‘अशी ही बनवाबनवी’ला तीस वर्षे पुरी झाल्याच्या निमित्ताने थोरले महागुरु नव्या कोर्या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. चित्रपटाचे नाव आहे ‘अशी ही पळवापळवी’.
मुख्य भूमिकांत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि नीतिन संदेसरा यांना कास्ट केले आहे. चित्रपटातील धनंजय माने गावाकडून पुण्याकडे प्रयाण करतात, तर या रिमेकमध्ये इंटरनॅशनल लेवल आणण्याच्या दृष्टीने ते मुंबईहून लंडनला पलायन करतात असा अपग्रेड देण्यात आला आहे. मल्ल्या प्रथम परदेशी पोचल्याने धनंजय मानेंच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे असा त्याचा दावा होता. पण ‘मेहुल आणि नीरव यांचे आल्रेडी नाते असल्याने त्यांना माने बंधूंच्या भूमिकेत कास्ट करणे योग्य ठरेल’ असे थोरल्या महागुरुंनी त्यांच्या गळी उतरवले आहे. त्यामुळे आता मल्ल्या आणि संदेसरा यांना स्त्री-भूमिकांत पहायची पाळी आपल्यावर येते की कहानी में पुन्हा ट्विस्ट येतो हे पाहायचे.
लीलाबाई काळभोर यांच्या भूमिकेसाठी प्रेमळ स्वभावाच्या सुषमाताई, तर विश्वास सरपोतदार यांच्या भूमिकेत जेटलीकाका फिट्ट बसतात. उगा कन्ट्रोवर्सी नको म्हणून त्यांच्या पत्नीचे पात्र ड्रॉप करण्यात आले आहे. बळीची भूमिका दस्तुरखुद्द थोरल्या महागुरुंनी करावी की धाकल्या महागुरुंना द्यावी हे अजून ठरलेले नाही. ‘लीलाबाई काळभोर यांचे स्त्री पात्र लाला काळभोर या पुरुष पात्राने रिप्लेस करुन ती भूमिका थोरल्या महागुरुंनी करावी आणि बळीची भूमिका मला द्यावी’ अशी गळ धाकल्या महागुरुंनी घातली आहे. परश्याच्या सासर्याच्या भूमिकेत संबित पात्रांचा वशिला फिट्टं बसल्याचे खात्रीलायक रित्या समजते. सतत आग ओकत बोलणे या क्वालिफिकेशनवर रविशंकर प्रसादही शर्यतीत होते; पण ते गरजेपेक्षा अधिक विषयाला धरुन बोलत असल्याने थोरल्या महागुरुंची त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली आणि त्यांचा पत्ता कट झाला.
स्त्री पात्रांच्या बाबत विचार करताना ‘आपापली हिरोईन हीरोने स्वतःच शोधून आणावी नि आपल्याच मानधनातला हिस्सा तिला द्यावा (एवढा पैसा तुमच्या पदरी पडलाय फुकट, त्यातला थोडा खर्च करा की)’ असे थोरल्या महागुरुंनी चारही नायकांना बजावले आहे. आता फक्त पटकथा लिहायची आहे. “ते ही काम मलाच द्या मी त्यात ‘वंदे मातरम्’ पासून ‘मंदिर वहीं बनाएंगे’ पर्यंत आणि ‘कुणीतरी जाणार जाणार गं’ वगैरे सगळी गाणी बसवेन” अशी ऑफर संबित पात्रा यांनी दिली आहे. पण ‘हा चोर चॅनेल-चर्चेप्रमाणे एकटाच सगळे फुटेज खाईल’ हे ठाऊक असल्याने ‘मीच आहे सर्वात मोठा फुटेजकखान’ म्हणवणार्या थोरल्या महागुरुंनी त्याला अजून टांगले आहे.
‘धनंजय मानेंनी नेलेली केरसुणी विश्वास सरपोतदारांनी परत नेली आहे आणि तिने ते अंगण झाडताहेत. आणि रस्त्याच्या समोरच्या बाजूला भिंतीवर ‘भारत स्वच्छता अभियान' ची जाहिरात आहे नि त्यावर थोरल्या महागुरुंची छबी विराजमान आहे’ अशा सीनने फटमार होणार आहे. ‘हिचकॉक जसा केवळ छबीरुपाने आपल्या चित्रपटात असे तसे थोरले महागुरु या छबीरूपानेच त्यात असावेत’ असा कुत्सित सल्ला आपल्याला काही रोल न मिळाल्याने रुसलेल्या राजनाथसिंहानी दिला. पण ‘गुळाचा गणपती’ हा जसा ‘सबकुछ पुलं’ चित्रपट होता तसा ‘अशी ही पळवापळवी’ सबकुछ मीच असावा असा ध्यास घेतलेल्या थोरल्या महागुरुंनी तो अर्थातच कानाआड केला. फटमार अडवानींच्या हस्ते व्हावे हा पूज्य जेटलीजींचा सल्लाही त्यांनी असाच धुडकावून लावत तो आद्यपूजेचा मान मा. शाजींना द्यावा असे त्यांनी ठरवून टाकले आहे.
परशाचे वगनाट्य गुरु म्हणून ड्रामादेवबाबा चमकून जाणार आहेत. तर डब्बल श्रींना लीला/लाला काळभोर यांचे गुरु (तेच ते परशाला ‘प्रसादाचा आंबा’ देणारे) यांची भूमिका देण्यात येणार आहे. पण हे अजून फिक्स नाही कारण त्या गुरुंच्या भूमिकेवर आपलाच हक्क आहे असे सांगत कुणी एक स्थानिक आंबेवाले गुरुजी नि एक मौलाना हजर झाले आहेत. त्यांचे भांडण मिटेतो त्यांचे शॉट्स घेऊ नयेत असे महागुरुंनी ठरवले आहे.
हा इन्टरनॅशनल सिक्वेल (सर्व हीरो लोक परदेशी जातात याची कृपया नोंद घ्यावी) असल्याने ‘सत्तर रुपये वारले’ ऐवजी ‘सत्तर हजार कोटी रुपये वारले’ असा बदल केला आहे. आणि ते ‘नोटाबंदीमध्ये वारले’ असे धनंजय माने ऊर्फ नीरव मोदी सांगतात असा सीन घेतला आहे. परशा बळीला ‘सारखं सारखं त्याच झाडावर काय?’ ऐवजी ‘सारखं सारखं त्याच देशात काय?’ असं म्हणताना दिसेल.
हा चित्रपट ‘रिलायन्स एन्टरटेनमेंट अँड डिफेन्स प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली फ्लोअरवर जाईल. यात मी ही काम करणार असा घोषा धाकल्या अंबानींनी लावला होता. पण ‘तुम्ही आधी देशाबाहेर तर जा, सिक्वेलमध्ये तुम्हाला घेतो’ असे म्हणून थोरल्या महागुरुंनी त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तात्कालिक तडजोड म्हणून जसे यशवंत सिन्हा नाहीत तरी जयंत सिन्हांना घ्यावे लागते, तसे सौ. धाकल्या अंबानी यांना त्यांच्या चित्रपटीय अनुभवाला प्राधान्य देऊन विश्वास सरपोतदार यांच्या पत्नीचे किंवा परशाच्या कमळीच्या मैत्रिणीचे काम द्यावे असा विचार थोरल्या महागुरुंच्या डोक्यात घोळतो आहे.
बाकी तपशील जसा हाती येईल तसा देण्यात येईल. अधिक माहितीसाठी या जागेवर लक्ष ठेवा.
-oOo-
---
संबंधित लेखन:
अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा