-
आलेखाचा तिढा « मागील भाग
भारतीय साहित्यामध्ये जे स्थान रामायण नि महाभारतासारख्या महाकाव्यांना आहे तेच स्थान ग्रीकांच्या इतिहासामध्ये होमर कवीच्या इलियड आणि ओडिसीला आहे. ट्रॉयचे ग्रीक नाव ‘इलियन’ (Ilion), म्हणून त्याची कथा ती ‘इलियड’ (Iliad). याचा लेखनकाळ इ.स.पूर्व ७ वे शतक मानला जातो. यामध्ये ट्रॉयच्या युद्धाच्या अखेरच्या पर्वातील काही दिवसांचे तपशील येतात. ‘ओडिसी’ मध्ये इथाका (Ithaca) या तत्कालीन ग्रीक (Mycenaean Greece) राज्याचा राजा ओडिसिअस(१)(Odysseus) याच्या जवळजवळ वीस वर्षांच्या काळातील संघर्षाचे कथानक उलगडले आहे. यातील पहिली दहा वर्षे ही सुप्रसिद्ध ‘ट्रॉयच्या युद्धा’ने (Trojan War) व्यापलेली आहेत. या कथानकामध्ये ट्रॉयच्या युद्धातील अनेक तपशील आठवणींच्या (flashback) रूपात आलेले आहेत.
रामायण नि महाभारताशी संबंधित कथानकांना गाणी, दंतकथा, संस्कारकथा, अध्यात्म अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या साहित्यामध्ये फाटे फुटले, कथनाचे नवे प्रवाह निर्माण झाले. अनेकदा हे प्रवाह महाभारतीय कथांना छेद देऊन जाऊ लागले. मग यांच्यापैकी अधिकृत कोणते हा प्रश्न वारंवार सामोरा येऊ लागला. इलियड, ओडिसी या खेरीज एपिक सायकल हे प्राचीन गीतांचे संकलन, मौखिक परंपरेतून वाहात आलेल्या काही कथा अशा अनेक मार्गांनी ट्रॉयचे कथानकही आधुनिक मानवापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कथानकामध्ये विसंवादही बराच आहे. तेव्हा आज त्याबद्दल बोलताना नक्की कुठले आधार मानायचे या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते.
१९११ मध्ये रिलीज झालेल्या The Fall of Troy (La caduta di Troia) या इटालियन फ़िल्मपासून ट्रॉयची गोष्ट दृश्य माध्यमातून अवतरली. विविध भाषांतून लघुपट, चित्रपट, मालिका, माहितीपट अशा विविध माध्यमांतून कित्येक लेखक, दिग्दर्शक, अभ्यासक आपापले आकलन दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. शब्दांच्या माध्यमांतून तेच करण्याचा हा प्रयत्न आहे. या आकलनाचा आधार Troy: Fall of a City (2018) ही बीबीसीनिर्मित ८ भागांची मालिका आहे. त्यांनी गाळलेल्या तपशीलांमुळे जिथे आकलन अपुरे राहाण्याची शक्यता दिसली तिथे होमरच्या इलियड वा ओडिसीमधून आलेल्या तपशीलाचा वापर करून सांधेजोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
पूर्वरंगएखाद्या संस्कृती वा देशाच्या इतिहासामध्ये लोकप्रिय झालेल्या ऐतिहासिक पौराणिक कथांना नंतर अनेक फाटे फुटत जातात, काही वाटा बुजत जातात काही पुसून टाकल्या जातात. यातून त्या कथानकांना वर्तमानातील काही व्यक्ती, गट, संस्कृती वा विचार यांच्या सोयीच्या मुशीत घडवणे सोपे जाते. क्षत्रिय कुलातील नायक वर्तमानामध्ये शाकाहारी असल्याचे वर्तमानात दुराग्रही प्रतिपादन केले जाऊ लागते. त्यांच्या मांसाहाराचे तपशील कथानकातून वगळले जाऊ लागतात. एखाद्याला नायकत्वाकडून महानायकत्वाकडे पोहोचवण्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वातील उणिवा, दोष निपटून टाकले जातात. काही वेळ यातील काही कथाबीजांना घेऊन स्वतंत्र रचना केल्या जातात. या ग्रथित वा अभिजन निर्मित कथानकाला छेद देणारी कथानके लोकपरंपरेतून, गाण्यातून, मौखिक परंपरेतून वाहात येतात.
या सार्या बदलांबरोबर काही कथानकांना पूर्वरंगही (back story किंवा prequel) निर्माण केले जातात. असे पूर्वरंग हे विशिष्ट अंतस्थ हेतूने चिकटवले जातात. मूळ कथेतील नायकाच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी अथवा त्यातील अविश्वसनीय व्यापक पराक्रमाचे समर्थन करण्यासाठी देवांकडून मिळालेल्या शाप अथवा वरांच्या गोष्टी जोडल्या जातात. एखादा नायक म्हणून प्रस्थापित करावयाच्या व्यक्तिच्या नृशंस अथवा अन्यायकारक कृतीचे समर्थन करण्यासाठी एखादी पूर्वकथा रचून तिच्याद्वारे ‘ती कृती पूर्वी झालेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून झाली’ अशी मखलाशी केली जाते. काही वेळा महानायकांना आपल्या कळपात ओढून घेण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना झिलई देण्यासाठीही वा त्यांची पार्श्वभूमी बदलण्यासाठीही वापरले जातात.
उदाहरण द्यायचे झाले तर कृष्णाची कथा महाभारतामध्ये येते. पण त्याच्या बालपणीच्या कथा या बर्याच नंतर भागवतासारख्या अन्य माध्यमांतून प्रसृत केल्या जातात. कृष्णासारख्याच सामान्य कुलात जन्माला येऊनही महानायक ठरलेल्या मोझेस, पर्सिअस, कर्ण आदी अनेकांच्या बाबतीत जन्मवियोगाच्या (separated at birth) कथा प्रसृत करुन त्यांना तथाकथित उच्चवर्गामध्ये खेचून घेतले जाते. बहुतेक वेळा या कथांमध्ये देव नामक जमाती लुडबूड करताना दिसतात. ट्रॉयच्या या कथेलाही असे काही पूर्वरंग(२) मागाहून चिकटले असे दिसते.
पथ्वीवरील सर्व संस्कृती, समाज वा टोळ्यांचे आपापले देव आहेत. हे कुठे महानायक आहेत, कुठे सर्वशक्तिमान आहेत. या देवांच्या इच्छेखेरीज ट्रॉयच्या युद्धासारखी मोठी घटना घडली तर त्यांच्या देवत्वाला काय अर्थ राहातो? देवांचे संपूर्ण नियंत्रण असलेल्या जगात यादृच्छिकतेला, मानवी इच्छेला थारा नाही. ‘जे होणार ते देवांच्या इच्छेने’ असे शरणागत मानसिकतेची बहुसंख्या मानत असते. तिच्या त्या श्रद्धेला धक्का पोहोचवला तर त्यांच्या कथा सांगणार्या कथेकरीबुवांच्या दक्षिणेत खड्डा पडेल ना.
उत्क्रांतीवादाला अब्राहमिक धर्माच्या लोकांचा आजही विरोध असतो तो याच कारणाने. जीवसृष्टी ही स्पर्धा, सहकार नि यादृच्छिकता यांच्या संयुक्त परिणामाने विकसित होत जाते हे मान्य केले, तर परमेश्वराची कल्पना बाधित होते. तसे झाले तर त्या पायावर उभा केलेला धर्माचा डोलारा बाधित होतो. त्यातून प्रार्थनास्थळांचे नि धर्मोपदेशकांसह अन्य अनेकांचे अर्थकारण कोसळते. म्हणून देवांची सर्वशक्तिमान ही भूमिका शिल्लक राहायला हवी.
