बातमी: कुराणाचा प्रथमच संस्कृतमध्ये भावानुवाद ; दिवंगत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन
---

काही काळापूर्वी जावेद अख्तर यांचे रेख़्ता या वार्षिक उर्दू संमेलनातील भाषण ऐकले होते, त्यावर ’वेचित चाललो...’ वर (’भाषा: राष्ट्र, धर्म... आणि हत्यार’) लिहिलेही होते.

त्या भाषणादरम्यान त्यांनी केलेला एक उल्लेख मला रोचक वाटला होता. ते असं सांगतात की, १७९८ मध्ये कुराण प्रथम उर्दूमध्ये अनुवादित केले गेले. त्यावेळी ’असल्या अमंगळ भाषेत आमचे पवित्र पुस्तक लिहिले’ म्हणून तो अनुवाद करणार्‍याविरोधात मौलवींनी फतवा काढला होता. त्याचवेळी ’असल्या अमंगळ भाषेला ’देव’नागरी नावाने ओळखळी जाणारी आमची पवित्र लिपी वापरल्याने ती विटाळेल’ असा विरोध हिंदू समाजातील संभावितांनी केला होता. ’अमंगळतेच्या कल्पना अमंगळ मनातूनच येतात’ हे माझे मत काहीसे दृढ करणारी ही दोन उदाहरणे. दोनही धर्मांतील सनातन्यांच्या नाकावर टिच्चून ऊर्दू वाढली नि लोकप्रिय झाली. त्यातील सुरुवातीचे साहित्यही प्राधान्याने विद्रोही होते, धार्मिक नव्हते हे उल्लेखनीय.

पण जुन्या चुकांतून माणसे शिकत नाहीत. तसे होते, म्हणून इतिहास शिकावा म्हणणारे लोक धूर्त असतात. इतिहासातून ते आपले झेंडे नि जोडे, हीरो नि सैतान निवडत असतात आणि त्या आपल्या धारणा बहुसंख्येच्या बोकांडी मारण्यासाठीच त्यांना तो रुजवायचा असतो. या समाजात स्वत:हून शिकण्याला परंपरा नाही. तो विद्रोहाचाच भाग असतो. आणि इतिहासातून कुणी विद्रोह शिकतो असे मला वाटत नाही. किंबहुना विद्रोह हा आतून उमटतो, इतरांच्या विद्रोहाची नक्कल म्हणजे विद्रोहच नव्हे. असला विद्रोहदेखील एक परंपराच बनून राहतो. ’ब्लॅक मिरर’ विज्ञान-काल्पनिकेमधील ’फिफ्टिन मिलियन मेरिट्स’ या एपिसोडमध्ये उपभोगवादाच्या विरोधातील कुण्या बिंगचा विद्रोह क्रयवस्तू बनून विकला जाऊ लागतो तसे.

त्यामुळेच तेव्हाचा उर्दूचा इतिहास शिकूनही आज फारशी समज वाढलेली नाही. संस्कृत ही ब्राह्मणांची आणि उर्दू ही मुसलमानांची म्हणून तिचा तिरस्कार करणे याला विद्रोह वगैरे समजले जाऊ लागले आहे. अख्तरांच्या भाषणाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखामध्ये भाषेचा ’हत्यार’ म्हणून कसा वापर झाला हे उर्दूच्या संदर्भात लिहिले होते. संस्कृतचाही तसाच वापर झालेला आहे असे म्हणता येईल.

पण या दोन्हींमध्ये त्या-त्या भाषेचा दोष अर्थातच नाही. कारण भाषा मानवनिर्मित आहे, तिला स्वत:च्या अशा भाव-भावना नसतात. ती कुणाचा द्वेष करत नाही की कुणाला धार्जिणी असत नाही. भाषा घडते ती संवादाचे माध्यम म्हणून, घडवली जाते ती अनेक माणसांकडून. एक माणूस लिहायला बसला नि एक भाषा तयार केली असे होत नाही. किंबहुना भाषा हे संवादमाध्यमाला दिलेले औपचारिक रूपच असते. ज्यात लिखित वा मौखिक साहित्य निर्माण केले जाते ती अधिक रुजते. एखाद्या समाजाचा द्वेष करताना त्या भाषेचा द्वेष करणे, त्या भाषेला केवळ त्या समाजाच्या संदर्भातच पाहणे हा करंटेपणा आहे. आपल्याला ती भाषा शिकण्याची वा समजून घेण्याची इच्छा नसेल तर तसे न करणे हा आपल्या स्वातंत्र्याचा भाग आहे. जगात अक्षरश: हजारो भाषा आहेत, सार्‍यांतच आपल्याला रूची असणे शक्य नसते. म्हणूनच हिंदीची सक्ती हा निषेधार्ह आहे, तशीच संस्कृत वा ऊर्दूचीही.

माझे मत विचाराल, तर संस्कृत ब्राह्मणांची म्हणून तिचा तिरस्कार करण्याऐवजी त्या भाषेत भरपूर विद्रोही साहित्य निर्माण करुन एका बाजूला झुकलेल्या तराजूचे दुसरे पारडे जड करत न्यावे असे मला वाटते. शोषकांची भाषा म्हणून तिला अडगळीत टाकण्याचा आटापिटा करणे मला मान्य नाही. त्याच भाषेत धार्मिक वाङ्मयाबरोबरच नाट्यशास्त्रापासून आयुर्वेदाच्या अनेक अनुषंगापर्यंत, भास्कराचार्यांच्या लीलावती पासून कणादाच्या खगोलशास्त्रापर्यंत इतरही बरेच उत्तम लेखन झाले आहे. शोषक-समर्थक लेखनासाठी अख्खी भाषा बुडवावी हे म्हणणे विचारहीनतेचे लक्षण आहे... तिथे कम्युनिस्ट आहेत म्हणून जेएनयूसारख्या एका सर्वोत्कृष्ट विद्यापीठाला शक्य त्या सार्‍या माध्यमांतून बदनाम करण्याचा आटापिटा करण्याइतकेच !

हीच बाब उर्दूबाबत अख्तरांनी नोंदलेली आहे. ते पंजाबी तरुणांना विचारतात, ’अरे ही तुमची भाषा आहे. यातले सर्वात दर्जेदार साहित्य तुम्ही- पंजाबींनी- निर्माण केले आहे. आता अमुक धर्माची भाषा म्हणून तुम्ही तिला दुसर्‍यांच्या ओटीत कसे घालता. तुम्ही ती स्वीकारली पाहिजे त्यात तुमच्या मातीतले साहित्य निर्माण केले पाहिजे.’

आज कुराणाचा संस्कृतमध्ये केलेला अनुवाद प्रसिद्ध होतो आहे, एक भिंत तुटते आहे. दुर्दैवाने त्या बातमीतही ’जन्माने मुस्लिम असले तरी...’ असा दुर्भाग्यपूर्ण उल्लेख वाचावा लागतो आहे. संस्कृतचे कितीही गाढे पंडित असले तरी ’मुस्लिम असूनही’ हा hyphenated(याला नेमका मराठी प्रतिशब्द सापडला नाही) विचार बातमीदारालाही टाळता आलेला नाही. केवळ ’कुराणाचे संस्कृत भाषांतर/अनुवाद’ इतकाच विचार करुन त्याला थांबता आलेले नाही.फोटोही गळ्यात ’भगवे’ उपरणे असलेला निवडला आहे! आजच्या द्वेषसंपृक्त काळात त्याच्याकडे अशा दूषित दृष्टीनेच पाहिले जाणार आहे. बिराजदार हे मूळचे सोलापूरचे (बहुधा तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठातही त्यांनी शिकवले, मला हे नक्की आठवत नाही आता.) त्यामुळे उलट दिशेने ’तुम्ही पुण्या-मुंबईचे लोक...’ हा प्रांतवादही खेचून आणता येईल. ’आम्ही हिंदू आहोत, आम्ही यास्मिन शेख यांचे व्याकरण अभ्यासत नाही. आमच्याकडे फडकेंचेच पुस्तक असेल.’ असे आयुष्यात व्याकरणाचा ’व्य’देखील न व्यायलेल्या निर्बुद्धांकडून ऐकण्याचे दिवस आहे्त. यात काही कारण नसताना यास्मिन शेख विरुद्ध फडके ही कदाचित दोघांच्या गावीही नसलेली विभागणी गलिच्छ मंडळी करत आहेत, त्यांना सत्तेचा आशीर्वाद आहे आणि कणाहीन बहुसंख्येचा मूक वा नाईलाजाने उघड पाठिंबा.

