'नाना आणि तनुश्री यांच्या वादात तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही?' असा प्रश्न अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आला नि त्यांनी या बाजूची वा त्या बाजूची प्रतिक्रिया न दिल्याने पार्ट्या पाडून या दोघांचा वाद उसनवारीने लढवणार्या दोन्ही बाजूंनी त्यांना दूषणे दिली. मला एक कळत नाही, तनुश्री दत्ता यांनी ज्या प्रसंगावरुन नाना पाटेकरांवर आरोप केले आहेत त्या घटनेच्या वेळी हजर असणारे लोक सोडून इतर व्यक्ती ठामपणे विधाने करतात ती नक्की कशाच्या जोरावर? पूर्वग्रह वा सोयीच्या विचारांना अनुसरुन बाजू घेण्याशिवाय यात (आणि इतर अनेक बाबतीत) नक्की काय घडू शकते?
उदा. महिला अधिकाराबाबत जागरुक असणारे ताबडतोब तनुश्री दत्ता यांची बाजू घेणार. पण जसे तनुश्री खरे बोलत आहेत ही शक्यता आहेत तशीच त्या खोटे बोलत आहेत अशी शक्यता आहे किंवा त्याहून तिसरी म्हणजे त्यांनी उल्लेखलेली कृती घडली पण हेतूबाबतचे मूल्यमापन कदाचित चुकले अशीही शक्यता असेल. यातले काय खरे हे इथे बसून आपण कसे जाहीर करु शकतो? 'नाना तसलाच आहे, बायकांबाबत सैल आहे. लंपटपणा केलाच असेल' किंवा 'नाम फौंडेशन'च्या माध्यमातून इतके चांगले काम करणारा नाना असे करुच शकणार नाही' ही दोन्ही विधाने बाजू घेणारी असली तरी शक्यतांपैकी एकच निवडून हेच बरोबर हे कोणत्याही पुराव्याखेरीज जाहीर करणारी आहेत.
वेश्येवर केलेला बलात्कार हा ही बलात्कारच असतो! 'ती काय शरीरविक्रय करते, तिनेच त्याला खुणावले असणार' हा तर्क चुकीचा तसेच तसेच 'साधुपुरुष अत्याचार करुच शकत नाही' हा ही. घटना ही घटना असते, ती त्यात सहभागी व्यक्तींच्या पूर्वायुष्यातील वर्तनाशी सुसंगत असतेच असे नाही.
शिवाय त्यांचे पूर्वायुष्य हे देखील प्रत्येकाचे आपापले पर्सेप्शन असते. नेहरु म्हटले की एडविना, लता म्हटले की इतरांचे हक्क हिरावून घेणारी एवढेच आठवणारेही लोक असतात. ते चूक असतात असेही नाही. त्यांना त्या त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तो भागच अधिक महत्त्वाचा वाटतो. तो खरा की खोटा हे महत्त्वाचे नसते. त्याला पुरावे शोधत न बसता त्यांनी ते मान्य केलेले असते.ते तसे असावे अशी त्यांची इच्छा असते. आणि त्यांच्या समजाला सत्य मानण्या त्यांना तेवढे पुरेसे वाटते. तेव्हा आजवर ते असे वागले म्हणजे इथे ते असे असे वागले 'असतील' हा तर्क करायला हरकत नाही, पण 'असतील' ही केवळ शक्यता आहे हे विसरुन चालणार नाही. त्याला 'आहेच' ने रिप्लेस करुन त्यावर निवाडा देऊन वर हेच बरोबर समजून विरोधी बाजूला चॅलेंज करत हिंडणे, त्याहून वाईट म्हणजे 'मी तिथे नव्हतो, काय घडले मला ठाऊक नाही' म्हणणार्याला डरपोक, भूमिका न घेणारा म्हणून हिणवणे योग्य नव्हे. कदाचित ती व्यक्तीच दोन बाजूंना उभे राहून उसनवारीची रस्सीखेच खेळणार्या व्यक्तींपेक्षा प्रामाणिक असण्याची शक्यता अधिक आहे.
आता इथे बच्चन हे केवळ उदाहरण झाले. लगेच मी बच्चन यांची बाजू घेतो असे समजायचे असेल तरी माझी काही हरकत नाही. पण जाताजाता 'बच्चन हे दृश्य माध्यमातले पवार नि पवार हे राजकारणातले बच्चन आहेत. दोघेही नेहमी सत्तेच्या व्यासपीठावर नसले तरी विंगेत असतात आणि मुख्य म्हणजे ठाम भूमिका वा एक बाजू घेण्याचे टाळून गुळमुळीत बोलतात' हे आमचे मत सांगून टाकतो. :) (बघा म्हणजे आम्ही पण तटस्थांना बाजू घ्या म्हणतोय. शेवटी आम्हीही याच समाजाचे भाग आहोत राव. ;) )
#शक्यतांचाविचारकरा