पुढे अब्राहमिक नि आशियाई धर्मांनी ते सर्वगुणसंपन्न, कृपाळू असल्याचीही बतावणी रुजवत नेली असली तरी ग्रीक देव हे मानवी आहेत, षड्रिपुंनी लिप्त आहेत. नागदेव, वाघदेवादी निसर्गाशी संबंधित विघ्नकर्त्या देवांशी नाते सांगणारे आहेत. झ्यूस हा देवही त्याच परंपरेतील आहे.
झ्यूसग्रीक परंपरेमध्ये देवांच्याही पिढ्या आहेत. पहिल्या पिढीला टायटन्स म्हटले जाते. याचा प्रमुख होता क्रोनस, हा झ्यूसचा पिता. झ्यूसने हेडिस आणि पोसायडन या दोन भावांशी हातमिळवणी करुन आपल्या वडिलांची सत्ता उलथून टाकली (सांगायची गोष्ट म्हणजे खुद्द क्रोनसने आपले वडील युरेनस यांच्याबाबतही हेच केले होते.). मग या तीन भावांनी जगाची वाटणी केली. हेडिसला पाताळलोक मिळाला, पोसायडनला समुद्राचे राज्य मिळाले आणि झ्यूस हा स्वर्ग नि मर्त्यलोकाचा राजा झाला.
आता मर्त्यलोकांच्या या राज्यात एवढे मोठे युद्ध झाले ते काय राजा झ्यूसच्या इच्छेशिवाय? त्याचे महत्त्व अक्षुण्ण राहायचे, तर ट्रॉयचे युद्धही त्याच्याच इच्छेने झाले याची कथा रचायला हवी. ट्रॉयच्या कथेला चिकटलेली अशी पूर्वरंगसदृश एक कथा असे सांगते की एकदा झ्यूसला पृथ्वीवर वाढत चाललेल्या निम्न-गुणवत्तेच्या लोकसंख्येची चिंता वाटू लागली. विशेषत: निम्न-देवदेवता हे आवश्यकतेपेक्षा अधिक वेगाने पुनरुत्पादन करत असल्याने ही समस्या उद्भवली आहे असे त्याने ठरवले. या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी त्यांच्या वंशावळीचे मोठ्या संख्येने निर्दालन करण्यासाठी त्याने ट्रॉयच्या युद्धाचा घाट घातला.
इथे महाभारतीय युद्ध घडवण्यामागची कृष्णाने दिलेली कारणमीमांसा आठवा. जय, भारत नि अखेर महाभारत या टप्प्यांतून जात असताना महाभारतातील कृष्णाचे जेव्हा दैवतीकरण झाले, तेव्हा त्याला महाभारत युद्धाच्या कर्त्याचे श्रेयही मिळाले. आपण या युद्धाचा घाट का घातला आहे याच्या प्रचलित कारणांबरोबरच तो आणखी एक महत्त्वाचे कारण सांगतो. तो म्हणतो, ‘पृथ्वीवर (ब्रह्मास्त्रासारख्या) दैवी अस्त्रांचा सुळसुळाट झाला आहे. लायक नसलेल्यांच्या हातीही ही अस्त्रे जाऊन बसली आहेत. यातून काही दुष्प्रवृत्त लोकांचे त्यावर नियंत्रण प्रस्थापित होते आहे. हे सर्वसामान्य समाजाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे या युद्धामध्ये या अस्त्रांचा नि ती धारण करणार्या सार्यांचा मी संहार घडवून आणणार आहे.’
रामायणकथेवर आधारित असलेल्या, अलिकडेच वाचनात आलेल्या अमीश देवगण यांच्या ‘अयोध्या त्रिखंडी’ कादंबरीमधील रावणही असाच काहीसा मुद्दा मांडतो आहे. तो म्हणतो, ‘मी माझ्या दिग्विजयाच्या लालसेपोटी माझ्याशी एकनिष्ठ असे शूर, निष्ठुर, क्रूर नि निर्मम सैन्य उभे केले आहे. त्यांच्याकडून मला हवे ते साध्यही केले आहे. परंतु यात धोका असा आहे की ज्याक्षणी त्यांच्यावरील माझा ताबा निसटेल, वा माझा मृत्यू घडेल, त्याक्षणी ते निर्नायकी सैन्य मोकाट सुटेल. आणि असे सैन्य समाजासाठी अतिशय घातक ठरेल.’ त्यासाठी रामाशी युद्ध ओढवून घेत या सैन्याचा विनाश घडवून आणण्याचे आपले प्रयोजन असल्याने तो सांगतो.
आपल्या अनिर्बंध वर्तनाने हाताबाहेर गेलेल्या मानवी समूहाचा संहार करण्याची ही कल्पना विविध समाज, संस्कृतींच्या पुराणकथांमधून वारंवार डोकावते. अब्राहमिक धर्मांच्या परंपरेमधील नोहाच्या कथेमध्ये, भारतीय परंपरेतील मनूच्या माशाच्या कथेमध्ये देवांनी धाडलेल्या जलप्रलयाचा हेतू मानवी वंशसंहार हेच आहे. हाच हेतू साध्य करण्यासाठी झ्यूस एक डाव खेळतो आहे.
पीलिअस आणि थेटिस या देवांच्या विवाहप्रसंगी हर्मिस या देवाला फितवून तो ‘विसंवादाची देवी’ एरिस हिला लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यास अटकाव करतो. परतून जाण्यापूर्वी एरिस दरवाजातूनच एक सोनेरी सफरचंद आत भिरकावते. त्यावर लिहिलेले असते ‘सर्वात सुंदर व्यक्तिसाठी’ (Kallistē).
ही भेट कुणासाठी आहे यावरुन झ्यूसची पत्नी हेरा (जी त्याची बहीणही आहे), त्याची मेतिस या देवतेपासून झालेली मुलगी अथीना आणि डायोनी या देवतेपासून झालेली दुसरी मुलगी अफ्रोडाईटी या तिघींमध्ये वाद सुरू होतो.
या तिघींच्या वादाचा निवाडा करून दोघींशी शत्रुत्व घेण्याची कुण्या देवाची इच्छा नसते. मग झ्यूस या तिघींना माउंट आयडा येथील एका मेंढपाळाचा मुलगा अलेक्झांडर यांच्याकडे पाठवतो नि त्याच्याकडून या प्रश्नाचा निवाडा घ्यावा असे सुचवतो. इथे पूर्वरंगाचा हा प्रवाह ट्रॉयच्या कथानकाकडे जाणारे वळण घेतो
देवकथा आणि आपणपण ज्या व्यक्ती ‘सांगितले तसे’ कथानक भक्तिभावाने ग्रहण करत नाहीत, ज्यांचे विचारांचे इंद्रिय जागे असते, अशांना ‘सारे देव, पृथ्वीवरील मानवजातीतील सर्व संभावित व्यक्ती सोडून झ्यूसने एका मेंढपाळ-पुत्राकडे हा निवाडा का सोपवावा?’ असा प्रश्न पडेल. इथे माझा पूर्वरंगाचा मुद्दा स्पष्ट होईल. ही कथाच मुळी पुढे ट्रॉयच्या युद्ध नि त्याला कारणीभूत ठरणार्या त्यापूर्वीच्या (हेलनचे अपहरण वा स्वखुशीने पळून जाणे वगैरे) घटनांना पार्श्वभूमी म्हणून रचली गेली आहे. त्यातून त्या पुढच्या कथाभागामधील काही घटनांचे समर्थन करणारा कथाभाग इथे लिहिला जातो आहे.
देवकथा या काल्पनिकच असतात, मानवी आयुष्यात घडलेल्या घटनांना कार्य-कारणभावाचे, लिहिणार्याच्या वा त्याच्या गटांच्या स्वार्थांना, खोटे टेकू देण्यासाठी त्यांची निर्मिती केली जात असते. त्यातून देवांचे देवपणही शेंदराचा आणखी एक लेप देऊन घट्ट केले जात असते.
हा सारा पूर्वरंग लिहिला नसता तरी पॅरिस, हेलन नि ट्रॉय यांच्या संबंधाने घडलेल्या पुढच्या घटना तशाच घडल्या असत्या. पाहिलेली मालिका, होमरची दोन महाकाव्ये यांनी दिलेले बिंदू जोडताना देवकथांच्या बिंदूंना फारसे महत्त्व न देता मर्त्य लोकाशी संबंधित बिंदूंतूनच परस्पर-संबंधांचा आलेख रेखण्याचा माझा प्रयत्न आहे.
आपले भारतीय देव हे चांगल्या-वाईटाचा आधीच निवडा करून त्यातील योग्य बाजूला एकतर्फी मदत करतात. ग्रीक देव मात्र एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे माणसांना मोहरे म्हणून वापरतात. खेळामध्ये जसा कौशल्याबरोबरच (systematic part) शक्यतांचा, संभाव्यतांचा (chance and compounding factors) भागही असतो तसेच यांच्या कह्यात असलेला नि नसलेलाही भाग या खेळात असतो. त्यामुळेच मानवी जीवनाचा खेळ सर्वस्वी पूर्वनियोजित न राहता त्यात अनिश्चिततेला वाव राहतो.
हा खेळ जरी झ्यूसने सुरू केला असला तरी त्याचे मोहरेच ते खेळत असतात. इथे झ्यूस, हेरा, अथिना आणि अफ्रोडाईटी हे काहीसे आपल्याकडील आयपीएल (Indian Premier League) वा जगभरातील तत्सम स्पर्धांमधील ‘संघमालकां’च्या भूमिकेत आहेत. आपले खेळाडू निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. पण प्रत्यक्ष मैदानावरचा खेळ या खेळाडूंच्या कौशल्यावर भिस्त ठेवूनच खेळला जात असतो.
- (क्रमश:) -
पुढील भाग » पॅरिस आणि हेलन
टीपा :
(१) याचेच लॅटिन नाव Ulysses. प्रसिद्ध इंग्लिश कवी अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन याने ‘युलिसिस’ याच शीर्षकाचे दीर्घकाव्य लिहिले आहे. वीस वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या राज्यात परतून आलेल्या युलिसिस वा ओडिसिअसचे स्वगत हे काव्य मांडते आहे. [↑]
(२). असा ‘पश्चातबुद्धी’ने जोडलेला पूर्वरंग ही पौराणिक कथांचीच मक्तेदारी नाही. अनेक अर्वाचीन कथानकांचेही असे पूर्वरंग (prequel) लिहिले वा सादर केले गेले आहेत. दृश्य माध्यमांतून उल्लेखनीय म्हणता येईल असे Star Wars चित्रपट-मालिकेचे उदाहरण देता येईल. आमच्या लहानपणी लोकप्रिय असलेल्या ‘टॉम अँड जेरी’ यांच्या बालपणीचे किस्से सांगणारी चलच्चित्रपटांची मालिकाही मागाहून सादर झाली होती.
परंतु या अर्वाचीन मंडळींना पुराणकथा लिहिणार्यांच्या सफाईने या पूर्वरंगांची वीण वर्तमानाशी घट्ट जोडता येत नाही असे माझे मत आहे. त्यांनी लिहिलेले पूर्वरंग बव्हंशी स्वतंत्र कथा म्हणूनच उभे राहातात. उदाहरणच द्यायचे तर अलिकडेच आलेला मुफासा (२०२४) हा चलच्चित्रपट डिस्नेच्या ‘द लायन किंग’ची (१९९४) पूर्वपीठिका सांगू पाहातो. पण सिम्बाच्या वडिलांची ही कथा बव्हंशी सिम्बाच्या कथेच्या वळणावरच जाते. तिचे कोणतेही महत्त्वाचे धागे पुढच्या कथेशी घट्टपणे जोडले जात नाहीत.[↑]
सोमवार, ८ जून, २०२६
हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: २. पूर्वरंग
हे वाचले का?
आकलन
जिज्ञासानंद
मालिका
मिथ्यकथा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा