गुरुवार, ५ मे, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश

सामान्यपणे औषध निर्मिती कंपन्यांना त्यांचा संशोधन-खर्च - जो अवाढव्य असतो - भरून येण्यासाठी ते औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. या काळात अन्य कोणत्याही उत्पादकाला या उत्पादनाशी मिळतेजुळते असे उत्पादन बाजारात आणण्यास मनाई केलेली असते. हा कालावधी उलटल्यानंतर मात्र अन्य उत्पादक या किंवा तत्सम द्रव्याचे उत्पादन करू शकतात. यात उत्पादन-एकाधिकार नि संशोधन-एकाधिकार असे दोन भाग असू शकतात. हा एकाधिकार काळ वाढवून मिळावा यासाठी बहुतेक औषध कंपन्या प्रयत्नशील असतात. यात त्यांना मोठा धोका वाटतो तो 'जेनेरिक ड्रग' निर्मात्या औषध कंपन्यांचा. या कंपन्या सामान्यपणे स्वतंत्र संशोधन करीत नाहीत. बाजारात आलेले औषधच ते द्रव्याच्या फॉर्म्युलात वेगळेपण दाखवण्यापुरता बदल करून तांत्रिकदृष्ट्या नवे औषध बाजारात आणणात. यात त्यांचा संशोधन-खर्च नगण्य असल्याने या नव्या औषधाची किंमत ते मूळ औषधापेक्षा कितीतरी कमी ठेवू शकतात. यामुळे मूळ उत्पादक कंपनीच्या विक्रीत वेगाने घट होते. हे टाळण्यासाठी मूळ संशोधक कंपनीला काही कालावधीत त्या उत्पादनासाठी एकाधिकार बहाल करण्यात येतो. या कालावधीमधे अन्य कोणत्याही उत्पादकाला अथवा वितरकाला त्या उत्पादनाशी संबंधित नवे उत्पादन बाजारात आणण्यास मनाई असते. परंतु एखादे नवे उत्पादन हे अशा एकाधिकाराखाली असलेल्या उत्पादनाशी संबंधित आहे का किंवा त्याच्या विक्रीक्षेत्रात प्रत्यक्ष घट करणारे आहे का हे ठरवणे नेहमीच गुंतागुंतीचे असते. आजही संशोधक-उत्पादक अशा मोठ्या औषध कंपन्यांच्या पैशाचा मोठा हिस्सा अशा 'कॉपी कॅट' कंपन्यांशी कायदेशीर लढाई खेळण्यात गुंतलेला असतो.

रोशकडे उत्पादन-एकाधिकार असलेल्या लिब्रियम नि वॅलियम या दोन औषधांचे एकाधिकार १९६८ नि १९७१ मध्ये संपले होते नि स्पर्धा-व्यापाराला चालना देण्याच्या धोरणानुसार ब्रिटन सरकारने 'डी.डी.एस.ए.' नि 'बर्क' अशा दोन कंपन्यांना या दोन औषधांचे 'सक्तीचे' उत्पादन परवाने दिले होते. या परवान्यांबद्दल प्रथम रोशने आक्षेप नोंदवला. रोशचा आक्षेप असा होता की सदर उत्पादनांचा संशोधन-खर्चदेखील अद्याप वसूल झालेला नाही आणि अशा तर्‍हेने इतर उत्पादकांना उत्पादनाचे हक्क देणे हे रोशवर अन्याय करणारे आहे. रोशने नोंदवलेल्या आक्षेपाचा तपास करणार्‍या यंत्रणांना मात्र आवश्यक ती संशोधन-संबंधी माहिती देण्यास रोशने नकार दिला. कदाचित यातून त्यांची खरी उलाढाल किती हे जर नियंत्रक संस्थांना समजले असते तर त्यांचा मागे आणखी काही शुक्लकाष्ठे लागण्याचा धोका होता.नंतर प्रशासकीय पातळीवर काही करता येत नाही हे पाहून या दोन कंपन्यांच्या उत्पादनाबद्दल रोशने खरी खोटी ओरड सुरू केली नि त्यांच्या उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळाचे आदळआपटीचे कारण असलेला दोन्ही उत्पादनांचा या दोनही कंपन्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा जेमतेम एक टक्का इतकाच होता.

लिब्रियम नि वॅलियम उत्पादनाचे हक्क ब्रिटनमधे डी.डी.एस.ए आणि बर्कला मिळाल्यानंतर त्यांना ग्राहक मिळू नयेत यासाठी रोशने पद्धतशीर प्रयत्न चालू केले. मोठ्या रुग्णालयांना त्यांनी ही औषधे फुकट पुरवायला सुरवात केली. संशोधन-संरक्षण कालावधीत या उत्पादनांवर अफाट पैसा आधीच मिळवल्याने नि अनेक देशात असलेल्या उत्पादन व्यवस्थांमधून स्वस्त उत्पादन करणे शक्य असल्याने रोश हे सहज करू शकत होती. (आणि गंमत म्हणजे दुसरीकडे या औषधांचा संशोधन-खर्च देखील वसूल न झाल्याचा दावाही करीत होती.) यामुळे या दोन स्पर्धकांना रुग्णालयांसारखे मोठे ग्राहक मिळेनासे झाले. त्यातच रुग्णालयामधे एकदा उपचार घेतला की ते रुग्ण नि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स तीच औषधे चालू ठेवणे - साहजिकच - इष्ट समजत. दुसर्‍या बाजूने या 'धर्मादाय' कामामुळे रुग्णांमधेही रोशला सहानुभूती मिळू लागली.

हेच तंत्र वापरून कॅनडामधे फ्रँक हॉर्नर नावाच्या कंपनीला साफ आडवं केलं. या सुमारास रोशच्या एका पत्रकात लिहिले होते 'अशा चालींमुळे हॉर्नर कंपनीचा आपल्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न थंडावेलच पण तसा हेतू बाळगणार्‍या इतर कंपन्यांनाही परस्पर शह बसेल. रोशच्या अंतर्गत प्रसारासाठी असलेल्या एका पत्रकात असे म्हटले होते की 'बाजारपेठेत जाणार्‍या सर्व मार्गांवर वॅलियम - लिब्रियमचे लोंढे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहू देत की सध्याच्या नि भविष्यातील बांडगुळांना त्यातून वाटच मिळू नये.' तथाकथित स्पर्धात्मक व्यापाराचे थडगे बांधण्याचाच हा प्रकार होता. रोशच्या या कृत्यांबद्दल पुढे कॅनडातील न्यायालयाने अतिशय कठोर शब्दात आपला निर्णय दिला होता. 'स्वसंरक्षणासाठी माणूस एका मर्यादेपर्यंतच आपली ताकद वापरू शकतो, त्याप्रमाणे आपल्या बाजारपेठेच्या रक्षणासाठीही विशिष्ट मर्यादेतील मार्गच अवलंबले पाहिजेत. एखाद्याने तुमच्या मुस्कटात मारली तर तुम्ही त्याला ठार मारू शकत नाही. रोशचे मार्ग पाहता त्यांना हॉर्नर कंपनीशी स्पर्धा करायची नव्हती, हॉर्नरला आपल्याशी स्पर्धा करूच द्यायची नव्हती.'


ब्रिटिश मक्तेदारी आयोग नि रोश:

वर मागे उल्लेख केलेल्या दोन कंपन्या डीडीएसए नि बर्क यांना लिब्रियम नि वॅलियमच्या एकुण बाजारमूल्याच्या एक टक्कासुद्धा हिस्सा मिळत नव्हता नि जो मिळत होता तेवढाही मिळू नये यासाठी रोश सर्वतोपरी प्रयत्न करीत होती हे ही आपण पाहिले. अखेर आरोग्य नि सामाजिक सुरक्षा विभागाच्या शिफारसीवरून ब्रिटनच्या मक्तेदारी आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले. या अहवालानंतर ब्रिटनच्या व्यापारमंत्र्यांनी या दोन उत्पादनांची विक्री किंमत सुमारे ६० नि ७५ टक्क्याने कमी करण्याचा आदेश दिला. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी हातची जाते म्हटल्यावर रोश खवळणे साहजिक होते. या संपूर्ण तपासादरम्यान रोशने आयोगाला सहकार्य केले नाही. आयोगाने याबाबत आपल्या अहवालात कडक ताशेरे झोडले. रोशचा मुख्य मुद्दा असलेल्या तथाकथित प्रचंड संशोधन-खर्चाबाबत शहानिशा करून घेण्यासाठी मागवलेली आकडेवारी रोशने आयोगाला दिलीच नाही. प्रसिद्धी माध्यमातून भागधारकांसाठी प्रसिद्ध केलेली माहिती इतकी मर्यादित होती की त्यावरून रोशच्या जागतिक उलाढालीची पुरी कल्पना येणे शक्यच नव्हते. या असहकारानंतरही आयोगाने आपला तपास पूर्णत्वाला नेला नि रोशला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

हा तपास चालू असतानाच ब्रिटन मधील बेरोजगारीबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या डलरी येथे जीवनसत्त्वनिर्मितीचा एक कारखाना काढण्याची योजना सादर केली होती. पुन्हा एकदा रोजगाराचे आमिष दाखवून जनमत आपल्या बाजूला वळवून आयोगाच्या अहवालाबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याच्या कोल्हेकुईला स्थानिक पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे रोशचे उपाध्यक्ष "ब्रिटनचा आरोग्य-विभाग आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्हाला हा कारखाना उभारण्यासाठी दुसर्‍या देशाचा विचार करावा लागेल" अशी अप्रत्यक्ष धमकीही देत होते. याचवेळी प्रसिद्धी माध्यमातून रोश आपल्याला मिळणार्‍या वागणुकीची तुलना १९३० मधील रशियातील 'शुद्धीकरण' मोहिमेशी करत होती. यात एखाद्या अधिकार्‍याच्या टेबलवर रिकामी फाईल येई नि त्याबरोबर संदेश असे की 'अमुक अमुक कॉम्रेड राष्ट्रद्रोही आहे हे सिद्ध करा'. तो अधिकारी निमूटपणे तसा आरोप सिद्ध करणारा पुरावा तयार करून पाठवून देई, ज्याच्या आधारे 'शुद्धीकरणा'चे कार्य पूर्ततेस नेले जाई. आपल्यालादेखील ब्रिटिश आरोग्यविभाग अशीच वागणूक देत असल्याचा रोशचा दावा होता.

अर्थात या सार्‍या कांगाव्याचा फारसा परिणाम झाला नाही. एवढेच नव्हे तर ब्रिटनमधील धोरणाचे पडसाद लगेच इतर राष्ट्रांमधे उमटले नि रोशला तिथेही या दोन उत्पादनांच्या किंमती कमी करायला सांगण्यात आले. अखेर रोशने सामोपचाराने हा प्रश्न सोडवण्यास राजी झाली. तडजोडीनुसार दोन्ही उत्पादनांच्या विक्री किंमतीमध्ये 'पन्नास टक्के' कपात करण्याचे रोशने मान्य केले. एवढेच नव्हे तर डलरीतल्या नव्या कारखान्यात भरपूर गुंतवणुकीची तयारी दाखवली नि आधी नाकारलेले सुरक्षा विभागाच्या स्वयंनियमन योजनेचे सदस्यत्व हि स्वीकारले. त्याचबरोबर आरोग्य विभागाला भरपाई म्हणून सुमारे छत्तीस लाख पौंड देण्याचंही मान्य केलं. वर हे सारं झाल्यावर रोशचे उपाध्यक्ष उद्गारले 'आता आम्ही समाधानी आहोत. या समझोत्यानं सार्‍यांचाच लाभ होईल.' म्हणजे किंमती निम्म्यावर आणून, एवढी भरपाई देऊनही रोशचे फारसे नुकसान झाले नव्हतेच!


जागतिकीकरण आणि रोश:

रोशच्या युरप नि जगातील अन्य देशात शाखा होत्या याचा उल्लेख वर आलेला आहेच. आता याचा फायदा रोश कसा उठवत असे हे पाहू. रोशच्या अन्य देशातील उत्पादक कंपन्या या त्या त्या देशात स्वतंत्र कंपन्या म्हणून नोंदवलेल्या असत. याचा अर्थ त्यांच्यातील मालाची देवाणघेवाण ही व्यापार म्हणूनच गणली जाई. आता या स्वतंत्र कंपन्या उत्पादनासाठी लागणार्या कच्च्या मालाची मागणी मूळ रोशकडे नोंदवत. पण रोश सर्व कंपन्यांना सारख्या दराने कच्चा माल देत नसे. ती कंपनी ज्या देशातील असे तेथील करपद्धती, त्या देशातील आयात-निर्यात नियम, राजकीय परिस्थिती, बाजारमूल्य इ. चा विचार करून त्या कंपनी त्या देशात किती नफा दाखवणे सोयीचे आहे त्यानुसार आवश्यक तेवढा खर्च व्हावा हे ध्यानात ठेवून रोश मालाची कच्च्या मालाची किंमत निश्चित करत असे. ती कंपनीदेखील अप्रत्यक्षपणे रोशचीच उपकंपनी असल्याने अशा असमान दरांबद्दल तिची कोणतीही तक्रार नसे.

मक्तेदारी आयोगाने अंदाज काढला की १९६६ ते १९७२ या सहा वर्षांच्या काळात रोशने अशा मार्गाने फक्त ब्रिटनमधून सुमारे अडीच कोटी पौंड नफा मिळवला नि वर विवरण केलेल्या 'ट्रान्स्फर प्राईसिंग' (Transfer Pricing) च्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधे बिनबोभाट नेला.

या ट्रान्स्फर प्राईसिंगचे एक उदाहरण बघू. रोशच्या इटली नि ब्रिटन येथे उत्पादक कंपन्या होत्या. इटली या देशात संशोधन-एकाधिकार कालावधीचा नियम अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तेथे अधिक तीव्र स्पर्धा असल्याने औषधांचे दर कायम खालीच रहात असत. येथील आपल्या उत्पादक कंपनीला रोश लिब्रियमचा कच्चा माल असलेली पावडर ९ पौंड दराने देत असे. याउलट ब्रिटनमधे पंधरा वर्षांचा संशोधन-एकाधिकार रोशकडे असल्याने स्पर्धा नसलेल्या या सुरवातीच्या काळात रोश औषधाचे दर चढे ठेवून अधिकाधिक फायदा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती. यामुळे इटलीच्या तुलनेत ब्रिटनच्या कंपनीचा फायदा प्रचंड होता. परंतु या प्रचंड फायद्यावर ब्रिटनमधे त्यांना कर भरावा लागू नये यासाठी हा फायदा कागदोपत्री कमी करण्यासाठी इटलीच्या कंपनीला ९ पौंड दराने विकला जाणारा कच्चा माल तब्बल ३७० पौंड या दराने विकत असे. यामुळे ब्रिटिश कंपनीचा उत्पादन खर्च प्रचंड असे नि त्यामुळे प्रत्यक्ष करपात्र नफा नगण्य राही. आणि निव्वळ विक्रीच्या माध्यमातून रोशने जवळजवळ सर्व नफा स्वित्झर्लंडमधील कंपनीत शोषून घेतलेला असे. यामुळे १९७१ या वर्षी फक्त लिब्रियम नि वॅलियम या दोन औषधांवर रोशने ४८ लाख पौंड नफा मिळवला होता, परंतु विक्रीमधे सिंहाचा वाटा असलेल्या ब्रिटनमधील कंपनीला या वर्षी चक्क तोटा झाल्याचे कागदोपत्री दिसत होते. याचवेळी तिसर्‍या जगातील देशात (Third World countries) मधे लिब्रियम हे औषध त्याच्या मूळ वाजवी किंमतीपेक्षा सुमारे ६५ पट किंमतीला विकले जात होते आणि हे त्या राष्ट्रांनी दिलेल्या आयात सवलतींचा लाभ घेऊनही, हे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. (पुढे भारतासारख्या राष्ट्रांमधून ’जेनेरिक ड्रग उत्पादकां’नी रोश आणि तिच्यासारख्या कंपन्यांना त्यांच्याच मार्गांचा वापर करून त्यांना धडा शिकविला.)

उरुग्वे या देशात माँटव्हिडिओ नावाच्या ठिकाणी 'रोश इंटरनॅशनल लिमिटेड' नावाच्या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. शक्य तितक्या ग्राहकांना मूळ रोश ऐवजी रोश इंटरनॅशनलशी व्यवहार करण्यास उद्युक्त केले जाई. पण इथे कोणतेही उत्पादन होत नसे. माँट्व्हिडिओ येथे नफ्यावर कोणताही कर आकारला जात नसे. त्यामुळे हे ठिकाण करचुकव्यांचे नंदनवनच बनले होते. पुन्हा ट्रान्स्फर प्राईसिंगचा वापर केला जाई. मूळ रोश रोश इंटरनॅशनलला अत्यंत नगण्य दरात उत्पादन विकत असे. मग हेच उत्पादन रोश इंटरनॅशनल ग्राहकाला बाजारभावाने - जो त्यांच्या खरेदी किंमतीच्या कित्येक पट असे - विकून प्रचंड करमुक्त नफा कमवत असे.

रोशचे अध्यक्ष डॉ. जान यांना एकदा या कंपनीबद्दल नि त्या अनुषंगाने होणार्‍या करचुकवेगिरीबद्दल छेडले असता ते म्हणाले होते "जिथे तुम्हाला पन्नास, साठ, सत्तर वा अगदी नव्वद टक्के फायदा हा फक्त करापोटी घालवावा लागणार नाही त्या ठिकाणी अगदी कायदेशीररित्या काही पैशाचा साठा करण्याचा प्रयत्न करणे हे 'मनुष्यस्वभावाला धरून आहे'. शिवाय हा पैसा आम्ही आमच्या संशोधनकार्यासाठी, उद्योगाच्या वाढीसाठी गुंतवणूक म्हणून वापरतो. कायदेशीर करव्यवस्थेतील कमतरता नि त्रुटी यांचा वापर करून जर कुणी कर चुकवत असेल तर तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणणार का? छट्, मी तर मुळीच म्हणणार नाही.' रोशची एकुण व्यावसायिक भूमिकाच यातून स्पष्ट होत होती.

हे वाचले का?

मंगळवार, ३ मे, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती


 • रोश त्यावेळी सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्पादन करत असे. अशी उत्पादने बनवणार्‍या अन्य कंपन्यांना रोशने आपली उत्पादने घाऊक भावात कमी किंमतीने देऊ करून आपले कारखाने बंद करावेत यासाठी राजी करत असे. अर्थात यात एका बाजूने त्या उत्पादकाचा प्रत्यक्ष फायदा ही लालूच, नपेक्षा त्याच्या ग्राहकांना त्याच्या घाऊक खरेदी किंमती इतकीच किरकोळ विक्रीची किंमत देऊ करण्याची अप्रत्यक्ष धमकी असे दुहेरी शस्त्र वापरले जाई. अॅडम्सच्या कारकीर्दीतच किमान पाच प्रमुख उद्योगांनी आपले कारखाने बंद करून आवश्यक ती जीवनसत्त्वे रोशकडून घ्यायला सुरवात केली.

  याच दुहेरी अस्त्राचा वापर करूनच अमेरिकेत बड्या मॉल कंपन्यांनी स्थानिक 'अंकल-आंटी शॉप्स'चा बळी कसा घेतला याचे सुरेख विवेचन अनिल अवचट यांच्या 'अमेरिका' या पुस्तकात आले आहे. याच भयाने उत्तर भारतात रिटेल चेन-शॉप्सना विरोध करून ती बंद पडण्यात आली. (अर्थात ही नाण्याची केवळ एक बाजू आहे हे ही खरेच आहे.) पेप्सी नि कोकाकोला या दोन कंपन्यांना भारताबाहेर घालवणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांना प्रगतीविरोधी म्हणून लाखोली वाहण्यात आली. नंतर आलेल्या सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा झेंडा खांद्यावर घेताना या दोन कंपन्यांना दारे खुली करताच अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ सर्वच भारतीय शीतपेयांच्या कंपन्यांचा घास घेतला हा अगदी ताजा इतिहास आहे.
 
 • ज्यांना वरील पहिल्या प्रकारे वठणीवर आणता येत नसे त्यांच्यासाठी रोशचा दुसरा फास तयार होताच. जीवनसत्त्वे नि रसायने बनविणार्‍या सर्व प्रमुख उत्पादकांना एकत्र आणून एक सर्वमान्य किंमत निश्चित करून घेणे (collusion and price fixing) यासाठी रोशच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रोशतर्फे अशा उत्पादकांच्या कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जात. वरवर पाहत यात किंमतीत तफावत राहू नये जेणेकरून रोशसारख्या मोठ्या कंपन्यांनी किंमत कमी ठेवून अन्य उत्पादकांना अनाठायी स्पर्धेत लोटू नये व त्यांचे खच्चीकरण करू नये असा उदात्त हेतू असावा असे वाटते. पण ग्यानबाची मेख अशी होती, की जर एखाद्या अन्य - स्थानिक वा छोट्या - उत्पादकाचे नि रोशचे उत्पादन एकाच किंमतीला मिळत असेल तर साहजिकच ब्रँड-नेम असलेल्या रोशच्या उत्पादनालाच ग्राहक अधिक पसंती देत. अर्थात हे तर्कशास्त्र ग्राहकांपर्यंत पोचवण्याची रोश व्यवस्थित काळजी घेई हे वेगळे सांगायची गरत नाही.

  अशा तर्‍हेने एकाधिकारशाही (Monopoly) नि एकाधिकारशाही मोडून काढण्याचे उपाय या दोन्ही मार्गाने रोश स्वत:च्या फायद्याचे तेच घडवून आणत असे.

 • देशोदेशी शाखा असलेल्या रोशला विविध देशातून येऊ शकणार्‍या मागणीचा वेध घेण्याचे, अंदाज बांधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले होते. एकदा हा अंदाज उपलब्ध झाला कि उत्पादन त्या दृष्टीने वाढवण्याऐवजी उत्पादन त्या मागणीहून कमी ठेवले जाई. यासाठी काही कारखाने बंद ठेवावे लागले तरी पर्वा केली जात नसे. एखाद्या आणिबाणीच्या क्षणी उत्पादन वाढवण्याऐवजी कमी करून किंमती भरमसाठ वाढवल्या जात. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे भारतात इन्फ्लुएंझाची साथ आली असताना आवश्यक औषधांचे उत्पादन कमी करून रोशने त्याच्या वाढलेल्या किंमतीचा फायदा घेऊन प्रचंड नफा कमावला होता. स्वतः बराच काळ लॅटिन अमेरिकेतील गरीब देशात काढलेल्या अॅडम्सला तेथील जीवनसत्त्वांच्या अभावी नि:सत्त्व झालेले जीव दिसत होते तर दुसरीकडे त्यांच्या मूळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न न करता त्यांना जीवनसत्त्वे देणारी औषधे विकून आपले उखळ पांढरे करून घेणारी व्यवस्था दिसत होती. अॅडम्स म्हणतो 'या उद्योगधंद्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान अशा कुणी तरी या सार्‍या (अनैतिकता बोकाळलेल्या) स्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे होते.' अशी कोणतीही यंत्रणा स्वित्झर्लंडमधे अस्तित्वात नव्हती, आजही नाही. परंतु यानंतर बाजारपेठ व्यापक करण्याच्या दृष्टीने १९७२ च्या डिसेंबार महिन्यात रोशने 'युरपिअन इकनॉमिक कमिटी (ई.सी.सी.) बरोबर खुल्या व्यापाराचा करार केला नि अशी व्यवस्था अॅडम्सला उपलब्ध झाली.

 • रोशचा आणखी एक मास्टरस्ट्रोक म्हणजे तथाकथित 'एकनिष्ठेचा करार'. अनेक बड्या ग्राहकांना पटवून हा करार त्यांच्या गळी उतरवण्यात आला होता.

  १. यानुसार त्या ग्राहकाला आपल्या गरजेच्या किमान नव्वद ते पंचाण्णव टक्के माल हा रोशकडून घ्यावा लागे. या बदल्यात ख्रिसमसच्या काळात रोशकडून त्यांना रोखस्वरूपात पाच ते दहा टक्के सूट देण्यात येई. अर्थात बिल पूर्ण रकमेचे देण्यात येत असल्याने एक प्रकारे काळा पैसा निर्माण करण्यास मदत होई.

  २. याशिवाय त्या ग्राहकाला अन्य उत्पादकाकडून रोशपेक्षा कमी दराचे कोटेशन मिळाल्यास तर त्याने ते रोशला कळवणे बंधनकारक होते. यानंतर या दरात रोश मालाचा पुरवठा करणार का हे रोशला विचारणे बंधनकारक होते. रोशने याबाबत निर्णय घेतल्याशिवाय त्या उत्पादकास ऑर्डर देण्यास मनाई होती. हे कलम अन्य उत्पादकांवर उघड अन्याय करणारे होते. एवढेच नव्हे तर एका अर्थाने आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणार्‍या या प्रोफेशनल हेरांचे जाळेच रोशला उपलब्ध झाले होते. त्यायोगे प्रतिस्पर्धी उत्पादनाची इत्थंभूत माहिती रोशला मिळे नि त्यावर उपाययोजना करण्यास पुरेसा वेळ नि आयती व्यवस्था मिळत असे.

  ३. रोश उत्पादन करीत असलेल्या एकाही उत्पादनाबाबत वरील अटींचा भंग झाल्यास ग्राहकाला वरील सूट मिळत नसे.

  ४. लेखी करार करण्यास अनुत्सुक ग्राहकांसाठी केवळ 'परस्पर-सामंजस्य' या पातळीवरही सदर करार वैध मानला जाई.

  ५. असा करार करणार्‍या ग्राहकांना रोशच्या उत्पादनाचा पुरवठा करण्यात नेहमीच अग्रक्रम दिला जाई. याचा एक अर्थ असा होता कि ज्यांनी करार केलेला नाही त्यांना तुटवड्याच्या काळात ज्या ग्राहकांनी करार केलेला नाही त्यांनी आधी मागणी नोंदवूनही मागाहून आलेल्या करारबद्ध ग्राहकाच्या मागणीमुळे आवश्यक माल मिळेलच याची शाश्वती नव्हती. ज्या लहान ग्राहकांना असा करार करणे शक्य नव्हते त्यांना मूग गिळून बसण्यापलिकडे काहीच करता येत नसे. १९७१ साली जीवनसत्त्वाच्या आगामी तुटवड्याचा अंदाज घेऊन रोशने त्या कारणास्तव अनेक ग्राहकांना अशा करारात बांधून घातले होते.

 • जीवनसत्त्वांच्या उत्पादनात सुमारे ७५% वाटा हा मांसासाठी होणार्‍या पशुपालन व्यवसायात लागणार्‍या प्राण्यांच्या पोषकद्रव्यांचा होता. त्यामुळे मांसाची विक्री किंमत ही थेट या जीवनसत्त्वांच्या किंमतीवर अवलंबून होती. अमेरिका वगळून अन्य देशातील अशा जीवनसत्त्वांची विक्री वार्षिक सत्तर कोटी डॉलर्सहून अधिक होती. हा आकडा ७०च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे लक्षात घेतले तर ही बाजारपेठ किती प्रचंड मोठी होती हे लक्षात येईल. यात मोठा वाटा युरपचा होता. या प्रचंड बाजारपेठेत वरील उपायांचा परिणामकारण वापर केल्याने रोशला स्पर्धक जवळजवळ नव्हतेच.

अशा तर्‍हेने रोश हजार हातांनी आपला फायदा लाटत असताना याविरुद्ध कोणीच कसा आवाज उठवत नव्हतं असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. शासकीय यंत्रणा यात काहीच करू शकत नव्हत्या का असे प्रश्न पडतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. तो म्हणजे रोश ही 'स्वित्झर्लंड'मधे मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती. मुळात स्वित्झर्लंड या देशाचे कायदे अतिशय लवचिक नि रोशचे अनेक राष्ट्रात अस्तित्व असल्याने 'अधिकारक्षेत्राचा' (Jurisdiction) महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होत होता. याशिवाय असा आवाज उठवायचा कोणी (व्यक्ती की व्यवस्था) हा प्रश्न होताच. त्यात स्विस कायदे कंपनीला अनुकूल असल्याने (याचा दाहक अनुभव अॅडम्सला पुढे आलाच) निदान स्विस सरकार तरी या फंदात पडेल हे शक्यच नव्हते. त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा देशात आणणार्‍या कंपनीचा गळा सरकार धरू पाहील हे अशक्यच होते. (स्विस बॅंकात ठेवलेला आपल्या देशातील काळा पैसा परत आणण्याच्या मोहिमेला स्विस सरकार/बँका वाटाण्याच्या अक्षता लावतात ते याच कारणाने. उद्या हा सगळा पैसा भारताने परत आपल्या देशी नेला तर ते त्यांचे मोठे नुकसानच आहे. अशा स्थितीत ते अशा प्रयत्नांना सहकार्य करणार नाहीत हे उघड आहे.) एखाद्या व्यक्तीने हे शिवधनुष्य उचलायचे तर त्याला कंपनी व्यवहाराची बारकाईने माहिती हवी. अशी व्यक्ती साहजिकच कंपनीच्या उच्च वर्तुळातील हवी नि बराच काळ स्वित्झर्लंडमधील मुख्यालयाशी संबंधित हवी. इथेच अॅडम्सला आपण काही करू शकू असा विश्वास वाटला.

परंतु नुसते ठरवणे नि करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. कारण अशा अवाढव्य कंपनीच्या गळ्याला नख लावताना त्यावर आधारित अन्य समस्यांचा विचारही करावा लागतो. रोशचे मुख्यालय असलेली बाझल् नगरी ही संपूर्ण रोशमय झालेली होती. येथील नागरिक हे रोशचे पूर्ण पक्षपाती झालेले होते. याची एकाहुन अधिक कारणे होती. पहिले मह्त्त्वाचे कारण म्हणजे येथील नागरिकांची ही कंपनी मुख्य आश्रयदाती होती. यामुळे अन्नदात्याविरुद्ध त्यांचा पाठिंबा इतर कोणाला - मग भले तो भ्रष्टाचाराविरोधात का असेना - मिळेत हे बिलकुल संभवत नव्हते. (आपल्याकडेही आपण 'कर्मचार्‍यांची संभाव्य बेकारी' ही ढाल पुढे करून अनेक बेकायदेशीर उद्योग कायदेशीर होतात. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमाप पैसा करणारे पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना करायला पैसा नसल्याचे सांगून हात वर करतात, कारवाईची शक्यता दिसताच उद्योग बंद करून कर्मचार्‍यांना बेरोजगार करण्याची धमकी देतात. साहजिकच कर्मचार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे जनमत कंपनीच्या बाजूने झुकते नि या दबावाचा वापर करून असे उद्योग कारवाईतून सूट मिळवतात नि उजळ माथ्याने पुन्हा तसेच धंदे चालू ठेवतात.) तर या मुख्य कारणाने नि अन्य काही दुय्यम कारणाने बाझल् नगरीचे सारे अर्थकारण नि जीवनमानच रोशने ताब्यात ठेवल्याने तेथे असणारा कोणीही तिच्याविरुद्ध ब्र देखील उच्चारू शकत नसे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील बंधने - जसे कुटुंबिय, सुखवस्तू आयुष्याची लागलेली चटक इ. - लक्षात घेता कोणी या फंदात कधी पडेल हे जवळजवळ अशक्य होते. अॅडम्स म्हणतो 'मागे वळून पाहताना एका गोष्टीवरून मला मानवी स्वभावाची मोठी गंमत वाटते. या काळात मी स्वतःला असा प्रश्न कधीही विचारला नाही की एवढ्या लठ्ठ वेतनाला मी स्वतः लायक होतो का? ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का?'
रोशची ऐंशी टक्के उलाढाल ही फक्त दहा उत्पादनांवर अवलंबून होती. यातच त्या काळात परिसच समजली जाणारी अशी लिब्रियम आणि वॅलियम ही दोन ट्रँक्विलायजर्स (Tranquilizers) होती. नागरी नि धावपळीच्या जगण्यात ही औषधे अत्यावश्यक भाग होऊन बसली होती. त्यामुळे या दोन उत्पादनांवरच रोश अमाप पैसा कमवत होती. नेमक्या याच दोन औषधांवर सत्तरीच्या उत्तरार्धात गंडांतर आले.

_______________________________________________________________________________________________
या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.

१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.
२. Ethics (Book Review: Roche versus Adams) - Eike-Henner W. Kludge. In: Canadian Medical Association Journal, 1984, Vol. 130.
३. SWP 17/87 - Hoffman-La Roche v Stanley Adams - Corporate and Individual Ethics - Eric Newbigging


(पुढील भागातः मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश)
हे वाचले का?

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अ‍ॅडम्स

स्टॅन्ले अ‍ॅडम्स:

स्टॅन्ले अ‍ॅडम्स हा तसा सुखवस्तू घरातील, माल्टा (जो आज स्वतंत्र देश आहे) सारख्या छोट्या ब्रिटिश कॉलनीमधे जन्मलेला. तरुण वयातच विविध भाषांमध्ये प्रवीण झालेला हा तरुण मुळातच सुखवस्तू घरचा नि त्यात सुरवातीच्या काळात जहाज-विमा कंपनीचा एजंट, ब्रिटिश वकिलातीचा प्रतिनिधी, हौशी शेतकरी वगैरे बराच काही होता. पण सुखवस्तूपणाला साजेलशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी म्हणून मग तो औषध व्यवसायाकडे वळला. वेगवेगळ्या देशात नि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम तीन वर्षे काम केल्यावर एका बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीत दाखल झाला. इथून दोन वर्षातच त्याला प्रसिद्ध स्विस कंपनी 'हॉफमन-ला रोश' या कंपनीने उचलला. (एकमेकांचे एम्प्लॉई पळवण्यालाही परंपरा आहे पहा, आपल्या आय टी कंपन्यांनी लाज वाटून घ्यायचं कारण नाही.) मुळात स्विस कंपन्या या वरिष्ठ जागांवर फक्त स्विस नागरिकांचीच नेमणूक करत असत. असे असूनही एका माल्ट्न-ब्रिटिश व्यक्तीसाठी रोशने स्वतः गळ टाकावा यावरूनच या पाच वर्षात अ‍ॅडम्सने केलेल्या कामाची पावती मिळते.आधीच्या नोकरीतील अनुभवाचा वापर करून अ‍ॅडम्सने सुचवलेल्या अनेक सुधारणा रोशने मान्य केल्या नि त्याच्या ज्ञानाचा आणि पुढाकार घेण्याच्या वृत्तीचा उपयोग करून घेण्यासाठी त्याला आपल्या विविध ठिकाणी असलेल्या शाखांमधे प्रशिक्षणाला पाठवायला सुरवात केली. त्याचा पगारही अतिशय वेगाने वाढत गेला.आता अ‍ॅडम्सला त्याला हवी तशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती, तीही स्वर्गसमान स्वित्झर्लंडमधे. अशातच महाराज आपल्या सर्वार्थाने गुणी सेक्रेटरीच्या प्रेमात पडले नी चतुर्भुज झाले. अ‍ॅडम्सला स्वर्ग दोन बोटे उरला होता.


हाफमन-ला रोश:

एका धनाढ्य टेक्स्टाईल व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या नि व्यवसायाने बँकर असलेल्या फ्रिट्ज हॉफमान-ला रोश (Fritz Hoffmann-La Roche) याने १८९४ मध्ये मॅक्स कार्ल ट्रॉब (Max Carl Traub) याच्याबरोबर भागीदारी करून स्वित्झर्लंडमधील बाझल्-स्थित एक लहानशी औषधनिर्माण कंपनी ताब्यात घेतली. व्यावसायिक दृष्ट्या खडतर अशा दोन वर्षांनंतर रोशने आपल्या भागीदाराचा हिस्सा विकत घेतला नि कंपनी पूर्णपणे आपल्या कब्जात घेतली आणि हॉफमन-ला रोश कंपनीचा जन्म झाला. कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखाद्या हुकमी उत्पादनाच्या शोधात असतानाच ब्रँडेड उत्पादनाच्या स्वरूपात विविध औषधांचे प्रमाणित डोसेस बाजारात आणण्याची कल्पना सुचली. याचबरोबर हे ब्रँड्स आंतराष्ट्रीय बाजारातही विकता येतील असा त्याचा होरा होता. शक्यतो स्थानिक नैसर्गिक उत्पादनांपासून औषधांना आवश्यक ती रसायने वेगळी करून ती औषधनिर्मितीसाठी वापरावीत असे त्याचे धोरण होते. त्यामुळे विविध देशातील बाजारांसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन केंद्रे स्थापन करणे आवश्यक ठरले. त्यामुळे रोशचे पहिले ब्रँडेड उत्पादन (Sirolin हे कफ सिरप जे कंपनीच्या Thiocol नावाच्या क्षयरोगविरोधी (antitubercular) रसायनापासून बनवले होते) बाजारात येण्यापूर्वीच (१८९८) इटली आणि जर्मनी या दोन देशात रोशच्या स्थानिक शाखा काम करू लागल्या होत्या. १९१२ पर्यंत रोशच्या तीन खंडातील नऊ देशात स्थानिक शाखा निर्माण करण्यात आल्या. रशिया हे फ्रिटझच्या दृष्टीने मोठे मार्केट होते नि त्याने तिथे बर्‍यापैकी बस्तान बसवले होते. परंतु १९१७ मधे डाव्या क्रांतीचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. १९१९ पर्यंत रोश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली होती. अखेर बाझल्-स्थित हेन्डेल्स बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आणि खाजगी मालकीची रोश ही लिमिटेड - भागीदारीतील - कंपनी झाली

त्या काळापासून आजपर्यंत रोशचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. यात अंतर्गत वाढ (Organic growth) तर आहेच पण त्याहूनही मोठा वाटा हा ताब्यात घेतलेल्या अन्य कंपन्यांचा (Inorganic growth) आहे. अ‍ॅडम्सने रोशची नोकरी स्वीकारली त्यावेळी स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि जपान या देशांमधे रोशची उत्पादन यंत्रणा कार्यान्वित होती. याशिवाय जगभर तिच्या विक्री-शाखा पसरलेल्या होत्या. अ‍ॅडम्स रोशचा नोकर झाला नि लगेचच त्याची नेमणूक व्हेनेझुएलामधील रोशच्या नव्या कंपनीचा प्रमुख म्हणून झाली. तेथील अनुभवाबाबत अ‍ॅडम्सने थोडक्यात पण मार्मिक विवेचन केले आहे. तो म्हणतो 'प्रचंड आकार नि केवळ एक कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सुमारे ९० टक्के लोक एवढे दरिद्री होते की त्यांना रोजचे जेवण मिळण्याची मारामार होती. असे असून देखील रोशची येथील वार्षिक सहा लाख स्विस फ्रँक (सुमारे सहा कोटी भारतीय रुपये) इतकी होती.'

हे आकडे १९६९-७० मधील आहे हे ध्यानात घेतले तर एका दरिद्री देशात अन्नाची ददात असताना जीवनसत्त्वांचा व्यापार मात्र तेजीत होता असे म्हणावे लागेल. यातूनच नव्या व्यावसायिक नीतीमधील एक मुख्य तत्त्व अधोरेखित होते, ते म्हणजे 'जिथे गरज नाही तिथे ती व्यवसायाच्या वाढीच्या उद्देशाने ती निर्माण केली जावी.' आणि ही गरजेची निर्मिती कशी केली जाते हे उघड गुपित आहे. यासाठी वापरलेले काही उपाय तर या लेखमालेत पुढे येतीलच.

व्हेनेझुएलातील शाखा अतिशय उत्तम तर्‍हेने प्रस्थापित केल्यानंतर त्याला त्यानेच निवडलेले मेक्सिकोमधे पोस्टिंग देऊ करण्यात आले. अर्थात यापूर्वी त्याला त्याची मनपसंत लक्झरी कार नि तीन महिन्याची भरपगारी सुटी देण्यात आली होती. पण सुटीवरून परतलेल्या अ‍ॅडम्सला सांगण्यात आले की त्याचे मेक्सिकोतील पोस्टिंग रद्द करण्यात आले आहे. काही काळातच त्याच्या लक्षात आले की ज्या व्यक्तीला हटवून त्याची नेमणूक झाली ती अतिशय पोचलेली असामी होती. कंपनी नि स्विस सरकार यांच्या बड्या बड्या धेंडांपर्यंत त्याचे हात पोहोचलेले होते. यावर अ‍ॅडम्स मार्मिक टिपण्णी करतो. तो म्हणतो 'तुम्हाला (कामाविषयी) काय माहिती आहे यापेक्षा कोणकोण माहिती आहेत हे स्वित्झर्लंडमधे अधिक महत्त्वाचे ठरत असे, रोशदेखील याला अपवाद नव्हती.' यानंतर अ‍ॅडम्सला कॅनडा नि लॅटिन अमेरिकेच्या डिविजनल मॅनेजरची जागा बहाल करण्यात आली. यानंतरच रोशचे अवाढव्य साम्राज्य नि त्यांची ’व्यवसायाभिमुख’ कार्यपद्धती, नैतिकतेची केलेली ऐशीतैशी इ. गोष्टी अ‍ॅडम्सला जवळून पाहता आल्या, नि इथून त्याच्या मनात स्वार्थ नि नैतिकता यातील द्वंद्व सुरू झाले.

रोशच्या व्यावसायिक नीतीमत्तेची पहिली चुणूक अ‍ॅडम्सला त्यांच्या वेतनपद्धतीत दिसली होती.रोशची वेतन देण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. यात प्रत्येक पोस्ट साठी निश्चित मासिक वेतन असे जो सर्वांना माहित असे. परंतु या मासिक वेतनाचे वर्षाला बाराच हप्ते मिळत असे नाही. उत्तम काम करणार्‍या वा मर्जीतल्या व्यक्तीला तेरा किंवा त्याहून अधिक हप्ते दिले जात. यामुळे इतर सेवकांना सदर व्यक्तीचे नेमके वेतन किती हे समजणे अवघड जाई. याच वेतनपद्धतीची एक काळी बाजू ही होती (जी आजही आपले अस्तित्व राखून आहे. एवढेच नव्हे तर चांगले हातपाय पसरून ऐसपैस बसली आहे नि आपल्या देशासारख्या अनेक देशांची निर्याताभिमुख अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून आहे.) ती म्हणजे तिच्या दुसर्‍या नि तिसर्‍या जगात असलेल्या कर्मचार्‍यांच्या नि युरपमधील कर्मचार्‍यांच्या वेतनात असलेली प्रचंड तफावत. (आउट्सोर्सिंगची सुरवात आपण समजतो तशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यानी सुरू केलेली नसून रोशसारख्या औषध कंपन्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच याचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.) अशा वेळी अ‍ॅडम्ससारखा एखादा युरपियन अधिकारी जेव्हा व्हेनेझुएलासारख्या लॅटिन अमेरिकन देशात शाखा उभारणीसाठी अथवा व्यवसायवृद्धीसाठी जाई तेव्हा त्याचे मूळ वेतन तर त्याला मिळावे पण ते किती याची माहिती स्थानिक समकक्ष अथवा एक दर्जा खाली असलेल्या कर्मचार्‍यांना मिळू नये यासाठी हे वेतन दोन भागात दिले जाई. पहिला भाग हा स्थानिक वेतनाच्या प्रमाणात त्या त्या देशी अदा केला जाई तर उरलेला भाग हा स्विस बँकेतील त्याच्या खात्यात जमा केला जाई. यामुळे त्या कर्मचार्‍याला या दुसर्‍या भागावर त्या देशातील स्थानिक करही द्यावा लागत नसे. आजही अशा विभाजित वेतनाची पद्धत रूढ आहे. हा दुसरा भाग आता पर्क्स, स्टॉक ऑप्शन्स, पेड हॉलिडे अशा स्वरूपात दिला जातो इतकेच.

खुद्द रोश आणि अ‍ॅडम्स यांच्याशिवाय आणखी काही व्यवस्था पुढील घटनाक्रमात सहभागी होत्या. यात ई.ई.सी. या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी युरपियन इकनॉमिक कम्युनिटी (European Economic Community), युरपियन आयोग (European Commission), युरपियन संसद (European Parliament), स्विस सरकार नि स्विस न्यायव्यवस्था यांचा प्रामुख्याने सहभाग होता. (विस्तारभयास्तव या व्यवस्थांबाबत अधिक माहिती लिहिणे टाळले आहे, दिलेल्या दुव्यांवरून अधिक माहिती मिळवता येईल.)


_________________________________________________________________________________

या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.


१. Traditionally Ahead of Our Times (Roche official release, 2008)

२. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.(पुढील भागातः रोशची कार्यपद्धती)

हे वाचले का?