आपापल्या धर्मातले साहित्य, धर्मग्रंथ हे अन्य भाषेत नेणे याला केवळ धर्मप्रसाराचाच भाग समजणारी मंदबुद्धी बहुसंख्या बरीच असते. मुळात सतत गमावण्याची भीती असणार्‍या या जनतेला यातून परस्पर सांस्कृतिक ओळख, अभ्यास नि आदानप्रदान होऊ शकते याची जाणीव नाही. ज्यांना आहे त्यांना नेमकी त्याचीच भीती आहे. सतत प्रत्येक गोष्ट पावित्र्याच्या प्रेतवस्त्रात गुंडाळून पूजणार्‍यांना बदल नको असतात. आणि म्हणूनच ’आमच्याकडे पुराणां-कुराणांतून वा दास कॅपिटलमधून आलेले संपूर्ण ज्ञान आहे. आम्हाला इतरांकडून काही शिकण्याचे शिल्लकच नाही’ असा यांचा दावा असतो. त्यामुळे असे प्रयत्न आजच्या ’द्वेष करा, कळपात राहा’ समाजातच नव्हे, तर एरवीही कायम दुर्लक्षित राहतात.

माझी खात्री आहे एरवी गीतेबरोबरच कुराणाचा अभ्यासही सारखाच मानणार्‍या इतर समाजापेक्षा तुलनेने समतोल असणार्‍या पुरोगामी वर्तुळातही याचे स्वागत थंडपणे केले जाणार आहे. कुराण धार्मिक म्हणून तटस्थ राहावे, एका मुस्लिम विद्वानाने संस्कृतचा केलेला व्यासंग म्हणून नावाजावे की संस्कृतचे अप्रत्यक्ष कौतुक होईल नि पुरोगामी वर्तुळाचा एक भाग आपल्याला शोषितांचे समर्थक म्हणून वाळीत टाकतील या संभ्रमात ते मुकाट राहणेच पसंत करतील. एका तटस्थ मित्राने ’विज्ञानवादी सावरकर’ या विषयावर चर्चा आयोजित केली असता, अशाच भीतीने बहुतेक पुरोगामी मंडळींनी त्यापासून दूर राहणे पसंत केले होते. वास्तविक ’सावरकरांचा विज्ञानवाद हा त्यांच्या हिंदुत्ववादाचे अपत्य आहे’ हे त्यांचे एरवी मांडले जाणारे मत तिथे विस्ताराने मांडण्याची संधी होती. पण सावरकर या नावामुळेच आपण ’घराबाहेर’ काढले जाऊ ही भीती त्यांच्या मनात होती. हिजाबबाबत गदारोळाच्या वेळेसही अनेकांच्या मनात असा तिढा उत्पन्न झाला होता. मी हे लिहितो म्हणून दुसर्‍या बाजून खुश व्हायचे कारण नाही. त्यांच्या मनात संभ्रम आहे कारण ते विचार करतात. तुमच्या मनात संभ्रम नसतो कारण तुम्ही एक बाजू आंधळेपणे उचलायची हे ठरवल्याने विचार नि तुमचा संबंध येत नसतो, त्यामुळे संभ्रमाचा प्रश्नच येत नाही.

मला स्वत:ला शाळेतील अभ्यासाखेरीज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तीन परीक्षा देऊनही संस्कृत कधी आपली वाटली नाही. कळत्या वयाच्या सुरुवातीच्या ज्या काळात हिंदुत्ववाद्यांच्या प्रभावाखाली होतो, तेव्हाही ’आपण हिंदू, त्यातही ब्राह्मण घरात जन्माला आलो म्हणजे तिचा अभिमान बाळगला पाहिजे’ असे वाटले नाही. त्याचबरोबर, ’मला आवडली नाही वा माझे तिचे नाते जुळले नाही, म्हणजे ती भाषाच वाईट वा दुय्यम आहे’ असा कांगावा करुन वा सिद्ध करण्याचा आटापिटा करुन तो इतरांच्या गळी उतरवावा असेही मला कधी वाटलेले नाही. त्याच काळात- अद्याप हिंदुत्ववाद्यांच्या प्रभावात असताना- संस्कृतपेक्षा उर्दू अधिक भावली. त्यातील शायरीमधून झालेली विचारस्वातंत्र्याची ओळख जशी महत्वाची वाटली, तसेच त्यातील कानावर पडलेल्या एक न एक गजलेचा अर्थ उर्दू-मराठी शब्दकोष वाचून समजून घ्यायलाच हवा इतके तिच्याशी घट्ट नाते जुळले. कदाचित तोवर डोक्यातील विचारांचे इंद्रिय जागे झाल्याने तिचे विद्रोही असणे आवडले असेल.

पण अशी आवडनिवड सापेक्ष असते, एका डेटा पॉईंटवर संपूर्ण भाषेबाबत निवाडा करावा हे तेव्हा संख्याशास्त्र शिकणे सुरु झालेले नसूनही समजत होते. तसंच बहुसंख्येने याचा निवाडा करणेही हास्यास्पद असते. कारण तसे असेल तर गणित हा बहुसंख्येने बाद विषय ठरेल. आणि ते नष्ट होताना तयार झालेल्या ब्लॅक-होलमध्ये सारे विज्ञान आणि म्हणून सारी मानवी प्रगती नाहीशी होऊन जाईल. मानवाची प्रगती ही नि:संशय विज्ञानाची प्रगती आहे धर्मग्रंथांची नाही! त्यामुळे केवळ आपल्याला रुचते, जमते ते स्वीकारले, जे नाही ते सोडून दिले इतके सोपे असते. यामुळे ’माझेच बरोबर’ या न्यायाने ही भाषा ग्रेट नि ती दुय्यम असा निवाडा मी दिलेला नाही.

भाषांना राष्ट्रवादाचे वा जातीयवादाचे हत्यार समजणे हा मानवी मनाचा मोठा आजार आहे आणि तो फारच सार्वत्रिक आहे. आणि अस्मितेसह इतर अनेक आजारांसह आपण सोडून सगळ्यांना तो आहे असा आपला भ्रम असतो. प्राणिसृष्टीचा भाग म्हणून विचार केला तर बांधिलकीपेक्षा वाळीत टाकणे अधिक आवडणारा माणूस हा एका बाजूने कळपप्रधान शेळ्यांसारखा असतो आणि त्याचवेळी आपण सिंहासारखे आहोत, इतर नरांना माझ्या कळपात जागा नाही हे त्या कळपात सुरक्षित राहूनच तो गर्जून सांगत असतो. त्यामुळे त्याचे तथाकथित शौर्य हे केवळ कळपाबाहेरच्यांबाबतचा द्वेष या स्वरूपातच शिल्लक राहते. आणि ते ही शिल्लक राहावे म्हणून कळपाबाहेरचे लोकही शिल्लक राहावे लागतात... मग ते राजकारण असो, समाजकारण असो की भाषाकारण.

हे सारे विचार ज्यांच्या निमित्ताने उमटले त्या दिवंगत पं. गुलाम दस्तगीर बिराजदार, त्यांनी आयुष्यभर जपलेले संस्कृतप्रेम यांना एक मानाचा मुजरा करता आला तरी खूप झाले.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा